उलटून पाने मी पाहता
आठवांचे क्षण उलगडले
एका एका स्मृतींनी त्या
किती आनंदाश्रु ओघळले !
होता जोष होता उल्हास
किती धावत पळत होतो
अजुनी त्या क्षणांत रमता
आतल्या आत सुखावतो !
जड झाले ओझे असं
मी कधीच म्हणणार नाही
आनंदाला कसर नव्हती
मी कधी विसरणार नाही !
अनेकां सारखा संसार केला
दोन नातवंडेही झाली
त्यांच्या बाललीला पाहून
माझी गतस्मृति चाळवली !
वात दिव्याची मंद जाहली
कधीतरी होणारच होती
थकली तनु कायाही थकली
आता कसली हो भीती ?
नेत्रसुखाने भारावलेला
कार्यपुर्तीने सुखावलेला
समस्तांना सुखी ठेव
हीच प्रार्थना ईश्वराला ! !

— रचना : सुनील श. चिटणीस. खेड – रत्नागिरी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800