नमस्कार वाचक हो….
आज सकाळसकाळीच एका समुहात एक संदेश पाहिला . ‘आज मराठी दिवस आहे. आज मराठीत बोलूया ‘.. हे वाचून काळजात चर्र झाले.. जिथे बोलणारे मराठी आणि ऐकणारेही मराठी त्यांनाच मराठीचे वावडे.. मराठी मातीत जन्मलेल्या, मराठी मातीत वाढलेल्या मराठमोळ्या व्यक्तींना मराठी नको झाली आहे. आपल्याच भाषेला मान देण्यासाठी काय कमीपणा वाटतो काय माहित. कदाचित इतरांची भाषा बोलल्यामुळे मोठेपणा मिळतही असेल पण घरातील वडीलधाऱ्यांना जर परकीय भाषा येत नसेल तर त्यांच्याशी कसे संभाषण साधत असतील ??
इतर भाषा जरूर शिकावी, आदरही करावा पण त्यासाठी स्वतःच्या मातृभाषेला का टाळावे ?? महाराष्ट्राबाहेर पडल्यावर तिथल्या भाषेची गरज पडतेच .. त्यावेळेस पर्याय नसतो पण मराठी मातीत राहून मराठीशी सवती मत्सर योग्य नव्हे.
काय नाही हो मराठी भाषेत ? ओव्या, अभंग, भारूडाचा नाद, भजनातला छंद, पोवाड्यातील शौर्य, लावणीतील लावण्य, अंगाईतील वात्सल्य, शिवबाचा गनिमी कावा आणि अजून बरेच काही. हे सर्व मराठीतून सांगताना ऐकताना जो स्वानंद मिळतो, मान गौरवाने उंच होते, रक्त सळसळतं ते इतर भाषेतून शक्य नाही.
वळेल तसे वळणारी मराठी भाषा लवचिक आहे.. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून साद देणारी रांगडी आहे.. आऊसाहेबांचे कर्तृत्व दाखवणारी वंदनीय आहे. परंपरा वर्णणारी गोंडस आहे, प्रमुदित करणारी मोहिनी आहे.
इतकेच नव्हे तर.. पुरणपोळी सारखी गोड गोडुली, पिठलं भाकरीसारखी हवीहवीशी, ठेच्या सारखी ठसकेबाज तर भज्यासारखी चटपटीत, अळूवडी सारखी खमंग तर वरण भातासारखी साधी तरीही परिपूर्ण आहे, समृद्ध सुंदरी आहे, अमृताहूनही गोड आहे.
माय मराठी शब्दातीत आहे.
उमगले तर साज आहे.
मराठी मनाचा गाज आहे.
बाराखडीचा शृंगार आहे.
मनोहरमय मल्हार आहे.
— लेखन : सौ. मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800