आठवतंय मला गाढ झोपेत असे मी. आसपास मला जाणवे ती. कोण ही ? कुठून येते ! मला जागवते ! कळेना मला हा स्वप्नातला जागेपणा ! का जागेपणीचे स्वप्न. कसले हे भास आणि आभास!पण ती मात्र नक्की तीच ती होती.
हळुवार ऊठवायची. पण दिसायची नाही. झोपू पण द्यायची नाही.
नेहमीचंच झालं आणि हे भास ओळखीचे झाले. मनापासुन मी त्यांची वाट पाहू लागलो. बहुदा स्वप्नातच ती अशी येते, कारण दिवसा कधी जाणवत नसे.
आजी म्हणायची पहाटेची स्वप्नें खरी होतात. मग हे ही सत्यात ऊतरणार का ?
ती मनात ठसली… आवडली… काळजात हक्काची जागा घेऊनच बसली. ती आवडली तरी आता हे आभास छळायला लागले होते. आतुन अस्वस्थ होत होतो. भिती वाटत होती … ही हातातुन निसटणार तर नाही ?
अस्तित्व तर कळतंय मग स्वप्नांच्या हिंदोळ्यावर का अजुन झुलते आहे.
मला ती अगदी माझी अशी… जवळची वाटायची .. पण.. पण ..तिच्याकडुन प्रतिसाद नाही. मला ती दिसायला हवी होती. बघायची होती ती डोळे भरून. वाट पहाणे भारी जीवघेणे होते तरी तिची ओढ वाढत गेली… त्यात माधुर्य भरून राहिले. ती मला स्वप्नात सुद्धा समजुन घेत नव्हती आणि मी मात्र जीवाच्या आकांताने तिला हृदयात खोलवर जपत होतो. मला ती माझी म्हणुनच हवी होती.
ती दिसत तर नव्हती मग मानसीचा चित्रकार तिच्या प्रतिमांचे सुंदर सुंदर अविष्कार स्वप्नात दाखवू लागला. नवनविन शब्दांमधे तिचे वर्णन मनीचा कवी करू लागला.
तिच्या आठवणी जागेपणी छळायच्या आणि स्वप्नात ती सतावत राहायची.
भावनांचे रंगीबेरंगी आणि वेगवेगळे अविष्कार मनात खेळ मांडत राहिले
आता स्वप्नी तर मुक्काम होताच पण हल्ली कधी कधी दिवसाही जाणवू लागली.
आजच सकाळी खिडकीतुन फुललेल्या जाई जुईंचा सुंदर वास खोलीत शिरला. खिडकीत डोकावलो तर जाई जुईंच्या कळ्याफुलांशी खेळताना तीच दिसली. काळजातली माझी प्रतिमा व ती अगदी सारख्याच होत्या. बाहेर अंगणात पोहोचेपर्यंत ती गायब.
मध्ये एकदा प्राजक्ताखाली अंगावर सांडणाऱ्या फुलांना झेलत होती. कोमलतेचे ते दर्शन मला वेडाऊन गेले.
कधी लवकर बाहेर पडलो तर झुंजूमुंजू पहाटे सुगंधाच्या घमघमाटात, नभातल्या शुक्राच्या चांदणी च्या जागी हीच मला वेडाऊन दाखवत होती. आता पक्की ओळखू लागलो. पण क्षणात पसार व्हायची.
कधी भर गर्दीत घामेजल्या चेहेर्यांच्या सोबतीने कधी भुकावलेल्या मनांच्या संगतीने ही पण … हो!तीच भराभर चाललेली दिसे. कधी पाठमोरी तर कधी कोपर्यात. आता ती माझाही अंदाज घ्यायला लागली. मी पण नजरेला नजर भिडवयच्या तयारीत तर ही छूं मंतर. मी झोपेतुन जागा व्हायचो… स्वप्न खरं करायला बघायचो.. पण ती मला समजुन घेतच नव्हती. मी मात्र स्वप्न.. जागेपण. यात ठेंचकाळत नादखुळा झालो होतो.
एकदा इंद्रधनुच्या कमानीवर झुलताना.. एकदा झिम्माड पावसात चिंबभिजताना… कधी गोठ्यात वासराशी खेळताना .. तर कधी भर माध्यान्ही शांत जलाशयाच्या दर्पणी तरूवेलींच्या स्थिर प्रतिबिंबांशी खेळताना दिसली. कूठे कूठे दिसायची.. पण दूरवरूनच निघुन दिसायची. मनीची आस अतृप्तच राहिली. पण अजुनही निराश झालो नव्हतो.
