Saturday, July 20, 2024
Homeपर्यटनभारतरत्नांची पुण्यभूमी : दापोली

भारतरत्नांची पुण्यभूमी : दापोली

तीन भारतरत्ने आणि दोन पद्मश्री व्यक्ती हिंदुस्थानच्या एकाच तालुक्यामधून निर्माण झाल्या अशा काही तालुक्यांची नावे तुम्हाला माहित आहेत का ?

हिंदुस्थानमध्ये असा एकच तालुका आहे आणि त्याचे नाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका !

साधारण २७ किलोमीटर लांबी आणि २० किलोमीटर रुंदी एवढ्या छोट्या प्रदेशातून तीन भारतरत्न, दोन पद्मश्री आणि इतर अनेक कर्तृत्ववान व्यक्ती निर्माण व्हाव्यात, हा केवळ योगायोग नव्हे, तर हा येथील मातीचा, येथील जीवनमानाचा, संस्कारांचा, परंपरांचा कोणतातरी अज्ञात गुणधर्म असला पाहिजे.

हिंदुस्थानच्या पश्चिम समुद्रतटाजवळ दापोली आहे.‌ दापोलीच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्यांविषयी सविस्तर लिहिण्याचा या लेखाचा हेतू नाही. तरीपण, थोडक्यात सांगायचं तर, दापोली आणि परिसराचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळल्याचे कुठे दिसत नाही. परंतु दापोलीमधील दाभोळ हे गाव मात्र फार पूर्वीपासून इतिहासाच्या मानचित्रावर (नकाशा) दिसून येते. दाभोळजवळील पन्हाळेकाजी येथील प्रसिद्ध बौद्ध लेण्यांच्या अभ्यासावरून येथे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून वस्ती होती असे दिसून येते.
इतिहासकारांच्या मते या परिसरावर शिलाहार राजांचे राज्य बराच काळ होते. नंतर यादवांचे राज्य आले आणि त्यानंतर मुसलमानांचे. या मुसलमानी काळातही दापोली जवळील जालगाव या ठिकाणी जालंधर नावाचा राजा राज्य करीत होता असे काही संदर्भ आहेत. नंतर विविध मुसलमानी सत्ता, पोर्तुगीज आणि सरतेशेवटी मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले.
सध्याचे जे दापोली नगर आहे ते वस्तुतः ब्रिटिशांनी त्याकाळी सैन्याच्या तळासाठी वापरलेल्या भूमीभागाचा विस्तार आहे. दापोली गावाला महाराष्ट्राचे ‘मिनी महाबळेश्वर’ असे म्हटले जाते.‌ याचं कारण एकेकाळी तेथे असणारी थंड आणि आल्हाददायक हवा असेल!

सध्या आपण ज्याला दापोली नगर म्हणून ओळखतो, तो मूलत: मौजे दापोली, गिम्हवणे, जालगाव आणि जोगेळे या चार खेड्यांच्या सीमांवर ब्रिटिशांनी वसवलेला सैन्याचा तळ (मिलिटरी कॅम्प) होता. त्याचं नाव होतं कॅम्प दापोली.‌ मौजेची गोष्ट अशी की, स्थानिक लोक त्याला काप दापोली किंवा नुसते काप असं म्हणत असत.‌ कॅम्प नावाचा अपभ्रंशच तो

दापोलीबद्दल लिहायचे झाले की, काय लिहू, किती लिहू, कुठून सुरुवात करू असे होऊन जाते. सगळ्याच गोष्टी मनात एखाद्या वादळवाऱ्यासारख्या थैमान घालू लागतात.‌

प्रारंभ करूया भारतरत्नांपासून! अनेक वेळा होतं काय की, गावातील लोक मोठ्या नगरांमध्ये उपजीविकेसाठी म्हणा, भवितव्य घडवण्यासाठी म्हणा, किंवा काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी म्हणा, राज्य वा देशपातळीवर जातात. त्यातील जीजी मंडळी नाव कमावतात, प्रसिद्ध होतात, त्यावेळी लोक त्यांच्या कर्मभूमीचा उल्लेख बऱ्याच वेळा मोठ्या गौरवाने आणि कौतुकाने करतात. परंतु बऱ्याच वेळा त्यांचे जन्मगाव किंवा त्यांचे मूळ गाव लोकांच्या दृष्टीपासून दुर्लक्षित राहते.

हिंदुस्थानच्या, समाजसुधारणेच्या चळवळीतील एक अग्रगण्य नाव, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, विधवा विवाहाचे खंदे पुरस्कर्ते महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे हे दापोलीचे पहिले भारतरत्न ! दापोली पासून आठ किलोमीटरवर असणारे मुरुड हे त्यांचे गाव. आज हिंदुस्थान मधील अनेक स्त्रिया उच्चशिक्षित आहेत विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत किंवा मोठी मोठी पदे भूषवित आहेत त्याचे फार मोठे श्रेय अण्णा साहेबांना जाते.‌ महर्षींनी केलेल्या या अजून कार्याचा गौरव करण्यासाठी हिंदुस्थान सरकारने त्यांना १९५८ मध्ये भारतरत्न या हिंदुस्थानच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. मुरुडच्या वझे कुटुंबियांनी तेथे अण्णासाहेबांचे स्मारक बांधले आहे.‌

दापोलीचे दुसरे भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे हे होत. हिंदुस्थानी प्राच्यविद्येचे (Indology) अभ्यासक आणि संस्कृत पंडित म्हणून जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवलेले डॉक्टर पां वा काणे यांचा जन्म जरी त्यांच्या आजोळी परशुराम येथे झाला असला तरी त्यांचे मूळ गाव दापोली हे आहे. दापोलीच्या ए.जी. हायस्कूलमध्ये ते प्रारंभी शिकले. पुण्याची सुप्रसिद्ध भांडारकर संस्था स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. याच संस्थेचे एक ध्येय म्हणून त्यांनी धर्मशास्त्रावर लिहिलेला एक महाग्रंथ-‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ हा साधारण साडेसहा सहस्रांहून अधिक पानांचा ग्रंथराज केवळ हिंदुस्थानमध्येच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे. हिंदुस्थानमधील न्यायालये, बऱ्याच वेळा संदर्भासाठी त्याचा वापर करतात. केवळ या एका ग्रंथ निर्मितीसाठी १९६३ मध्ये हिंदुस्थानातील भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना दिला गेला. महामहोपाध्याय काणे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपरही भूषविले होते.

दापोलीचे तिसरे भारतरत्न म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी तथा डॉ.‌ बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कोणाला माहित नाही असा मनुष्य संपूर्ण हिंदुस्थानमध्ये कुणाला सापडणार नाही. बाबासाहेब आपल्या बालपणातील दोन वर्षे दापोली येथे राहिले आहेत. दापोली जवळील मंडणगड उपजनपदामधील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव. आता जरी मंडणगड हे स्वतंत्र उपजनपद असले तरी त्याकाळी ते दापोली उपजनपदाचा एक भाग होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना दापोलीकर आपल्याच उपजनापदातील महनीय व्यक्ती मानतात. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल येथे लिहावयास लागलो, तर या लेखाचे रूपांतर एका ग्रंथराजामध्ये होईल. त्यामुळे येथे थांबतो.

हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्याचे जनक आणि इंग्रजांच्या भाषेमध्ये हिंदुस्थानी असंतोषाचे जन्मदाते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मूळ गाव चिखलगाव. हेही दापोली तालुक्यामध्ये आहे. याच चिखलगावमध्ये दापोलीमधील एक सेवाव्रती आणि सेवाभावी दांपत्य डॉक्टर राजाभाऊ दांडेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, सिद्धहस्त लेखिका सौ. रेणूताई दांडेकर हे गेली ४० हून अधिक वर्षे लोकसाधना ही शिक्षण आणि समाजसेवेला वाहून घेतली संस्था चालवत आहेत. कधी दापोलीला गेलात तर या संस्थेला अवश्य भेट द्यावी.

विख्यात समाजसेवक आणि आपल्या अत्यंत संवेदनशील मानसिकतेचे यथार्थ चित्रण आपल्या लेखनातून करणारे परमपूज्य साने गुरुजी यांचं गाव पालगड हे दापोलीच्या उत्तरेला १८ किलोमीटरवर आहे. त्यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाने प्रेरित होऊन आचार्य अत्रे यांनी जेव्हा ‘श्यामची आई’ हा चित्रपट निर्माण केला तेव्हा ते दापोलीमध्ये आले होते. त्यावेळची एक आठवण येथे सांगण्याचा मोह आवरत नाही. ही आठवण आहे दापोलीमधील एका ऐतिहासिक संस्थेबद्दलची. ती संस्था म्हणजे एका इंग्रज मिशनरी व्यक्तीने- श्री. अल्फ्रेड गॅडने यांनी स्थापन केलेले प्रसिद्ध ए. जी. हायस्कूल.

आचार्य अत्रे आणि वसंत बापट, ‘श्यामची आई’ चित्रपट निर्माण करण्याच्या वेळेस ए. जी. हायस्कूलला भेट द्यायला आले होते.‌ तेव्हा ते दोघे दापोली येथील एक सामाजिक व्यक्तिमत्व, डॉ.‌ मंडलिकांकडे उतरले होते. मुंबईहून बोटीने हर्णैपर्यंत आणि मग पुढे, मला वाटतं, बैलगाडीने दापोलीपर्यंत.. असा त्यांचा प्रवास होता.‌ संध्याकाळी ते आणि वसंत बापट शैलाताईकडे आले. ‘कऱ्हेचे पाणी’ या आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या भेटीचे सविस्तर वर्णन लिहून ठेवले आहे- “सौ मंडलिकांनी आमचे सुहास्य वदनाने स्वागत केले”, असे लिहून अत्रे पुढे लिहितात, “आम्ही चहापाणी वगैरे करून डॉक्टर मंडलिकांसमवेत ए. जी. हायस्कूलच्या टेकडीवर गेलो. इतकी निसर्गसुंदर शाळा मी उभ्या महाराष्ट्रात पाहिली नाही.!”
साने गुरुजी याच शाळेतले. त्यांच्या श्यामची आईमधील खर्वसाची गोष्ट याच प्रशालेच्या आमराईमध्ये घडलेली आहे.
अशी ही यादी न संपणारी आहे. परंतु त्यातील काही महत्त्वाची नावे येथे लिहिलीच पाहिजेत.

सरखेल कान्होजी आंग्रे, लोकमान्य टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई टिळक, बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर, नाना फडणवीस यांच्या पत्नी जिऊबाई, गणिताचे विद्वान रॅंग्लर र. पु. परांजपे, लोकसंख्या नियंत्रण हा विचार प्रथम मांडणारे र.धों. कर्वे , प्रसिद्ध कादंबरीकार श्री. ना. पेंडसे, रेव्हरंड ना. वा. टिळक, भारतीय चित्रपट सृष्टीचा पहिला नायक दत्तात्रय दामोदर दाबके, गोनिदा तथा गो. नी. दांडेकर, कॅमलिनचे सुभाष दांडेकर, मुंबईतील एक प्रसिद्ध नागरी अभियंता आणि मुंबईच्या पाणीपुरवठ्याची तसेच इतर अनेक नागरी सुविधांची मुहूर्तमेढ होणारे विख्यात इंजिनियर पंचनदीचे सुपुत्र श्री. नारायण मोडक, कैलासजीवनचे वासुदेव शिवराम कोल्हटकर, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक श्री बाबा फाटक, केशरंजना या सुप्रसिद्ध केशवृद्धी औषध निर्माण करणाऱ्या ‘आगोम’ चे उद्गाते श्रीकृष्ण गोपाळ महाजन तथा मामा महाजन, अलीकडच्या काळातील व्यक्तींची नावे सांगायची झाली तर दापोलीच्या इतिहासाचा विश्वकोश म्हणून प्रसिद्ध असणारे श्री अण्णा शिरगावकर, पद्मश्री भिकू रामचंद्र तथा दादासाहेब इदाते, आणि प्रसिद्ध नेपथ्यकार नितीन देसाई, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे माधवराव कोकणे ही सारी मंडळी दापोलीची.

त्याशिवाय मराठी आधुनिक कवितेचे जनक केशवसुत, सुप्रसिद्ध मराठी इंग्रजी शब्दकोश निर्माण करणारा इंग्रज जेम्स मोल्सवर्थ, मामा वरेरकर या मंडळींचे दापोलीमधे पुष्कळ काळ वास्तव्य होते.‌ एवढेच नव्हे तर त्यांच्या अनेक कर्तृत्वकृती येथे घडलेल्या आहेत. केशवसुतांचे वडील दापोली जवळील वळणे या गावामध्ये मंडलिक कुटुंबियांच्या जमिनीचा कारभार पाहण्यासाठी काही वर्षे राहिले होते. केशवसुतांच्या अनेक गाजलेल्या कविता या गावामध्ये निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ ‘नैऋत्येकडचा वारा’, ‘सिंहावलोकन’.
‘नैऋत्यकडचा वारा’ या कवितेमध्ये तर केशवसुत वळणे गावाचा उल्लेखही करतात.

“सोडुनी गाव वळणे आमुचे घराचे
येऊ घरा परत खाजगी वालियांचे!”

‘एक खेडे’ या त्यांच्या गाजलेल्या कवितेमध्ये त्यांनी या वळणे गावाचे वर्णन केले आहे.

दापोलीचा परिसर जसा अनेक नररत्नांसाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो समृद्ध इतिहास, शांत, स्वच्छ, सुंदर समुद्र तट आणि विविध प्रकारची पर्यटन स्थळे यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
दापोली पासून ३५ किलोमीटरवर असलेली पन्हाळे काजी या गावातील लेणी ही बौद्धकालीन तसेच गाणपत्य व नाथ संप्रदायातील लेणी हे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. येथे एकूण २९ गुंफा आहेत.

दापोली पासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या ऐतिहासिक नौकापत्तनातील, समुद्रातील सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग एकेकाळी आपल्या शिवछत्रपतींच्या साम्राज्याचा एक मोठा आधारस्तंभ होता. आजही सुवर्णदुर्ग समुद्राच्या लहरींना तोंड देत मराठ्यांच्या नौसेनेच्या सामर्थ्याचा शक्तिमान साक्षीदार म्हणून दिमाखात उभा आहे. याचप्रमाणे हर्णैच्या समुद्रतटावर तीन भुईकोट दुर्ग आहेत.‌ गोवा, फत्तेगड आणि कनकदुर्ग.‌ त्याचप्रमाणे पन्हाळे काजीच्या लेण्याजवळ पन्हाळे दुर्ग आणि पालगड गावाच्या सीमेवर पालगड असे दोन गिरीदुर्गही दापोली उपजनपदात आहेत.

राष्ट्र सामर्थ्यवान करायचं असेल, राष्ट्र अजिंक्य, अभेद्य करायचं असेल तर धर्मकारण आणि राजकारण हे हातात हात घालून एकत्रच चालले पाहिजेत असे जाणकार सांगतात. दापोलीतील द्रष्ट्या मंडळींनी हे ओळखलं होतं आणि त्यांनी ते साध्य करण्यासाठी दुर्गांबरोबरच विपुल मंदिरेही बांधली.
समुद्रकाठावरील अतिशय निसर्गरम्य अशा आंजर्ल्यामधील कड्यावरचा गणपती, महर्षींच्या मुरुडमधील दुर्गा देवीचे मंदिर, दाभोळ येथील गुंफेतील चंडिका मंदिर, आसूद गावामधील एका छोट्या पर्वतशिखरावरील केशवराज मंदिर, गावातील व्याघ्रेश्वर मंदिर तसेच बुरोंडी येथे पुण्यातील गानू कुटुंबियांनी अलिकडे बांधलेले परशुराम स्मारक, सडव्यातील विष्णू मंदिर, आडे आणि कोळबांद्रे येथील भार्गवराम मंदिरे, केळशी येथील महालक्ष्मी मंदिर आणि प्रत्यक्ष दापोलीमधील मारुती आणि विठ्ठल यांची मंदिरे, अशी अनेक पुरातन आणि ऐतिहासिक मंदिरे दापोली परिसरात विखुरलेली दिसतात.
येथे. “श्यामची आई” या साने गुरुजींच्या प्रसिद्ध पुस्तकातील लाडघर गावातील समुद्रतटावर असलेल्या तामस तीर्थाचा उल्लेख केलाच पाहिजे. या जागेवर समुद्रतट तांबड्या रेतीचा आहे. ही लाल रेती समुद्रात खोलवर पाण्याखाली पसरली आहे त्यामुळे येथील पाणीसुद्धा लालसर दिसते. म्हणून त्याला तामसतीर्थ असे म्हणतात.

गेली कित्येक वर्षे दापोलीचा सतत विस्तार होत आहे. सह्याद्री आणि सिंधुसागर या दोघांच्या कुशीतले एक छोटे गाव ते महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पर्यटन स्थळ, असा नावलौकिक दापोलीनै आता कमावला आहे. दापोली येथे कोकणातील एकमेव कृषी विद्यापीठ -कोकण कृषी विद्यापीठ हे आहे. या विद्यापीठाने दापोलीच्या प्रगतीस मोठा हातभार लावला आहे. यानिमित्ताने दापोलीकरांसाठी अभिमानाची अशी एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते.‌
या कोकण कृषी विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून शिक्षक आणि इतर कर्मचारी मंडळी येतात, येथे राहतात, काम करतात, त्यांची दापोलीशी नाळ जोडली जाते.‌
आणि मंडळी, दापोलीचं पाणी म्हणा, दापोलीची माती म्हणा. येथील एकंदरीतच वातावरण आणि स्थानिकांचा काही विशेष गुणधर्म म्हणा, या बाहेरगावाहून आलेल्या मंडळींना निवृत्तीनंतर दापोली सोडून जावेसेच वाटत नाही. मग ती मंडळी येथेच घर बांधून राहतात.

असेच एक प्रोफेसर डॉक्टर विजय तोरो. हे १९७३ साली दापोली मध्ये आले आणि ‘प्रथम तुज पाहता,जीव वेडावला’ अशी त्यांच्या मनाची अवस्था झाली. मनाने अतिशय संवेदनशील असलेले डॉक्टर हे दापोलीच्या प्रेमात पडले. इतके प्रेमात पडले की, त्यांनी दापोलीचा साद्यंत इतिहास लिहिण्याचा बेत केला. त्यांनी दापोलीवर सखोल संशोधन केलं. किती वर्ष ? २५ वर्षांहून अधिक काल! त्यांनी दापोलीतील जवळजवळ प्रत्येक गावाला भेटी दिल्या. दापोलीतील शतावधी लोकांना ते भेटले आणि त्यांच्याकडून त्यांनी दापोलीचा भूगोल, दापोलीचा इतिहास, दापोलीमधील कर्तृत्ववान मंडळी, दापोलीमधील पर्यटन स्थळे आणि दापोलीमधील इतर अनेक गोष्टी यांचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले. आणि या संशोधनामधून त्यांनी ५०० ते ६०० पानांचे हस्तलिखित तयार केले. त्याचा प्रथम खंड त्यांनी काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केला. त्याचं नाव आहे ‘परिचित अपरिचित दापोली तालुका‘. निधीअभावी डॉ. विजय तोरो संपूर्ण पुस्तक प्रकाशित करू शकले नाहीत. परंतु आज ना उद्या हा संपूर्ण इतिहास प्रसिद्ध करण्याची त्यांची इच्छा आहे. मंडळी, हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचावं आणि अनेक क्षेत्रात भव्य दिव्य कामगिरी करणाऱ्या दापोली मधील रत्नांची ओळख करून घ्यावी.‌ हा लेख लिहिताना डॉक्टर विजय तोरो सरांच्या या पुस्तकाचा मला खूप उपयोग झाला आहे हे मी येथे कृतज्ञतापूर्वक नमूद करतो.

