महाराष्ट्र शासनातून माहिती संचालक म्हणून निवृत्त झालेले प्रल्हाद जाधव यांना लेखक आणि नाटककार म्हणूनही ओळखले जाते. विशेषतः दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत कुठे ना कुठे त्यांची नाटके हमखास होत असतात. त्यातही त्यांच्या ‘शेवंता जित्ती हाय ! या आगळ्या नाटकाचा प्रयोग कुठे ना कुठे ठरलेलाच असतो.
यावर्षी म्हणजे ६२ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत होणारी प्रल्हाद जाधव यांची ३ नाटके सादर होत आहेत. ती अशी :
१. विठू माझा लेकुरवाळा
२३ नोव्हेंबर सोलापूर.
सादरकर्ते : भारतीय क्रीडा शिक्षण व नाट्य मंडळ सोलापूर स्थळ : हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर
दिग्दर्शक : सुमित फुलमामडी.
२. शेवंता जित्ती हाय !
४ डिसेंबर मुंबई.
सादरकर्ते : सचिवालय जिमखाना, मुंबई
स्थळ : साहित्य संघ मंदिर गिरगाव
वेळ : सायंकाळी ७.०० वा.
दिग्दर्शक : सुगत उथळे.
३. सुजाता मेली न्हाय !
८ डिसेंबर मालवण.
सादरकर्ते: अक्षरसिंधू साहित्य कलामंच, कणकवली
स्थळ : मामा वरेकर नाट्यगृह मालवण
वेळ: सायंकाळी ७.०० वा.
दिग्दर्शक : विजय चव्हाण.
प्रल्हाद जाधव यांचे ‘शेवंता जित्ती हाय !‘ हे नाटक गेली ३३ वर्षे महाराष्ट्रात विविध स्पर्धांमध्ये कोठे ना कोठे सतत होत असते. अलीकडच्या काळातील हा एक विक्रमसुद्धा ठरू शकतो. या नाटकात अशी काय जादू आहे ते जाणून घ्यायचे असेल तर त्याचा प्रयोग पाहणे किंवा त्याची स्क्रिप्ट मिळवून वाचणे याला पर्याय नाही. महाराष्ट्राबाहेर हिंदी आणि छत्तीसगढी भाषेतही त्याचे प्रयोग झाले आहेत. विविध महोत्सवात अधून मधून त्याचे प्रयोग होतच असतात. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज आणि नामवंत रंगकर्मींनी या नाटकाविषयी अनेकदा गौरवोद्गार काढले असून संबंधित तपशील जाणून घ्यायचा असेल तर जाधव यांना फोन करून जिज्ञासूंना तो जाणून घेता येईल. या नाटकावर चित्रपट तयार करावा असे प्रस्ताव अधून मधून त्यांना प्राप्त होत असतात पण दर्जेदार आणि खात्रीच्या निर्माता-दिग्दर्शकाच्या अभावी अजून ते काम मार्गी लागलेले नाही. जाधव यांनी स्वतः या नाटकावर सिनेमा लिहिला असून ती संहिता त्यांनी ‘स्क्रीन रायटर्स असोसिएशन’कडे अधिकृतरित्या नोंदवलेली आहे.
शेवंता जित्ती हाय ! हे नाटक इतकी वर्षे जिवंत आणि ताजेतवाने कसे राहिले याचा विचार, कोरोना काळात मिळालेल्या निवांतपणात जाधव करत होते. या नाटकाची रसिक प्रियता लक्षात घेऊन त्याच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित एक नाट्य-शृंखला करावी असे त्यावेळी त्यांना वाटले आणि म्हणून त्यांनी त्या शृंखलेतील दुसरे नाटक ‘सुजाता मेली न्हाय’ हे अलीकडे म्हणजे ‘शेवंता’ला सुमारे ३० वर्षे झाल्यानंतर लिहिले. त्याचा पहिला प्रयोग आता मालवण केंद्रावर आठ डिसेंबरला होत आहे. त्याच मालिकेतील तिसरे नाटक ‘संगीता हाय का न्हाय?’ या नावाचे असून ते यावर्षी लिहून पूर्ण होईल असे जाधव म्हणतात. या तिन्ही नाटकांचा केंद्रबिंदू ‘स्त्री आणि स्त्रीचे दुःख’ असा आहे…या तीन नाटकांच्या लेखन प्रकल्पाला जाधव यांनी ‘नाट्य-त्रिवेणी’ असे नाव दिले असून ही माहिती महाराष्ट्रातील रंगकर्मींसमोर या टिपणाच्या रूपाने प्रथमच येत आहे…
प्रल्हाद जाधव यांनी आजपर्यंत किमान १६ नाटके आणि तितक्याच एकांकिका लिहिल्या असून त्यांचे सर्वत्र प्रयोग होत असतात. (नाटके : शेक्सपिअर गेला उडत, विठू माझा लेकुरवाळा, हिरण्यगर्भ, शेवंता जित्ती हाय, एक कप चहासाठी, राजदंड, या भुतांनो या !, यमक, भूमिका, चेटूक, लेडीज सायकल, दोन घडीचा डाव, डोन्ट वरी बी हॅपी !
एकांकिका : कुलकर्णी व्हर्सेस देशपांडे, कृष्णाजी केशव, (मुंबई विद्यापीठात एस.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट) पाचूचे बेट, चिमूटभर अंधाराचा स्वामी, आचार्य देवो भव, गेला मोहन कुणीकडे ?, ऑपरेशन दगड, पक्षी जाय दिगंतरा, हरवले ते गवसले का ?, युद्धविलाप, मरणगंध इत्यादी.) ‘कृष्णाजी केशव’ ही त्यांची एकांकिका मुंबई विद्यापीठात एस. वाय. बी. ए. च्या अभ्यासक्रमात अभ्यासाला लावण्यात आलेली आहे. त्यांना नाटक- एकांकिकांच्या लेखनासाठी खाजगी संस्थांची आणि शासनाची इतकी पारितोषिके मिळाली आहेत की त्याचे रेकॉर्डही त्यांनी ठेवले नाही. त्यांचे चाहते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत असे सांगितले तर त्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही.
कोरोनाच्या दोन अडीच वर्षाच्या कालखंडात जाधव यांनी ‘घराकडे आपुल्या…’, ‘जरा हळू !’ आणि ‘सुजाता मेली न्हाय !’ ही तीन नवी नाटके लिहिली. या नाटकांचे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर व्हावेत यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘पाझर’ नावाची संपूर्ण लांबीची एक चित्रपट कथाही त्यांनी या काळात लिहिली असून त्या अनुषंगाने पुढे काय करता येईल या प्रयत्नात ते आहेत.
जाधव आपल्या भिडस्त आणि संकोची स्वभावामुळे आपल्या लेखनाविषयी कधी कुठे फार काही बोलताना दिसत नाहीत…ते फक्त एवढेच म्हणतात, “माझे काम मी करीत आहे आणि पुढेही करीत राहणार आहे !”
त्यांना आमच्या शुभेच्छा !
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
आदरणीय जाधव साहेब एक द्रष्टे विचारवंत साहित्यिक आहेत. त्यांची एक स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण शैली व विचारसरणी आहे. त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वास सलाम आणि हार्दिक अभिनंदन