Saturday, April 13, 2024
Homeलेखबदलतं जग…

बदलतं जग…

या अत्याधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला कमी माहिती असते पण बऱ्याच गोष्टी माहीतही नसतात. सगळं कसं सहज, रेडीमेड उपलब्ध असल्यामुळे त्याची किंमतच नसते आणि खरं तर नाही देखील.

आपल्या आधीची पिढी जाऊ द्या, पण आपणही किती टक्केटोणपे खात इथपर्यंत आलो आहे, हे मागे वळून बघितलं तर लक्षात येईल. पूर्वी आई-वडिलांना घाबरत होतो आणि आता हेच मुलांच्या बाबतीत होत आहे. अर्थात सगळ्याच ठिकाणी सगळ्याच जणांना हे लागू नाही, पण आहे ते असं आहे.

अगदी साधं उदाहरण घेऊ, पूर्वी आईस्क्रीम खायचं तरी अवघड होतं, नवीन शर्ट पॅन्ट किंवा ड्रेस अप्रूप होतं, असायचं, फोटो काढल्यावर फोटोग्राफरच्या दुकानात ब्लॅक अँड व्हाईट फोटो मिळण्यासाठी चार चार चकरा, टेलर कडे कपडे शिवायला टाकल्यानंतर तो मिळण्यासाठी मारलेल्या चकरा, नवीन बाटा ची चप्पल घेण्यासाठी मॅट्रिक पर्यंत पहावी लागलेली वाट, इतकेच काय, साधा काळा टेलिफोन येण्यासाठी वयाची चाळिशी गाठल्यावर मिळाला.

कॉलेज ची फी भरण्यासाठी व स्वतः चा इतर खर्च भागवण्यासाठी ₹.150/- ची नोकरी अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

अर्थात, आता काळ खूप बदललेला आहे, त्याबद्दल काहीही तक्रार नाही, आनंदच वाटतो. सुख सोयी सगळ्याच, सगळ्यांनाच सहज प्राप्त होऊ लागल्या आहेत.

पूर्वी बँकांची वेळ साडेदहा ते अडीच अशी असायची. ही साधी गोष्ट पहा ना, आज आपण ऑनलाईन लाखो रुपये कधीही, कुठेही सहज पाठवू शकतो किंवा आपल्याला मिळू शकतात. किती प्रचंड आणि कौतुकास्पद बाब आहे.

पूर्वी खूप कमी लोकांकडे सायकल असायची.ती अनकॉमन गोष्ट होती. आज चारचाकी ही तर कॉमन झालेली आहे परंतु ऑडी किंवा मर्सिडीज बेंज गाडी असणं हे अनकॉमन झालेलं आहे.
हा पण किती छान बदल आहे.!

पूर्वी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर निवृत्ती वेतन (प्रॉव्हिडंट फंड,) ग्रॅच्युईटी याची रक्कम घेऊन घर बांधत असत, आपल्या दोन खोल्या हक्काच्या म्हणून. आज किती सुविधा झाल्या आहेत, तुमच्या वेतनाची स्लिप आणि आधार कार्ड दिल्याबरोबर तुम्हाला तात्काळ फ्लॅट मिळू शकतो, जास्त वाट पाहावी लागत नाही हा देखील किती छान बदल आहे, पण वाट पाहण्यात जी गंमत असते ती मात्र हरवली.

आज सर्व सुविधांनी आपण परिपूर्ण झालेलो आहोत, मागाल ते मिळेल अशी परिस्थिती आहे. एखाद्या व्यक्तीची आठवण आली की एका क्षणात तुम्ही मोबाईल द्वारे त्याच्याशी संपर्क साधू शकता मग तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो.

मला आजच्या पिढीचे खरच खूप कौतुक वाटतं खूप नशीबवान आहेत.
बघाना, उदाहरणार्थ सकाळी शाळेत जायचं असलं की बॅग तयार आहे, आई किंवा वडील बस पर्यंत येण्यास तत्परतेने असतात. बसची शाळेपर्यंत सोय . इंग्रजी शाळेमध्ये जवळपास 95% विद्यार्थी जाताएत, ही देखील क्रांतीच म्हणावी लागेल. मराठी शाळा मात्र बंद पडत आहेत, शेवटची घरघर लागली, शिक्षक बेकार होतायेत.
घसा घसा फोडून आपली महान नेतेमंडळी सांगत आहेत, की आपल्या मुलांना मातृभाषेत शिक्षण दिले पाहिजे, खरंच किती प्रगल्भ विचार आहेत, पण या सज्जन लोकांची मुलं मात्र अमेरिका, इंग्लंड मधे शिकायला असतात ! असो.
सध्या इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर मोबाईल, व्हाट्सअप आणि असंख्य सुविधा झाल्यामुळे आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे मोठी क्रांती केली आहे. मोबाईल मधे सकाळपासून रात्रीपर्यंत जास्तीत जास्त वेळ जातो. 24 तास खरंच कमी वाटतात.

मित्रांनो,
एक गोष्ट मात्र खेदाने नमूद करावी वाटते की, आपण नेहमी विसरतोय की, पूर्वीसारखा आपल्यामध्ये संवाद राहिला नाही, कोणालाही कोणाकडे जाण्यास वेळ नाही. पूर्वी रेडिओ हे एकच साधन होतं मनोरंजनाचे, तेच काही दिवसांनी पुन्हा येईल असे वाटते.

कोणाकडेही समारंभाला जाण्यासाठी आपण फक्त चेहऱ्यावर जास्तीत जास्त खोटं हसू आणि जास्तीत जास्त दांभिकपणा कसा करता येईल तेवढा आपण करत असतो, त्यात आपुलकीचा लवलेश नसतो, आधी पाहतो, “आहेर आणू नये, आपली उपस्थिती हाच आहेर” हे वाचल्यावर बघा अंतर्मनाला विचारून कसे वाटते ? जाणे ही एक औपचारिकता असते.

मला आठवतं, माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये सर्व मित्र झटून काम करत होते, दहा दहा तास. त्यावेळेस चटई टाकून सगळेजण मांडी घालून बसत असत.
आता बुफे पद्धत आहे, त्याबद्दल काही नाहीच, हे फक्त बदल होतात. स्वागत केलं पाहिजे हे बदलत्या काळानुसार आहे.

अश्या अनेक बदलांमुळे आपल्यामधे भावनांची प्रचंड दरी कशी होती आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मोठेपणा दाखविण्यासाठी श्रीमंतीचे प्रदर्शन केले जाते (कधी कधी केविलवाणे).

खुप काही लिहिता येईल, पण थांबतो.एकच वाटते, जसे आहात तसेच रहा, तुम्ही आनंदी मोकळे रहा, मोकळ्या मस्त गप्पा मारा, खुश रहा. गरजा कमी करा. छोट्या छोट्या गोष्टीत खुप आनंद दडला आहे. अगदी कौटुंबिक सहल काढा, जिवलग मोजक्या मित्रांसोबत.
काही गरज नाही, मोठ्या सहलीची लगेच, जवळच्या ठिकाणी जा, अंगत पंगत करा, जुने खेळ खेळा. अगदी शुलिभंजन इथे जा, बघा दिवस किती प्रसन्न जातो, आपल्या माणसात आणि, हां मोबाईलचा वापर टाळा (अर्जंट नसेल तर).
बघा जीवन किती सुंदर आहे. या सर्व सोयी सुविधा यांचा वापर कराच, पण माणसं जपा, त्यांच्या भावना जपा, मित्र जपा, मग कळेल आपण जगातले खरे श्रीमंत आहोत.
आयुष्य देवानी दिलेली अनमोल देणगी आहे याचे प्रत्यंतर येईल.

— लेखन : प्रसाद साडेकर. छत्रपती संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments