पैशासाठी मरमर करुनी देह झोपतो रात्री
देते का ही झोप माणसा शांत मनाची खात्री
गोड बोलुनी बोलघेवडा फसवणूकही करतो
बनवाबनवी ओळखते ती एक तेवढी दात्री
मापा इतक्या आकाराचे कपडे शिवतो शिंपी
उरल्या सुरल्या कपड्याला का चिंधी करते कात्री
मार्ग जलाचा जिथे अडवला साचत जाते डबके
वाटत जावे ज्ञान म्हणूनच बुद्धीने सत्पात्री
झिजून गेली हाडे सारी दमडी दमडी साठी
दिडदमडीच्या हौसेसाठी धडकी भरते रात्री
देवाद्वारी समान आहे सारे काही म्हणुनी
अंधाराच्या न्यायासाठी देतो हर शिवरात्री
साथ लाभते कोणाची ती मृत्यू झाल्यानंतर
असते शांती ब्रह्मांडाच्या प्रवासातला यात्री
— रचना : सौ.प्रज्ञा कुलकर्णी. वसमत
— संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800