Monday, December 9, 2024
Homeलेखप्रेरणेचा झरा : अलका भुजबळ

प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ

अष्टपैलू, उत्साही, निर्भीड व तितक्याच मनमिळावू प्रेमळ अलकाताईंचा आज, १८ एप्रिल रोजी ६० वा वाढदिवस आहे,हे कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही. जाणून घेऊ या, प्रेरणेचा झरा असलेल्या अलकाताईंचा प्रेरणादायी जीवन प्रवास…

मी आज ओळख करून देणार आहे, एका अशा सुंदर स्त्रीची जी अतिशय, सुस्वभावी तर आहेच, पण तेव्हढीच लढाऊ व धाडसी वृत्तीचीही आहे. तिने लढाई लढली कुणा शत्रूशी नाही तर कॅन्सर सारख्या असाध्य रोगाशी ! आपल्या कणखर जिगरबाज वृत्तीने तिने ह्या असाध्य रोगावर मात केली व फिनिक्स पक्ष्यप्रमाणे पुन्हा नवीन विश्व निर्माण केले. ओळखलं ना ? अगदी बरोबर ! मी न्यूज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय पोर्टल च्या निर्मात्या सन्माननीय अलकाताई भुजबळ यांच्याबद्दलच लिहिते आहे. हे पोर्टल ८६ पेक्षा अधिक देशात पोहचले असून 5 लाखांच्या वर वाचक असल्याने, त्यांना गेल्याच वर्षी सावित्रीबाई फुले व माणुसकी गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत . एक स्त्री इच्छा शक्तीच्या जोरावर काय करू शकते ह्याचे उदाहरण म्हणून अलकाताईबद्दल लिहितांना मला विशेष आनंद होत आहे.

अलकाताई मूळ मुंबईच्या. मध्यमवर्गीय कुटूंबात जन्म झालेला. खरं तर बारावीनंतर शिकायची इच्छा असूनही परिस्थिती समजून उमजून त्या टेलीफोन खात्यात नोकरीला लागल्या. घर, नोकरी आणि शिक्षण अशी तिहेरी भूमिका त्यांनी खुप चांगल्या निभावल्या.दिसायला खूप सुंदर असल्याने विवाह जुळण्यास त्रास होणार नव्हताच. जोडीदाराविषयी त्यांची एकच अट होती कि श्रीमंत नकोच पण स्वतःच्या कर्तबगारीने पुढे जाणारा, शिक्षणाची जाण असणारा हवा. अगदी नीट पारखून त्यांनी देवेंद्र भुजबळ यांना निवडलं.
त्यांचा विवाह झाला त्यावेळी देवेंद्र भुजबळ भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात सहायक निर्माते होते.त्यांचे स्वतःचे घर देखील नव्हते, पण स्वतःच्या कर्तबगारीने, विविध स्पर्धा परीक्षा देऊन ते नोकरीमध्ये वरच्या पदाला पोहोचले आणि मुंबईत स्थायिक झाले.

श्री भुजबळांच्या मदतीने ताईंनी अनेक उपक्रम राबविले. उदा अभिनय, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शिबिरे सुद्धा घेतली.सासूबाईंची प्रेमळ साथ होतीच. मुळातच क्रीडा क्षेत्रात आवड असल्याने त्या ऑफिस मध्ये क्रीडा, नाटक तसेच युनियन मध्ये सक्रिय सहभागी होत्या. त्यांनी दूरदर्शन वर दामिनी, बंदिनी, महाश्वेता, आई, पोलिसातील माणूस अशा अनेक मराठी मालिकां मध्ये काम केले.

संसारवेलीवर देवश्रीच्या रूपाने एक सुंदर फुल उमलले. सगळे कसे छान सुरू असतांना देवाच्या मनात काही वेगळेच होते. क्रूर नियतीने ६ वर्षांपूर्वी कर्करोगाच्या निमित्ताने जीवनात वादळ निर्माण केले. पण असाध्य समजल्या जाणाऱ्या या आजारावर त्यांनी धैर्याने मात केली. पती व मुलगी, नातेवाईक आणि त्यांच्या मैत्रिणींनी त्यांचे मानसिक बळ वाढविले.

अलका ताईंनी ह्या दुर्धर आजारातून बरे झाल्यावर आपल्या अनुभवावर आधारित “कॉमा” हे पुस्तक लिहिले. त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकावर आधारित “कॉमा” या माहितीपटाचे प्रकाशन राजभवनात तत्कालीन राज्यपाल श्री भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले.

