Wednesday, June 19, 2024
Homeलेखभगवान बुद्ध आणि बाबासाहेब

भगवान बुद्ध आणि बाबासाहेब

भगवान बुद्ध यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर पडलेला भगवान बुध्द यांचा विशेष प्रभाव यावर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख.भगवान बुद्ध यांना विनम्र अभिवादन.
– संपादक

गौतम बुद्धांचा जन्म, त्यांनी केलेला गृह त्याग, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती, त्यांनी दिलेले पहिले प्रवचन आणि त्यांचे महापरिनिर्वाण या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये पौर्णिमेच्या दिवशी घडल्या. पौर्णिमेला त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असल्याने या दिवसाला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात. अर्थात बुद्ध पौर्णिमा हे नाव कोणी दिले हे सांगणे जरा कठीण आहे.

गौतम बुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ. बुद्ध याचा अर्थ शांतता. वैदिक संस्कृतीमध्ये शांततेच्या सर्वोच्च पदाला पोहोचलेल्या व्यक्तीला ब्रह्मास्मि असे म्हणतात. ख्रिस्ती धर्मामध्ये ख्रिस्त म्हणजे शांतता. इस्लाम धर्मामध्ये इस्लाम म्हणजे शांतता. जगातील सगळ्या धर्मांना हवी आहे ती शांतता. आणि त्या धर्मात नांदणाऱ्या लोकांना नको झालेली शांतता. हे तर हे विचारांचे दोन मुद्दे आहेत. एक शांतता हवी असणारा गट. त्यांना बुद्ध हवा आहे. ज्यांना युद्ध हवे आहे त्यांना बुद्ध नको आहे. पण मित्रांनो जीवनामध्ये शांततेने सहजीवन जगायचे असेल तर बुद्धाच्या विचारांची गरज आहे. युद्धांच्या विचारांना थारा देण्याची सुद्धा जीवनात आवश्यकता नाही.

महात्मा गौतम बुद्ध संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज तसेच बडोदा नरेश प्रजावत्सल अधिपती सयाजीराव गायकवाड या सर्वांनी शांततेचा अंगीकार केला. ही सर्व शांततेची पुरोगामी परंपरा पुढे चालवणारे जेष्ठ व्यक्तिमत्व भारतात जन्माला आले ते मध्य प्रदेशातील महू या गावी. हे थोर व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. लष्करी नोकरीच्या निमित्ताने त्यांचे वडील मध्य प्रदेशातील महू येथे वास्तव्यास होते. मात्र आंबेडकर यांचे मूळ गाव कोकणातील अंबावडे. त्यांना शिकवणारे शिक्षक आंबेडकर या नावाने परिचित होते. आंबेडकर गुरुजींनी बाबासाहेबांना अंबावडेकर या नावाऐवजी आंबेडकर असे उपनाम दिले. ज्या गुरुजींनी हे पुण्य कर्म केले त्यांच्या नातवंडाला भेटण्याचे भाग्य आम्हास लाभले आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मध्ये गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिरात त्यांनी शिक्षक म्हणून प्रदीर्घकाळ सेवा दिली आहे. अतिशय प्रेमळ असे ते व्यक्तिमत्व अजून आपणास पाहावयास मिळते. आपल्या आजोबांनी बाबासाहेबांना कसे शिकवले आणि त्या वेळच्या ब्राह्मण समाजाने त्या मुलांनी बाबासाहेबांना कसा विरोध केला याविषयी ते आम्हास सांगत. हे प्रसंग त्यांनी त्यांच्या आजोबांकडून ऐकले असे ते नमूद करत.

बाबासाहेब आणि बुद्ध यांचा संबंध आला तो सोळाव्या वर्षी. 1907 मध्ये बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास झाले. केळुस्कर गुरुजींनी त्यांना बक्षीस म्हणून बुद्ध चरित्राची प्रत भेट दिली. एखाद्या माणसाचे मस्तक बदलण्याची ताकद पुस्तकात कशी असते ही गोष्ट आपणास या प्रसंगांमधून पहावयास मिळते. बाबासाहेबांच्या घरात मुळात कबीर पंथी वातावरण होते. कबीरांचे दोहे आणि प्रार्थना झाल्याशिवाय संध्याकाळी जेवायला कोणी बसत नसे. आणि प्रार्थनेलाही कोणी गैरहजर राहत नसे.

मित्रहो, बाबासाहेब आणि बुद्ध समजून घ्यायचे असतील तर प्रथम त्यांचे साहित्य संग्रहित करावे त्यानंतर जमेल तसा वेळ काढून त्याचे वाचन करावे. चांगला अभ्यास करावा टिपणे काढावी. बाबासाहेबांच्या प्रमाणे आपलाही मुलगा जगाच्या वैचारिक क्षेत्रात नांदावा असे प्रत्येक पालकाला वाटत असेल तर त्यांनी बाबासाहेबांचे जीवन आचरणात आणावे. ग्रंथ संग्रह करण्यासाठी जगात प्रसिद्ध असलेले आणि सर्वात जास्त वैयक्तिक ग्रंथ संग्रह करणारा विद्या व्यासंगी म्हणून बाबासाहेबांची ख्याती आजही जगात आहे.
अशा बाबासाहेबांनी मनुस्मृती हा ग्रंथ जाळला. ग्रंथ प्रेम करणारी व्यक्ती ग्रंथ का जाळते याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांचा विरोध ग्रंथाला नव्हता. ग्रंथातील कालबाह्य झालेल्या मांडणीला होता. महाडचा सत्याग्रह केला तेव्हा बाबासाहेबांचे अनेक अनुयायी त्यांना म्हणाले, ब्राह्मणांना सोबत घेऊ नका.
बाबासाहेबांनी त्यावर उत्तर दिले. ते आपण सर्व वाचकांनी हृदयस्त केले पाहिजे. ते म्हणाले मी ब्राह्मण जातीविरोधी नाही. मी ब्राह्मणातील कर्मकांडाविरुद्ध आहे. कर्मकांड फक्त ब्राह्मण या वर्गातच आहे असे नाही तर ते जातीय चौकटीच्या बाहेरही आहे आणि असणार. म्हणून परिवर्तनाच्या या लढ्यास व्यापक करण्याची गरज आहे आपणास नैतिक न्याय निवाडा करता आला पाहिजे तो ही चिकित्सक दृष्टिकोनातून. हे त्यांचे वाक्य अनेक जणांना आपल्या मताचा पुनर्विचार करायला भाग पाडणारे आहे.

बाबासाहेबांनी ३ ऑक्टोबर १९५४ रोजी नवी दिल्ली आकाशवाणी वरून एक भाषण केले. माझे जीवन विषयक तत्वज्ञान स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या तीन घटकांवर आधारित आहे. ही तीन मूल्य मी 1789 च्या फ्रान्सच्या क्रांति वरून घेतलेली नाहीत तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या घटकांचा मूळ उगम राजकारणामध्ये नसून बुद्धांच्या शिकवणुकीमध्ये आहे.
महाबोधी नावाच्या नियतकालिकामध्ये 1950 मध्ये बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य नावाचा लेख लिहिला हाच लेख पुढे बुद्ध व त्यांचा धम्म या नावाने ग्रंथ म्हणून प्रसिद्धी दिला.

धम्म आणि धर्म या दोन संकल्पना एकमेकांपासून वेगळे आहेत. आपला मानसिक आणि नैतिक अभ्युदय घडविण्याचे सामर्थ्य असणाऱ्या धर्मामध्ये मी जाणार अशी घोषणा त्यांनी 1935 मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला येथे केली. येवला ही भूमी आज बाबासाहेबांच्या या धर्मांतराच्या घोषणेची तीर्थक्षेत्र अशी भूमी झाली आहे. ते म्हणतात, अन्न पोटाची भूक भागविते, धम्म मनाची भूक भागवितो. मनाची भूक भागविण्यावर आपण भर दिला पाहिजे. धम्मावर मनापासून प्रेम केले पाहिजे. बुद्ध धम्म हाच खरा समतेचा धर्म आहे.
यातील धर्म म्हणजे वैदिक शास्त्रात केलेली व्याख्या आपणांसमोर ठेवतो. जीवन जगण्याची उत्कृष्ट कला म्हणजे धर्म. मी ज्या व्यवसायात ज्या नोकरीत आहे ते काम मी इमाने इतबारे आणि प्रामाणिकपणे इतरांना मदत म्हणून करेल हा माझा धर्म. मी प्राध्यापक आहे मुलांच्या प्रति अभ्यास करून शिकविणे हाच माझा धर्म.

विशेष म्हणजे बाबासाहेबांनी 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा केली खरी. आपण कोणत्या धर्मात जाणार आहोत हे मात्र तेव्हा सांगितले नाही.
1948 मध्ये बाबासाहेबांनी एका ग्रंथाची रचना केली त्याचे नाव आहे. ‘Untouchables who are they and why they become untouchables’ या ग्रंथाचा सार म्हणजे भारतीय अस्पृश्य हे पूर्वाश्रमीचे बौद्ध धर्मीय आहेत याविषयीचे संशोधन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य पहावे. हा ग्रंथ त्यांनी भारतीय समाजातील सर्व अस्पृश्य संतांना अर्पण केला आहे.

बाबासाहेबांच्या जनता बहिष्कृत भारत आणि मूकनायक या सर्व नियतकालिकांचे साप्ताहिकांचे शीर्षक काय आहे हे जरा पहावे. संत वचने, तुकाराम महाराजांची अभंग वाणी, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील काही वचने ते उधृत करतात.
उदाहरणार्थ
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म l
भेदाभेद भ्रम अमंगळ l
काय करू आता l धरुनिया भीड l
निशंक हे तोंडा वाजविले l
नव्हे जगी कोणी l मुकियांचा जाणं l
सार्थ लाजून l नवे हित l

ज्ञानेश्वरीतील पुढील श्लोक बाबासाहेबांना फार आवडत असे.
आता कोदंड घेऊनी हाती l
भारुड पा इथे रथी l
येथे हे वाचोनी काही बोलो नये l.
व्यक्तीच्या नैतिक पायाभरणीच्या दृष्टीने संत साहित्या आवश्यक आहे असे ते प्रतिपादन करत.

