आज सर्व क्षेत्रात अत्यंत मोठ्या प्रमाणावर लाचखोरी, गैरकारभार ,भ्रष्टाचार बोकाळला असून समाज व राज्यव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जागरुक होऊन सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली लोकशाही राज्यपद्धती अस्तित्वात येईल, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पुखराज बोरा यांनी व्यक्त केले.
नाशिक येथील सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ग्रंथाली प्रकाशानाच्या वतीने सेवानिवृत्त जिल्हाधिकारी बी.जी. वाघ लिखित ‘ घटनात्मक मूल्यांचा विकास व ऱ्हास, संविधान : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धिक चरित्रव या पुस्तकाच्या नुकत्याच झालेल्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोरा बोलत होते.
न्या. बोरा पुढे म्हणाले की, लेखक बी.जी. वाघ यांनी आपल्या पुस्तकात घटनात्मक मूल्यांच्या संदर्भात चर्चा केली असून काही ठिकाणी आपले मत अत्यंत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. तसेच यात अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजींची भूमिका एकमेकाला पूरकच होती. राज्यघटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. परंतु राजकीय व्यवस्थेला स्वतःचा धर्म नाही , ती धर्मनिरपेक्ष आहे.
याप्रसंगी ॲड. जयंत जायभावे म्हणाले की, आजच्या काळात प्रत्येकाने संविधान समजून घेण्याची गरज आहे. राष्ट्राच्या विकासाचे तत्व म्हणजे संविधान होय. राष्ट्रगीताप्रमाणे आपण संविधान उद्देशिकेचे पाठांतर करायला हवे. उद्देशिकांचा मूळ उद्देश काय हे समजून घेतले पाहिजे, तसेच राज्यघटना निर्मितीप्रसंगीच्या ऐतिहासिक घटनांचे सविस्तर वर्णन करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटने संदर्भातील संविधान निर्मितीसाठीच्या पहिल्या सभेच्या प्रथम भाषणाची क्लिप उपस्थित त्यांना ऐकवली. डॉ. बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणामुळेच काँग्रेस सह सर्व पक्षांनी डॉक्टर आंबेडकरांचे महत्त्व ओळखले असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
लेखक बी. जी. वाघ यांनी आपल्या मनोगतात पुस्तकाच्या निर्मितीची संकल्पना स्पष्ट केली. सध्याच्या काळात राज्यघटनेतील मूल्यांची पडझड सुरू असल्याचे दिसून येते. वास्तविक पाहता राज्यघटनेने व्यक्ती हीच ओळख असावी, कारण व्यक्ती ही घटनेचा आत्मा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्तीला सर्वाधिकार दिले आहेत. गरिब, वंचित वर्गाचे चिंतन घटनेत आहे. राज्यघटनेने देशाचे चरित्र बदलले. घटनेचा प्रवास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास हा समांतर आहे. हा देश पुढे जावा म्हणून त्या काळात अनेक महापुरुषांनी प्रचंड कष्ट घेतले, असे सांगून त्यांनी घटनात्मक मूल्यांचा विकास कसा झाला हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे, संविधानाचे आणि संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करण्यात आले.
ग्रंथालीचे विश्वस्त सुरेश हिंगलसपूरकर काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून त्यांचे मनोगत वैशाली ताजणे यांनी वाचून दाखविले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार यांनी केले.
यावेळी मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इंटरनॅशनल पुरस्कार मिळविलेले अशोक चिंतामण मोरे यांचा स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन पुखराज बोरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा बोराडे यांनी केले. आभार प्रदर्शन निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार यांनी केले.
कार्यक्रमास माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, आकाशवाणीचे निवृत्त संचालक उत्तम कोळगावकर, सावानाचे संचालक संजय करंजकर, भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह, प्रा. डॉ. यशवंत पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार ,वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, मानवधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कोल्हे, सेवानिवृत्त महसूल उपाआयुक्त कुलकर्णी, सेवानिवृत्त अधिकारी धर्मेंद्र मुल्हेरकर, डॉ. गुंजाळ, सुरेश पवार, रवींद्र मालुंजकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800