प्रत्येक क्षणी आपल्या मनासारखे घडावे यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. काही वेळा, काही जण तर काहीच प्रयत्न ही न करता, मनाप्रमाणे घडण्याची आस धरून बसतात. म्हणूनच कवी डाॅ. श्रीनिवास आठल्ये त्यांच्या कवितेतून प्रश्न विचारतात की,
मनाजोगते काय होते जगात ?
तर वाचू या ही त्यांची कविता.
अल्प परिचय : डाॅ. श्रीनिवास आठल्ये यांचा जन्म १५ जुलै १९६६ रोजी झाला. त्यांचे शिक्षण एम ए, एम लिब, सेट, पीएच डी इतके झाले आहे. ते सध्या स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय, डोंबिवली (पूर्व) येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. ते विविध मासिके, नियतकालिकांतून लेखन करीत असतात. त्यांची “सत्यभामा” ही कादंबरी, आठ कथा, गरजवंती हा कथासंग्रह, सैलावलेलं आत्मभान हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. वाचन, लेखन, गायन या त्यांच्या आवडी आहेत. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
मिळे चालताना उन्हाचीच साथ
नसे ज्या कमाई तया नित्य लाथ
कुठे सर्व होती तरू पल्लवीत ?
मनाजोगते काय होते जगात ? ।।1।।
भुकेल्या जिवाची रिकामीच झोळी
कुणा भोजनान्ती पुन्हा तूप-पोळी
सदा हात राही रिकाम्या खिशात
मनाजोगते काय होते जगात ? ।।2।।
कुठे वेदनाधीश मृत्यूस याची
अती जीवनाची कुणा खंत त्यांनी जाची
मऊशार गाद्या; नसे झोप शांत
मनाजोगते काय होते जगात ? ।।3।।
करावे कुणाचे भले; काय त्याला ?
मधू बोलताही शिव्या आपणाला
हिताची शिरेना कथा मस्तकात
मनाजोगते काय होतं जगात ? ।।4।।
दुजाच्या यशाला कशाला भुलावे ?
अरे, कर्म आशाविना आचरावे
तया गोड माना पडे जे पुढ्यात
मनाजोगते काय होते जगात ? ।।5।।
— रचना : डाॅ. श्रीनिवास आठल्ये. डोंबिवली.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
“मना जोगते काय होते जगात” छान रचना ,