संतश्रेष्ठ तुकोबाराय लिहितात…
बौद्ध अवतार माझिया अदृष्ठा l
मौन्य मुखे निष्ठा धरीयली l
पंढरीचा पांडुरंग हा मूळचा बौद्ध आहे. याविषयी आंबेडकर आणि गणेश हरी खरे यांनी लेखन केले आहे.
मात्र 1956 नंतर बाबासाहेबांच्या मताचे परिवर्तन झाले ते आपला ओढा आता बौद्ध धर्माकडे आहे असे प्रतिपादन करू लागले.

1911 मध्ये लक्ष्मी नरसू यांनी Essence of Buddhism नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला बाबासाहेबांनी प्रस्तावना लिहिली आहे. ही प्रस्तावना सविस्तर लिहिण्याऐवजी ते म्हणतात मी एका नव्या ग्रंथाची निर्मिती करणार आहे. तीही या विषयाच्या अनुषंगाने. The Buddha and his Dhamma.
आता गंमत पहा, ग्रंथाच्या मराठी भाषांतरास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म असे नाव दिले. महाबोधी नामाच्या नियतकालिकामध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य हा बाबासाहेबांनी लिहिलेला लेख त्यांच्या धम्म विषयक विचारांवर प्रकाश टाकतो. या लेखामुळे बौद्ध धर्मामध्ये खळबळ सुरू झाली. प्रसंगी बाबासाहेबांच्या विषयी टीकाही होऊ लागली. यानंतर बाबासाहेबांनी आणखी एक लेख लिहिला. या लेखाचे शीर्षक आहे ‘Buddha and the future of his Religion’ हा लेख दीर्घ आहे. भगवान गौतम बुद्धांची तुलना इतर धर्म संस्थापकांशी केली आहे इतर धर्मापेक्षा बुद्धांचा धम्म वेगळा आहे.
याविषयी मांडणी करताना ते लिहितात… धर्म हा समाज जीवनातील वारशाचा एक भाग असतो. त्याच्याशी मनुष्याचे जीवन त्याची प्रतिष्ठा त्याचा स्वाभिमान इत्यादी गोष्टी निगडित असतात. धर्म हा विज्ञानाशी विसंवादी असून चालत नाही. धर्म केवळ नीतीबद्ध नको तर स्वातंत्र्य समता बंधुता या तीन मुद्द्यांवर आधारित हवा. गौतम बुद्धांनी केवळ अहिंसा सांगितली नाही तर धम्माचा एक भाग म्हणून सामाजिक वैचारिक आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. धम्माचा हेतू एक जीवनात मनुष्याला सुख समाधान प्राप्त करून देणे हा आहे.

आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण या गोष्टीचा विचार करू की गौतम बुद्धांचा कोणता धर्म की धम्म बाबासाहेबांना अपेक्षित होता ?
त्यांच्या मते धर्म म्हणजे प्राचीन काळातील भारतातील बुद्ध चैतन्याचा वारसा आधुनिक तंत्रज्ञान व विद्यानाशी संयोग करून बौद्ध धर्माची पुनर्रचना करणे होय.
त्यासाठी काय आवश्यक आहे हे देखील त्यांनी सांगितले.

बौद्ध धर्माचा पायाभूत ग्रंथ तयार करणे.

बौद्ध भिक्षुकांच्या ध्येय धोरणात कार्यप्रणालीत बदल करणे.

आंतरराष्ट्रीय बौद्ध सेवा संघ स्थापन करणे.

 1. बौद्ध भिक्षुकांनी ख्रिश्चन मिशनरी आणि रामकृष्ण मिशनच्या सदस्यांप्रमाणे काम करावे.

भारतीय बुद्ध चैतन्य आणि आधुनिक पाश्चिमात्य ज्ञान विज्ञान यांचा संगम म्हणजे एक नवाब बुद्ध अधिक एक नवा धम्म बाबासाहेबांना अपेक्षित होता. त्यासाठी त्यांना हवे होते नवयान.

बाबासाहेबांच्या मनात जी विज्ञाननिष्ठा होती तिला अभिजात विज्ञानाची पार्श्वभूमी आहे ज्यास आपण चेतना म्हणतो विद्युत क्षेत्र आणि आकर्षण क्षेत्र त्याप्रमाणे शरीर आणि चेतना यांचा संबंध असतो. त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील विज्ञानाचे संकेत युरोपीय शास्त्रज्ञांनी मांडलेल्या संकेतांप्रमाणे आहेत. 1950 मध्ये ते जाहीर करतात ‘Buddha and the future of his religion’ अशा आशयाचा आधुनिक जगासाठी एक प्रमाणभूत ग्रंथ त्यांना तयार करावयाचा होता त्यासाठी त्यांनी त्यास बौद्ध धर्माचे बायबल असा शब्दप्रयोग केला आहे.
त्याची पूर्वतयारी म्हणून बाबासाहेबांनी सर एडविन अर्नाल्ड यांचा 1879 मध्ये लिहिलेला Light of Asia हा ग्रंथ वाचला. त्याचप्रमाणे पॉल कॅरस यांनी लिहिलेला The gospel of Buddha. गोडार्ड यांनी लिहिलेला Buddhist Bible हे तीन मूलभूत ग्रंथ वाचले होते.

बाबासाहेब बुद्ध धर्माकडे स्वतंत्र दृष्टीने पाहतात. परंपरेने चालत आलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म आधुनिक जगाला उपयुक्त नाही. तो बोधी पद प्राप्त करून घेणाऱ्यांसाठी योग्य आहे. आधुनिक विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी आणि संसारिक जीवन जगणाऱ्यांसाठी मूळ बुद्ध धर्माची पुनर्रचना करणे आवश्यक आहे.

बाबासाहेब धर्म संकल्पनेकडे नीती तत्वांकडे इतिहास आणि वर्तमान याकडे कसे पाहतात हे समजून घेणे गरजेचे आहे. विशुद्धीचा मार्ग सदाचाराचा मार्ग सद्गुणांचा मार्ग. धम्म म्हणजे तृष्णा त्याग सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्म.

बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. महात्मा फुले यांचे निधन 1890 मध्ये झाले. एका थोर पुरुषाचे या जगातून जाणे आणि त्यांच्या कार्याचा उर्वरित वारसा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी दुसरा एका महापुरुषाचा जन्म होणे हा योगायोग नाही. महात्मा फुलेंनी केलेले सर्व कार्य बहुजन वंचित समाजासाठी होते. मात्र आपण इतिहास अभ्यासकांनी फुलेंनी केलेल्या वंचितांच्या इतिहासाची जाणीव न ठेवता त्यांना इतिहासकार मानले नाही हे खरे आपले दुर्दैव आहे.

1891 मध्ये इटलीत ग्रामची नावाच्या विचारवंताचा जन्म झाला. त्याचे नाव अंतोनियो ग्रामची. वंचितांच्या इतिहासाचा जनक म्हणून त्याला मानले जाते. वास्तविक त्याचा जन्म होण्यापूर्वी वंचितांच्या इतिहासाचा प्रारंभ करून फुले यांनी बहुजनांच्या इतिहासाचा पाया घातला होता.
आता ही सगळी धुरा पुढे वाहण्याचे काम बाबासाहेबांना करायचे होते.
बुद्ध धर्माच्या पुनरुत्थानाचे काम देखील त्यांच्याकडेच होते. त्यावेळी बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी बुद्ध धर्माचे पुन्हा आगमन नावाची कविता लिहिली.
त्यात ते लिहितात, बाबासाहेबांचा जन्म हा बुद्धांच्या विचारांचे रोपण करण्यासाठी आणि ते घट्ट करण्यासाठी झाला आहे.

आपण बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आणि बाबासाहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मोठ्या आनंदाने जयंती पुण्यतिथी साजरी करतो. काही ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीला तमाशाचे आयोजन केले जाते. तमाशा ही कला वाईट नाही. पण बाबासाहेबांचे त्याविषयी काय मत आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी तमाशा कलावंत आणि फडमालकांकडून साधी देणगी ही स्वीकारली नाही या अनुषंगाने बाबासाहेब लिहितात ज्या तमाशामध्ये बहुजन समाजाच्या स्त्रियांना नाचविले जाते त्या कलेतून प्राप्त होणारा पैसा मी माझ्या शिक्षणाच्या कामी स्वीकारणार नाही. आणि आपण जयंतीच्या दिवशी तमाशाचे आयोजन करतो हा मोठा विरोधाभास आहे असे मला वाटते.

बाबासाहेबांना काय अपेक्षित होते याचा विचार आम्ही करत नाही तर आमच्या विचारांप्रमाणे आणि मनाप्रमाणे आम्ही जयंती पुण्यतिथी साजरी करतो.
भारताच्या विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असावेत आर्थिक व शैक्षणिक विकासाच्या मुद्द्यांचा विचार करणे गरजेचे आहे हे बाबासाहेबांना बहुजनांच्या विकासाच्या संदर्भात अपेक्षित होते.

स्वातंत्र्यापूर्वी बाबासाहेबांनी सुचवलेल्या या धोरणाचा विसर आज आपल्याला पडला आहे ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. खरे तर तो पडू नये.

राज्यसभेचे सदस्य असलेले श्री अनिल यांचा डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतासाठी व्रतस्थ वाटचाल हा दिनांक 14 एप्रिल 2018 रोजी दैनिक लोकसत्तेमध्ये पान नंबर नऊ वर प्रकाशित झालेला लेख जरूर वाचणे गरजेचे आहे. त्यावेळी संसदेमध्ये दलितांचे 48 सदस्य होते. आपण सर्वांनी बाबासाहेबांना तीर्थस्थान बनवले आहे.
तीर्थस्थान बनविणे वाईट नाही मात्र त्यांच्या विचारांचा तीर्थरूप प्रसाद आपण पचविणे गरजेचे आहे हे महत्त्वाचे.

हल्ली बाबासाहेबांच्या बाबतीत पंचतीर्थ नामाची नवीन संकल्पना जन्माला आली आहे.

 1. बाबासाहेबांचे जन्मस्थान
 2. बाबासाहेबांचे लंडन येथील निवासस्थान
 3. महापरिनिर्वानाची जागा
 4. नागपूरची दीक्षाभूमी
 5. दादर येथील चैत्यभूमी.
  केंद्र आणि राज्य सरकारच्या मिळून आज बाबासाहेबांच्या नावे 112 योजना आहेत. आपण हे सर्व तयार केले पण अहो बाबासाहेबांना काय अपेक्षित होते याचा विचार केला नाही.
  बाबासाहेबांना अपेक्षित लोकशाही रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक सामाजिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. ती यशस्वी करायची असेल तर हवी समानता. न्यायापासून दुरावणे नव्हे. हल्ली निकाल दिल्यानंतर लगेच न्यायाधीश राजीनामा देतात अशी उदाहरणे आपल्याला पहावयास मिळतात ती योग्य नाहीत.

एक शिक्षक म्हणून शिक्षकाकडून बाबासाहेबांची काय अपेक्षा होती तर याविषयी विचार मान्य आवश्यक आहे.
मुंबईतील सिडनेहॅम कॉलेज आशिया खंडात वाणिज्य शिक्षण देणारी पहिली शिक्षण संस्था.
पाच डिसेंबर 1917 प्राध्यापकाच्या एका रिक्त जागेसाठी 11 अर्ज प्राप्त झाले. या ठिकाणचे प्राध्यापक आर एम जोशी यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांची चौकशी करून माहिती मागितली. बाबासाहेबांसाठी ही जागा अगोदरच राखीव करून ठेवली.
दिनांक 10 नोव्हेंबर 1917 बाबासाहेब प्राध्यापक म्हणून पहिला तास घेऊ लागले. आम्ही शिक्षकही तास घेतो. त्यांनी केलेली तयारी आणि आपण करत असलेली तयारी जरा तुलना करून पहा.
बाबासाहेबांनी पहिले पहिले भाषण करण्याच्या पूर्वी तेही विद्यार्थ्यांच्या समोर तेरा वेळा त्यांनी आपली पाठ टाचणी लिहिली. आणि मग त्यांना वाटले की आता विद्यार्थ्यांसमोर बोलण्यास हरकत नाही. या अनुषंगाने ते लिहितात, आपली व्याख्याने आपण पूर्ण तयारी झाल्याशिवाय व त्याचे लघुत्तम टिपण केल्याशिवाय कधीही देऊ नये.
आता आजच्या परिस्थितीवर मी भाष्य करत नाही ते करणे योग्य नाही. एक खरे सांगू इच्छितो मी बाबासाहेबांचा हा वारसा 100% चालवतो. बाबासाहेबांनी या कालावधीत आर्थिक विषयावर जी भाषणे दिली त्या विषयाचे भारतीय वित्त नावाचे स्वतंत्र पुस्तक तयार झाले.
शिक्षकांनी कळकळीने वाचावे संशोधन करावे स्वतःची संशोधन पद्धती विकसित करावी स्वतःचा ग्रंथ संग्रह करावा ग्रंथकार व्हावे विषयाचा गाडा अभ्यास करावा असा त्यांचा ग्रह होता.

लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला Arctic home in Vedas हा ग्रंथ वाचल्यावर आंबेडकरांनी काही दुरुस्त्या सुचविल्या. मोठ्या मनाने टिळकांनी त्या मान्य ही केल्या. या महापुरुषांचे वैचारिक मतभेद जरूर होते. पण आपले वैचारिक मतभेद त्यांनी व्यक्तिगत मतभेदापर्यंत आणि मनभेदापर्यंत कधीही जाऊ दिले नाही. समाजात आज वाचताना हा आदर्श आपण घेतला पाहिजे. याविषयीची अधिक माहिती आपणास वाचायची असेल तर साय दैनिकांमध्ये लिहिणाऱ्या दुर्गा भागवत यांचा गोधडी नावाचा स्तंभ वाचावा. आपण महापुरुषांचे उत्तरदायित्व कसे पाळतो. संत तुकाराम महाराजांनी केलेली अहिंसेची व्याख्या आणि शिकवण किती सुंदर आहे. काम क्रोध बकरे मारा आपण कोणते बकरे मारतो याविषयी संत गाडगे महाराज काय म्हणत होते जरा विचार करणे गरजेचे आहे.

अमेरिकेची राज्यघटना ज्यांनी निर्माण केली त्यांच्या घराण्यास अमेरिकेच्या संसदेचे आजन्म सभासदत्व देण्यात आले. आणि बाबासाहेब पराभूत कसे होतील याची यंत्रणा भारतातील एका पक्षाने केली. केसरी या अग्रगण्य वर्तमानपत्राने त्यावेळी मूकनायक या बाबासाहेबांच्या वर्तमानपत्राची जाहिरात छापली नाही. रा गो रानडे कृत मराठी नियतकालिकांचा इतिहास हा पत्रकारितेचा ग्रंथ प्रकाशित झाला. पत्रकार म्हणून बाबासाहेबांचे कोठेही स्थान त्यात दिसले नाही. याला अपवाद आहेत रा. के. लेले यांनी मराठी वृत्तपत्राचा इतिहास लिहून बाबासाहेब आणि पत्रकारिता असा स्वतंत्र लेख लिहिला.

आंबेडकरांनी मराठी भाषा शुद्धीसाठी किती प्रयत्न केले याचे भान आपण अभ्यासकांना नाही याविषयी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी जे लिहिले आहे ते एकदा वाचले पाहिजे. सरल प्रासादिक आणि सूत काढल्यासारख्या सुबोध मराठी भाषेत बाबासाहेब लिहीत. संक्षेपी संपादक विद्वत्तापूर्ण आणि प्रतिभा युक्त लेखन म्हणजे बाबासाहेब.
युरोपला जाताना ते जहाजावरून पत्र लिहितात. गरज पडली तर माझे राजगृह घर विका परंतु बहिष्कृत भारत वर्तमानपत्र बंद पडू देऊ नका.

लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधर पंत यांनी आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात ते लिहितात.. ‘माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणावर विंदी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे.
अधिक माहितीसाठी वाचा भाऊ लोखंडे, ‘बाबासाहेबांची पत्रकारितेतील लक्षनीय कामगिरी’ दैनिक सकाळ 14 एप्रिल 2018 पृष्ठ क्रमांक सहा.

आज आपल्याला दिसत असलेल्या रिझर्व बँक ऑफ इंडिया चा ड्राफ्ट बाबासाहेबांनी 1935 च्या कायद्याच्या दरम्यान सुरू केला होता. 3 एप्रिल 1927 चा मूकनायक चा अग्रलेख पाहिला तर आपल्या लक्षात येते की अर्थतज्ञ म्हणून बाबासाहेबांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती बँकेची कल्पना मांडली होती.

आज अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी अर्थशास्त्री आंबेडकर म्हणून विचार करणे गरजेचे आहे.
आपण तुलनात्मक अभ्यास करतो आपण गांधीजींची तुलना बाबासाहेबांशी करतो.
मित्रहो दोन्ही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत.
गांधी म्हणजे हिंदू धर्माचा नव्याने अर्थ लावू पाहणाऱ्या सुधारकी विचारधारेचे प्रतिनिधित्व करणारे होते.
तर बाबासाहेब आधुनिकतेची कास धरून पाहणाऱ्या समाज घटकांचे आणि बौद्ध परंपरेचे नेते होते.
1908 ते 1935 हा आंबेडकरांचा बौद्ध धर्माकडे जाणारा वैचारिक प्रवास सुरू झाला होता. बाबासाहेब ब्राह्मण या वर्गाच्या विरुद्ध नव्हते तर त्या वर्गातील कर्मकांडाच्या विरुद्ध होते.
बाबासाहेबांनी महाड येथे पाण्यासाठी सत्याग्रह केला. बाबासाहेबांनी कोकणामध्ये चरी या गावी शेतकऱ्यांचा जगातील पहिला संप यशस्वी करून दाखविला.
महाडच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी गांधीजींचे छायाचित्र लावले होते हे आपण विसरता कामा नये.
बाबासाहेबांनी ज्या मनुसती नावाच्या ग्रंथाची होळी केली. मित्रांनो ती ग्रंथाची होळी नाही तर त्यातील दांभिक विचारांची होती. ग्रंथ प्रेमी आंबेडकरांना ग्रंथ जाळायचा नव्हता तर त्यातील दांभिक वृत्ती जाळायची होती.
गांधींना रामराज्य अपेक्षित होते मात्र रामदर शस्त्रधारी असेल तर त्याचे काय करायचे याचे उत्तर गांधींकडे नव्हते.

धर्मशास्त्रामध्ये अस्पृश्यतेचा पुरस्कार केला तर ते सर्व धर्मशास्त्र मी नाकारणार आहे असे गांधी म्हणत. मात्र जेव्हा बाबासाहेबांनी त्यांना मनुस्मृति या ग्रंथाचा उल्लेख करून सांगितले त्यावेळी गांधी बाबासाहेबांच्या बोलण्याकडे लक्ष देणे टाळत. गांधी त्यावेळी उपोषण करत. हजारो वर्षांपासून कुपोषित राहिलेल्या बहुजन समाजासाठी आणि त्यांचे कुपोषण घालविण्यासाठी बाबासाहेब काम करत होते.

बाबासाहेबांचा वारसा कसा चालवावा याविषयी मी युरोपमधील एका देशाचे उदाहरण देतो. युरोप खंडात हंगेरी नावाचा एक देश आहे. तेथे बाबासाहेबांच्या नावाने शाळा सुरू झाली आहे. हंगेरीच्या संसदेचे सदस्य डेरडाक टिबोर. आणि रोमा नेते ओरसोस जाणोस या दोघांनीही शाळा काढली. ते म्हणतात वयाच्या 25 व्या वर्षी बाबासाहेबांनी समाजाच्या मनाचा अभ्यास सुरू केला अशा थोर समाज शास्त्रज्ञांच्या नावाने आम्ही हंगेरी येथे शाळा काढली आहे.

आता बाबासाहेबांनी काढलेल्या शिक्षण संस्थेचे आज काय झाले आणि तिची काय परिस्थिती आहे याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही.
मिलिंद महाविद्यालयात एकदा एका ब्राह्मण मुलाला फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्याने बाबासाहेबांकडे ही माफीचा अर्ज केला. बाबासाहेबांनी त्यावर हिरव्या पेनाने लिहिले अश्रू सर्वांना असतात.अर्थात विद्यार्थ्याला फी माफी झाली.

