कथा “ऑपरेशन एक्स” ची
26 नोव्हेंबर 2008 रोजी मी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागात होते. सातचं बातमीपत्र संपल्यावर मी निघाले आणि रात्री साडेआठ वाजता घरी पोहोचले. तेव्हा आम्ही ठाण्यात जांभळी नाक्याजवळ भाड्याच्या घरात रहात होतो. नेहमीप्रमाणे आवरून मी झोपी गेले. नंतर फोन वाजला. तो नणंद वंदनाचा होता. तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजले होते. तिनं संदीप (माझा नवरा तेव्हा आयबीएन लोकमत या वृत्त वाहिनीवर डेप्युटी न्यूज एडिटर आणि क्रीडा संपादक होता) कुठे आहे ? अशी विचारणा केली आणि सांगितलं, “अगं प्रज्ञा मुंबईत ठिकठिकाणी गोळीबार सुरू आहे.” फोनवरून संदीप सुखरूप असल्याची खातरजमा करून मी लगेच टीव्ही सुरू केला. त्यानंतर एकामागोमाग घडलेल्या घटनांनी माझा थरकाप उडाला. माझा हा अनुभव प्रातिनिधीक होता. त्या दिवशी प्रत्येक मुंबईकरानं हाच अनुभव घेतला. फक्त अनुभवांचे तपशील प्रत्येकाचे वेगळे होते.
या हल्ल्यापासूनच माझ्या मनात एक माणूस म्हणून, एका लोकशाही देशाची नागरिक म्हणून आणि पत्रकार म्हणून अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याची उत्तरं शोधता शोधता एका पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया डोक्यात सुरू झाली. या पुस्तकाला मूर्त रूप मिळालं ते पुढे 21 नोव्हेंबर 2012 रोजी दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियेनंतर कसाबला फासावर लटकावण्यात आलं त्यानंतर काही महिन्यांनी.
कसाबला फाशी दिल्यानंतरही एक ना दोन अनेक नवीन प्रश्न माझ्या मनात गुंजी घालत होते. कसाबला अत्यंत गोपनीय पद्धतीनं फासावर चढवण्यात आलं, त्याला मुंबईहून पुण्याला हलण्यासाठी नियोजन पद्धतीनं योजना आखण्यात आली होती. त्याची तपशीलवार माहिती गोळा करताना अनेक महत्त्वाची माहिती हाती लागली. या सगळ्या मोहिमेविषयी एक पुस्तक होऊ शकतं, अशी कल्पना मी राजहंस प्रकाशनाकडे मांडली. कल्पना तुमचीच आहे तर त्यावर तुम्हीच पुस्तक लिहा असा प्रस्ताव त्यांनी ठेवला, तो मी मान्य केला.
इथून पुढचा पुस्तकाचा प्रवास ही मात्र तारेवरची कसरत होती. पुस्तक लवकरात लवकर पूर्ण करायचं होतं. आणि देशाची राजधानी दिल्ली, पाकिस्तानातल्या घडामोडी,महाराष्ट्रातल्या घडामोडी यांचा बारकाव्यांसह तपशील गोळा करणं आव्हानात्मक तर होतंच शिवाय प्रचंड अभ्यास करावा लागणार होता. अनेक लोकांना भेटावं लागणार होतं, अनेक पुस्तकांचं वाचन करावं लागणार होतं. अनेक पुस्तकांचं वाचन केल्यानंतरही प्रश्नांचं सतावणं सुरूच राहिलं.
पत्रकार म्हणून माझं कार्यक्षेत्र (बीट) हे कधीच क्राईम नव्हतं. घटनांचा मागोवा घेताना एकात एक गुंतलेल्या घटनांची सांगड घालणं यात कसोटी लागणार होती. या घटना एकाच ठिकाणी अगदी इंग्रजी पुस्तकांत, नियतकालिकांमध्येही उपलब्ध नव्हत्या. एखाद्या पुस्तकात फक्त ताज हॉटेलमधल्या घटनांना केंद्रस्थानी ठेवलं होतं तर काही पुस्तकांत अचूक तपशील नव्हता. संशोधक वृत्तीचा कस लागला. लॉजिकल माइंड अस्वस्थ होतं. खळबळजनक, वादग्रस्त गोष्टींचा उल्लेख टाळता येणार नव्हताच; पण पुस्तकाबद्दल वाद निर्माण करणं हा पुस्तकाचा हेतू नव्हता. टीकेचं लक्ष्य झालेल्या सुरक्षा यंत्रणांचं योगदान जगासमोर आणणं अत्यावश्यक होते. तुटपुंज्या साधनांनिशी काही क्षणात रस्त्यावर उतरलेल्या पाच हजाराहून अधिक पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या जवानांनी दाखवलेल्या ‘न भूतो न भविष्यती’ शौर्याला पुस्तकरुपी मानवंदना द्यायची होती. त्याच वेळी सडेतोडपणे सत्य सांगायचं होतं.
पुस्तक पूर्ण होईपर्यंत माझी झोप उडाली होती. कसाबला मुंबईहून पुण्याला नेण्याची योजना आखली ती तत्कालीन पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते यांनी. पुस्तकानिमित्त मी त्यांना भेटले. मी त्यांना प्रश्न विचारला आणि रेकॉर्डर ऑन केला. त्यांनी रेकॉर्डर फोन बंद करायला सांगितला. मग मी डायरी आणि पेन काढलं आणि प्रश्न विचारला. खाली पाहून लिहायला लागले तर ते बोलायचे बंद झाले. असं तीन चारदा झाल्यावर मी विचारलं, “सर काय झालं ?” तर ते म्हणाले, “आत्ता जे बोलेन ते फक्त ऐक. घरी गेल्या गेल्या कागदावर लिहून काढ. ते जसंच्या तसं लिहून काढ. ते तसंच्या तसं कागदावर उतरलं तर पुढची माहिती देतो.” पुढे ते एक तास बोलत होते. मी फक्त कानसेन झाले होते.
हा अनुभव नवीन होता; पण तितकाचं आव्हानात्मक होता. मी घरी गेल्यावर लगेच पेन काढलं आणि जे ऐकलं ते तंतोतंत कागदावर लिहून काढलं. नंतर त्यांना ते फोनवर वाचून दाखवलं. ते त्यांनी सांगितलं होतं तसंच्या तसं होतं. त्यांनी त्याबद्दल कौतुक तर केलंच; पण लगेचच पुढच्या भेटीची वेळ दिली हे वेगळं सांगायची गरज नाही.
पुढे ज्यांना ज्यांना मी भेटले त्यावेळी हीच माहिती मिळवण्याची पद्धत ठेवली. दाते यांनी दिलेल्या माहितीमुळे मुंबईच्या आर्थर रोड तुरूंगातून कसाबचा पुण्याच्या एरवडा कारागृहापर्यंतचा प्रवास बारकाव्यांसह मांडणारं ‘ऑपरेशन एक्स’ हे प्रकरण या पुस्तकाचा गाभा ठरलं.
कसाबला ताब्यात घेतल्यापासून त्याची कोठडी संपेपर्यंत तो पोलीस निरीक्षक रमेश महाले यांच्या देखरेखीखाली होता. त्यांनीच दाते यांच्या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या टीमचं नेतृत्व केलं. ते 26/11 हल्ला प्रकरणातील गुन्ह्यांचा मुख्य तपासअधिकारी होतो. या पुस्तकासाठी मी त्यांची समक्ष भेट घेतली. अनेक प्रश्न आणि प्रतिप्रश्न विचारले. त्यातून आतल्या गोटातली माहिती मिळवण्यात यश मिळालं. जी कमांडो टीम कसाबला मुंबईहून पुण्याला घेऊन गेली त्यांचं दुर्मीळ छायाचित्र महाले यांनीच दुसऱ्या आवृत्तीसाठी उपलब्ध करून दिलं.
महाले यांची भेट घेतल्यानंतर मला एका कडव्या दहशतवाद्याची मानसिकता कशी असते हे उमगत गेलं. कसाबविषयीच्या सर्वच प्रकरणात त्यामुळे एक जिवंतपणा येत गेला.
हे पुस्तक अनेक ग्रंथालयांत कितीतरी दिवस प्रतीक्षायादीत होतं. प्रत्यक्ष पुस्तक लिहायला फक्त चार महिने लागले; पण लिखाण रात्रंदिवस सुरू होतं. अनेकदा काही प्रसंग कागदावर उतरवताना सुन्न व्हायला व्हायचं. कधी डोळ्यात पाणी यायचं. झोप लागायची नाही. काहीशी अशीच प्रतिक्रिया वाचकांची असते. एका बैठकीत ते पुस्तक संपवतात.
कसाबला फाशी दिल्यानंतर या पुस्तकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली खरी; पण या घटनेचा मागोवा प्रत्यक्ष हल्ल्यापासून घेणं आवश्यक होतं. त्यामुळे पुस्तकाचा आवाका वाढला, माझी जबाबदारी वाढली. घटनांची ‘लिंक’ लावताना कधी संबधितांना प्रत्यक्ष भेटावं लागलं, तर कधी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधावा लागला. संदर्भग्रंथांचं वाचन झालं. पुन्हा कुठं धागा निसटला नाही ना हे तपासावं लागलं. हे पुस्तक घडताना मलाही खूप शिकायला मिळालं. पुस्तकाच्या शेवटी सलग दिलेला घटनाक्रम, सात परिशिष्ठात दिलेले वेगवेगळे घटनाक्रम यामुळे पुस्तकाला एक संदर्भमूल्य प्राप्त झालं.
26/11 चा हल्ला, कसाबला फाशी हे विषय आता मागं पडले आहेत, त्यामुळे या पुस्तकाचं महत्त्व काय ? असा प्रश्न मला विचारला जातो. कसाबच्या फाशीनंतर मृत्युदंडाची शिक्षा, भारताचं परराष्ट्र धोरण, दहशतवाद, अमेरिका आणि पाकिस्तानची या संदर्भातली वागणूक, देशाची सागरी सुरक्षा, देशांतर्गत राजकारण अशा अनेक मुद्यांवर नव्यानं विचार करायला सुरूवात झाली.
दहशतवाद ही खूप गुंतागुंतीची समस्या आहे. देशाच्या सुरक्षेचा त्याच्याशी थेट संबंध आहे. कसाबला फाशी देण्यापेक्षा त्याच्या माध्यमातून खऱ्या सूत्रधारांपर्यंत नक्कीच पोहोचता आलं असतं. जोपर्यंत दहशतवाद आणि त्याच्याशी निगडित समस्यांचही समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत या पुस्तकाला मरण नाहीच; पण एक साहित्यकृती म्हणूनही हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवणारं आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या पुस्तकात कथा, कादंबरी, निवेदनात्मक शैली, फ्लॅशबॅक असे अनेक प्रकार वापरले आहेत हे विशेष.
‘ऑपरेशन एक्स: कसाबचा प्रवास तुरूंग ते फाशी गेट’ हे माझं पहिलं पुस्तक तयार होताना अनेकांनी मला वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत केली. त्या अर्थानं या पुस्तकाचे अनेक निर्माते आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर मी दहशतवाद्यांच्या मार्गांची पाहणी केली. कसाबला फाशी दिल्यानंतर मी हल्ल्याच्या वाईट आठवणी पुसून टाकायचा प्रयत्न केला; पण व्यवहार्य पातळीवर देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अजूनही आपण पूर्णपणे सज्ज झालेलो नाही याची खंत त्यावेळीही मनात होतीच. मुंबई हल्ल्यानं ऊरावर दिलेल्या जखमांवर कसाबला दिलेली फाशी ही तात्पुरती मलमपट्टी असल्याची जाणीव कायम राहिली.
माझ्या या पहिल्या पुस्तकाची दुसरी सुधारित आवृत्ती 2017 मध्ये बाजारात आली. दुसऱ्या आवृत्तीत 50 पानांची भर घालून 26/11 च्या हल्ल्याबरोबर इतर अद्ययावत माहिती त्यात आहे. या पुस्तकाच्या निर्मितीनंतर 2017 मध्ये मी स्वत:ची सदामंगल ही प्रकाशनसंस्था सुरू केली आणि या पुस्तकाचे हक्क आता सदामंगलनंच विकत घेतले आहेत.
“लेखिकेचं हे पहिलंच पुस्तक आहे आणि म्हणूनच लेखिकेनं एक पत्रकार म्हणून केलेलं संकलन अप्रतिमच आहे. लेखनात पुस्तक लिहिण्याचा अभिनिवेश नाही. त्याचबरोबर खरी बाजू मांडण्याचा बिनधास्तपणा आहे. लेखन कोणाच्या बाजूनं वा विरोधात नाही. सर्वसामान्यांना आकलन होईल इतक्या सहजतेनं केलेलं हे वास्तववादी लिखाण आहे. पुस्तकातला घटनाक्रम आणि त्याची मांडणी याला ओघवत्या शैलीची जोड लाभल्यामुळे एकदा पुस्तक हातात घेतलं की ते तुम्ही शेवटपर्यंत वाचाल, अशी मला खात्री आहे. पुस्तक माहितीपर तर आहेच; पण सत्यघटनांवर आधारित आहे आणि म्हणूनच लेखिकेनं त्याची मांडणी अत्यंत जबाबदारीनं केली आहे. अतिरंजकतेसाठी सत्याचा कुठंही विपर्यास केला गेलेला नाही. ज्यांच्या भावना जिवंत आहेत, त्या प्रत्येकाला हे पुस्तक आपल्या नजरेतून लिहिलं गेलं आहे असं वाटेल.” असं पुस्तकाच्या बोलक्या प्रस्तावनेतच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
लवकरच या पुस्तकाची तिसरी आवृत्ती निघत आहे. वाचक तिचंही स्वागत करतील, अशी आशा आहे.
— लेखन : प्रज्ञा जांभेकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Excellent article. I went through this article 2-3 times and found different aspects. It provides a perspective about alertness at citizen level. Worth reading the article and the book.