“माध्यम भूषण” या माझ्या लवकरच प्रसिद्ध होणार असलेल्या पुस्तकातील जेष्ठ पत्रकार मधू कांबळे यांच्या वर लिहिलेली यश कथा पुढे देत आहे. मधू कांबळे यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा….
वडील गवंडी काम करायचे तर आई मजुरी करायची. अशा आईवडिलांच्या पोटी सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील हरोली या गावी १ जून १९६१ रोजी जन्मलेला, गावीच सातवी पर्यंत, तर पुढचे आठवी, नववी अशी दोन वर्षे गव्हाण या गावी आणि त्या पुढील बारावी पर्यंतचे शिक्षण सांगली येथे समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहून घेतलेला एक तरुण पुढील शिक्षणासाठी मुंबईत येतो, युवा चळवळीत सक्रीय भाग घेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वडाळा येथील सिद्धार्थ हॉस्टेल मध्ये राहून फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज मधून बी ए (राज्यशास्त्र) ही पदवी मिळवितो आणि पुढे सकाळ, लोकसत्ता या सारख्या प्रथितयश वृत्तपत्रात सामाजिक बांधिलकीतून पूर्ण वेळ यशस्वीरीत्या, पत्रकारिता करतो अशी ही एखाद्या चित्रपटाला शोभेलशी सत्य कथा आहे, जेष्ठ पत्रकार मधू कांबळे यांची.
मधु कांबळे यांच्या घरची परिस्थिती किती बिकट होती, हे सुरुवातीला लिहिलेच आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईतील मोहमयी दुनियेत न फसता ते फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन युवक चळवळीत सक्रीय काम करू लागले. इतकेच नाही तर त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या प्रज्ञा, शील, करुणा या तत्वांची आद्याक्षरे घेऊन “प्र शी का” ही विद्यार्थी संघटना स्थापन करून या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलने हाती घेतली.
याच दरम्यान मधु कांबळे यांना वाचनाची आवड लागली. एकीकडे चळवळीत भाग आणि दुसरीकडे वाचनाची आवड यातून ते पत्रकारितेकडे ओढल्या गेले. पत्रकारितेची आवड ओळखून त्यांनी रीतसर शिक्षण मिळावे यासाठी सिद्धार्थ कॉलेज मध्ये पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पण आर्थिक परिस्थितीमुळे हा अभ्यासक्रम तसेच एम ए भाग १ झाल्यानंतर भाग २ ते पूर्ण करू शकले नाही, याची त्यांना आजही खंत वाटते.
मधु कांबळे यांनी, त्याकाळी फार लोकप्रिय असलेल्या “श्री” साप्ताहिकातून १९८९/९० साली प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून आपली पत्रकारिता सुरू केली. पुढे साप्ताहिक चित्रलेखा आणि दैनिक सकाळ मधून ते लिहू लागले. त्यांची तळपती लेखणी पाहून त्यांना दैनिक सकाळ मध्ये वार्ताहर कम उपसंपादक म्हणून १ जुलै १९९१ पासून कायम स्वरुपी नोकरीत सामावून घेण्यात आले. सकाळ मध्ये ते तब्बल २० वर्षे होते. त्यानंतर अधिक चांगली संधी चालून आल्याने ते सकाळ मधून २०११ साली दैनिक लोकसत्ता मध्ये आले. लोकसत्तात १३ वर्षे पत्रकारिता करून ते १ जून २०२४ रोजी पूर्णवेळ पत्रकारितेतून निवृत्त झाले.

खरं म्हणजे, इतक्या बिकट परिस्थितीत जन्म, शिक्षण, भोगाव्या लागलेल्या हाल, अपेष्टा यामुळे एखादी व्यक्ती सतत कडवट वागत बोलत राहिली तरी त्या व्यक्तीला कुणी दोष देणार नाही आणि देऊ सुद्धा नाही. पण भले कामानिमित्तानेच जरी आमचा मंत्रालयात संबंध येत राहिला तरी त्यांच्या वागण्याबोलण्यात कटुता, व्यवस्थेला, विशिष्ट वर्ग आणि व्यक्तींना दोष देणे असे कधी चुकूनही झाले नाही. इतकेच काय आधी सकाळ मध्ये आणि नंतर लोकसत्ता अशा मराठीतील दोन मोठ्या वृत्तपत्रांमध्ये पत्रकार असूनही त्यांच्या वागण्याबोलण्यात कधी ऐट आली नाही की, कधी त्यांनी या गोष्टींचा अहंकार त्यांना शिवू दिला नाही. पण त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व दिसून यायचे ते त्यांच्या पत्रकारितेतून. त्यामुळे त्यांच्या विषयी प्रत्येकाला आदर वाटत आला आहे.
मधू कांबळे यांनी दैनंदिन पत्रकारिता सांभाळून सामाजिक जाणिवेतून लिहिलेल्या लेखमाला या तर त्यांच्या पत्रकारितेचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.
या सर्व लेखमाला, बातम्यांनी त्या त्या वेळी व्यवस्थेला खडबडून जागे करण्याचे काम केले आहे. व्यवस्थेत प्रत्यक्ष बदल घडवून आणला आहे, हे त्यांच्या पत्रकारितेचे मोठेच यश आहे. त्यांनी प्रामुख्याने राजकीय, सामाजिक, कष्टकरी वर्गाचे प्रश्न आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून हाताळले. त्यांच्या काही गाजलेल्या लेखमाला, वृत्तांत पुढील प्रमाणे आहेत…..
१) दै. सकाऴमधून १९९१ मध्ये मुंबईतील संक्रमण शिबिरात राहणाऱया रहिवाशांच्या व्यथा मांडणारी ‘नको जिणे संक्रमण शिबिरातले’, ही वृत्तमालिका.
२) राज्य सरकारने १९८१ मध्ये खासगी सुरक्षा रक्षकांना संरक्षण देणारा कायदा केला परंतु त्याची नीट अंमलबजावणी होत नसल्याने सुरक्षा रक्षकांची व्यथा मांडणारी वृत्तमालिका प्रसिद्ध. शासनाकडून या वृत्त मालिकेची दखल घेण्यात आली.
३) १९९६-९७ च्या दरम्यान जव्हार, मोखाडा या आदिवासी भागात साथीच्या रोगाने थैमान घातले होते. त्या भागाचा दौरा करुन आरोग्य सुविधांची वानवा, आदिवासी समाजाची गरिबी, अंधश्रद्धा असंवेदनशील शासकीय यंत्रणा यावर प्रकाश टाकणारी वृत्तमालिका दैनिक सकाळमध्ये प्रकाशित.
४) महाराष्ट्र शासनाच्या कंत्राटदार धार्जिण्या टोल धोरणाची समिक्षा करणारी वृत्तमालिका दैनिक लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध. माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन राज्यभरातून प्रत्यक्ष पथकर वसुलीचा कालावधी व त्याआधीच कंत्राटदारांची वसूल झालेली रक्कम किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम वसुल झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शासनाने या वृत्तमालेची दखल घेऊन काही प्रमाणात टोल धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला.
५) महाराष्ट्रातील एका सधन जिल्ह्यातील मूकबधीर मुलीवर अत्याचार प्रकरणात प्रशासनातील अधिकाऱ्यांचा बातमीद्वारे पर्दाफाश. तत्कालीन मुख्यंत्र्यांकडून बातमीची दखल. शासनाकडून मुलीच्या बाजुने विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात आली. पुढे त्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली.
६) राज्यात कंत्राटदारांकडून आदिवासी महिलांच्या शोषणाला वाचा फोडणाऱ्या बातमीची राज्य शासनाने दखल घेऊन पोलीस अधिक्षकांकडे चौकशी सोपविली. चौकशी अहवाल शासनाला सादर झाला.
७) २०१३ मध्ये सामाजिक आरक्षणाशिवाय खासगी विद्यापीठ विधेयक घाईत विधिमंडळात मंजूर करुन घेण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तर लेख लिहिला. २००४ मध्ये केवळ कायद्याने मान्यता दिलेल्या शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण लागू राहील, अशी तरतूद आहे. त्याच कायद्याला छेद देणारा विधिमंडळात आरक्षण नाकारणारा दुसरा कायदा करण्यात आला. एकाच विधी मंडळात आरक्षण देणारे व आरक्षण नाकारणारे असे पस्परविरोधी कायदे कसे काय मंजूर होऊ शकतात ? यावर लिहिलेल्या वृत्तांताची दखल थेट राज्यपालांनी राज्य शासनाला आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याबाबत विचारणा केली. त्यावर शासनाला समर्पक खुलासा करता आला नाही. शेवटी ज्या विधिमंडळाने खासगी विद्यापीठ कायदा मंजूर केला होता, त्याच विधिमंडळात सरकारने ते विधेयक मागे घेत असल्याचा प्रस्ताव मांडून मंजूर करुन घेतला. विधिमंडळाने मंजूर केलेला कायदा विधिमंडळातच मागे घेण्याची सरकारवर नामुष्की आली. विधिमंडळाच्या इतिहासातील कदाचित ही दुर्मिळ घटना असेल. त्याचा दुसरा परिणाम म्हणजे नंतर विधिमंडळात जे खासगी विद्यापीठ विधेयके मंजूर केली जातात त्यात सामाजिक आरक्षणाची तरतूद केली जाते, नव्हे ती बंधनकारक करण्यात आली.
८) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य शासन प्रकाशित करीत असते. परंतु अलीकडच्या काळात या अप्रकाशित साहित्याची छपाई अत्यंत संथगतीने होत होती. प्रचंड मागणी असूनही पुस्तके मिळत नव्हती. विशेष म्हणजे हे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी खरेदी केलेला चार कोटी रुपयांचा कागद धुळ खात पडला होता. त्यावर प्रकाश टाकणारी बातमी मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका म्हणून दाखल करुन घेतली आणि बाबासाहेबांच्या साहित्याच्या प्रकाशनाबद्दल जी दिरंगाई चालविली होती, त्याबद्दल शासनाची कानउघाडणी केली. त्यानंतर वेगाने पुस्तकांची छपाई सुरु झाली.
९) राज्य सरकारने २०१५-१६ दरम्यान राजद्रोह किंवा देशद्रोहाबद्दल गुन्हे दाखल करणे व अंतर्गत सुरक्षासंबंधी कायदा करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन भारतीय दंड संहितेतील (आयपीसी) कलम १२४ (ए) ची मोडतोड करुन, राजकारण्यांवर टीका केली तरी, देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार, असे परिपत्रक गृह विभागाने जारी केले. ते पत्रक पहिल्यांदा प्रकाशात आणून त्यावर बातमी प्रसिद्ध केल्याने एकच खळबळ उडाली. सर्व माध्यमांनी तो विषय उचलून धरला. शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहासंबंधीचे कलम परिपत्रकात रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. अंतर्गत सुरक्षा कायद्याचा मसुदा सरकारने जाहीर केला. त्यात राज्य घटनेने दिलेल्या संघटना स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावरच गदा आणली होती. त्यालाही वाचा फोटली. त्यानंतर तो विषयही नंतर इतर माध्यमांनी उचलून धरला. शेवटी तो प्रस्तावित कायदा व त्याचा मसुदा रद्द करण्यात आला.
१०) भारतीय समाजात सामाजिक तणाव आणि अस्वस्थता वाढविणाऱया आरक्षण, अॅट्रॉसिटी आणि जातीय अत्याचार या तीन प्रमुख समस्या आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षानंतरही आपण संविधानाला अभिप्रेत असलेल्या सामाजिक समतेपासुन फार दूर आहोत. त्यावर केलेला अभ्यास व चिंतनातून लोकसत्तामध्ये समाजमंथन नावाचे वर्षभर स्तंभ लेखन केले. आरक्षणाला पर्याय, अॅट्रॉसिटी कायद्याची व्याप्ती आणि जाती व्यवस्थेचे आधार नष्ट करणे, यावर चिंतनात्मक लेख लिहिले. पुढे या लेखांचा विस्तार करुन ‘समतेशी करार’ हे पुस्तक लिहिले.

मधु कांबळे यांना त्यांच्या गौरवशाली पत्रकारितेबद्दल आतापर्यंत पुढील पुरस्कार, मान सन्मान मिळाले आहेत.
१ ) सन २००० : मुंबई मराठी पत्रकार संघाचा कॉ.तु. कृ. सरमळकर स्मृती पुरस्कार.
२) सन २००९ : मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल तत्कालीन गृहमंत्री मा. आर. आर. पाटील यांच्याकडून सन्मान .
३) सन २०१३ : कॉ. नरेंद्र (नाना) मालुसरे चॅरिटेबल संस्थेचा ‘उत्कृष्ट पत्रकारिता दीपस्तंभ’ पुरस्कार
४) सन २०१६ : पुणे येथील जेष्ठ पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार
५) सन २०१९ : महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पत्रकारिता पुरस्कार.
६) सन २०२४ : ख्यातनाम पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एक आघाडीचे शिलेदार, समाजवादी चळवळीतील ध्येयवादी कार्यकर्ते दिवंगत श्री दिनू रणदिवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पारितोषिक समितीतर्फे १९ जुलै २०२४ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात प्रदान. रु. २५,००० रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पूर्वी राजकीय विश्लेषक, श्री प्रताप आसबे, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीमती ओल्गा टेलिस हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

चांगल्या पत्रकाराचे व्यावसायिक आयुष्य हे जितके मान सन्मानाचे असते तितकेच ते व्यक्तिगत जीवन, सुखदुःखाचे क्षण हिरावून घेणारे असते. दिवस असो, रात्र असो, शनिवार, रविवार असो, दसरा, दिवाळी असो की अन्य काही बरे वाईट प्रसंग असो प्रत्येक वेळा त्यांना घरच्यांसोबत, नातेवाईकांसोबत, स्नेही, मित्रमंडळी यांच्या सोबत सहभागी होता येईलच असे नसते. कित्येकदा पूर्व नियोजित कार्यक्रमसुद्धा रद्द करून स्वतःचे मन मारावे लागते आणि घरच्यांचा,इतरांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. बऱ्याचदा घरातील महत्वाच्या प्रसंगी वेळेत घरी पोहोचता येईल, याचीही शाश्वती नसते. त्यामुळे जोडीदार जर समजूतदार असला/ असली तरच पत्रकार व्यक्ती उमेदीने काम करू शकते. सुदैवाने सौ सुहासिनी वहिनींनी प्रत्येक अटीतटीच्या प्रसंगात मनापासून साथ दिल्यामुळेच, पूर्ण वेळ घर सांभाळल्यामुळेच मधुजी निश्चिंतपणे पत्रकारिता करू शकले. या दाम्पत्याची दोन्ही मुले उच्च शिक्षित आहे. थोरले चिरंजीव कनिष्क हे महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी विभागात सांख्यिकी अधिकारी, वर्ग १ म्हणून रुजू झाले होते. ते आता पदोन्नती मिळून उपसंचालक झाले आहेत. सुनबाई सौ स्वाती या आधी ॲक्सिस बँकेत होत्या. त्याही स्पर्धा परीक्षा देऊन आता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी आहेत. ही यश कथा लिहित असताना, सात वर्षांपूर्वी कनिष्क आणि स्वाती, यांच्या लग्नाला उपस्थित राहिल्याची मला आठवण झाली. सौरेनच्या रूपाने त्यांचा संसार छान फुलला आहे. तर धाकटे चिरंजीव सुसेन एमएससी झाले असून सध्या कायद्याचा अभ्यास करीत आहे.
असे हे मधू कांबळे, पत्रकारितेत असलेल्यांसाठी आणि येऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आदर्श आहेत.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
खूप खूप शुभेच्छा अभिनंदन 🌹 अशीच उंची वाढत राहिली याचा आम्हास आनंद व अभिमान वाटतो. डॉ पद्माकर तायडे, ठाणे