औद्योगिक विकासामध्ये कामगार वर्ग हा महत्त्वाचा घटक आहे. कामगारांना विना संरक्षण त्यांच्या दैनिक भत्त्यामध्ये वाढ कामगारांच्या मुलांसाठी शाळा स्त्री-पुरुषांना समान वेतन या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी केल्या आहेत.
बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, गणपत बुवा जाधव, अनंतराव चित्रे, ना. म जोशी यांच्या समवेत बाबासाहेबांनी स्वतः कामगारांच्या अवस्था फिरून पाहिल्या. मुंबईतील परलच्या मैदानावर 16 ऑक्टोबर 1938 रोजी सहा नोव्हेंबर 1938 रोजी आणि सात नोव्हेंबर 1938 रोजी कामगारांच्या विषयी बाबासाहेबांनी जी तीन भाषणे दिली ती पोट तिडकीने दिली म्हणून ती आपण बारकाईने वाचली पाहिजेत. कामाच्या तासाची निश्चिती स्त्री पुरुष, आहेस समानता समान पगार इत्यादी गोष्टी सर्वांना समान असाव्यात.

धनबादच्या कोळसा खाणीत बाबासाहेब स्वतः चारशे फूट खाली उतरले .कामगारांशी बोलले. परिस्थिती समजून घेतली. याच्यानंतर कोणी मंत्री कोणत्या खाणीत उतरला असेल हे मला आठवत नाही. स्त्रियांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूती नंतर रजा असावी तीही पगारी. हे आमच्या महिलांनी लक्षात घ्यावे की ही बाबासाहेबांची देणगी आहे.

आज ओबीसीचा जो प्रश्न आहे तो मिटवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेच्या 340 व्या कलमाप्रमाणे मागासलेल्या वर्गासाठी आणि विचारांसाठी राष्ट्रपतींनी एक आयोग नेमायचा असतो तत्कालीन प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही. 27 सप्टेंबर 1951 रोजी बाबासाहेबांनी राजीनामा दिला आणि पंडित नेहरूंनी तो स्वीकारला.
शिक्षण या गोष्टीसाठी सर्वांनी समाजात एकत्र आले पाहिजे. सर्व नद्या डोंगरात उगम पावतात सर्व पाणी पाहून येतात सर्व समुद्राला जाऊन मिळतात सर्वांच्या प्रती एकतेची भावना असणे गरजेचे आहे.
कोणत्याही धरणाचे काम करताना प्रथम आदिवासी बांधवांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांची संस्कृती जपणे, शेती नैसर्गिक जीवन यावर अतिक्रमण करू नये आणि त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे बाबासाहेबांनी लिहून ठेवले आहे.

भारतातील लहान मोठे जल प्रकल्प साकारत असताना बाबासाहेबांनी सर्वप्रथम मानवतावादी दृष्टिकोन ठेवला. राजकीय इच्छाशक्ती, बौद्धिक कौशल्य या दोन्ही गोष्टींच्या मागे आधुनिक दृष्टिकोन असावा आणि तो मानवी असावा असे बाबासाहेब प्रतिपादन करत.

आधुनिकता कपड्यांनी नव्हे तर विचारांनी येते. बाबासाहेबांनी उभारलेल्या आणि आखणी करून दिलेल्या या जलविद्युत प्रकल्पांना पंडित नेहरूंनी आधुनिक भारताची मंदिरे असा शब्दप्रयोग केला.
आता मंदिरामध्ये तोपर्यंत कित्येक बहुजनांना प्रवेश नव्हता ही गोष्ट आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.

शेतकरी आंदोलन पीक संरक्षण मत्स्यपालन पाळीव जनावरांचे निदान गरिबांसाठी रेशनिंग हवे नद्याजोड प्रकल्प शेतीला उद्योगाचा दर्जा देणे गरजेचे आहे हे स्वतंत्र अभ्यास विषय बाबासाहेबांनी हाताळले आहेत.
वीज निर्मिती करणे गरजेचे आहे या प्रकल्पाचा विकास आणि वीजपुरवठा हा राष्ट्रीय धोरणाचा भाग असावा त्यासाठी वीज अभियंता प्रशिक्षण द्यावे त्यांच्यासाठी स्वतंत्र शिक्षण संस्थेची आणि संशोधन संस्थेची निर्मिती करावी याविषयी दिनांक 21 फेब्रुवारी 1939 रोजी बाबासाहेबांनी केलेले भाषण भारतातील समस्त वीज कर्मचाऱ्यांनी मन लावून वाचले पाहिजे. केरोसीनचा दिवा वापरू नये. अभ्यास करताना तो दिवा वापरला तर काय विपरीत परिणाम होतात याचा अनुभव बाबासाहेबांनी लहानपणी घेतला होता. माणसाच्या श्वसनशक्तीवर किती विपरीत परिणाम होतात हे ते उदाहरणासह पटवून देतात. शेतीस आज आपण अखंड वीज मागतो बाबासाहेब तेव्हा म्हणत होते शेतकऱ्यांना अखंड वीज आणि उद्योगांनाही अखंड वीज दिली पाहिजे. कारण त्यातच खरी आधुनिक भारताच्या विकासाची बीजे पेरली गेली आहेत.

भारताच्या विकासासाठी सर्वांगस्पर्शी विचार मांडणाऱ्या महामानवास आपण दलितांचे कैवारी असे म्हणतो. आणि मित्रांनो असे म्हणून त्यांना एका चौकटीमध्ये अडकवून ठेवतो. ते एकट्या दलित समाजाचे नाहीत ते समस्त मानवाचे आहेत. बुडती हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा अंतरीचा.
या अभंगाप्रमाणे आपल्या बहुजन समाजाचा विकासाची तळमळ बाबासाहेबांच्या शब्द शब्दांमधून प्रगट होताना दिसते.
म्हणून त्यांची जयंती पुण्यतिथी करताना बाबासाहेबांना काय अपेक्षित होते आणि त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण काय करतो याविषयी आपण सूक्ष्म विचार करणे गरजेचे आहे.

जय जवान जय किसान या घोषणेपूर्वी बाबासाहेबांनी जय जवान जय किसान आणि अधिक धान्य पिकवा. अशी घोषणा दिली होती. भारत अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वावलंबी व्हावा हा त्यांचा मूळ विचार होता.
केवळ दलितांचे कैवारी नव्हे दलितांचे महान नेते नव्हे त्यांना उपाध्याय नकोत. तर कसे पहावे देशाचे महान नेते देश उभारणीचे सुंदर स्वप्न पाहणारे कोणत्याही जाती आणि धर्माच्या राज्यांच्या सीमेमध्ये त्यांना बांधू नये. दलितांचे नेते आणि घटनेचे शिल्पकार अशा तस्वीरीमध्ये त्यांना अडकवू नये. आपण व्यापक दृष्टी ठेवावी.
बाबासाहेबांनी सुरू केलेले जलविद्युत प्रकल्प आणि जलसिंचनाचे प्रकल्प यापैकी दामोदर नदीचा प्रकल्प कितीतरी वर्षांनी कार्यान्वित करण्यात आला.

दलितांचे कैवारी असे जेव्हा म्हणतो तेव्हा कैवारी म्हणजे काय हे समजून घ्या.
एखाद्या लेकराची आई त्या लेकराची कैवारी नसते. ती जन्मदाती आई असते आतून जिव्हाळा असतो. कैवार घेण्यामध्ये कोरडेपणा असतो. जमले तर बाजू घेऊ उपकार करण्याची भावना त्यात असते प्रसंगी व्यक्तीचे अश्रू पुसणे आधार देणे इथपर्यंत कैवार महत्त्वाचा असतो. आई आई असते दाई कैवारी असते.

आई आणि दाई यात फरक आहे. बाबासाहेब कैवारी नाहीत दलितांचे पुढारी नाहीत तर सामाजिक विषमते विरुद्ध आत्मभान विसरलेल्या समाजास सामाजिक समता आणि न्यायासाठी लढा देणारे स्वतःच्या समाजास स्वतःची ओळख करून देऊन आत्मशोध व आत्मभानाची दृष्टी देणारे द्रष्टे महापुरुष आहेत. नव्या समाजाच्या स्वप्नात साकार करण्यासाठीचा लढा उभा करणारे बाबासाहेब होते. हा नवा समाज म्हणजे मला माणूस म्हणून जगू द्या.

माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही गोष्ट बाबासाहेबांना अपेक्षित होती.
समस्त विद्यार्थी वर्गाने बाबासाहेबांच्या विषयीचे एक पत्र लक्षात घ्यावे.
ते मूळ इंग्रजी पत्र पुढे देत आहे.
Columbia University
Faculty of political science
September 23 .1920
Professor H. S Foxwell
London school of economics London.

My dear Foxwell
This is to introduce to you an Indian gentleman Mr. B. R. Ambedkar . Ambedkar was a student with us for several years at Columbia and passed his examination for the doctor’s degree with considerable distinction.
He has been feeling the chair of commerce and economics at the Sydney hame College of commerce in Bombay. And she is now proposing to spend about 2 years in a great Britair to finish a piece of research work which he is interested.
He writes to me that he is desirous of utilising certain research facilities both in London and in Edenberg and he asked for a letter of introduction to you.
This I am very glad indeed to give him as she is not only a very able but exceedingly pleasant fellow. And I am sure that you will do for him what you can.

बाबासाहेबांची आणि गौतम बुद्ध यांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे त्यांची सर्व साहित्य संपदा आपण आपल्या घरी संग्रहित करावी. अगोदर ती वाचावी. ते विचार आचरणात आणावे. तरच खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक म्हणण्यासाठी पात्र ठरू, अन्यथा नव्हे.

प्रा डॉ लहू गायकवाड.

— लेखन : प्रा डॉ लहू गायकवाड.
कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, जि: पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

 1. खूपच अभ्यास पूर्ण व सूक्ष्म मांडणी.बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू या लेखातून सहजपणे उलगडून दाखवले आहेत.त्याबद्दल डॉ.गायकवाड सरांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत.त्यांच्या व्यासंगाला त्रिवार सलाम 🙏🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments