“प्रयत्नांती परमेश्वर” या विषयावरील महत्त्वपूर्ण अशी समर्थ रामदास स्वामींची ओवी वाचल्यानंतर, तिची महत्ता लक्षात येते.
“कोशिश करने वालों की कभी हार नही होती !” हे माझं ब्रीदवाक्य आहे आणि यातील “कभी” हा शब्द मला खूप महत्त्वपूर्ण वाटतो. याचे महत्त्वपूर्ण कारण असे की, आपण प्रयत्न करतो, कधी ते प्रयत्न तोकडे पडतात, त्याकरीता पुन्हा-पुन्हा प्रयत्नांची गरज असते. शेवटी एक वेळ अशी येते की, आपण आपल्या प्रबळ प्रयत्नांनी त्यात यशस्वी होतो.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी, त्यांच्या ग्रामगीतेतील “प्रयत्न प्रभाव” या ३५ व्या अध्यायातील ओवीमध्ये म्हटलेले आहे-
“जन्म हाची इच्छेचा खेळ !
जगी अनेक इच्छांचा मेळ !
तेथे संघर्ष असे अटळ !
सुख-दुःख फळ कर्माचे !!”
याकरीता आपले उत्तमोत्तम कर्म तसेच खरे व प्रामाणिक प्रयत्न अतिशय महत्त्वाचे असतात.
“करावे काम, खरा तो दाम,
प्रभू नामाची गरज काय ?”
आपले मन जर विचारी असेल आणि ते आपल्या काबूत असेल तर, चार धामांची सुद्धा गरज नाही. ज्याचे जीवन सेवाधर्मा करिता समर्पित आहे त्याला गुरु मंत्राची काही गरज नाही. ज्याला खोटेपणा अजिबात पटत नाही, जो फक्त आणि फक्त खऱ्याच गोष्टींचा पुरस्कर्ता आहे, त्याला ग्रंथपठणाची काही एक गरज नाही. मृत्यू समोर ठाकलेला असतांना ज्याचे मन पूर्णत: निडर आहे, त्याला कुणाच्याच सोबतीची आवश्यकता नाही. जेव्हा आपण वरीलप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपण आयुष्याने असे सर्वकाही भरभरून दिले असतांना, जे नाही त्याचा, त्या गत आयुष्याचा हिशोब ठेवायचा तरी कशाला ? हा आपला नश्वर नरदेह शेवटी मातीतच ठेवायचा आहे, तेव्हा आपण सदोदित उत्तमोत्तमच कर्म करीत राहायला हवे. तसेच काळाच्या क्रियाशील अशा वाहत्या लाटांमध्ये दिवसरात्र, वर्षांचा हिशोब ठेवण्याची काहीएक गरज नाही.
आपण जगनियंत्याची वेगवेगळी रुपे जरी मानली असली तरी, सर्व चराचरात वसणारा ‘खरा सूत्रधार’ मात्र तो एकच आहे. विधात्याने रचलेल्या नाटकात आपण सामान्य कलाकार आहोत. त्यामुळे त्याने ठरविल्या नुसारच आपल्या जीवनाला आकार मिळेल. सुख-दुःख हे तर येतच राहणार आहे, परंतु निराशेतूनही आनंदाला शोधावे लागेल. त्याकरिता आपले जीवन जरी कष्टी असले तरी त्या कष्टातूनच यशाला कवटाळावे लागेल.
“प्रारब्धवादी शिथील झाला !
प्रयत्नवादी चेतना पावला !
शोध करीत पुढे गेला !
दिगंतरी !!”
वरील ओवीनुसार येथे आवर्जून सांगावेसे वाटते की, याकरिता प्रारब्धावर अवलंबून राहता कामा नये. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील स्व.बाबा आमटे यांनी स्थापन केलेली “कुष्ठरोग्यांची वसाहत.” वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मा.प्रकाश आमटे यांनी स्थापन केलेली ‘हेमलकसा’ येथील कुष्ठरोग्यांची वसाहत. वडिलांचे काम मुलाने नेटाने पुढे चालू ठेवले, हा पुरुषार्थ त्यांनी गाजविला.
अनाथांच्या माई स्व.सिंधुताई सपकाळ, यांनी सततच्या कष्टाने अनेक मुलांच्या आयुष्याची होणारी परवड थांबविली, त्या सगळ्यांच्या आई झाल्या, हा सुद्धा पुरुषार्थ आहे.
आणखीन नावे सांगायची तर मॉं अहिल्याबाई, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती संभाजी महाराज, अशी कितीतरी नाव घेता येतील, ज्यांनी कष्टाने साम्राज्य वाचवले, उभे केले.
कष्टसाध्य सर्व गोष्टी असतात पण माणसाला आयते खाण्याची फार सवय झालेली असते आणि त्यामुळेच भ्रष्टाचार बोकाळतो. कमी कष्ट आणि जास्त पैसे अर्थात लायकी नसतांना मिळाले की, त्याची किंमत शून्य होते. पैसे आपण कष्टसाध्य मिळवतो पण जेव्हा खर्च करतो तेव्हा सुद्धा अक्कल हवी. म्हणून कष्ट करून भाकरी मिळविंणे ही सर्वात समाधानाची गोष्ट आहे.जीवनात कष्टाला पर्याय नाही. “जो थांबला तो संपला.” या म्हणीच्या संदर्भानेच मी हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद !
— लेखन : डॉ.माया यावलकर. वरूड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
प्रयत्नांती परमेश्वर हा माया ताईंचा लेख अतिशय प्रेरणा देणारा आहे.बाबा आमटे, प्रकाश आमटे, सिंधुताई,
छत्रपती शिवाजी महाराज,माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, समर्थ रामदास अशा मौल्यवान रत्नांची उदाहरणं देऊन कष्टसाध्य यश मिळवण्याचा फार मोलाचा
संदेश दिलेला आहे.कष्ट न करता फुकटात कसं मिळेल, ताबडतोब
कसं मिळेल ही वाईट वृत्ती वाढीस लागत आहे. त्यामुळे
सकारात्मक ऊर्जा देणारा,मनाला चांगलं वळण लावणारा
हा सुंदर लेख आजच्या तरुणांना योग्य दिशा देणारा आहे.
धन्यवाद माया ताई.
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई.
प्रयत्नांती परमेश्वर
हा माया ताईंचा लेख
आहे सर्वांगसुंदर
वाचून मिळते ऊर्जा
येतो आनंदाला बहर
छत्रपती शिवाजी महाराज
माता जिजाऊ, अहिल्याबाई
यांच्या उदाहरणांसह
प्रेरणा देतात बाबा आमटे, सिंधुताई
माणसाला सारं काही शक्य आहे
मात्र प्रयत्न पडतात तोकडे
कष्ट न करता कसं मिळेल या मनोवृत्तीतून
माणसाचं लक्ष असतं फुकटच्या गोष्टींकडे
समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक
आणि दासबोधाची आठवण झाली
माया ताई आपला लेख वाचून
मरगळलेल्या मनाला फार मोठी प्रेरणा मिळाली
खूप खूप धन्यवाद ताई.
राजेंद्र वाणी, दहिसर मुंबई