बोल भावनांचे
उघडे कवाड केले आता जरी मनाचे
कळले तुला असावे ते बोल भावनांचे ॥ धृ.॥
चंद्रावरी रुसावे हा न्याय कोणता तो
तो शोध चांदण्यांचा सायास व्यर्थ होतो
निजरूप ते रुपेरी आहेच त्या क्षणांचे
कळले तुला असावे ते बोल भावनांचे ॥ १ ॥
शब्दात जाणिवांना वर्णावयास जावे
संकोच आड येई हे ओठही मिटावे
साऱ्या मनोगतांचे दव पापणीत साचे
कळले तुला असावे ते बोल भावनांचे ॥ २ ॥
नित्यापरी जरी हा संसार चाललेला
हृदयांत खोल जागी तो घाव साचलेला
कवितेत आज येथे झालेत शब्द त्याचे
कळले तुला असावे ते बोल भावनांचे ॥ ३ ॥
— रचना : सुधीर नागले. गोरेगाव – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800