प्रिय स्वजनांनो,
आपण सर्वांना शिवजयंतीच्या परम पावन दिनानिमित्य मानाचा मुजरा !
आपण १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. ३९४ (शिव १९ फेब्रुवारी १६३०) शिवनेरी गडावर जेव्हां शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा मुगलशाही आणि आदिलशाहीने संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानला गुलामगिरीच्या बंधनात जखडून टाकले होते. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आपल्याला समजून घ्यायची तर, त्यांच्या जन्मापासून किती विपरीत परिस्थितीत त्यांच्या मातेने त्यांना वाढवले हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बालशिवाजीला झोपविंण्याकरता जिजाऊने गायलेली अंगाई या संकटांचे पुरेपूर यथार्थ वर्णन करते. गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी आपल्यात याच रचनेत म्हणतात-
गुणी बाळ असा जाग कां रे वाया । नीज रे नीज शिवराया ॥ ध्रु ॥
अपरात्री प्रहर लोटला बाई । तरि डोळा लागत नाही
हा चालतसे चाळा एकच काळा । तिळ उसंत नाही जिवाला
निजवायाचा हरला सर्व उपाय. जागाच तरी शिवराय
चालेल जागता चटका, हा असाच घटक घटका
कुरवाळा किंवा हटका,कां कष्टविसी तुझी सांवळी काया ।
नीज रे नीज शिवराया ॥१॥
ही शांत निजे बारा मावळ. शिवनेरी जुन्नर पेठ
त्या निजल्या ना तशाच संकटं । कोंकणाच्या चवदा ताली
ये भिवया बागुल तो बाळा । किति बाई काळा काळा ॥
इकडे हे सिद्दि-जवान, तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलुख मैदान, हे आले रे तुजला बाळिया ।
नीज रे नीज शिवराया ॥२॥
या खंबीर मातेने बालशिवाजीचे चारित्र्य उत्तमरित्या घडविले. तेव्हां शिवबांचे महापराक्रमी पिता शहाजी राजे भोसले कर्नाटकात होते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत देखील ही वीरमाता शिवबावर सर्वांगीण संस्कार करीत होती. रामायण आणि महाभारत यांच्यासारख्या महनीय ग्रंथांचाच नव्हे तर युद्धकलेचे शिक्षण घेऊन शिवबा आपल्या कर्तव्यपूर्तीकरता हे सर्वांगीण शिक्षण घेत होता. आपली माता जिजाबाई आणि गुरु दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबा सकलगुणमंडित होत गेला. त्याला राष्ट्रभक्तीच्या जाज्वल्य भावनेने असे कांही भारले होते की, शिवबाने वयाच्या केवळ १६ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले !
त्यांच्या संघटन शक्तीचे उदाहरण जरी घेतले तरी त्यांची दूरदृष्टी आपल्याला स्तिमित केल्याशिवाय राहत नाही. महाराजांच्या पदरी पडून पवित्र झालेले अन आधीचेच पवित्र असलेले १८ पगड जातीचे अन प्रत्येक धर्माचे मावळे स्वराज्याचे कंकण अभिमानाने मिरवीत त्यांच्या प्रत्येक स्वराज्य-मोहिमेत अत्यंत आत्मविश्वासाने, जिद्दीने अन हिरीरीने सुखाने सामील होत होते. त्यांचे शौर्य, पराक्रम, बुद्धिमत्ता, रणकौशल्य, इत्यादींविषयी मी पामराने काय लिहावे, केवळ अतीव आदरयुक्त प्रेमाने नतमस्तक व्हावे. त्यांच्या स्त्रीदाक्षिण्याचे तर कौतुक काय वर्णावे! कल्याणच्या सुभेदाराच्या सुंदर सुनेला बघून, ‘अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती’. हे मातेचे संस्कार आणि शिवरायाची निर्लोभ, निरंकारी वृत्ती होती! त्यांचा कट्टर शत्रू औरंगजेब देखील त्याच्या सरदारांना शिवाजीचे गुण अंगी बाणवा म्हणून सांगायचा. शिवरायांनी मुगल बादशहा औरंगजेब आणि सर्व नवी-जुनी अस्त्रे-शस्त्रे दिमतीस असलेल्या त्याच्या महाकाय फौजेचे आक्रमण थोपवून धरले, इतकेच नाही तर त्यांचे पारिपत्यही केले. हे करतांना आपल्या मूठभर फौजेला हाताशी धरून “गनिमी कावा” अमलात आणीत या “दक्खन के चूहे” ने औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले.
महाराजांसाठी किती म्हणून कसोटीचे क्षण आले, जयसिंग राजेंबरोबर तहात गमावलेले किल्ले, आग्ऱ्याहून शिताफीने केलेली अविश्वसनीय अशी स्वतःची आणि बाल संभाजींची सुटका, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी अन तानाजीसारख्या आपल्या कित्येक मोहऱ्यांचा मृत्यू, स्वकीयांची कारस्थाने, एक ना दोन! पण महाराज या सर्वांतून तावून सुलाखून निघाले आणि मग राजगडावर राज्याभिषेक झाला शिवरायांचा. (६ जून १६७४) या प्रसंगीचे अविस्मरणीय वर्णन समर्थ रामदास स्वामींच्या ‘आनंदवन भुवनी’ या काव्यात अनुभवावे:
‘स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी, तीर्थासी तुळणा नाही आनंदवनभुवनी
बुडाली सर्व ही पापे, हिंदुस्थान बळावले,अभक्तांचा क्षयो झाला आनंदवनभुवनी’
महाकवि भूषण शिवरायांच्या महापराक्रमी रूपाचे वर्णन असे करतात:
इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,’भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥
(कवी भूषण म्हणतात की, इंद्राने जंभासुर नावाच्या राक्षसावर ज्याप्रकारे हल्ला करून त्याचा वध केला, बडवाग्नी ज्या प्रकारे समुद्राचे पाणी जाळून शोषून घेतो, रघुकुलतिलक श्रीराम ज्या प्रकारे दुष्ट आणि कपटी रावणावर हल्ला करतात, ज्याप्रमाणे वायू अति वेगाने मेघांवर हल्ला करतो, ज्या प्रकारे भगवान शंकराने रतीचा पती कामदेव याला जाळून भस्म केले, ज्या प्रकारे परशुरामाने अत्याचारी सहस्रबाहू (कार्तवीर्य) राजावर हल्ला करून त्याचा वध केला, जंगली वृक्षांवर ज्याप्रकारे वणव्याचा प्रकोप होतो, जसे वनराज सिंह हरणांच्या कळपाला घाबरवतात, किंवा मृगराज सिंह हत्तींवर वर्चस्व गाजवतात, जसे सूर्यकिरण तमाचा नाश करतात आणि खली कंसावर युवा श्रीकृष्णाने आक्रमण करून त्याचा नाश केला होता, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी सिंहासारखे शौर्य, धैर्य आणि पराक्रम दाखवून मुघलांच्या वंशावर आतंक पसरवतात.)
संभाजी महाराजांना पाठवलेल्या पत्रात समर्थ रामदासस्वामी त्यांना त्यांच्या महान तीर्थरुपांची आठवण करून देत असा उपदेश करतात:
शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।भूमंडळी ||
शिवरायांचे कैसें बोलणें ।शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।कैसी असे ||
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ||
मोगलाई आणि आदिलशाहीचे वर्चस्व झुगारून “स्वराज्याचे तोरण” बांधणारे आपले खरेखुरे एकमेवाद्वितीय हृदयसम्राट गो-ब्राम्हण प्रतिपालक असे शिवाजी महाराज! अशा या महान राष्ट्रपुरुषाच्या गुणांचे कितीही वर्णन केले तरी कमीच! महाराष्ट्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र, हा कोता विचार मनात आणणे, म्हणजे प्रत्यक्ष राष्ट्रभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे होय.
म्हणूनच शिवरायांचे निव्वळ नांव आठवताच अंगावर रोमांच उभे राहतात ते उगाच नव्हे! हेच सकल गुणनिधान छत्रपती शिवाजी महाराज आमचे सर्वकालीन आदर्श आहेत! मी त्यांच्या चरणी नम्रपणे नतमस्तक होऊन पवित्र शिवजयंतीच्या उत्सवाचा मुहूर्त साधून त्यांना ही शब्दकुसुमांजली अर्पण करते !
जय शिवराय !!!
— लेखन : डॉ. मीना श्रीवास्तव. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800