“मराठवाडा मुक्ती संग्राम दिन”
आज “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन” आहे. त्या निमित्ताने पाहू या काही छायाचित्रं आणि जाणून घेऊ या, दिनाचे महत्त्व. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
आपल्या देशाला जरी १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले तरी मराठवाडा, कर्नाटक राज्याचा काही भाग आणि हैद्राबाद प्रदेश या भू भागावर निजामाचे राज्य होते. अन्य संस्थानांप्रमाणे निजाम काही भारतात सहभागी व्हायला तयार नव्हता. शेवटी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेला प्रदीर्घ लढा आणि भारत सरकारच्या कारवाई मुळे निजामाची राजवट १७ सप्टेंबर १९४८ रोजी संपुष्टात आली आणि हा भाग भारतात समाविष्ट करण्यात आला.

पुढे राज्य पुनर्रचना झाली. मराठवाडा विभाग महाराष्ट्र राज्यात सहभागी झाला. कर्नाटकातील सीमावर्ती भाग कर्नाटक राज्यात तर हैद्राबाद आंध्र प्रदेशात सहभागी झाला. पण पुढे अनेक वर्षे १७ सप्टेंबर हा दिवस सर्वांच्या विस्मरणात गेला.
दरम्यान तत्कालीन परिवहन मंत्री तथा नांदेड, परभणी जिल्ह्यांचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या या पुढाकारामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हुतात्मा स्मृतीस्तंभ साकार झाले. मराठवाडा मुक्तीसाठी प्राणपणाने लढणाऱ्या स्वातंत्र्यविरांच्या हौतात्म्याला चिरस्वरुपी मानवंदना मिळाली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनाचा समारंभ या स्मृतीस्तंभांना पुष्पचक्र अर्पण करून आणि शहीदांना मानवंदना देऊन साजरा करण्यास नांदेड येथून प्रारंभ झाला. नांदेडसह, औरंगाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, जालना, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यात एकाच रुपातील हुतात्मा स्मृतीस्तंभ उभे आहेत.
नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानात 17 सप्टेंबर 1998 रोजी हुतात्मा स्मृती स्तंभाच्या अनावरणाचा भव्य असा सर्वपक्षीय ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचे सहकारी शंकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या कार्यक्रमास तत्कालिन विधानसभेचे अध्यक्ष दत्ताजी नलावडे, मुख्यमंत्री मनोहर जोशी, नांदेडचे पालकमंत्री श्री.दिवाकर रावते, प्रतापराव बांगर, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक साहेबराव बारडकर, चंद्रकांत म्हस्के भास्कर राव पाटील खतगावकर, माधवराव किन्हाळकर, ओमप्रकाश पोकर्णा, यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकप्रतिनिधीची उपस्थिती होती.
श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयमवर यासाठी त्यावेळी भव्य कार्यक्रमही झाला होता. या कार्यक्रमाच्या स्मृती आज पुन्हा जाग्या झाल्या. त्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मृती स्तंभांची रचना आणि त्यावरील शिल्प (म्युरल्स) बाबत एकवाक्यता असावी या साठी विविध संकल्पना एकत्र करुन स्मृति स्तंभ तयार करण्यात आले.
मराठवाडा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबाबत सर्वांना प्रचंड आत्मियता आहे. या आत्मियतेतूनच हुतात्मा स्मृतीस्तंभांची आणि मुक्ती संग्राम दिनाचा वर्धापन दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. मुक्तीसंग्राम वर्धापनदिन आणि हुतात्मा स्मृतीस्तंभ या दोन्ही स्मृतीस्तंभाशेजारीच हुतात्म्यांच्या बलिदानाला वंदन करणाऱ्या ज्येष्ठ कवी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या कवितांच्या ओळीही शिलालेखाच्या स्वरुपात आहेत. त्या ओळीही समर्पक अशाच आहेत…
“या मातीचा टीळा कपाळी लावू, जोवर वाहे गोदामाय तोवर गाणे गाऊ” हे गीत ही आता नक्की संग्रामाच्या सोहळ्यात गायल्या जात असते.

१९९८ पासून राज्याचे मुख्यमंत्री छ्त्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यक्रमास उपस्थित राहतात. तर संबधित जिल्ह्याचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यात उपस्थित राहतात. या दिवशी मराठवाड्यात शासकीय सुट्टी असते. तसेच विविध प्रकारचे कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येतात.
मराठवाडा मुक्ती संग्रामदिन आणि त्यानिमित्त हुतात्मा स्मृतीस्तंभाजवळ पुष्पचक्रांचे अर्पण, शहीदांना मानवंदना दरवर्षी देण्यात येते. त्या प्रमाणे आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर नांदेड चे पालकमंत्री श्री गिरीश महाजन यांच्या आणि इतर जिल्ह्यात संबधित पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले.

— लेखन, छायाचित्रं : विजय होकर्णे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800