Wednesday, April 23, 2025
Homeलेखभाषांतर : कला आणि शास्त्र

भाषांतर : कला आणि शास्त्र

जगातील बहुसंख्य ज्ञान व माहिती इंग्रजीत एकवटली आहे. ती मराठीत आणणे ही सुद्धा मातृभाषेची सेवाच आहे. दोन्ही भाषांतील शब्द, शब्दच्छटा, अर्थ, व्याकरण, बोलीभाषेतील प्रचलित शब्द यांसारख्या गोष्टींचा विचार करून भाषांतर केले जावे.

भाषांतरकाराने लिखाण करताना महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाचे मराठी शुध्दलेखनविषयक नियम पाळणे गरजेचे आहे. आपल्या लेखन/टंकलेखनाचे मुद्रितशोधनही भाषांतरकाराने करणे आवश्यक आहे.
टंकलेखनात एखादा शब्द चुकणे ही तांत्रिक त्रुटी राहून जाते, संपादक/प्रकाशकाकडे मुद्रितशोधनावर अंतिम हात फिरवला जाताना मग लेखकाच्या (भाषांरकाराच्या) दृष्टीकोनातून महत्वाचा शब्द “व्हेन इन डाउट कट इट आउट’ या अलिखित नियमानुसार तोच शब्द वगळला जाऊ शकतो.

भाषांतर करताना भाषांतरकाराला सर्वसामान्य लोकांची बोली, व्यावसायिकांची भाषा, शास्त्रीय व तांत्रिक शब्दरचना यांची जाण असावी लागते. या कामांत दोन्ही भाषांतील शब्दकोश, परिभाषा कोश यांचा भाषांतरकाराने आधार घ्यावा.

भाषांतरात अपेक्षित भाषेतील शब्द चपखलपणे वापरून मूळ आशय व्यक्त झाल्यास वाचकाला मूळ साहित्यकृती वाचल्याचे समाधान व आनंद मिळतो. हीच खऱ्या अर्थाने भाषांतरकाराची कसोटी; हे भाषांतर वाचकाला आपले वाटते.

एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अर्थाचे संक्रमण होताना मूळ आशयाला कोणताही धक्का लागणार नाही, याची दक्षता भाषांतरकाराने घ्यावी.
मूळ भाषा (प्रामुख्याने इंग्रजी) तसेच लक्ष भाषा अर्थात मराठी या दोन्ही भाषकांच्या संस्कृतीचे आकलन करून आशयाची मांडणी करावी (या भाषांचे आकलन नसल्यास चुका संभवतात).
सर्वसामान्य सुशिक्षित, तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या व त्या पातळीच्या वाचकांच्या संदर्भासाठी हे भाषांतर करायचे आहे हे लक्षात घ्यावे. त्यासाठी विविध विषयांतील तत्त्वे व विचारप्रवाह यांच्या लेखनात आढावा घ्यायचा आहे, हे भाषांतरकाराने लक्षात ठेवायला हवे.

नवनवीन ज्ञानशाखांतील विविध व अपरिचितही विषयांची मूलतत्त्वे आणि त्यांत घडत असणारे महत्त्वाचे अर्थपूर्ण बदल मराठी वाचकाच्या प्रथमच वाचनात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला त्यांचा परिचय सहजपणे होईल, अशा प्रकारे भाषांतर करण्याकडे कल असावा.

भाषांतर करताना परिभाषा गरजेची असतेच. परिभाषेत सर्वत्र एकसारखेपणा किंवा एकवाक्यता रहावी. नवीन पारिभाषि‍‍क शब्द आढळल्यास त्याचा मराठी प्रतिशब्द घडविण्याचाही प्रयत्न भाषांतरकार करू शकतो.नवीन परिभाषिक संज्ञा मराठी विश्वकोशातील इतर पारिभाषिक संज्ञांशी ताळमेळ राखणारी किंवा सुसंगत असावी. त्यासाठी भाषांतरकाराने अशा शब्दांचा संग्रह (ग्लोसरी) तयार करणे अधिक योग्य आणि वाचकास मार्गदर्शक राहील.

इंग्रजी किंवा अन्य परक्या भाषेच्या संस्कृतीचे भारतीयकरण करण्याची गरज नाही. तसे झाल्यास भाषेसह मूळ ज्ञान मराठीत येणार नाही आणि मराठी भाषेची समृद्धता वाढणार नाही. उदाहरणार्थ आमेन हा शब्द मराठीत रूढ झाला आहे त्याला केवळ धार्मिक अर्थ राहिलेला नाही मात्र बाप्तिस्मा हा केवळ स्नानसंस्कार नाही किंवा नामकरण विधीही नाही त्याला धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ आहे. तसेच की/कीबोर्ड याला ‘कळ’ हा शब्द वापरण्या ऐवजी मूळ शब्द त्या त्या अर्थाने वापरावा. याच्या अर्थाला तांत्रिक अर्थछटा (connotation) आहे.
अवघड विषयांचेही भाषांतर सुबोध रीतीने करण्याचा प्रयत्न भाषांतरकाराने केला पाहिजे. ‘सुबोध’ म्हणजे नेमके काय याचे उत्तर रेव्ह. अलन ग्रेव्हज् या मिशनरी अनुवादकाने यांनी ४ नोव्हेंबर १८३१ रोजी बायबल सोसायटीला लिहिलेल्या पत्रात आहे. ग्रेव्हज् लिहितात, “मराठी वापरताना ग्राम्य पातळीवर उतरावयाचे नाही त्याचप्रमाणे अवघड भाषेचाही उपयोग करावयाचा नाही. वाक्यरचना सुबोध व मराठीच्या स्वभावाला अनुसरून करण्याकडे लक्ष देणे.”
(Bruce Henry J., The literary Work of the American Marathi Mission, Bombay 1882, p 5).

भाषांतर साधे, सोप्या भाषेतील आणि मुळाबरहुकूम असावे. भाषांतरात मूळ अर्थ, आशय आला आहे हे पाहणे ही भाषांतरकाराची मुख्य जबाबदारी आहे. काटेकोरपणे भाषांतर करण्यासाठी ते अक्षरश:, शब्दशः केले पाहिजे हा दंडक नाही. भाषांतरित आशय कठीण झाल्यास त्याचे वाचकाला आकलन होत नाही व भाषांतर करण्यामागील हेतू साध्य होत नाही, हे भानही बाळगणे गरजेचे आहे.

भाषांतरकाराने किंचित स्वातंत्र्य घावे परंतु हे त्याच्या मांडणीच्या शैलीवर अबलंबून असते. सुलभिकरणाच्या हव्यासापोटी मूळ अर्थ निसटण्याची शक्यता अधिक असते. तसे होणार नाही याची दक्षता भाषांतरकाराने घेतली पाहिजे. शास्त्रीय संकल्पना, विषयातील संज्ञा वापरताना शब्दकोश, परिभाषा कोश यांचा आधार घेतल्यास नेमकेपणा जपला जातो.
नवनवीन परिभाषिक शब्द, संज्ञा, संकल्पना लक्ष्य भाषेत वापरताना त्यांच्या अर्थच्छटांचा विचार करावा. शिवाय या गोष्टी वाचकाच्या माहितीतील असाव्यात, ही जागरुकता भाषांतरकाराने बाळगावी. उदाहरणार्थ: इंग्रजी content या शब्दासाठी मराठीत संहिता आणि विदा असे दोन्ही शब्द वापरले जातात. विदा data या शब्दासाठी वापरला जातो तर संहिता हा शब्द माहिती,पटकथा या अर्थी वापरला जातो.

भाषेतील म्हणी, वाक्प्रचार, अलंकार, शैली यांच्यावर भाषेचे वैभव अवलंबून असते; म्हणी, वाक्प्रचार, लोकानुभव हे लोकांच्या व्यवहारांतून रूढ होत असतात. शब्द, पद, वाक्ये इत्यादींचा उपयोग त्यांच्या मूळ अर्थाहून, वाच्यार्थाहून भिन्न अर्थाने भाषेत रूढ झालेला असतो. यांचे भान मुख्यत्वे ललित वाङ्मय प्रकाराच्या भाषांतरात बाळगणे महत्वाचे असते. लेखकाची मानसिकता, त्या भाषेतील शब्दांचा पोत, संकेत, वाक्प्रचारांचे संदर्भ, भाषेची लय इत्यादी गोष्टींचा ललित वाङ्मय प्रकाराच्या भाषांतरात विचार करावा लागतो.

ज्ञान, इतिहास,अर्थशास्त्र यांसारख्या विषयांतील मजकुराचे भाषांतर केवळ वाच्यार्थ अपेक्षित असतो. संकेतार्थ, गूह्य वा गूढ अर्थ, भाषेच्या शैलीची वैशिष्ट्ये यांसारख्या अवघड गोष्टींचा संबंध अशा भाषांतरात कमी येतो. या साहित्य प्रकारांचे भाषांतर तुलनेने काहीसे सोपे असते, परंतु या विषयात नित्यनव्या संकल्पनांची, शोधांची, माहितीची व त्याला अनुसरून शब्दांची भर पडत असल्याने, त्यांसाठी मराठी प्रतिशब्द शोधणे व रूढ करणे हे मात्र आव्हान आहे. धर्मांचे तत्त्वज्ञान, दर्शने, इतर तत्त्वज्ञाने यांच्या संकल्पनेची विशिष्ट परिभाषा असते, त्यांचे भाषांतर स्पष्टीकरणासह देणे गरजेचे ठरते. त्यामुळे वाचकास मूळ भाषिक संस्कृती समजून घेण्यासाठी मदत होते.

भाषांतराला व्यवहार्य रूप देताना पुढील प्रकारच्या मर्यादा व अडचणी येऊ शकतात : पाल्हाळ, क्लिष्टता, द्विरुक्ती :
पाल्हाळ म्हणजे अनावश्यक मजकूर तसेच रटाळपणा आणणारे लेखन, हे टाळणे गरजेचे असते. क्लिष्टता म्हणजे दुर्बोधता किंवा अवघड शब्दरचना व वाक्यरचना. याचप्रमाणे तोच तोपणा, द्विरुक्ती हाही एक लेखन दोष आहे तो भाषांतरात संभवतो, ज्यावेळी मूळ भाषेतील लेखन लक्ष्य भाषेत साधे व सोपे केले जाते. मूळ भाषेत वेगवेगळ्या शब्दांत तोच तो अर्थ सांगितलेला असतो.
इंग्रजी भाषेत एकाच अर्थाची विविध क्रियापदे वापरली जातात. त्यात वेगळ्या अर्थछटा अभिप्रेत नसतील तर त्या शब्दांच्या भाषांतराने लक्ष्य भाषेत तोच तोपणा येतो. कर्मणी प्रयोग, अनेक उपवाक्ये ही इंग्रजी भाषेची वैशिष्ट्ये असून ती भाषांतरीत करताना जशीच्या तशी मराठीतून आणून चालत नाही. कारण मराठी भाषेच्या शैलीत ती चपखलपणे बसणारी नाहीत. म्हणजे मराठी भाषेच्या प्रकृतीशी ती जुळणारी नाहीत. म्हणून भाषांतर अभ्यासपूर्ण रीतीने, कसोशीने व नेमकपणाने व्हायला हवे. भाषांतराचा विषय व्यवस्थितपणे समजून न घेतल्यास आशयाच्या आविष्कारात चुका, त्रुटी राहू शकतात. भाषांतर करावयाच्या विषयासंबंधीचे संदर्भ विश्लेषण लक्षात घेणे गरजेचे असते. तांत्रिक शब्दकोशातील व्याख्या, महाराष्ट्र शासनाचा शासन व्यवहार कोश, पुणे व इतर विद्यापीठांचे परिभाषाविषयक कार्य, केंद्रीय शासनाचा परिभाषासंग्रह, प्रमाणित इंग्रजी–मराठी शब्दकोश, महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेले विविध विषयनिहाय परिभाषा कोश यांचा आधार घेता येतो. परिभाषा कोशातील काही शब्द क्लिष्ट आहेत, काही प्रचलित झालेले नाहीत. प्रचलित प्रतिशब्दांचा वापर करणे आणि प्रचलित साध्य शब्दांना व्यवहारात आणणे याचा सुवर्णमध्य भाषांतरकाराने साधावा. ऑक्सिजन, हीलियम, युरेनियम, कारब्युरेटर इत्यादी शास्त्रीय शब्द तसेच मराठीत रूढ झालेले स्क्रू, नट, बोल्ट, एंजिन, रेल्वे, रॉकेट, रोबॉट, इंटरनेट, व्हिडीओ, इत्यादी इंग्रजी शब्द मराठीत तसेच वापरावेत. भ्रमणध्वनी (मोबाईल), संकेतस्थळ (वेबसाईट), संगणक (कॉम्पुटर) यांचा वापर व्हावा, यांनी मराठी समृद्ध झाली आहे.

वर्ण्यविषय अधिक परिणामकारक व स्पष्ट करण्यासाठी आवश्यक तेथे मजकुरासोबत किंवा परिशिष्टात रेखाचित्रे, छायाचित्रे, चित्रपत्रे (रंगीत/साधी), आलेख, आकृती, कोष्टक, नकाशे देणे उपयुक्त ठरते. आकृतीच्या खाली, वर व मध्यभागी असणाऱ्या अशा सुनिदर्शनांसंबधी मजकुराचेही भाषांतर करणे अत्यावश्यक असते. तसेच भाषांतरकाराने मजकुरातील अशा सुनिदर्शनांचे स्थान योग्य आहे की नाही, हे सुचवावेत. नोंदीत आलेली शीर्षके, उपशीर्षके, उपउपशीर्षके व्यवस्थित आहेत ना हेही भाषांतरकाराने पाहावे.

सामान्यपणे मोठ्या नोंदीच्या शेवटी त्या विषयाशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या इतर नोंदी ‘पहा म्हणून दिलेल्या असतात. शिवाय मोठ्या नोंदींच्या अखेरीस त्या विषयाची अधिक माहिती कोठे मिळू शकेल, हे दर्शविणारे संदर्भग्रंथ दिलेले असतात. त्यांतही भाषांतरकार भर घालू शकतो.

सुधीर ब्रह्मे

— लेखन : सुधीर शालीनी ब्रह्मे. ज्येष्ठ पत्रकार
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता