“अरे संसार संसार, एका श्वासाचं अंतर”, अशा एक नाही तर अनेक जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची आज जयंती आहे.त्या निमित्ताने हा विशेष लेख.बहिणाबाई यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगांव जिल्ह्यातील असोदा येथे २४ ऑगस्ट १८८० रोजी (नागपंचमी) झाला. त्यांच्या वडिलांचे नांव उरवाजी महाजन व आईचे नाव भीमाई होते.
वयाच्या १३ व्या वर्षी बहिणाबाईंचे नथुजी चौधरी यांच्याबरोबर लग्न झाले. बहिणाबाईंना ओंकार व सोपान हे दोन मुलगे व काशी ही कन्या झाली. मोठा मुलगा ओंकार याला प्लेगच्या साथीत कायमचे अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. त्यामुळे मुलांना सांभाळून त्यांनी घरची व शेतीची कामे केली.
बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते.त्याकाळी काम करता करता तसेच वर्षभरातील सणांना एकत्र जमून परस्परांशी साधला जाणारा संवाद हाच काय तो स्त्रियांच्या जीवनातला विरंगुळा होता. हर्ष, खेद, चीड, संताप अशा भावना व्यक्त होण्याचे काव्य हेच माध्यम होते. बहिणाबाईंनी तेच माध्यम निवडले.त्या काम करता करता स्वरचित कविता म्हणत असत. त्यांचा पुत्र सोपानदेव व भाचा यांनी अवघ्या ३५ कविता लिहून काढल्या.
बहिणाबाईंकडे काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम व घरकाम करता करता त्या “लेवा गणबोली” तील ओव्या व कविता रचून गात असत.
बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादापेक्षा प्रयत्नवाद त्यांना योग्य वाटत होता. त्यांचे तत्वज्ञान हे शक्तिशाली स्त्रीचे तत्वज्ञान होते.
बहिणाबाईंचे सुपूत्र कवी सोपानदेव यांनी बहिणाबाईंच्या कविता साहित्यिक आचार्य अत्रे यांना दाखवल्या. त्यांना त्या खूप आवडल्या. सोपानदेव यांनी आचार्य अत्रे यांच्या प्रस्तावनेसह ३५ कविता असलेला कविता संग्रह १९५२ साली प्रकाशित केला.
बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत रचल्या आहेत. माहेर, संसार, शेतीची साधने, कापणी, मळणी काही परिचित व्यक्ती या विषयांवर त्यांनी अनेक कविता रचल्या परंतु त्या सर्व कोणी लिहून काढल्या नाहीत.
लेवा गणबोली (खानदेशी) भाषेतून ; अतिशय सोप्या शब्दांत त्यांनी जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त केले आहे. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुध्दी, जीवनातील सुखदुःखाकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्टये होती. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्वज्ञान त्या साध्या, सोप्या आणि कमीत कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या.
आचार्य अत्रे म्हणत असत की ‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे.’ त्यांचे काव्य म्हणजे सोन्याच्या मोहरा आहे. सोपानदेव यांनी जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा तेव्हा शब्दरूपी सोन्याच्या मोहरा वेचल्या व कविता संग्रह रुपी हंड्यात साठवल्या म्हणून पुढील पिढीला त्याचा फायदा झाला.
संपन्न शब्दभांडार , सहजसुंदर परिणामकारक शैली, प्रतिभेचा मनोहारी विलास, विचारांची धार आणि भावनांची उत्कटता बहिणाबाईंच्या काव्यातून दिसून येते.शिक्षण म्हणजे फक्त वही, पेन नव्हे तर बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे असे विचारवंत म्हणतात म्हणूनच निरक्षर असलेल्या बहिणाबाईंनी विचारवंतांचे विचार खरे करून दाखवले.त्याचमुळे बहिणाबाईंच्या निधनानंतर एका विद्यापिठाला त्यांचे नाव देण्यात येऊन “बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ” स्थापन करण्यात आले.
बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारीत “खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा” हा सांस्कृतिक कार्यक्रम संगीत दिग्दर्शक व गायक दत्ता चौगुले व माधुरी आशिरगडे यांनी तयार केला होता.
दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारीत “बहिणाबाई” नावाचा लघुपट निर्माण केला होता. बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद माधुरी शानबाग, प्रा.के.ज.पुरोहित यांनी केला आहे.त्यांचे अल्पचरित्र सुध्दा प्रकाशित झाले आहे.त्यांच्यावर अनेक मान्यवरांनी पुस्तके प्रकाशित करून त्यांच्या कर्तुत्वावर प्रकाशझोत टाकला आहे.
साने गुरुजींनी “शामची आई” हे पुस्तक लिहून आपल्या आईला प्रकाशझोतात आणले.तर कवी सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करून आपली आई “बहिणाबाईं” यांना प्रकाशझोतात आणले.विशेष म्हणजे “श्यामची आई” आणि “सोपानदेव यांची आई बहिणाबाईं” यांना जास्त प्रकाशझोतात आणण्यासाठी आचार्य अत्रे यांचे सहकार्य लाभले.
अशा या थोर बहिणाबाईंचे वयाच्या ७१ व्या वर्षी ३ डिसेंबर १९५१ रोजी निधन झाले. बहिणाबाईंच्या कार्याला माझा साष्टांग नमस्कार.
— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800