आज ६ डिसेंबर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन. त्या निमित्ताने वाहिलेली ही आदरांजली.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
१. झंझावात
मन माझे तूच बदलले
वृत्ती तूच फुलवल्या
मनावरची धूळ झटकूनी
ग्रहदशा तू खरवडल्या ………१
जीवनात तू नसता तर
खचित असतो पडलेला
विचार प्रक्रिया बदलण्यास
कारणीभूत तू ठरला…………२
वैचारिक भूमिका ही माझी
तूच सुसंगत केली
झंझावात बनून माझ्या
जीवनाची दिशा बदलली………..३
बुद्धी माझी स्वतंत्र झाली
गुंता तूच सोडवला
नैतिकतेच्या परिभाषा ही
तूच मला समजाविल्या………….४
अन्यायाचे परिमार्जन करण्या
बळ तुझ्याचमुळे मिळाले
संघटनेचे महत्व जीवनी
तूच मला शिकविले………………५
अचपळ मनास आवरण्याही
तूच हात मज दिधले
तुझेच शब्द, ज्ञान यांनी
भ्रमनिरास माझे केले…………….६
पुस्तके, पोथ्या, लेखांचा हा
खजिनाच मज गवसला
जगात ज्याला तोड नाही
तो अर्थ मला उमगला…………….७
— रचना : सौ.स्वाती वर्तक. खार (प)
२. महामानव
महापरिनिर्वाण दिन पूज्य बाबासाहेबांचा
त्यांच्या महान कार्याला स्मरण्याचा ।। १।।
बाबासाहेब दीपस्तंभ महापुरुष झाले
अंधारमय जीवन उजळुनी टाकिले ।।२।।
अन्याया विरुद्ध अविरतसे ते लढले
आवाज उठावण्या त्यांनीच शिकवले ।।३।।
शिक्षणाचा महामंत्र मनामनाला दिला
ज्ञानाचा दीप घराघरात हो लाविला ।।४।।
बुद्धधर्माची शिकवण आचरणात होती
मानवता धर्माची ज्योती हातात होती ।।५।।
देशाभिमान सदैव जगाला दाखविला
समता, बंधुभाव, जनमनाला दिला ।।६।।
देशाच्या घटनेचे आहेत थोर शिल्पकार
त्यानुसार चालतो देशभरात कारभार ।।७।।
बाबासाहेब दिसती मूर्तिमंत बोधिसत्व
प्रज्ञा, शील, करूणा, हे जीवन तत्व ।।८।।
साऱ्यांचे आदर्श बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर ।।९।।
।।महामानवाच्या चरणी काव्यांजली ।।
–– रचना : अरुण वि.देशपांडे. पुणे
३. महामानव
हे ज्ञानसागरा
गातो तुझी भीम वंदना
वसली तुझिया ठाई
प्रेम दया करुणा
बुद्धाची शांती
समतेची क्रांती
शिक्षणाच्या मंत्रातून साधली
दीन दलितांची प्रगती
संविधानाच्या सूर्यातून दिलीस तू
न्याय स्वातंत्र्य बंधुत्वाची किरणे
तुझ्यासम तूच महामानवा
तेजाचे तव गातो गाणे
भीम गदेच्या प्रहाराने
तोडली विषमतेची पाळेमुळे
पवित्र झाले चवदार तळे
हे ज्ञानसूर्या तुझ्यामुळे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
नाव कोटी कोटी हृदयावर
भारतभूषण भारतरत्न
जोडतो तूज विनयेन दोन्ही कर
— रचना : राजेंद्र वाणी. दहिसर
— संपादक : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800