अलकाताई कॅन्सरग्रस्त व्यक्ती व त्यांचे कुटूंबीय यांना दिलासा देण्यासाठी सतत सक्रिय असतात. त्यांनी अनेक ठिकाणी कॅन्सर वर लोकांना स्वतःचा अनुभव सांगत या असाध्य रोगाशी कसे लढावे आणि काय काय काळजी घ्यावी, आपले मनोबल कसे वाढवावे याबद्दल त्या “कॉमा संवाद उपक्रम ” राबवित असतात. शाळा,कॉलेज, मंडळे येथे हा उपक्रम राबविला जात असतो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कोणत्याही रोगावर मात करता येते हे त्या पटवून देतात.

स्वतःचा आजाराचा बाऊ न करता त्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुसूत्र नियोजन करतात. त्यांनी सुरु केलेल्या वेबपोर्टल चे काम, ह्यात जे लेख/कविता प्रसिद्ध होतात ते कसे वाचनीय होईल ह्या कडे त्या कटाक्षाने बघतात. म्हणून तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २०२२ साली या वेब पोर्टलला चौथा स्तंभ उत्कृष्ट पोर्टल म्हणून सन्मानित करण्यात आले.याच बरोबर या पोर्टल ला इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे पती देवेंद्र भुजबळ हे न्यूज स्टोरी टुडे या वेबपोर्टल चे संपादक असून कन्या देवश्री पत्रकार आहे. त्या लायन्स क्लब च्या सामाजिक कामातही सक्रिय सहभागी आहेत.

अनेक पुरस्कार मिळविणाऱ्या अलकाताईंनी देशविदेशात भरपूर प्रवास केला आहे. हे सगळे करतांना त्या कधीच थकत नाहीत. अतिशय आनंदी वृत्तीच्या अलकाताईंना कशाचाच जराही अभिमान नाही. न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टल चा भला मोठा व्याप संभाळूनही त्यांचे दैनंदिन जीवन चारचौघी सारखेच आहे.

अलकाताईंनी पोर्टल च्या जोडीने मैत्रिणीच्या आग्रहाखातर प्रकाशन व्यवसायातही झेप घेतली आहे. अनेक पुस्तकांचे प्रकाशन केले आहे आणि काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी फोन करणार आहे हे कळल्यावर त्यांनीच मला फोन केला .आमचे दिलखुलास बोलणे झाले, एव्हढ्या मोठ्या स्तरावर काम करणाऱ्या अलकाताईंशी बोलतांना मनावर दडपण आलेले होते पण पाचच मिनिटात खूप जुनी घट्ट मैत्री असावी असे वाटले. प्रत्यक्ष भेट झालेली नसून त्या मनाने किती निर्मळ आहेत हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. एक जीवाभावाची मैत्रीण मिळाल्याचा आनंद झाला. त्यांची मैत्रीण पूर्णिमा शेंडे नी त्याच्या गुणांवर केलेली कविता त्यांची जीवनशैली स्पष्ट करते. हे जीवन सुंदर आहे ते भरभरून जगावे हा त्यांचा विचार मला खूप आवडला आणि सहज जीवनमृत्यु या सिनेमातील आनंद बक्षीचें गाणे आठवले
“झिलमिल सितारोंका आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा”
संसाराचे असे सुंदर चित्र मनाशी बाळगणाऱ्या, स्वप्ने पाहणाऱ्या अशा या अलकाताईना, जीवनात सर्व सुखे मिळोत आणि दशदिशात त्यांच्या यशाचा सुगंध पसरो. माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

— लेखन : प्रतिभा पिटके. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

13 COMMENTS

  1. सर्व प्रथम अलकाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या कार्य कर्तृत्वाला मानाचा मुजरा 🙏. मनाची दुर्दम्य इच्छाशक्ती असाध्य रोगावरही मात करु शकते आणि जीवनाचा भरभरून आस्वाद आपल्याला हवा तसा घेता येतो हेच तुमच्या उदाहरणावरून दिसून येतं. या लेखामुळे तुमच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेता आली त्याबद्दल लेखिका प्रतिभा पिटके यांनाही धन्यवाद 🙏

  2. आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
    आपला लोभ,प्रेम असेच कायम असू द्या.

  3. प्रतिभाताईंनी अलका मॅडमचे अल्पाक्षरात शब्दचित्र उभे केले आहे. अलकाताईंचं व्यक्तिमत्व खरंच त्या जाईल त्या समूहामध्ये प्रेरणादायी ठरेल असेच आहे.
    सदाबहार अशा अलकाताईंना
    वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!

