Saturday, April 20, 2024
Homeलेखबातमीमागची बातमी 1

बातमीमागची बातमी 1

वृत्तपत्र वार्ताहरांनी मिळविलेल्या रोचक कहाण्या प्रसिद्ध होत असतात. अशा कहाण्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
असेच अनुभव सरकारी माध्यम प्रतिनिधींनाही येत असल्याने त्यांचे अनुभव नक्कीच वाचनीय ठरतील, पुढे त्याचे पुस्तकही निघू शकेल,अशी कल्पना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे निवृत्त विभागप्रमुख प्रा डॉ किरण ठाकूर यांनी मांडली. त्यानुसार केलेल्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि मिळत आहे.

आकाशवाणीच्या हंगामी वृत्त निवेदक-भाषांतरकार, प्रकाशक, लेखक असलेल्या प्रज्ञा जांभेकर चव्हाण यांचे अनुभव आपण आजच्या पहिल्या भागात वाचू या.

प्रज्ञा जांभेकर चव्हाण यांचे न्युज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

२००२ पासून मी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर हंगामी वृत्त निवेदक-भाषांतरकार म्हणून रुजू झाले.
२५ ऑगस्ट २००३ रोजी गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे बॉम्बस्फोट झाले. त्या दिवशी माझी आकाशवाणीत दुपारी १ ते रात्री ९ अशी शिफ्ट होती. काही कामानिमित्त मी आणि माझा नवरा संदीप सकाळी लवकर उठून महालक्ष्मीला आलो होतो. तितक्यात दीराचा फोन आला की मुंबईत बॉम्बस्फोट झालेत, तुम्ही क़ुठे आहात ? तातडीने संदीपनं मला टॅक्सीत बसवलं कारण चर्चगेटला आकाशवाणीत पोहोचणं आवश्यक होतं. टॅक्सीतच बॉम्बस्फोट झाले आहेत याची आम्हा दोघांनाही कल्पना नव्हती. संदीपनं मला टॅक्सीत बसवलं आणि तो त्याच्या कामाला निघून गेला. तेव्हा तो मुंबई सामनात क्रीडा विभाग प्रमुख होता. नंतर जेव्हा कळलं की स्फोट टॅक्सीतच झालेत तेव्हा आम्हाला थोडा धक्का बसला खरा, पण आकाशवाणीची ड्युटी रद्द करावी असा विचारही मनाला शिवला नाही. आकाशवाणीत गेल्यानंतर बोरीवली आणि वांद्रे येथून येणाऱ्या माझ्या दोन सहकाऱ्यांनी घाबरून येणं टाळलं होतं आणि सर्वात लांब राहणारी मी वेळेवर पोहोचले होते. अशा प्रकारच्या घटनांची बातमी सरकारी माध्यमांसाठी लिहिताना समतोल आणि परत परत पडताळून कशी द्यायची हे त्या दिवशी शिकता आलं.

११ जुलै २००६. त्या दिवशी मी आकाशवाणीत ११ ते ६ च्या शिफ्टला होते.
काही कारणाने त्या दिवशी संध्याकाळी आकाशवाणीतून निघायला उशीर झाला. मी खाली उतरले पावणे सात वाजता. तेवढ्यात संदीपचा फोन आला की पश्चिम रेल्वेगाडीत बॉम्बस्फोट झाला आहे, वसईला जाऊ नकोस. फोन संपवला आणि पहिला फोन आकाशवाणीच्या वृत्त विभागातील अधिकारी सुनील कांबळे यांना केला. त्यानंतर त्यांनी लगेच सातच्या बातम्यांसाठी ती बातमी तयार केली. माझी मैत्रीण ऋजुता आणि मी टॅक्सीतून वरळीला निघालो. वरळीला पोहोचायला आम्हाला तब्बल तीन तास लागले. त्या दिवशी ११ मिनिटांच्या अंतरानं संध्याकाळी ६.२४ ते ६.३५ या वेळेत सात बॉम्बस्फोट होऊन पश्चिम जीवनवाहिनी ठप्प झाली. त्यामुळे लाखो रेल्वे प्रवासी घरी जाण्यासाठी रस्ते वाहतुकीकडे वळले होते. सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली होती. प्रत्येकाच्या मनात विचारांची गर्दी होती. त्या दिवशी मी उशिरा निघाले म्हणून नाही तर चर्चगेटहून सुटणाऱ्या बॉम्बस्फोट झालेल्या एखाद्या गाडीत मी असण्याची शक्यता होतीच. या दोन्ही घटनांचं मी घटनास्थळी जाऊन वार्तांकन नाही केलं पण त्याच्या बातम्या केल्या.

सह्याद्री वाहिनीवर एकदा रविवारी माझी अनुवादकाची ड्युटी होती. दुपारी दीडच्या बातम्यांचं काम सुरू होतं. तेव्हा एक वाजून गेला असताना झाडून सगळ्या वाहिन्यांनी “रिझर्व बॅंकेच्या इमारतीला आग” अशीब्रेकिंग न्यूज द्यायला सुरुवात केली. वेळ कमी होता तरीही आम्ही लोक अग्निशामक दलाशी बोललो. त्यांनी सांगितलं की रिझर्व बॅंकेच्या कर्मचाऱ्यांसाठी हे मॉक ड्रील होतं. काही वेळानं सगळ्या खाजगी वाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूज मागे घेतली होती.

अलीकडील काही वर्षांमध्ये एकूणच सरकारी काय किंवा खाजगी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये अभ्यासाची सवय कमी होऊन अज्ञान लपवायची सवय वाढत चालली आहे. याचं एक ताजं उदाहरण देऊन थांबते. यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत असा विषय त्यांच्या जयंतीनिमित्त संपादकांनी ठरवला होता. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखती मागवण्यात आल्या. एका शिकाऊ वार्ताहराला मुलाखतींची टेप दिली आणि स्टोरी बनवायला सांगितलं. तिनं टेप पाहून संपादक महाशयांना सांगितलं की सर यात शिल्पकार, शिल्पकला असं काहीच नाही ! एक प्रशिक्षणार्थी डिक्शनरीत क्वात्रोची शब्दाचा अर्थ बघत होता. ही दोनही उदाहरणं सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही माध्यमांतील असू शकतात. शेवटी सजगता, अभ्यासाची तयारी या व्यक्तीसापेक्ष आहेत. एक चांगला पत्रकार कुठल्याही प्रसार माध्यमांत चांगलंच काम करतो हे मात्र नक्की.

— लेखन : प्रज्ञा जांभेकर-चव्हाण. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. The article by smt Pradnya Jambhekar found really good. Only a passionate and genuine journalist can write such article. It reflects right approach towards the profession of journalism. Eager to read further articles.

  2. प्रज्ञा चव्हाणांच्या लघु लेखातून पत्रकारीतेत बातमीची सत्यता आणि ती देताना घ्यावयाची सजगता किती महत्त्वाची असते हे छान सांगितले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