कॉलेज मध्ये शारीरिक आरोग्याची तपासणी झाली. दोन तीन दिवसात सर्वांना रिपोर्ट दिले गेले.
प्राध्यापकांची चर्चा झाली आणि प्रश्न होता तो मानसिक आरोग्याचा….त्यासाठी उपाय म्हणून मग कॉलेज तर्फे मानसोपचारतज्ज्ञ यांना आमंत्रित केले होते…..जी आजच्या आधुनिक काळाची खरी गरज आहे.
ते बोलू लागले…..
मानसिक आरोग्य जपण्यासाठी तुम्ही काय करता…..?
सगळे शांत होते. कारण याचे ठाम उत्तर कोणाकडे नव्हते.
शारीरिक आरोग्यासाठी तुम्ही व्यायाम करता. पण मनाचे आरोग्य कसे जपता ?
खरे म्हणजे आजच्या धावपळीच्या जीवनात मनाचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. परंतु त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही आणि यामुळे खूप मोठे नुकसान होते.
ताण तणाव ही एक वाळवी आहे जी माणसाला आतल्या आत पोखरत राहते. लवकर सावरले तर ठीक, नाहीतर कधी कधी एखादी व्यक्ती टोकाचे निर्णय घेऊन आपले हे सुंदर आयुष्य संपवून टाकते.
त्यासाठी मनापासून कळकळीने विनंती करते…..
बोलते व्हा….व्यक्त व्हा…..
हसा, बोला, रडा, भांडा, रागवा. पण आपल्या भावना व्यक्त करा.
आज तुम्ही पहात असाल अनेकांकडे पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, दुसऱ्यांना हेवा वाटावा अशा सर्व गोष्टी आहेत..पण मनाचे समाधान व आनंद याचे काय….? ते हरवत चालले आहे…
हे त्या सुंदर नाण्याच्या दुसऱ्या अदृश्य बाजू चे कटु सत्य आहे.
आजच्या धावपळीत, स्पर्धेच्या जमान्यात याच गोष्टींना जोडून येतो तो ताण तणाव आणि तो सहन झाला नाही की मग मात्र मानसिक आरोग्य धोक्यात येते.
अशी व्यक्ती सतत निराश असते. तेव्हा गरज असते आधाराची. त्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची. त्याला जज न करता व्यक्त होण्याची, एक हक्काची जागा हवी असते.
आज मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे, अमोलची. माझ्याकडे येण्याआधी तो बोलत होता, स्वतःशीच. त्याच्या अंतर्मनाशी…..
मी त्याला बोलते केले. तेव्हा तो सांगू लागला….. कधी कधी असे वाटते काहीही नको. एकदम शांत बसावे… कोणाशीही काहीही बोलूच नये…… निशब्द…. निर्विकार…. स्वतःच्या विश्वामध्ये हरवून जावे…..
मला अनेक वेळा असे होते….. काही त्रास, काही जखमा मनाच्या खोलवर रुतून असतात .मात्र आपण त्या बोलू शकत नाही. कुणाला सांगूही शकत नाही. त्यापेक्षा एकांत हवाहवासा वाटतो !
आपल्याला समजून घेणारे कोणीच नाही का ? आपले ऐकून घेणारे कोणीच नाही का ?
कधी कधी ना शब्द सापडत नाही. म्हणजे शब्दात व्यक्त होता येत नाही. म्हणजे मनात एक असते पण दुसरेच काही सांगितल्या जाते. का असे ? किंवा कुणी सांगण्याचा प्रयत्न ही करतो पण ते समोरच्याला समजत नाही. तो त्याचा वेगळाच अर्थ काढतो अथवा त्याला समजून घेण्याची इच्छाच नसते. मग सर्व घोळ होऊन बसतो.
जणू या माणसांच्या गर्दीत ती व्यक्ती एकटी पडली आहे. हरवलो आहे स्वतःमध्ये…… ती घाबरून जाते. अस्वस्थ होते.तिला भीती वाटते कसे होईल, आपले ? …..सतत चिंता….काळजी…
अमोलचे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेतलं….
अमोलची द्विधा मनस्थिती झाली होती. अनेक वेळा तो कल्पनेतील व्यक्तीशी बोलत असायचा आणि हे अतिशय घातक आहे.
प्रत्येक वेळी शांत रहाणे हे अशांत मनाचे लक्षणही असू शकते. म्हणजे आत एक तर बाहेर एक. पाहणाऱ्याला वाटते की, या व्यक्तीकडे सगळेच तर आहे. म्हणजे मग हा किती नशीबवान आहे. पण……….अनेक वेळा या लोकांकडे न दिसणारे त्रास अथवा दुःख असते जे केवळ त्यांना माहीत असते.
‘मी ठीक आहे’…… यात खूप काही गोष्टी लपवलेल्या असतात…….
काही व्यक्ती असे भासवतात की मी खूप आनंदी आहे. मात्र आतून त्या पूर्णपणे कोलमडलेल्या असतात. मनात अनेक विचारांचा कल्लोळ असतो.
आणि मग……. अचानक त्यांनी आत्महत्या केल्याची बातमी कानावर येते.
कोणालाही विश्वास बसत नाही, कारण सदैव हसमुख असणारी ती व्यक्ती मनाने पूर्णपणे खचलेली होती, असे कधीच कुणाच्या कसे लक्षात आले नाही ? ती व्यक्ती मन मोकळेपणे कधी,कुणाशी का बोलली नाही ? का आपल्याला सांगितले नाही ? मी एवढा जवळच मित्र अथवा मैत्रीण होते तरी का माझ्यावर विश्वास ठेवला नाही ? असा त्या व्यक्तीला कोणता त्रास होता की त्याला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.
या….. का ? चे उत्तर मात्र अनेकांना मिळत नाही. हे गुपित त्याच्या बरोबरच जाते.
त्या व्यक्तीच्या अशा प्रकारे जाण्याचा घरातील मंडळी अथवा मित्र परिवारालाही खूप त्रास होता.
सतत कामाच्या व्यापात मनुष्याला कुटुंबाकडे व स्वतःसाठी ही वेळ नाही.
तो नुसता पळत आहे पैसा, प्रसिद्धी सर्व आहे मात्र समाधान, शांतता व आनंद आता उरला नाही.
या सर्वाचा समतोल साधता आला पाहिजे. ती देखील एक कला आहे ती ज्याला जमली तो सर्वात सुखी मनुष्य. कारण….. कोठे थांबले पाहिजे हे त्याला माहित असते.
अनेक वेळा दुःख देणारी व्यक्ती ही जवळचीच असते कारण आज वेळेअभावी इतर लोकांशी बोलणे फारसे होत नाही.
संवाद हरवत चालला आहे व कामाचे व्याप आज प्रचंड आहे. जीवन अतिशय धावपळीचे झाले आहे.
अपेक्षांचे ओझे वाढले आहे हे दुःखाचे प्रमुख कारण आहे. स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कोणाकडूनही अपेक्षा ठेऊ नये कारण प्रत्येकाचे विचार वेगळे प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा असतो.
आपण तो पर्यंत दुःखी होऊ शकत नाही जोपर्यंत आपण स्वतःला त्रास करून घेत नाही.
काही गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे…हो ना ?
पण…….
हे तेवढे सोपे नाही….. हो……मात्र अशक्य ही नक्कीच नाही.
प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो .काही लोक खुप हळवे असतात. त्यामुळे त्यांना जास्त मनस्ताप होतो.
शेवटी काय……. वेळ आणि काळ हेच सर्व दुःखांवर रामबाण औषध आहे.
मनुष्याला वेळोवेळी व्यक्त झालेच पाहिजे .कोणी टोचुन बोलले तर वाईट वाटते.
कोणी उगाच चिडले की राग येतो.कोणी आपल्याला दुखावले की रडू येते. हे सर्व स्वाभाविक आहे. या सर्व भावना आहेत .आपण मनुष्यप्राणी आहोत, निर्जीव वस्तू नव्हे. त्यामुळे या सर्व गोष्टीचाही स्वीकार करता आला पाहिजे.
व्यक्त होणे यात काही चूक नाही.
प्रत्येक वेळी रडायचे नाही, रागवायचे नाही, बोलायचे नाही असे ठरवले तर त्याचा जास्त त्रास होतो कारण आपल्याला ही मन आहे, कोमल हृदय आहे.
भावनिक असणे म्हणजे आपले काही चुकते असे अजिबात नाही. तो दोषही नव्हे.
व्यक्त व्हा…..आपल्या पालकांशी, शिक्षकांशी, मित्र मैत्रिणीशी आणि नाहीच जमले तर मी आहे ना….माझ्याकडे या कधीही केव्हाही आमची एक सामाजिक संस्था आहे जी तुमच्या प्रश्नांना जोग्य उत्तर देते तुमचे ऐकून घेते व तुमचे नाव हे गुपित ठेवले जाते.
काही संस्था,व्यक्ती आपल्याला जज न करता साथ देतील. सोबत करतील, जेव्हा आपण फार एकटे असू.
त्या परमेश्वरावर, त्या अदृश्य शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवा. आपल्या जीवनात जे काही घडेल ते चांगलेच असेल. मग ते आपल्या वाटेला आलेले सुख अथवा दुःख का असेना व तीच त्या परमेश्वराची इच्छा असेल.
त्यामुळे मुलांनो तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी जिद्दीने, हिंमतीने पुढे जायचे.
कितीही कामाचे टेन्शन असले अथवा कितीही व्याप असले तरीही महिन्यातून अथवा आठवड्यातील एक दिवस किमान आपल्या कुटुंबासाठी देणे आवश्यक आहे.
वर्तमानात जगा .प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आयुष्य खूप सुंदर आहे तर भरभरून जगू या. स्वतःसाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्यावर प्रेम करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी, परमेश्वराने दिलेल्या या मनुष्य जन्मासाठी.
सभागृहात शांतता पसरली होती, vसर्व मुलं मन लावून ऐकत होती. सर्व मुलांनी मनाचे आरोग्य जपण्याची शपथ घेतली आणि नवी ऊर्जा घेऊन आनंदाने ती बाहेर पडली.

— लेखन : रश्मी हेडे. सातारा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: सौ अलका भुजबळ ☎️9869484800.