  4. प्रतिभाताईंच्या ह्या लेखामुळे अलकाताईंचा प्रेरणादायी जीवनपट कळला. धन्यवाद ताई.
    अलकाताई वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…
    आपला प्रगतीचा आलेख उंच उंच जावो…
    आपल्या तेजाने अनेकांस उजळावे…
    पुढील वाटचालीस प्रेमपूर्वक आशीश…

  5. प्रतिभा ताईंचा हा लेख वाचला…अलकाताईंबद्दची ओळख झाली,त्यांची कर्तबगारी समजली धन्यवाद प्रतिभाताई.
    अलकाताई वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…
    तुमचा प्रगतीपर जीवनालेख असाच पुढे जावो…
    आपल्या पोर्टलचा एक अल्पसा भाग असल्याने
    तुमची ओळख झाली.

  6. सौ.अलकाताई देवेंद्र भुजबळ यांना सर्व प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि उभयतांच्या अतिशय श्रद्धेने उत्तमपणे मार्गस्थ असलेल्या सर्वांगिण कार्याबद्दल मनापासून धन्यवाद…
    सुधाकर तोरणे

  7. प्रिय अलका ताई,
    षष्ठब्धि पूर्ति निमित्त हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

    हीच आयुष्यातली सर्वांगाने फुलण्याची, बहरण्याची योग्य वेळ आहे. आपल्याला यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

    जयश्री अनिल भिसे.
    मुंबई.

  8. अलका वाहिनी एक गृहिणी,लेखिका व उत्कृष्ट नाट्य कलाकार म्हणून गेल्या 35 वर्षांपासून मला परिचित आहेत कारण त्यांचे यजमान माझे देवेंद्र भुजबळ माझे निकटचे मित्र आहेत, अतिशय सुखी व आनंदी कुटुंब म्हणून परिचित आहे तांच्या वाढदिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा!🌹🌹

  9. वाढदिवसाचे अभिष्टचिंतन
    आपले कार्य व देवेंद्रजी यांची साथ , यामुळे आपले जीवन निश्चितच प्रेरणादायी आहे .

  10. प्रिय अलका
    तुला वाढदिवसाच्या अंमळ उशीरा पण दिल से दिलेल्या शुभेच्छा स्वीकार! तुझ्याविषयी विशेष कांही माहित नसतांना साधारण एक दीड महिन्याआधी तुमच्या घरी आले अन पहिल्या भेटीतच तू आणि देवेंद्र दादा ने आपलेसे केले, उणीपुरी अर्ध्या तासाची ती भेट अविस्मरणीय ठरली. व्हॉटस अँपच्या आभासी माध्यमातून होणारी भेट अशी योगायोगाने प्रत्यक्षात अवतरली. इतके पुरेसे नव्हते, तुझे पुस्तक ‘कॉमा’ तू भेट दिले अन त्यातून तुझे तेजस्वी व्यक्तिमत्व उलगडत गेले. इतके साधे सिम्पल वर्णन केले आहे तू कॅन्सरवर मात करण्याचे, जणू कांही काळ सर्दी झाली अन गेली. तुझ्या शारीरिक अन मानसिक कणखरतेने तू एक आदर्श निर्माण केला आहेस. नवसंजीवनी आणायला प्रत्येक वेळी हनुमानाची झेप आवश्यक नसते! ती आपली आपणच घ्यायची असते तुझ्यासारखी, मग काय ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश! अशीच अस्मानात स्वच्छंदपणे विहरत राहा! शुभेच्छा तुला भावी तंदुरुस्त मन आणि शरीर राखण्यासाठी!
    डॉक्टर मीना श्रीवास्तव

    • खुप खुप धन्यवाद मॅडम आपल्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहू द्या. उच्च भरारी घ्यायला बळ मिळते.

    • अमरावतीहून प्रतिभा फिटके मॅडम यांनी आपणा विषयी अत्यंत सुंदर अशा शब्दात माहिती दिली आहे. प्रत्येक समस्या ही संधी आहे असे समजून आपण जीवन जगत आहात ही फार मोठी कसरत आहे. जीवनाविषयी आपली समज खूप मोठी वाढलेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट सहन केल्याशिवाय यश मिळत नाही हे आता आपल्या अंगवळणी पडले आहे. भुजबळ सरांचे आपणास खूप मार्गदर्शन मिळालेले आहे त्यामुळेच आपण संधीचे सोने केले आहे.
      साठाव्या वाढदिवसानिमित्ताने आपणास सरोदे परिवारा मार्फत मनःपूर्वक शुभेच्छा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments