शांताबाई गेल्या तेव्हा…
श्री नितिन सप्रे हे भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असून सध्या भारत सरकारच्या डी.डी.न्युज,(दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक आहेत.
मुंबई दूरदर्शन केंद्रात वृत्त संपादक म्हणून कार्यरत असताना त्यांनी सांगितलेले हे अनुभव…
या लेखातील मते त्यांची व्यक्तीगत आहेत.
त्यांचे लिखाण https://saprenitin.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहे.
– संपादक.
अनेकवेळा आणीबाणीची परिस्थिती आणि संयमाधीष्टीत निर्णयक्षमतेचा लागणारा कस यामुळे प्रसारमाध्यमात काम करताना अत्यंत सजगता बाळगावी लागते. इलेक्ट्रॉनिक माध्यमात बातमी लवकरात लवकर प्रसारित करत असतानाच ती अचुक असणे नितांत गरजेचं असतं. मात्र प्रत्यक्षात काम करत असताना अचूकतेबाबत शंभर टक्के खातरजमा करण्याइतका वेळ बऱ्याचदा हाताशी नसतो. अश्या प्रसंगी, काहीसा नशिबावर हवाला ठेऊन, इंग्लिश मध्ये ज्याला आपण ‘कॅलक्यूलेटेड रिस्क’ म्हणतो, ती घ्यावी लागते.
मुंबईत दूरदर्शनच्या वृत्तविभागात वृत्त संपादनाची जबाबदारी निभावत असताना ६ जून २००२ हा दिवस माझ्यासमोर अशीच आव्हानात्मक परिस्थिती ठाकून गेला.त्या दिवशी रोजच्या प्रमाणे साडे नऊ च्या बातमीपत्राची जुळवाजुळव सुरू होती. वृत्तसंस्था, प्रतिनिधी आदीं कडून मिळणाऱ्या बातम्याची निवड, उपलब्ध चित्रफिती, आयत्यावेळी उपलब्ध होऊ शकणाऱ्या चित्रफिती यांचा क्रम निश्चित करून त्या संपादनासाठी पाठवणे, ताज्या घडामोडींचा पाठपुरावा असे संध्याकाळी सात आणि रात्री ९.३० वाजताच्या बातमीपत्रासाठीचे कामकाज साधारण दुपारी ३ वाजेपासून सुरू होते.
पुढे भाषांतर, वार्ताहरांनी दिलेल्या बातम्या तपासणे, प्रसारण सुरू होण्याआधी पर्यंत आणि सुरू झाल्या नंतरही बातम्यांचा प्राधान्यक्रम ठरवीत राहणे आणि शेवटी ठळक बातम्या असा सर्वसामान्य दिनक्रम असतो. बातमीपत्र लाईव्ह असल्याने योग्य फेरबदल अथवा नव्यानं आलेल्या बातमीचा समावेश करणं आवश्यक असते.
६ जून २००२ हा दिवसही साडे नऊ च्या बातम्या सुरू होऊन, संपण्यापूर्वीच्या काही काळ आधी पर्यंत, सर्वसामान्य असाच होता. रात्री दहा वाजता बातमीपत्र संपताच घरी परतण्यासाठी वृत्त विभागातील सर्वांचीच लगबग असते. त्या दिवशी मात्र बातमीपत्र संपण्यापूर्वी पाच मिनिटे आधी, साधारण ९.५५ च्या सुमारास, वृत्त विभागातील फोन खणखणला. पलीकडच्या व्यक्तीने, बहुदा आकाशवाणी मुंबईवरून वृत्तनिवेदन करणाऱ्या सविता कुरतडकर किंवा अंजली आमडेकर यांनी, विख्यात मराठी कवयित्री, लेखक, पत्रकार शांताबाई शेळके निवर्तल्याचे समजते आहे, मात्र खात्री करून घ्यावी लागेल असे सूतोवाच केले. प्रतिक्षिप्त क्रियेने घड्याळ बघितले. ९.५७ झाले होते. बातमीपत्र संपायला अवघी तीन मिनिटे बाकी होती. या बातमीचा समावेश अत्यावश्यकच होता. संपूर्ण खातरजमा न करता ती देणे दुःसाहस ठरलं असत आणि खात्री करून घेण्यासाठी अवधी फक्त तीन मिनिटेच होता. शांताबाई पुण्याच्या के. इ. एम. रुग्णालयात दाखल असल्याचं कळलं.
योगायोगाने तिथे आकाशवाणी पुण्याचा माझा मित्र शेखर नगरकर होता. त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याने दुजोरा दिला मात्र शंभर टक्के खात्री दर्शवली नाही. एव्हाना बातमीपत्राच्या शेवटच्या भागात दिल्या जाणाऱ्या क्रीडा विषयक बातम्या संपवून वृत्तनिवेदीका अंजली पाठारे हवामान वृत्तावर आलेल्या…….९.५८…..आता फक्त शेवटच्या ठळक बातम्यात फेरबदल करून संपूर्ण महाराष्ट्राला ही महत्त्वाची बातमी पोहोचवणे शक्य होते. मात्र अजूनही अधिकृत पुष्टी होत नव्हती. शांताबाईंच्या निकटच्या स्नेही कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांच्याकडून निश्चित स्थिती कळू शकेल असे लक्षात आले. सुदैवाने अरुणाताईंचा नंबर होता. साहित्य रसिकांच्या दुर्दैवाने बातमी खरी ठरली. दहा वाजत आले होते. ‘कवयित्री शांताबाई शेळके यांचे निधन’ एव्हढे शब्दच मोठ्या आकारात कागदावर खरडले आणि वायूवेगाने लाईव्ह स्टुडिओत शिरलो. वृत्तनिवेदिकेचे लक्ष कागदाकडे वेधले. तो पर्यंत ‘पुन्हा आपली भेट सकाळी साडे आठ वाजता’ हेही वाचून झाले होते…. पण मी लाईव्ह स्टुडिओत प्रवेश करून कागदाकडे सतत लक्ष वेधत असल्यानं आणि वृत्तनिवेदीका ही अनुभवी असल्यानं, तिने प्रसंग योग्य रीतीने निभावत ‘मात्र तत्पूर्वी एक महत्वाची बातमी अशी जोड लावत ‘नमस्कार’ उच्चारण्यापूर्वी वृत्तनिवेदिकेनी शांताबाईंच्या निधनाची बातमी वाचली. दूरदर्शन वृत्त विभागाच्या इतिहासात बातमीपत्र संपल्यानंतरही फ्लॅश न्युज देण्याचा कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा. बातमी महत्वाची होती आणि जर ती साडेनऊ च्या बातम्यात प्रसारित केली गेली नसती तर दूरदर्शन सहयाद्री वर ही बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता द्यावी लागली असती. तो पर्यंत बराच उशीर होऊन गेला असता.
हा सर्व खटाटोप यशस्वी झाल्याचं एकीकडे समाधान मनाला स्पर्शू पाहत असतानाच, बातमी मिळवून ती साहित्य रसिकांपर्यंत पोहचविण्यात गुंतलेल्या मनाला दुसरीकडे महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न कवयित्रीला मुकल्याची सल मात्र लागली होती.
शांताबाईंच्या अनेक कवितांच्या, गीतांच्या आठवणींनी मनात गर्दी केली होती आणि कंठ दाटून आला होता.
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे
हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी, तुला बघून वाटले
तृणांत फुलापाखरू तसे बसेल गीत हे
स्वयें मनात जागते, न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते
उन्हें जळांत हालती तिथे दिसेल गीत हे
कुणास काय ठाउके, कसे कुठे उद्या असू
निळ्या नभांत रेखिली, नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले, तुला कळेल गीत हे
— लेखन : नितीन सप्रे. नवी दिल्ली
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800