पैरालिंपिक स्पर्धेत भारतीयांची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. या स्पर्धेत ८४ खेळाडूंनी भाग घेतला. त्यापैकी ७ सुवर्ण, ९ रौप्य, १३ कास्य अशी छान पदकाची कमाई झाली.
याउलट पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत ११७ खेळाडू होते आपले. पण एकही सुवर्ण नाही. फक्त एक रजत अन् ५ कास्य अशी लाजिरवाणी कमाई !. पण आपल्याकडे फटाके वाजवावे असे काही घडले नाही. १४० कोटीचा देश.. पण आपल्या पदकाची संख्या दोन अंकी देखील नाही. एकही सुवर्ण पदक नाही. उलट नेदरलँड सारखा छोटा देश पहिल्या दहात ! जपान, कोरिया, हे देखील आपल्या कितीतरी पुढे..आपण गाजलो ते विनेश फुगत प्रकरणामुळे ! या झगड्यात देखील प्रामाणिकपणा नाहीच. फक्त खोटे अकांड तांडव. नियम सगळ्यासाठी सारखे. तिथे सहानुभूतीला वाव नसतो. या खेळाडूने भारतातच निवडीसाठी नाटक केले होते अशा बातम्या येताहेत. नियमात बसत नसताना देखील ५० किलो, ५५ किलो या दोन्ही कॅटेगरीत आपल्याला निवडण्यात यावे हा तिचा आग्रह. तो दबावामुळे पूर्ण करण्यात आला ! असे दबाव तंत्र मान्य करायचे तर नियमाची गरज काय ?
आपल्या कडे प्रत्येक क्षेत्रात गोंधळ, राजकारण, भ्रष्टाचार, अनैतिक व्यवहार हे आता नित्याचे झाले आहे. याच महिला कुस्ती खेळाडू चा लैंगिक छळ झाल्याचे प्रकरण काही महिन्यापूर्वी गाजले. पण तिथे ही राजकारण, पक्षीय दबाव आड आल्याने न्याय झालाच नाही.
क्रिकेट, कबड्डी, कुस्ती अशा खेळात ज्याचा या खेळाशी काडीचा संबंध नाही असे राजकारणी पुढारी किंवा त्यांचे चमचे हेच बोर्डाचे अध्यक्ष होतात. निवड समितीचे राजकारण तर सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. आता टेनिस, क्रिकेट सारख्या खेळात कोट्यवधी रुपयांचा व्यापार आहे. जाहिरातीचे उत्पन्न आहे. इथेही लिंग भेद, जाती भेद, राज्य भेद आहेतच.
महिला क्रिकेट खेळाडूंना पुरुष क्रिकेटर इतका भाव नाही. मान, पैसा, प्रसिध्दी नाही. क्रिकेट हा खेळ सोडला तर इतर कुठल्याही खेळात आपण जागतिक पातळीवर सातत्याने यश मिळवले नाही.
संसदेत या खेळाडूवर प्रशिक्षणासाठी कोट्यवधी रुपये सरकारने खर्च केल्याचे सांगितले. विनेष फोगत वरच साधारण एक कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून खर्च झाल्याचे वृत्त आहे.साधारण ११७ खेळाडू बरोबर त्याचे कोच अन् इतर सहकारी यांची संख्या खेळाडूच्या संख्ये पेक्षा जास्त. ही वरात कशासाठी ? त्यांनी तिथे जाऊन काय दिवे लावले ? त्यांचे दायित्व काय होते ? जबाबदारी काय ? आपल्या कडे खर्च केलेल्या पैशाचे, संबंधित कामगिरीचे ऑडिट होतच नाही. जाब विचारले जात नाहीत. स्पष्टीकरण मागवले जात नाही.
शाळा कॉलेजात खेळाला तितके महत्व दिले जात नाही. मैदाने नाहीत.खेळाचे साहित्य नाही. प्रशिक्षित खेळाडू नाहीत शिकवायला. सगळा भार अकेडेमिक गुण, परीक्षेचे परसेंटेज यावरच. तुम्हाला शिकायचे तर खाजगी कोच घ्या. पैसे खर्च करा. ही संस्था चालकाची जबाबदारी नाही. सरकार देखील हात वर करून, जबाबदारी झटकून मोकळे होणार !
खेळाडू प्रशिक्षक यांच्यातील सोहार्दाचे नाते, खेळाडूची संघ भावना, एकमेकांना प्रोत्साहन देण्याची खिलाडू वृत्ती, परस्पर सहकार्य हे सारे अभावानेच आढळते आजकाल. याही क्षेत्रात प्रचंड राजकारण आहे. लिंग भेद, जाती भेद आहेत. द्वेष तिरस्कार भाव आहे. देशासाठी आपण खेळतो, आपल्या देशाचे नाव उंच नेतो ही राष्ट्रीय निष्ठा अभावानेच दिसते.
फार पूर्वी आपण आयोजित केलेले आशियन गेम्स कोणत्या कारणाने गाजले होते हे आठवून बघा. म्हणजे मी काय म्हणतो ते नीट ध्यानात येईल.
खेळाडू च्याच बाबतीत, क्रीडा क्षेत्रात च हे सारे घडते असे नाही. संशोधन क्षेत्र घ्या. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात केलेल्या एकाही संशोधनाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही. आपण ज्या अंतराळ संशोधन, मिसाईल संशोधन च्या बाता मारतो ते डिझाईन, डेव्हलपमेंट स्वरूपाचे काम आहे. त्यात मूलभूत संशोधन फार कमी. त्यातले मूळ तंत्र, विज्ञान आधीच उपलब्ध आहे.
दुसरे शिक्षण क्षेत्र..तिथेही तीच अवस्था. आपले एकही विद्यापीठ पहिल्या शंभर क्रमांकात जागतिक पातळीवर येत नाही. अगदी जपान, सिंगापूर, नेदरलँड देखील त्या यादीत आहेत. आपले किती विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी, संशोधनासाठी बाहेरील देशात जातात ? त्या तुलनेत परदेशातून (म्हणजे लंका, नेपाळ, बांगलादेश, येमेन नव्हे) किती विद्यार्थी आपल्या विद्यापीठात शिकायला येतात ? आपण शिक्षणात सुधारणा केल्या म्हणजे जागतिक स्तरावर दर्जा वाढवण्यासाठी नेमक काय केले ? हे कुणीच सांगणार नाही. आपणच आपल्या पाठीवर थाप मारून घेण्यात आपण तरबेज आहोत !
आय टी क्षेत्रात आपले तरुण बरेच काम करताहेत असा आपण दावा करतो. हा देखील एक्सप्लायटेशन चा प्रकार आहे. आपल्याकडे वाढलेले आय टी क्षेत्र हा चीप लेबर चे उदाहरण आहे. आपण लाखोत मिळणाऱ्या पगाराने दिपून जातो. तिकडच्या डॉलर युरो च्या पगाराशी तुलना केली तर सत्य समजेल.
तांत्रिक प्रगती झाली, राहणी मान उंचावले हे खरे. रस्ते, महामार्ग, मेट्रो, विमान प्रवास ही डोळ्यात भरणारी प्रगती. पण तरी गरिबांची संख्या , मागासलेल्याची संख्या जास्त.. हे गणित कसे सोडवायचे ? गरीबी कमी झाली तरी सरकारी फुकट मदतीचा ओघ सुरूच आहे तिजोरीतून ! पावसाळा आला की खड्डे भरलेले रस्ते, चिखलातून वाटचाल करणारे शालेय विद्यार्थी, कसल्याही मूलभूत सोयी नसलेल्या शाळा, डॉकटर,नर्सेस, सोयी नसलेले दवाखाने, खचणाऱ्या इमारती, चाळी..याच बातम्या का दिसतात टी वी वर ? न्याय, कायदा सुव्यवस्था यावर न बोललेलेच बरे !
कुणाला हे सारे निराशा जनक, पेसिमिस्ट विचार वाटतील. निगेटिव्ह लेखन वाटेल. पण यातले काय असत्य आहे ? चुकीचे आहे ? वास्तवाला धरून नाही ?
ऑलिंपिक रिझल्ट च्या निमित्ताने का होईना आपण जागे व्हायला, नव्याने विचार करायला काय हरकत आहे ? तुम्हाला काय वाटते ?
— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800