Wednesday, October 9, 2024
Homeयशकथाप्रेरणादायी - प्रा नागेश हुलवळे

प्रेरणादायी – प्रा नागेश हुलवळे

मनुष्य जीवनात अनेक चढउतार भरलेले त्यातून मार्ग काढीत आपले जीवन यशस्वी करण्यासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या प्रा नागेश सोपान हुलवळे ह्या तरुणाची ही जीवनकहाणी अनेक तरुणांना निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहे .

नागेशजींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या जांभळे या छोट्याशा गावात झाला. अवतार मेहेरबाबांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेला हा परिसर ! आईवडील व दोघे भाऊ असे त्यांचे पाच जणांचे समाधानी कुटूंब! जिरायती शेतीमुळे उत्पन्न बेताचेच. पण आईवडिलांची शिकवण खुप चांगली होती. वडिलांचे शिक्षण फक्त मॅट्रिक पर्यंतच झालेले. त्यामुळे मिळेल ते काम करीत त्यांनी मुलांवर चांगले संस्कार केले. काटकसरीने आनंदात राहणे शिकवले. मुलांना श्रीमंती थाटाचे राहणीमान जरी देता आले नाही तरी त्यांना उत्तम संस्कार दिले.

नागेशजी लहानपणापासून सगळ्यांचे लाडके होते. खूप भावुक, थोडसं जरी मनासारखं झालं नाही तर त्यांना राग येई पण तो मनातच! त्यांचे वडील कामासाठी मुंबईला होते. त्यामुळे नागेशजी मामाकडे राहू लागले. लहानपणापासुन कष्ट करण्याची सवय होतीच. जांभळे ते ब्राम्हणवाडा हे सहा कि .मी अंतर शाळेसाठी रोज चालावेच लागे. त्यांना इयत्ता १०. वी ला असताना वडिलांनी जुनी सायकल घेऊन दिली. बी .ए, एम .ए करतांनाही त्यांना बरेच कष्ट करावे लागले. भावंडात सगळ्यात मोठे असल्याने जबाबदारीही वाढली होतीच. २००४ मध्ये मुंबईत येऊन खाजगी शिकवणी करत विविध कौशल्य प्रशिक्षण घेत त्यांनी बी एड केले. प्रारब्धापेक्षा त्यांचा प्रयत्नावर जास्त विश्वास आहे. एमबीए करण्याची इच्छा व पात्रता असूनही एक वर्षाने त्यांना ते शिक्षण आर्थिक स्थितीमुळे अर्धवट सोडावे लागले. स्व प्रयत्नाने त्यांनी अंधेरीत रात्रशाळेत सहशिक्षकाची नोकरी मिळवली.

रात्रशाळेत शिक्षक म्हणून रुजु झाल्यानंतर लगेच एम ए, बीएड झालेली उषा त्यांच्या जीवनात गृहलक्ष्मीच्या रुपात आली. तिच्या रूपाने लक्ष्मी व सरस्वतीचा घरात प्रवेश झाला. त्यामुळे डोंबिवलीत स्वतःचे घर झाले. सईच्या रुपात संसारवेलीवर एक गोड फुल उमलले.

नागेश सरांनी काही दिवस ज्यनिअर कॉलेजमध्येही नोकरी केली. त्यांना कामाचा अजिबात कंटाळा नाही. कौटूंबिक वातावरण ही सुखी समाधानी ! परंतु नागेशजींचे धडपडे मन स्वस्थ नव्हते. काहीतरी करायला पाहिजे असं त्यांचं मन त्यांना वारंवार सांगत होते आणि त्यातून त्यांनी साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यासाठी वर्ल्ड व्हिजन ह्या संस्थेची स्थापना केली. ते ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी या संस्थेमार्फत अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण वर्षभर साहित्यिक उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले रात्रशाळा राष्ट्रीय कविसंमेलनाचेही आयोजन केले आहे. हे कविसंमेलन ऐतिहासिक नॅशनल लायब्ररी वांद्रा येथे आयोजित करण्यात आले होते. पृथ्वी संघराज्य संविधानाचा मराठी अनुवाद त्यांनी विनामुल्य केला आहे.

मुळातच साहित्यिक पिंड असलेल्या नागेशजींची साहित्यिक कामगिरी लक्षणीय आहे. फक्त कथा, कवितापूरतेच त्यांचे साहित्य मर्यादित नाही, तर अनेक क्लिष्ट विषयावरही त्यांचे लेखन पाहून आपण चकित होतो. त्यांचा आनंदाच्या लहरी हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. From cleanliness to Prosperity (स्वच्छतेतुन समृद्धीकडे) हा एक मराठीतून इंग्रजी अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिगाथा स्वातंत्र्याची, आम्ही मावळे शिवरायांचे असे अनेक विषय संपादनात त्यांनी सहजतेने हाताळले आहेत.

त्यांना मिळालेल्या पुरस्कारांपैकी विशेष म्हणजे मराठबोली संस्था, पुणे तर्फे साहित्य भुषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. हा त्यांच्या जीवनातील अतिशय आनंददायी क्षण होय. आंतरराष्ट्रीय विश्वस्नेही पुरस्कार, सावित्रीबाई फुले रात्रशाळेचा कर्मयोगी राष्ट्रीय पुरस्कार, रोटरी क्लबचा नेशन बिल्डर अवार्ड, आंतरराष्ट्रीय डहाळी त्रिशताब्दी पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्वोत्कृष्ट संपादन पुरस्कार, कविवर्य नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार, कल्याण नागरी साप्ताहिक वृत्तपत्र समुहाचा आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२३ असे आहेत.

रेडिओ FTII पुणे येथे झालेली त्यांची मुलाखत श्रवणीय आहे. इंग्रजी वृत्तपत्रातही त्यांचे लिखाण सुरू असते .

विविध विषयांवर व्याख्याने, शिबिरे व कार्यशाळा घेणे हा नागेशजींचा आवडता छंद ! नवनवीन उपक्रम घेऊन ते यशस्वी करणे हा त्यांचा विरंगुळा. कोरोनापूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी व्याख्यानमालाही आयोजित केली होती आणि विद्यार्थ्यांसाठी शाळां मधुनही इंग्रजी कार्यशाळा सुरू असतात.

नागेशजींनी साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वर्ल्ड व्हिजन टाईम्स, मुंबई हे डिजिटल दैनिक सुरू केले आहे. या दैनिकाचे ते संपादक आहेत. असंख्य प्रसिद्ध तसेच नव साहित्यिकांचे वाचनीय साहित्य दररोज विनामुल्य प्रकाशित करण्यात येते.

स्वतःसाठी सगळेच जगतात पण जे समाजाचे ऋण मान्य करीत आपल्या समाजबांधवासाठी, जगतात, त्यांचे कार्य पाहून अधिक आदर वाटतो. नागेशजींची वाटचाल तशीच आहे. अशा या दुसऱ्याच्या गुणांची कदर करणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रास खूप खूप शुभेच्छा !

— लेखन : प्रतिभा पिटके. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments