कर्नाटक मराठी साहित्य परिषद, कलबुरगी अध्यक्ष श्री गुरैया स्वामी यांच्या अतुल्य योगदानाने बेंगळूरू सारख्या अमराठी शहरात कर्नाटक मराठी साहित्य परिषद आपले पाऊल मांडत आहे.
कर्नाटक मराठी साहित्य परिषद बेंगळूरू विभागात कार्यवाह मा. दिपाली वझे यांच्या निवास स्थानी त्यांचे पती मा. डॉ. महेश वझे यांच्या सहकार्याने काल अतिशय जोमाने व आत्मीयतेने मराठी दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यात बेंगळूरूच्या विविध विस्तारातले साहित्यिक आवर्जून उपस्थित राहिले होते.
मराठी साहित्य परिषद बेंगळूरू विभागाच्या अध्यक्षा डॉ. संध्या अणवेकर थेट बेळगाव हून बेंगळूरूला आल्या तेव्हा आपल्या उपस्थितीने त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. संध्या अणवेकर आणि सौ दिपाली वझे यांनी केलेल्या सरस्वती पूजन आणि दिप प्रज्वलनाने झाली. मा. अर्चना देसाई यांच्या सरस्वती वंदनाने वातावरण सुरम्य झाले.
या सोहळ्यात माननीय यशवंत जोशी, योगिनी जोशी, अर्चना देसाई, दत्तराज देसाई, अनंत मिसे, अपर्णा मिसे, शाम वडाळकर, अशोक हवालदार, अरूणा हवालदार, नुतन शेटे, लिना पेंढारकर, गौरी राठोड, परिज्ञा राठोड यांनी बेंगळूरू विभागाच्या पहिल्या मराठी साहित्य परिषदेत आपली उपस्थिती नोंदवली.
या शुभ दिनी स्वागतासाठी दारावर मराठमोळी रांगोळीची अप्रतिम सजावट केल्याने येणाऱ्यांचे चेहेरे सुखावले होते. त्याचं श्रेय मा. धनश्री गायकवाड आणि मा. प्रिती तरी यांच्या आत्मरूप असलेल्या कलेला जातं. सोहळ्याचे नियोजन, आतिथ्य व क्षणचित्रे मा. डॉ. महेश वझे यांनी आपल्या कॅमऱ्यातून उत्तम रित्या साकारले आहेत.
साहित्यिकांनी आपला सविस्तर परिचय देऊन आपली रचना व मनोगत सादर केले. मराठी दिनाची संध्याकाळ भाऊक मनाला स्पर्शणारी जीवाभावाची झाली. उपस्थित मान्यवरांनी एकमेकांच्या रचनेला उत्स्फूर्तपणे दाद देऊन एकमेकांस गौरवले.
या भेटीत रसिकांच्या बरोबरीनं मुलांचीही हजेरी होती. त्यांनी आपले कौशल्य दाखवून ज्येष्ठ साहित्यिकांकडून पाठीवर थाप देखील मिळवली. या भेटीतून साहित्यिकांना नवीन उर्जा तर मिळालीच पण अश्या भेटीतून नवकवी, नव साहित्यकारांची निर्मिती होईल यात शंका नाही.
डॉ. संध्या अणवेकर यांनी स्वानुभावावरील एका वास्तविक घटनेला शुद्ध मराठीवर लिहिलेल्या अप्रतिम अश्या कथेच्या स्वरूपातून केलेल्या मनोगतानी रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता सौ दिपाली वझे यांच्या मातृभाषा वरील प्रेरणादायी मनोगताने झाली व “मातृभाषा स्पंदनाच्या आत रूळली पाहिजे” हि भावपूर्ण गझल रसिकांच्या थेट ह्रदयात भिडली.
मा. अपर्णा मिसे, मा. यामिनी जोशी, मा. अर्चना देसाई, मा. शाम वडाळकर सरांनी मराठी साहित्य परिषद, बेंगळूरू विभागाचे कार्य उत्तमोत्तम करण्यासाठी बेंगळूरू विभाग अध्यक्षा डॉ. संध्या अणवेकर तसेच कार्यवाह मा. दिपाली वझे यांना शाल व हारतोरे घालून भरगच्च शुभेच्छा दिल्या.
कर्नाटक राज्यात महाराष्ट्रीयन पोहे व नारळ पोळीच्या अल्पहारानी सारस्वतांना संतुष्ट केले. अश्या गाठीभेटी नेहमीच उर्जादायी व सकारात्मक ठरतात आणि भविष्याची मुळे पसरवतात.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800