मानसिक आरोग्यावर काम करणे ही काळाची गरज आहे. आपल्या भावना आपल्या वर्तणुकीला नियंत्रित करतात. भावना जिथे अनियंत्रित असतात तिथे विवेक काम करत नाही. समोरचा व्यक्ती जरी चुकीचा असला तरी आपण आपल्या भावनांना नियंत्रित करणे गरजेचे आहे अन्यथा मोठ्या घटनेला सामोरे जावे लागते.
हंग्री, अँग्री लोनली व टायर्ड म्हणजेच भूक लागलेली असताना, राग आलेला असताना, एकटे पडले असताना व थकलेले असताना भावना मोठ्या प्रमाणात प्रवाहित होतात त्यामुळे या चार स्थितीमध्ये भावनांना योग्य प्रवाहित करणे गरजेचे आहे. मात्र भावनांना व्यक्त करणे सुध्दा गरजेचे आहे. जर भावनांना व्यक्त केले नाही तरी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुणाच्या चुका असतील, कोणाच्या तक्रारी असतील त्यांना माफ करा. आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफी मागून घ्या. यामुळे आपले जीवन नक्कीच आनंदीमय बनेल, असे प्रतिपादन कार्पोरेट ट्रेनर व भारत नशा मुक्ती अभियानाचे संयोजक ब्रह्माकुमार डॉक्टर सचिन परब यांनी केले.
नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेस मध्ये नुकतेच “नकारात्मक भावनांचे व्यवस्थापन व आनंदी जीवन जगण्याची कला” या विषयावर डॉक्टर सचिन परब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी डॉक्टर सचिन परब बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती देवी प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
याप्रसंगी सी एन पी चे अतिरिक्त महाप्रबंधक श्रीपद रामदास वाजपे, सयुंक्त महाप्रबंधक – श्री नवीन कुमार, प्रबंधक- श्री अर्पित धवन, नाशिक रोड सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी गोदावरी दीदीजी व ब्रह्माकुमार महेंद्र भाई उपस्थित होते.
महाप्रबंधक श्रीपद रामदास वाजपे यांनी डॉक्टर परब यांची शाल व बुके देऊन स्वागत केले.
सूत्रसंचालन सी एन पी चे अर्पित धवन यांनी केले.
व्याख्यानादरम्यान डॉक्टर सचिन परब यांनी विविध ऍक्टिव्हिटी द्वारे मोलाचा संदेश दिला.
अशा प्रकारची कार्यशाळा नियमित व्हावी असा मानस उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास करन्सी नोट प्रेस चा अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800