नैतिक शिक्षण म्हणजे व्यक्तींना नैतिक दुविधा सोडवण्यासाठी मदत करणे आणि त्यांच्या कृतींचे परिणाम समजावणे होय . नैतिक शिक्षणामुळे बालकांमध्ये नैतिक विकास होतो आणि ते योग्य आचरण करण्यास प्रोत्साहित होतात. नैतिक शिक्षणामुळे मुलांमध्ये सहानुभूती, निष्पक्षता आणि इतरांच्या गरजा आणि अधिकारांची जाणिव निर्माण होते. त्यामुळे बालक योग्य – अयोग्य गोष्टीचा अर्थ समजू शकते. हे नैतिक शिक्षण मिळण्याचे मार्ग बाधित झाले आहेत वा नैतिक शिक्षण बालकापर्यंत गांभीर्याने पोहचवण्यासाठी आपण सगळे कुठे तरी कमी पडत आहोत.याचा अभ्यास आणि शोध घेणं निश्चितच आवश्यक आहे.
पुण्यात नैतिक शिक्षण या विषयावर नुकतीच समाज विकास संस्थेच्या वतीने एक परिषद आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेत बोलताना माजी आय एस अधिकारी श्री अविनाश धर्माधिकारी यांनी बालक, पालक, युवा यांना व्यसनाधीनतेपासून लांब राहण्याचे आवाहन केले.

जेष्ठ साहित्यिक श्री श्रीपाल सबनीस यांनी ही परिषद इथेच न थांबता संपूर्ण महाराष्ट्रात अशा परिषदा आयोजित करण्यात याव्यात असे सांगून नैतिक शिक्षणाची आज किती गरज आहे या बाबतची आवश्यकता प्रतिपादित केली.
“बालक आणि नैतिक शिक्षण” या विषयावर बाल कल्याण समिती पुणे च्या अध्यक्षा डॉ राणी खेडीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी या विषयाचे अनेक पैलू मांडले. बालकांना नैतिक शिक्षण देण्यासाठी आपण सगळेच कमी पडत असून पालक, शिक्षक, समाज म्हणून आपण बालकाकडून कोणती अपेक्षा प्रथम स्थानी ठेवली आहे आणि त्यासाठी होणारी आपली कृती बालकाला कोणत्या दिशेने मार्गस्थ होण्यास कारणीभूत ठरत आहे या बाबत चर्चा केली.
डॉ राणी खेडीकर : प्रमुख मुद्दे
मी जेव्हा शाळा मध्ये बालकांना भेटायला जाते, त्यांच्याशी संवाद साधते त्यावेळी किती बालकांच्या दप्तरात “नैतिक शिक्षण” अर्थात या विषयाचं पुस्तक आहे का ? असं विचारते तेव्हा अगदी दोन ते तीन टक्के बालकाच्या दप्तरात ते पुस्तक असतं. एकतर त्याच्या अधिकतर पानाचे विमान बनवून उडवले असते किंव्हा ते पुस्तक अगदी नवीन कोरं असतं. या विषयाच्या तासाला गणित, विज्ञान किंव्हा इतर विषयाचे तास घेतले जातात.
चांगल्या सवयींबाबत बालकांना सांगितलं जातं पण आठवड्यातून एकदा असा तास घेतला जातो. पालक पण कधी बालकाला विचारत नाही की आज नैतिक शिक्षण मूल्य शिक्षण या तासाला काय शिकवलं ? अभ्यास केला का एवढंच विचारतात आणि ते ही विषय ठरलेले असतात.
माझं मुल एक चांगली नागरिक होण्यासाठी अभ्यास करतेय की नाही ? याची काळजी किंव्हा आवश्यकता पालकांना वाटते का ?
नीतिमत्ता या विषयाशी बालकाची ओळख व्हावी, त्याचा अभ्यास व्हावा आणि बालकाने ते कृतीत आणावं यासाठी शाळा प्रयत्न करतेय का पालकांच्या कृतीतून ते पोहोचते आहे का ? समाजात या गोष्टी बघायला मिळत आहेत का ? हे मूलभूत प्रश्न बालकांच्या वर्तनावर परिणाम करत असतात.

आई वडिलांशी खोटं बोलून त्यांना न सांगता एखादी मुलगी अनोळखी व्यक्तीच्या मोहात घर सोडून निघून जाते. एखादा बालक दुसऱ्या बालकावर अत्याचार करतो. एका सकाळी काही अल्पवयीन बालके एखाद्या आजी आजोबांवर सुरीने वार करतात. बालकांचे गट तयार होऊन ते समाज विघातक घटना घडवून आणतात. कोणी बालिका तिच्याच घरातील व्यक्ती कडून खाऊ पैसे नवीन कपडे देऊ केल्यास स्वतःचे शोषण करू देण्यास तयार होते. यात तिला गौर असं काही वाटत नाही. कारण ‘काही होत नाही’…. ‘त्याला काय होतं’….’सब चलता हैं’….. या तत्त्वावर हल्लीची पिढी पुढे चालली आहे.
आज प्रामुख्याने नैतिक शिक्षण हा विषय बालकापर्यंत त्यांना कळेल समजेल उमजेल त्या पद्धतीने पोहोचणं आवश्यक आहे.
डॉ राणी खेडीकर यांनी परिषदेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे गांभीर्य उपस्थित पालक शिक्षक यांना समजून आले आणि त्यांनी याबाबत निश्चितच कृती करू असे सांगून अशी आणखी सत्रे घेण्यात यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
नैतिक शिक्षणाची खरच गरजेचं आहे.
चांगला उपक्रम