अशीच एकदा एका हिरवाईने नटलेल्या गावात.. निळुल्या नदीच्या पाटाजवळ एका दगडावर पाण्याचे तुषार अंगावर घेत बसलेली दिसली. बाजुला सुरंगीचे झाड कळ्याफुलांनी बहरले होते आजूबाजू दोन तीन मोर व एक लांडोर पदन्यास करत फिरत होते. तिथे मी बसणार तर ही दिसेचना.
एकदा कहर झाला. सांज झाली आणि आकाश भरुन आलं वारा सुसाट झाला. वीजही चेकाळल्यासारखी घाबरवायला लागली एकाएकी बेधुंद पाऊस सुरू झाला. पावसा खेरीज काहीच हालचाल नव्हती आणि मी झपाझप घरी चाललो होतो. मनात काही गुणगुणत होतो कारण मला असा पाऊस खुप आवडतो. बहुदा माझे असे आनंदी गुणगुणणे आणि बाहेरचे रौद्ररूप तिलाही आवडले असणार आज तीच एकदम जवळ आली. अलगद् तिचा नाजुक हात माझ्या हाती अडकवला. पूर्ण विश्वासाने माझ्या दमदार आणि रूबाबदार पावलांवर जणू ती सप्तपदीच्याच थाटात चालू लागली. मी मात्र साशंक होत हाताला चिमटा घेऊ लागलो. हे स्वप्न का सत्य आहे ?
खात्री केली हा भासही नव्हे आणि आभासही नव्हे.
माझी मनाची तीव्र ओढ… मनाच्या गाभार्यापासुनची आवड… आपुलकी.. आणि तिच्यासाठीची खरीखुरी आसक्ती .. तिलाही समजली… जिव्हाळा वाढला… जळी स्थळी काष्ठी दिसुन ती मला निरखत होती. अंदाज घेत घेत शेवटी मला वश झाली.
मी आपला इतके दिवस शब्द.. अर्थ.. भावना.. ओढ. कल्पना सगळ्या चक्रव्हुवात सापडलो होतो. भावनांच्या जाळ्यात अडकलो होतो. तिला सतत पाठलाग करत दूर मात्र जाऊ दिलं नाही.. हातातुन निसटू दिलं नाही कारण मला ती फक्त तीच हवी होती अगदी मनापासुन मी तिच्यात गुंतलो होतो माझ्या इच्छेनेच.
माझे स्वप्नातील झुरणे तिच्यापुढे ऊलगडत गेलो हे ती ही समजत गेली. अंत:करणातुन तीही ऊमलत… फुलत आली आणि आज ती पूर्ण माझी झाली. ओळख पटली.. नाते पक्के झाले.. ते तिनेसुद्धा स्विकारले. संपले भास आणि आभास. सरली ती जिवघेणी स्वप्ने.
माझी होऊन ती आता माझ्या मनाच्या कागदावर एखाद्या स्वामिनीच्या तोर्यात शब्दांचा पद्न्यास करत… काळजातला कल्लोळ समजुन घेत.. सुंदर रूपगर्वितेच्या देखण्या रूपात भावनांचे अविष्कार रंगवू लागली. जनमानसात माझीच म्हणुन रूबाबात मिरवू लागली.
माझ्या प्रेमामुळे दिसामासी तिचे सौंदर्य निरखत रहावे असे खुलायला लागले. तेजस्वी ओजस्वी अशी झळकायला लागली.
तिचा माझ्यावर विश्वास केव्हाच बसला होता पण ती माझी परिक्षा घेत होती. खात्री पटवून घेत होती.
मी तिच्या पसंतीस ऊतरलो व ती … तीच ती माझी प्रतिभा … आणि माझा संसार कागदावर सुखाने नांदायला लागला.
मला तिची तीव्र आसक्ती होती. ती अचानक छूं मंतर करेल म्हणुन मी तिला जराही नजरेआड होऊ देत नव्हतो.
माझ्या भावनांशी तिची रेशीमगाठ घट्ट बांधून वावरत होतो. अंत:करणापासुन जपत होतो.
मी आणि माझी देखणी प्रतिभा असे कागदावरच्या संसारात रममाण होत सुखी झालो आहोत.
— लेखन : अनुराधा गो. जोशी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800