तर मंडळी, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचे मूलस्थान किंवा जन्मस्थान असलेल्या, तसेच विविध निसर्गरम्य पर्यटन स्थळांनी नटलेल्या अपरांत भूमीमधील दापोलीच्या या परिसराला आपण आयुष्यात एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

सुभाषितकार म्हणतात,

दुर्लभं भारते जन्म:। महाराष्ट्रे त्वति दुर्लभं।।

त्याला जोडून मी म्हणतो,

दुर्लभं भारते जन्म:।
महाराष्ट्रे त्वति दुर्लभं।।
दापोल्याम् च पूर्व सुकृतै:।।

भारतात जन्म मिळणे दुर्लभ! त्यात महाराष्ट्रात मिळणे महा दुरापास्त! आणि त्यातसुद्धा दापोलीत जन्म हा केवळ पूर्व जन्माची पुण्याई असेल तरच, नाही तर नाही ।।।।

अगर खुदा है कहीं, ये सरजमीं पर गालीब।

तो दापोली वह जगह है जनाब।

वरना इतने फरिश्ते कहां आते, अमन ढूंढते, ये चमन में।।

— लेखन : दादासाहेब दापोलीकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

 1. “कोळबांद्रे येथील भार्गवराम मंदिरे” – हे गाव दापोलीत आहे की खेड मधे? कोणत्याही बाबतीत हे गाव प्रसिद्ध असेल असे वाटत नाही.

  पडघवली व आसुद बाग तसेच श्री ना पेंडसे यांचे नाते खुलवता आले असते.

 2. दापोली परिसरामधे खुप सारे पक्षीवैभव आहे याचा ही उल्लेख व्हायला हवा. काही स्थलांतरीत परदेशी पक्षी तसेच मुळचे भारतीय पक्षी या परिसरात वास्तव्याला असतात.

 3. ह्या लेखकांचे मुळ नाव काय ते कळेल का?

  डॅा बाबासाहेब आंबेडकर व लोकमान्य टिळक यांना दापोलीचे म्हणजे तितकेसे रुचत नाही.

  पंचनदीचे एक देऊळ सप्तेश्वर नावाचे जे एका वेगळ्याच स्थापत्यशास्राचा नमुना आहे त्याचा उल्लेख बहुतेक राहीला असावा. त्याचे वैशिष्ठ म्हणजे कौलांच्या खाली जे लाकूड वापरले आहे ते खिळेविरहीत एकमेकांत जोडलेले आहे. शिवाय पुर्ण परिसर अतिशय रमणीय आहे.

  दाभोळ बंदर हे देखिल अत्यंत अप्रतिम व प्रेक्षणीय स्थळ आहे शिवाय त्याच बंदराजवळील “अंडा मशीद” ही तेवढीच सुंदर व देखणी आहे. तिची पण एक अख्यायिका आहे.

  तसेच हर्णै बंदरावर अतिशय मोठा मत्स्य व्यवसाय होतो व त्यावर खुप सारे व्यवसाय अवलंबून आहेत. सुवर्ण दुर्ग तर खरोखरच बावनकशी सोन्यासारखा समुद्रात तोर्यात ऊभा आहे.

  कदाचित लेखकांनी काही विभागाचा उल्लेख टाळला असावा.

  शिवाय पंचनदी मधेच काळभैरवाचे अत्यंत रमणीय असे मंदिर आहे व तिथून एक अप्रतिम झरा वाहत जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments