Saturday, April 13, 2024
Homeलेखप्रदक्षिणेचे महत्व

प्रदक्षिणेचे महत्व

प्रदक्षिणा म्हटले की आधी प्रश्न येतो तो श्रद्धेचा ! देव किंवा देवाचे अस्तित्व न मानणारे किती लोक आहेत माहित नाही पण देवावर, देवाच्या अस्तित्वावर श्रद्धा असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे हे निर्विवाद !

आपल्या संस्कृतीचा पायाच मुळी श्रद्धा आहे. अगदी शास्रज्ञांपासून ते समाजातील सर्व स्तरांतील लोकांपर्यत देव मानतात.
शास्रज्ञांनी तर देव कण शोधण्याचाही प्रयत्न केला हे आपल्याला माहित आहे.

जे लोक देव मानत नाहीत किंवा देव ही संज्ञा देऊ इच्छित नाहीत ते त्याला निर्मिक ही संज्ञा देतात. इतके पद्धतशीर पणे विश्व चालवणारी कोणी तरी अज्ञात शक्ति आहे हे ते मानतात. कारण निसर्गातील सर्व प्रकारची विविधता व नियमितपणे चालणारा सृष्टीक्रम पाहता हे निसर्गचक्र सांभाळणे साधे काम नाही. अहो, नुसत्या माणसाच्या शरिराचे व शरीर व्यापाराचे उदा. घेतले तरी तो अद्भूत चमत्कार वाटतो. ह्या झाल्या शास्रीय गोष्टी !

आपल्या साधुसंतांनी तर देवाशी साक्षात संवादाचे पुरावे लिहून ठेवले आहेत. अभंगवाणीतून ठाई ठाई त्याचा साक्षात्कार आपण वाचला आहे. तरी हे थोतांड मानून त्याचे विविध अर्थ काढणारे लोकही आहेत. सर्व धर्मात प्रार्थना होतात. फक्त प्रत्येकाची रीत निराळी आहे आणि ते अत्यंत स्वाभाविक आहे. देव एकच आहे फक्त त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रत्येकाने आपल्या मतीने व मताने निवडला आहे हे सत्य आहे.

मग आता परिक्रमा.. वा प्रदक्षिणा या विषयी बोलायचे तर आधी श्रद्धा असणे गरजेचे आहे तरच त्यावर बोलण्यात अर्थ
आहे. आता विज्ञानयुगात परिक्रमा कमी झाल्या असतील तर त्याची कारणे अनेक आहेत. प्रदक्षिणा कमी झाल्यात म्हणून श्रद्धा कमी झालेली नाही व परिक्रमा थांबलेली नाही. आपण सहजपणे देवळात गेलो तर एकतरी प्रदक्षिणा नक्की करतो इतकी श्रद्धा मनात मुरली आहे. नर्मदा परिक्रमा तर मोठ्या श्रद्धेने चालू आहेत.

ज्ञानदेवांचे मातापिता, विठ्ठलपंतांनी विवाह करूनही त्यांचे संसारात मन न लागल्यामुळे रूख्मिणीबाईंना त्यागून ते गुरूच्या शोधात थेट काशीस श्रीपाद रामानंद स्वामींच्या मठात निघून गेले व तेथे त्यांनी संन्यास घेतला. ज्यांनी संन्यास दिला रामानंद स्वामी तीर्थयात्रा करत आळंदीस आले असता त्यांना रूख्मिणीबाई अश्वत्थाला प्रदक्षिणा घालतांना दिसल्या. रूख्मिणीबाईंनी नित्यक्रमानुसार साधूमहाराज दिसताच वाकून नमस्कार केला व ते सहज पुत्रवती भव म्हणाले असता त्या दचकल्या व पतीने संन्यास घेऊन ते काशीस असल्याचे सांगताच स्वामींच्या लक्षात आले की विठ्ठलपंत म्हणजेच चैतन्य स्वामी ज्यांना त्यांनी नुकतीच दिक्षा देऊन त्याच्यावर भार सोपवून ते यात्रेस बाहेर पडले होते. ते रूख्मिणीला घेऊनच काशीला परतले व विठ्ठलपंतांच्या हवाली रूख्मिणीला सोपवून गृहस्थाश्रमाची आज्ञा दिली. दोघे आळंदीस परतले व निवृत्तीनाथादी थोर विभूती जन्माला आल्या.

आपण आज ही परिक्रमेवर विश्वास ठेवून आहोत. खेड्यापाड्यातून अजूनही महिला प्रदक्षिणा घालतांना दिसतात. अखंड नामस्मरण करत देवाची सेवा करण्याचा भाव व भक्ति त्यात असते. कुणाला अंधश्रद्धा वाटण्याचा संभव आहे पण मागे ही एकदा हा अनुभव मी शेअर केला होता. माझा देवावर विश्वास आहे पण मी अंधश्रद्ध नाही. सृष्टीचा चालक व पालक म्हणून मी त्याच्याकडे बघते. मी परिक्रमा वगैरे कधी केल्या नाहीत पण श्रद्धेने मंदिराला फेरी मारते. पण माझ्या मामी मात्र फार श्रद्धाळू होत्या व त्या जमेल तेव्हा पिंपळाला फेऱ्या मारत असत. फार जुनी व सत्य घडलेली घटना आहे. नाशिकला त्या आल्या असता त्यांच्या समवेत मला दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्रात जाण्याचा योग आला.

भर उन्हाळ्याचे दिवस होते. आमच्या कारने आम्ही दिंडोरीला पोहोचलो. जमिनीवर पाय ठेववत नव्हता इतकी तापलेली. चप्पल लांबवर काढून चटके सोसत आम्ही समर्थांच्या मंदिरात पोहोचलो. दर्शन घेतले. मामी म्हणाल्या, आता ११ प्रदक्षिणा
करू पिंपळपारा भोवती. नाही म्हणणे शक्य नव्हते. मनात म्हटले, बाप रे! केवढे पाय भाजताहेत ! आणि ११ प्रदक्षिणा ?
मंडळी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कडक ऊन, निरभ्र आकाश, ढगांचा मागमूस नाही, आणि माझ्या मनात उन्हाचे विचार चालू
असतांना साड साड साड पावसाचे थेंब पडू लागले व क्षणार्धात अंगण भिजून ओले झाले ! मी आश्चर्याने थक्क! मामींना माझ्या मनातील घालमेल माहित नव्हती. मी मात्र चकित झाले. तुझे पाय भाजतात काय ? घे, अंगण ओले करतो. एकच मिनिट पाऊस पडून अंगण ओले करून थांबला. ह्या प्रसंगाचा कोणी कसाही अर्थ काढो, फक्त मला घडलेली घटना मी सांगितली बस्स !

ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. अजूनही लोक प्रदक्षिणा करतात. कोणी म्हणतो, व्यायाम होतो, कुणी म्हणतो ॲाक्सिजन मिळतो. ठीक आहे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्याच्या मुळे कोण काय करतो त्याला नाक मुरडण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही कारण ते त्याचे स्वातंत्र्य व त्याची भावना आहे, आपण साऱ्यांचाच आदर केला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट ही व्यक्तिसापेक्ष असते.असो….
सहज म्हणून विचार मांडले आहेत .. ते फक्त माझे नि माझेच आहेत …
धन्यवाद.

प्रा. सुमती पवार

— लेखन : प्रा.सौ.सुमती पवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खरंच आहे ताई श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments