Saturday, October 5, 2024
Homeबातम्यामध्यमवर्गीयांची संवेदनशीलता पुनर्जीवित होणार कां ? - कुमार केतकर

मध्यमवर्गीयांची संवेदनशीलता पुनर्जीवित होणार कां ? – कुमार केतकर

आजचा मध्यमवर्गीय समाज मुलांच्या शिक्षणासाठी करीत असलेला खर्च, आपल्या मुलांनी परदेशात जाऊन तेथेच स्थिरस्थावर व्हावे अशी त्यांना पडत असलेली स्वप्ने आणि त्यासाठी त्यांचे खटाटोप, उतारवयात काही दिवस परदेशात मुलांकडे जावयास मिळते म्हणून त्यांचे होत असणारे संवाद, मुहूर्ताच्या दिवशी सोने खरेदीसाठी सराफाच्या दुकानात होणारी त्यांची झुंबड, या वर्गाकडून होणारी समभागांची खरेदी, अनेक दिवस चालणारे त्यांचे लग्न सोहळे, प्रत्येक प्रसंगाचे अवडंबर आणि श्रीमंती प्रदर्शन, मात्र सामाजिक समस्यांकडे दुर्लक्ष, हे सारे पाहता एकेकाळी समाजसुधारणांमध्ये अग्रेसर असणारा हा समाज आपली संवेदनशीलता हरवून तर बसलेला नाही ना ? असा प्रश्न पडतो. अशी खंत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केली. हुंडाविरोधी चळवळ, मुंबई या सामाजिक संस्थेच्या एकावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त लोकमान्य सेवा संघाच्या गोखले सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री कुमार केतकर पुढे म्हणाले, या सुशिक्षित मध्यमवर्गीय समाजाची संवेदनशीलता पुनर्जागृत झाल्यास, आपल्या कृतीने समाजमनावर दुष्परिणाम होणार नाहीत याची त्याने काळजी घेतल्यास, या मध्यम वर्गीय समाजाने वंचितांना आधार देण्याचे काम केल्यास हुंडा प्रथेसारख्या समाज विघातक रूढींना पायबंद बसेल. समाजसुधारक स्वातंत्र्य सैनिक मामासाहेब कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून कार्यरत असणारी ही संस्था पूज्य साने गुरुजींचे विचार सर्वदूर पोहोचवेल तसेच सानेगुरुजींची प्रेरणा आणि शिकवण कार्यकर्त्याना कायमच मार्गदर्शक राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हुंडाविरोधी चळवळीच्या माध्यमातून सुदृढ समाज घडविण्याचे कार्य पुढे होत रहावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

याच समारंभात “प्रथम” या संस्थेच्या माध्यमातून बाल हक्क तसेच वंचित, दिव्यांग आणि अल्पसंख्यांक मुलांच्या शिक्षण आणि सर्वांगीण प्रगतीवर लक्ष केंद्रित करून २५ वर्षे कार्य करणाऱ्या श्रीमती फरीदा लांबे यांना राधाबाई कुलकर्णी विधायक कार्यकर्ती जीवन गौरव पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित बालसाहित्यकार श्री एकनाथ आव्हाड यांना सानेगुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार श्री केतकरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

तसेच या प्रसंगी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत “भारतीय लोकशाहीचे संवर्धन कां व कसे ?” या विषयावरील सर्वोत्कृष्ठ निबंधाचे पारितोषिक व जगन्नाथ परळकर ट्रॉफी जळगाव च्या वीणा बाविस्कर यांना देण्यात आले.

स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रणेत्या शारदा साठे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी अनेक मान्यवर श्रोते तसेच स्पर्धेचे विजेते उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष एडव्होकेट जयप्रकाश सावंत यांनी प्रास्ताविक केले. महासचिव आशा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि संस्थेच्या कार्याचा आढावा देऊन अधिकाधिक विद्यार्थी-विद्यार्थिनीनी तसेच स्त्री-पुरुषांनी समाजप्रबोधनाच्या उपक्रमांमध्ये, जाणीव जागृतीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रा.डॉ.सुहासिनी आर्या यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यात माणिकताई बोंद्रे, डॉ. रश्मी फडणवीस, सुजाता नरसाळे, अलका परळकर, वैशाली जोशी, पौलोमी ओंक यांनी सहकार्य केले.

— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. विचारांना प्रवृत्त करणारी बातमी आणि आचाराला प्रवृत्ती करणारा कार्यक्रम…

    कुमारजी केतकर, ॲड . जयप्रकाशजी सावंत, आशाताई कुलकर्णी, एकनाथजी आव्हाड, फरीदाताई लांबे , वीणाताई बाविस्कर शारदाताई साठे, डॉ. सुहासिनीताई आर्या तसेच माणिकताई बोंद्रे, डॉ. रश्मीताई, फडणवीस, पौलोमीताई ओंक, सुजाताताई नरसाळे, अलकाताई परळकर, वैशालीताई जोशी आणि सर्व संबंधितांना मनःपूर्वक धन्यवाद…!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९