Saturday, July 27, 2024
Homeलेखमतदान : ४ चुटकुले

मतदान : ४ चुटकुले

१) मोफत टॅक्सी !

‘चला आता सिनेमा पाहू..’ असे पुटपुटत दादासाहेबांनी कुपनवरील टॉकीजचे नाव पाहिले. ऑटोने जावे का टॅक्सीने जावे हा विचार मनात येताच त्यांना नाष्टा करीत असताना आलेल्या एका संदेशाची आठवण झाली. तसे ते मनाशी म्हणाले, ‘आज तो टॅक्सीवाले मेहरबान है। कहते है, तर्जनीपर की स्याही दिखाव और शहर मे कही भी पचास रुपये देकर घुमो। अरे, वा ! काय मस्त ऑफर आहे।…’ असे म्हणत दादासाहेबांनी समोरून येणाऱ्या एका टॅक्सीला हात दाखवला. आरामात बसून ते म्हणाले,
“रिगल सिनेमा चलो” तसा चालकाने गिअर टाकला. काही वेळात रिगल सिनेमासमोर त्यांची टॅक्सी पोहोचली. अगोदरच काढून ठेवलेली पन्नासची नोट चालकाकडे देत असताना तो म्हणाला, “ए काहे दे रहे हो, बबुआ ! आप का तो तीन सौ पचास बनता है।”
“क्यों ? आज पचास रुपया देकर कही भी घुमो ऐसा संदेश मोबाइलपर…”
“जर हम भी तो देखे…” तो चालक म्हणत असताना दादांनी तो संदेश दाखवला. तो संदेश वाचून तो म्हणाला, “आप को ऐसी गाडी मे जाना चाहिए था।”
“ऐसी बोले तो…”
“यह संदेशा भेजनेवाली हमारी संघटना नहीं है। यह अलग टॅक्सी संघटना है, जो पचास रुपिया लेकर धंदा कर रही है। बाकी कुछ संघटनाओंकी अभी बहस चल रही है कि, छुट देवें या न दे। आखिर उन्होने यह सवाल अपनी अपनी हायकमांडपर छोड रखा है। जब वहाँ से कोई…”
“और आप कि कौन सी संघटना है भाई?” दादांनी विचारले.
“हमारा तो ‘परदेसी टैक्सी’ संघटन है।’ इसलिए हम यह छुट-बुट के झमेले मे नही पडते। इसलिए आप को पूरे साडे तीन सौ देना…”
“यह तो अन्याय है…” असे म्हणत दादासाहेबांनी तणतणत साडेतीनशे रुपये दिले आणि नाराज होत ते टॉकीजकडे निघाले….

) फुकटात सिनेमाची

टॉकीजच्या परिसरात शिरताच दादासाहेबांनी तिकीट फाडणाऱ्या पोराजवळ जाऊन विचारले,
“अरे भाऊ, मी मतदान केले आहे. ही पहा शाई! मी फ्रीमध्ये सिनेमा पाहू शकतो का ?”
“काका, तिथे खिडकीवर जाऊन हे कुपन दाखवून त्यावर सिट नंबर लिहून आणा…”
दादासाहेब तत्काळ तिकीट विक्री खिडकीपाशी गेले. त्यांनी ते कुपन आतल्या मुलीजवळ देताच तिने मंजूळ आवाजात विचारले, “काका, तर्जनी दाखवा आणि फोटो आय.डी. दाखवा ना…”
“ही तर्जनी, ही शाई आणि हे मतदान कार्ड…” असे म्हणत त्यांनी ते कार्ड मुलाजवळ दिले. त्यावरचा क्रमांक संगणकावर नोंदवून त्या मुलाने कुपनवर एक क्रमांक टाकला. ते कुपन घेऊन पुन्हा त्या मुलाकडे जाऊन कुपन त्याला देताच तो म्हणाला,
“तर्जनी दाखवा…”
“अरे बाबा, आत्ताच त्या मुलीला दाखवली आहे. ही बघ…” असे म्हणत दादासाहेबांनी तर्जनी मुलाला दाखवून म्हणाले,
“का रे भाऊ समाधान झाले ना ?”
“कसे आहे, अंकल ! परवाच एका मोठ्या नेत्याने सांगितले आहे की, शहरात मतदान करा, शाई पुसून टाका आणि गावी जाऊन पुन्हा वोटींग करा। म्हणून मालकाने सांगितले आहे की, आत सोडताना बोटाला शाई आहे की नाही ते पहा…” असे म्हणत त्यांच्या तर्जनीवरील शाई पक्की आहे ना अशी खात्री करून घेत त्या मुलाने त्यांना आत सोडले. तोपर्यंत सिनेमा सुरू झाला होता.
धडपडत, ठेचाळत दादासाहेब खुर्चीवर जाऊन बसले. पडद्यावर बघताच ते दचकले. पडद्यावर एक इंग्रजी सिनेमा सुरू होता. अतिशय उत्तेजक, बिनधास्त दृश्य चालू होते. आयुष्यात दादासाहेबांनी तसा सिनेमा कधीच पाहिला नव्हता. दादासाहेबांना समोर पाहवेना, करमेना पण इलाज नव्हता. एका वेगळ्याच अवस्थेत ते डोळे लावून बसून राहिले. किती वेळ गेला ते त्यांना समजले नाही पण मध्यंतर झाले आणि आनंदाच्या भरात दादा लगबगीने टॉकीजच्या बाहेर पडले. सिनेमा अर्धवट सोडून…

३) वापसीचे मीटर…

दुपारचे दोन वाजत होते. त्यांनी खिशातील उरलेले एकमेव कुपन काढले. त्यातील एका पंचतारांकित हॉटेलचे कुपन पाहून दादासाहेब आनंदाने पुटपुटले, ‘जय हो, लोकशाही ! हमेशा लगाव मतदान कि स्याही ! चलो. जिंदगी मे पहली बार फाईव्ह स्टार होटल मे खाना खाने का मोका मिला है। दोनों हाथों से खाऐंगे…’ असे पुटपुटत त्यांनी हात दाखवून एक ऑटो थांबवला. ऑटो थांबताच त्यांनी त्या चालकास हॉटेलचे नाव सांगितले. तसे त्याने विचारले,
“काय काका, शाई दाखवा, पोटभर खावा, असे आहे का ?”
“होय ! पण तू कसे ओळखले ?”
“मी तिकडेच चाललो आहे… जेवायला !…” असे म्हणत त्याने तर्जनीसह शाई दाखवली.
“तुम्ही मतदान केले. अभिनंदन! कुणाला केले मतदान ?”
“जिसने ज्यादा माल दिया… उसी को !”
“म्हणजे तुम्ही मत विकले ?” दादांनी विचारले.
“काका, गेला तो जमाना. आता कोण धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहे ? पाच वर्षांनंतर लोकशाही नामक गंगेला पूर येतो. गंगा दारी येते. हात धुऊन घ्यावे झाले.”
“ते जाऊ देत. पण तुमचे भाडे… नाहीतर सकाळी झाले तसे होऊ नये.” असे म्हणत त्यांनी सकाळीची सारी कथा ऐकवली.
“जाऊ द्या ना काका, त्याचेही खरे होते. आपण लोकशाही नामक एकाच नावेचे प्रवासी आहोत. लोकशाही महोत्सवाचा प्रसाद घेण्यासाठी एकाच हॉटेलमध्ये जात आहोत. तेव्हा ताटात पडले काय नि वाटीत पडले काय.. एकच…” असे म्हणत त्याने हसतच ऑटो दामटला…

४) लोकशाही थाली !

पंधरा-वीस मिनिटानंतर दादासाहेबांना घेऊन ऑटो त्या भव्य, सुशोभित हॉटेलमध्ये पोहोचला. आत शिरताना सुरक्षारक्षकाने मारलेल्या सॅल्यूटमुळे गहिवरलेल्या दादांनी त्याच्याशी हस्तांदोलन केले. आत शिरताच एका सुस्वरूप आणि साडी परिधान केलेल्या युवतीने दोन्ही हात जोडून त्यांचे स्वागत करून विचारले, “मामा, मतदान केले का ?”
“हो. केले की. हे पहा…” असे म्हणत दादासाहेबांनी तर्जनी पुढे करताना त्यांच्या मनात आले, ‘ही मुलगी मामा म्हणतेय, फुकटात म्हणून दामदुप्पट पैसे वसूल करून ‘मामा’ तर बनवणार नाही ना ?”
“अभिनंदन ! मामा, आपण आपले बहुमोल कर्तव्य पार पाडले आहे त्यामुळे आपणास आज आमच्याकडून स्पेशल ‘लोकशाही थाली’ एकदम फ्री ! या…” ती सौंदर्यवती म्हणाली.
“मामा, तुम्ही शाकाहारी का ?” ऑटोचालकाने विचारले.
“तर मग, शंभर टक्के शाकाहारी.”
“ठीक आहे. मी जरा तांबड्या रश्श्यावर हात मारतो…” असे म्हणत ऑटोचालक दुसऱ्या दालनात निघून गेला. दादासाहेब जवळच्या एका खुर्चीवर बसले. एक वेटर अत्यंत अदबीने त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,
“सर, आमची ‘लोकशाही थाली’ आणू का ? स्पेशल आहे.”
“असे म्हणतोस तर आण. नाही तरी आज लोकशाहीचा महोत्सव आहे तर मग प्रसाद म्हणून ‘लोकशाही’ थाली घेऊया!” दादासाहेब म्हणाले. थाली येईपर्यंत सूप, मसाला पापड यांची रेलचेल झाली. त्यानेच पोट भरले.

सुमारे एक तासानंतर भरपेट जेवलेले दादासाहेब खुर्चीवरून उठले तितक्यात त्यांना काही तरी आठवले. त्यांनी जेवण आणून देणाऱ्या मुलाला जवळ बोलावले आणि त्याला म्हणाले,
“अरे, आज बील तर नाही पण ही तुला बक्षिसी ठेव…” असे म्हणत तो मुलगा नाही म्हणत असतानाही वीस रुपयाची नोट त्याच्या खिशात टाकत दादासाहेब हॉटेलमधून बाहेर पडले…

नागेश शेवाळकर.

— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments