हा विषयच एवढा सुंदर आहे की नाव घेताच डोळ्यापुढे पंचपक्वान्नासहित वाढलेलं सुंदर केळीचं पान नाहीतर चांदीचं ताट दिसायला लागलं.काही म्हणा पण भारतीय किंवा हिंदू संस्कृतीचे संस्कार,संस्कृती याच्याबरोबर त्यांची खान पान सेवाही स्पृहणीयच आहे.
भारतात विविध प्रांत,विविध वेषभूषा,विविध संस्कृती नांदत आहेत तसेच विविध खाद्यपदार्थही आहेत.प्रत्येक प्रांत आपापल्या खाद्यविशेषाने प्रसिध्द आहे.आपल्यापैकी अनेकांनी पर्यटन करून त्या त्या प्रांतातील खाद्यपदार्थांचा लाभ घेतला असेलच आणि तृप्तही झाले असाल.
तर या आपल्या खाद्यसंस्कृतीत एक गोष्ट तुमच्या लक्षांत आली असेल की आपल्या पूर्वजांनी पदार्थ बनवतांना हवामान, वातावरण, स्थळ, काळ या सा-या गोष्टींचा पध्दतशीर विचार केलेला आहे.उष्ण हवेत पन्हे,सरबत,कलिंगड तर थंडीसाठी डिंक, मेथी, हळद घालून गरम दूध अशा पदार्थांना महत्व दिलेले आहे.शिवाय एकाच वेळी वाढलेल्या संपूर्ण अन्नातून सर्व प्रकारची जीवनसत्वे पोटात जातील आणि कुठलाही त्रास होणार नाही याचीही काळजी घेतलेली आहे.इतकचं नाही तर पानामध्ये कुठला पदार्थ कुठे आणि किती वाढायचा याचेही प्रमाण ठरलेले आहे. चटणी, कोशिंबीर, लोणचं, भरीत, पापड, कुरडया, भजी, पोळी अर्थात कुठल्याही प्रकारची, पुरण, खीर हे पदार्थ डावीकडे म्हणजे प्रमाणात खावे. उजव्या बाजूस सुकी भाजी, तिच्याखाली रस्साभाजी, मधोमध भाताची मूद त्यावर गोड वरण आणि साजूक तुपाची धार ! वरील भागात मसालेभात. वाटीमध्ये आमटी, कढी, सोलकढी, अळूची पातळ भाजी असे पदार्थ. म्हणजे एकाच वेळी गोड, तिखट, आंबट, खारं, अशा सर्व चवी. तसेच जाता येता तोंडात टाकायला म्हणून नारळाच्या, बेसनाच्या, रव्याच्या, आल्याच्या, राजगि-याच्या, खसखशीच्या, गुळपापडीच्या वड्या. तसेच नाश्त्याला भाजणीचं थालिपीठ, शिरा, सांजा, पोहे, घावन शिवाय दिवाळीला तर काय चिवडा, लाडू, करंज्या, अनारसे, चिरोटे, चकल्या नुसती धम्माल !
आणि हो, देवाला नैवेद्य दाखविल्याशिवाय आपण जेवायला सुरूवात करीत नाही. तसेच आपल्या गेलेल्या माणसांसाठीही आपण ताट वाढतो. कोणी काहिही म्हटलं तरी आपला आत्मा यावर विश्वास आहे. म्हणून पितृपंधरवड्यात आपण सर्व प्रकारचे पदार्थ वाढतो जेणेकरून गेलेल्याला सर्व प्रकार गोड, तिखट, मीठ आणि कडू कारल्याचीही चव देतोच. वडे, कढी असतेच पण त्या व्यक्तीचा आवडता पदार्थही असतोच. भारतीय संस्कृतीव्यतिरिक्त इतर कुठेही ही पध्दत दिसून येत नाही.
पण हाय ! आजकालच्या मुलांना या पदार्थांमध्ये रस नाही. त्यांना आवडतात मॅगी, पिझ्झा, बर्गर, नूडल्स. खरंतर यात जीवनसत्वांचा अभाव आहे. शाळांमध्येही जंकफूड खाऊ नका असच सांगतात. घरी पदार्थ बनवण्यापेक्षां बाहेरून पदार्थ मागवण्याचं प्रमाणही हल्ली वाढत चाललयं. अर्थात् हल्ली ऑफिसमधील वाढत्या कामांची जबाबदारी, कटकट, प्रवासातील गर्दी, वेळ या सा-यामुळे कंटाळा येतो. आराम करावासा वाटतो हे खरे आहे. पण स्वतः वेळातवेळ काढून नवनवीन पदार्थ करून स्वहस्ते दुस-याला खाऊ घालण्यात एक वेगळीच मजा असते आणि समाधानही !
हं, पण हीच गोष्ट आज घरातील पुरूषसुध्दां करू शकतात आणि आपल्या माणसाला एकt वेगळाच आनंद देऊ शकतात..यू ट्यूब, गुगल साथीला आहेतच ना.
थोडी गंमत केली बरं! रागावू नका.
— लेखन : स्वाती दामले. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800