१. संक्रांत
बदलली दिशा सूर्याने उत्तरायण सुरू केले
संक्रमण धनु राशीतून ते मकरेत झालेले
काळ उबेचा सुरू होतसे थंडी तीळ तीळ कमी
मकर संक्रांति सण भारत खंडाचा कृषी नामी
टिकून रहावा स्नेह गोडवा वर्तनात कायम
नातेबंध मैत्रीचे मानवी जीवनात ते अहम
वरवरचे नको गोड बोलणे पोटात वेगळे
स्निग्ध भाव असावा तिळगुळात प्रेमच सगळे
संक्रमण व्हावे विचारांचे नको धर्माचा विद्वेष
विषबीजे पेरणारे ओळखावे संक्रांत संदेश
- — रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर. पुणे
२. गोड गोड बोलू …
गुळाचा गोडवा
तिळाची स्निग्धता
चेहऱ्यावर असो
कायमची मुग्धता
आनंदाने आपण
मन आपले खोलू
तीळ गूळ घेऊ अन्
गोड गोड बोलू
नको कुणाचा द्वेष
नको कुणाचा हेवा
माणुसकी बाणवू
तोच अमूल्य ठेवा
बंधुभाव शिकवते
ही मकर संक्रांती
गोड बोलाने आणते
सुख समृद्धी शांती
आपण पाळू आपली
पुरातन परंपरा
विश्वचि आपले घर
करू सुंदर वसुंधरा
आपण वाटू सर्वांना
तीळ गुळाचे वाण
अंतर्मनाच्या गाभाऱ्यात
सद्गुणांची खाण
मनामनांना जोडू या
साजरा करू सण
चांगले वागू सर्वांशी
करू आपण प्रण
— रचना : प्रा. मोहन काळे. अकोला
३. तिळगुळाचा गोडवा
आला आला संक्रांतीचा सण
मन जाहले बाई पावन
बाळ जन्मले सोनुले छान
तिळ रेवडी बोराचे स्नान
बहरे हृदयी उपवन ||१||
भोगी दिनी तिळ नी भाकरं
प्रसादाला सेवती लेकरं
नाना विध भाजींचे सेवन ||२||
हळदी कुंकू घालती घाट
गळा भेटीचा आगळा थाट
एकमेका सौभाग्याचे वाण ||३||
नववधू दागिन्यांनी मढवावी
काळे वस्त्र संक्रांती नेसावी
ओटीत बोरं शेंगाचा वाण ||४||
सूर्याभोवती प्रदक्षिणा
सरे तीनशे पासष्ट दिना
ऋतू अक्ष कलता गगना ||५||
पितामह भीष्म मोक्षप्राप्ती
उत्तरायणा मृत्यू ख्याती
नर नारी वसे पारायणा ||६||
–– रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
४. तीळगूळ
तीळ आणि गूळ
घट्ट लाडू वळले
जसे गोड लागले
तसे नातेबंध जुळले
साखरेच्या पाकात
तीळ घोळावे
तीळ गुळाच्या मिश्रणासम
गोड गोड बोलावे
संक्रांतीच्या सणाला
पतंग उडती आकाशी
तिळगूळ घ्या गोड बोला
स्नेहदोर बांधू ह्रदयाशी
देते तुम्हाला
संक्रांतीच्या शुभेच्छा
कुणाच्याही मनी
नको कडवट इच्छा
— रचना : अरूणा मुल्हेरकर. अमेरिका
५. मकर संक्रांत
मकरसंक्रांतीचा सूर्य उधळो
आपुल्या जीवनी सोनकिरणे सौख्याची
हीच शुभेच्छा आजच्या शुभ दिनाची
शब्दांच्या स्नेहातून माझ्या
लाभो आपणा गोडी तीळगुळाची
शब्द प्रेमाचे राहोत
सदैव आपुल्या ओठावर
अमृत वात्सल्याचे जिव्हाळ्याचे
बरसो प्रभूकृपेने सकलांवर
अहंपणाचे काटे, क्रोधाग्नीचे चटके
करिती जीवन उध्वस्त
ध्येयाच्या चेतनारुपी प्रकाशाने
उजळत राहू अव्याहत
कोणाचं काय चुकतं यापेक्षा
करुया आत्म परीक्षण
कळावे आपुले आपल्याला
उत्तरायण दक्षिणायन
मजेचा आनंदाचा पतंग
आपुलकीच्या धाग्याने उडवू
स्वतःच्या मस्तीत मात्र उगा
नका कुणाला पायदळी तुडवू
इवलासा काजवा अंधारात
देतो आपल्या परीने प्रकाश
काय दिलं किती दिलं नको काथ्याकूट
अंतरीच्या भावसुमनांचा देऊ रे सुवास
ह्रदयास आपुल्या बनवू
मंदिर मांगल्याचे पावित्र्याचे
लाभेल वरदान हमखास देवाचे
दीप होऊनी गीत गाऊ प्रकाशाचे
आपणा सर्वांना मकरसंक्रांतीच्या
खूप खूप शुभेच्छा
–– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई
६. कर संक्रांतीची….
हे कर ते कर
काहीही कर
पण चांगले कर
विचारातील कचरा
दूर कर
मनाची स्वच्छता कर
प्रेम कर प्रेम कर
दुश्मनाला जवळ कर
आईबापाची सेवा कर
सर्व नाती गोड कर
चराचराला प्रगत कर
ज्ञान सारे अवगत कर
तुला हवे तर खुर्ची घे
पण जनतेचे भले कर
इथे तिथे लावतो कर
त्याच्या आधी भले कर
देशाला जगाच्या पुढे कर
लाज धर — भले कर
तुझेही भले हो
पण भले कर
बाबा भले कर
— रचना : यशवंत पगारे. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800