Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यमराठी दिन : काही कविता

मराठी दिन : काही कविता

१. मराठी भाषा दिन

बोलूया मराठी, वाचूया मराठी |
रोज काही वाक्ये, लिहूया मराठी ||१||

गाऊया मराठी, नाचूया मराठी |
करू ज्ञानभाषा, आपुली मराठी ||२||

पुस्तके मराठी चित्रपट मराठी|
सर्व मिळूनि करूया, नाटके मराठी ||३||

सदनी मराठी दुकानी मराठी |
व्यवहारी भाषा, ठसवू मराठी ||४||

शाळा मराठी शिक्षक मराठी |
पाल्यास शिकवू मायबोली मराठी ||५||

बोलीभाषा मराठी, वेशभूषा मराठी |
गर्जू अभिमाने आम्ही माणसे मराठी ||६||

— रचना : प्रवीण देशमुख. कल्याण

२. 🙏🌹माय मराठी 🌹🙏

आज माझ्या मायबोलीची
उगवे रम्य पहाट
ज्ञान ज्योतीने उजळते
माय मराठी ललाट

तिच्या शब्दांच्या दागिन्यांचा
काय वर्णू थाट
गौरवगीत गावया तिचे
चला रे होऊ भाट

भाव फुलांची बाग फुलविते
अमृत ओठी लावते
ज्ञानेश्वरी अन् गाथेच्या रुपे
पालखीत मिरवते

अभंग ओवी पोवाडा गवळण
लावणीत थिरकते
जय भवानी जय शिवाजी
जयघोष गगनी नेते

संतांनी हिला भूषविले
साहित्यिकांनी नटविले
संस्काराचे सिंचन करूनी
जीवन आमुचे घडविले

लिहिता वाचता बोलता मराठी
मन आनंदले
माय मराठीने आमुचे
जीवन धन्य जाहले

— रचना : राजेंद्र वाणी. मुंबई

३. मायबोली मराठी

मला कुसुमाग्रज दिसले
अन् म्हणाले…
सांभाळा रे माझ्या मराठी भाषेला,

अमृत प्यायलेली माझी भाषा
तशी ती डगमगणारी नाही पण,
मारक तर आपलेच मराठी भाषिक आहोत,

आप आपसात आपण मराठी ऐवजी
हिंदी अथवा इंग्रजीत बोलतो,
हेच घातक आहे

पुढील पिढी घडवायची आहे,
आपल्यालाच आपली मराठी मातृभाषा
रुजवायची फूलवायची आहे,

इतर भाषिक पहा
जरी इतर भाषा शिकतील पण,
आपआपसात संवाद मात्र,
मातृभाषेत करतील
हेच सर्वात महत्त्वाचे आहे,

आपली भाषा
रुजविण्यासाठी फुलण्यासाठी
सर्वांची साथ हवी आहे,

माझे मराठी बांधव परदेशी राहिले
पण, मातृभाषेला कधीच
विसरले नाहीत, तर
मराठी भाषेला पुरस्कारीत करतायेत,

कारण आपली भाषांचं वैभवशाली आहे
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून
समृध्द अजरामर केलेली
अमृताते पैजा जिंकणारी
माझी मराठी भाषा
मायबोली मराठी

— रचना : शामराव सुतार. पनवेल.

४. गौरव मराठी भाषेचा

संपन्न शब्द अन् गोडवा भाषेचा
मनोरम भावार्थाची फुले उमलली
स्फुर्तीच्या सुगंधाने
मने समृद्ध झाली.

अनुभव सिद्ध आशयघन
साहित्याचा जन्म झाला
मराठी भाषेचा झेंडा
अटकेपार फडकला.

सोहळा जन्मदिनाचा,
थोर कविराजांचा
ज्ञानपीठ पुरस्काराचा
गौरव मायमराठीचा
अभिमान महाराष्ट्राचा.

शब्द सामर्थ्य नाद मधुरता
गाण्यातील गेयता
भजनातील तल्लीनता
हरपूनी भान वाढवूया शान
माय मराठी भाषा महान

काना मात्रा वेलांटी ची
भाषा गमती जमती ची
आकार उकार रफारा ची
महिरप मखमली ची
अनुस्वार विसर्गाने
नेटकी सजवली
माय मराठी लावण्यवती झाली

संस्कार मराठी
सांस्कृतिक वारसा मराठी
सन्मान मराठी
स्वाभिमान मराठी
आस ठेवुनी कास धरुया
जगवूया जनामनात
रुजवूया नसानसात.

अवीट गोडी मराठीची
अभंग ओवी संतांची
थोरी मोठी मायबोलीची
नित्य नव्या रुपाची
अवनत होई माथा
तीच तुकयाची गाथा

मराठी भाषा गौरव
दिनाच्या शुभेच्छा🌹

— रचना : मीरा जोशी.

५. आम्ही मुस्लिम मराठी
(अष्टाक्षरी)

आम्ही बोलतो मराठी
आम्ही लिहितो मराठी
आम्ही वाचतो मराठी
आम्ही मुस्लिम मराठी

आहे श्वासात मराठी
आहे ध्यासात मराठी
कार्य आमचे मराठी
आम्ही मुस्लिम मराठी

जन्म आमचा मराठी
राष्टृ आमचा मराठी
मित्र आमचा मराठी
आम्ही मुस्लिम मराठी

आम्ही उठतो मराठी
आम्ही बसतो मराठी
आम्ही चालतो मराठी
आम्ही मुस्लिम मराठी

आम्ही हसतो मराठी
आम्ही रडतो मराठी
आम्ही खेळतो मराठी
आम्ही मुस्लिम मराठा

सण करतो मराठी
रीत आमची मराठी
आहे शेजार मराठी
आम्ही मुस्लिम मराठी

आम्ही वागतो मराठी
शब्दा शब्दात मराठी
अंत रंगात मराठी
आम्ही मुस्लिम मराठी

चरा चरात मराठी
घरा घरात मराठी
मना मनात मराठी
आम्ही मुस्लिम मराठी

शान आमची मराठी
जान आमची मराठी
स्वप्न आमची मराठी
आम्ही मुस्लिम मराठी

— रचना : अनिसा सिकंदर शेख. दौंड

६. “माय मराठी”

माय मराठी भाषा उमदी उभरी उदार
सर्वांना घेई सांभाळून राखी आदर IIधृII

म्हाइंभट मुकुंदराज ज्ञानोबा होत ऐश्वर्य
आकलन कल्पना अभिव्यक्ती होत संस्कार
माय मराठी प्राचीन होत नित्य वापर II१II

श्री शिवछत्रपतींनी वापरली आग्रहानं
राजभाषा कोश घेतला सिद्ध करून
सर्वत्र कटाक्षाने केला मराठीचा वापर II२II

नामदेव एकनाथ तुकारामांचे योगदान
रामदासादी संतांनी केली अधिक समृद्ध
संत काव्याने केले अजरामर संस्कार II३II

मातृभाषेतून लेख काव्याला फुटतो अंकुर
अध्यात्म तत्त्वज्ञानाला मराठीतून येई बहर
अभिमानानं मराठीचा करू सदा वापर II४II

अमृताते पैजा जिंकु शकणारी आहे मधुर
विश्व कल्याणार्थ पसायदान मागणारी थोर
चौदा विद्या चौसष्ट कला विज्ञानाचे भांडार II५II

— रचना : अरुण गांगल. कर्जत-रायगड

आज मराठी गौरव दिन…
कशी आहे माझी मराठी ?……

७. मराठी..

माझी मायबोली !
म्हणून ती आपली….

शब्दांनी नटली !
म्हणून भावली…..

काव्यांत रंगली !
म्हणून आवडली….

सुरात गायली
म्हणून रंगली…!

लेखांत गुंफली !
म्हणून समजली….

कथेत गुंतली !
म्हणून रमली…

कादंबरीत घुसली !
म्हणून रेंगाळली….

विनोदानी हसली !
म्हणून बिलगली….

नवरसांत नहाली !
म्हणून समृध्द झाली…

अशी मराठी आपली
जिवाभावाची झाली !

— रचना : चित्रा मेहेंदळे.

८. माय मराठी

तू माझी माय
येते बोबड्या बोलातून
ठेच लागता, दुःख होता
धावून येते मनातून ||१||

संस्कृतीची शिदोरी देवून
होते कायमची साथीदार
तू सरस्वती होऊन बसतेस जिभेवर
जीवनातील सुख_दुःखाचा आधार |२||

आज तलवारी घेऊन तुझे मारेकरी
पर भाषेचा विजय घोषित करतात
पण परभाषा शिकताना
मायबोली देते अर्थ ||३||

तू आहेस रक्ताच्या थेंबाथेंबात
कधीतरी आम्ही नेभळे पडतो
म्हणून तुला दूर करतो
आता बोलींची गोधडी शिवतो ||४||

तुझ्या मायेची ऊब घेणार
आई, तुला अभिजातता देणार
आई, तुला अनंत ज्ञानपीठापर्यंत
आम्हीच नेणार आहोत ||५||

— रचना : अंजली सामंत. डहाणू

. काय सांगू ख्याती मराठीची

माझ्या मराठीची काय सांगू ख्याति
जीच्यासाठी अंथरली
साक्षात माऊलींनी,
ज्ञानेश्वरीची ती मखमली पायघडी

छत्तीस व्यंजनावरी,
चौदा स्वरांचा मुकूटमनी
समुद्र मंथनातुनी निघालेले चौदा रत्ने
जणू ती उदरात हिच्या विसविल्या
साहित्य सोनियाच्या खानी

जरी वळली वळवाल तशी ही
तरी मोडेन पण वाकणार नाही

भरजरी किनार असता नामा तुकोबावानी
का भूलणार नाही वाचणारा कोणी ?

अखंड, अबादित अस्मिता हिची
माझिया मराठीची दूरवर ख्याति

माझा मराठीची बोलू कौतुके‌‌ ‌
परि अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मिळवीन
असता माऊलीचा आशीष शिरी
नकोच चिंता मराठी संवर्धनाची

— रचना : आशा दळवी. फलटण

१०. माझ्या मराठीचं लेणं
(अष्टाक्षरी)

माझ्या मराठीचं लेणं
चकाकते लख्ख भारी
डंका जगात अवघ्या
मराठीची ही खुमारी ।।

गोड मधुर रसाळ
पैज अमृताते जिंके
भाषा लाघवी सुंदर
पैंजणाचे बोल फिके ।।

ज्ञानेश्वरी मराठीत
पाया सुंदर रचला
ओवी, अभंग भारूड
रंग लोभस शब्दाला ।।

अभिमान मराठीचा
साहित्यिक कलावंत
सेवा केली मराठीची
थोर कवी आणि संत ।।

मातृभाषा आपुलीच
मान तिला जगी ठेवू
वाढवूया कौतुकाने
सन्मानाने ती मिरवू ।।

— रचना : अरूणा दुद्दलवार.

११. आपली मराठी…

आपली मराठी…..
थोडी गंमतीशीर थोडी मजेशीर..
मनाला थोडी देत चीर…
ऐका ऐका माझी कथा

मी मराठी, देश विदेशात खूप फिरते..
अनेक परिषदेत, अनेक संमेलनात,
मी जागतिक पातळीवर जगते
मला आहे जगात मान
माझा होतो खास सन्मान

एकदा देशी विदेशी फिरताना..
घोळक्यातून सुंदर, शुद्ध, स्पष्ट,
उच्चाराचे शब्द भोवती घोळू लागले…
भावनांचे, आपुलकीचे, गोड जिव्हाळ्याचे,
सातासमुद्रापार मला मी ऐकू लागले
आनंदाने मी गोल गिरकी मारू लागले

मी संपन्न, मी समृद्ध, ..
मी खानदानी, मी मराठी
मी संस्काराची, मी संस्कृतीची,
मी प्रभावी, मी विकासाची,

धुंदीत, मस्तीत, फिरता फिरता ..
आले मी माझ्या देशी,
हात पाय पसरून सुखावले होते..
एवढ्यात शब्द कानी पडले
मराठीत इंग्रजी, का इंग्रजीत मराठी

नादंतेय फिरतेय मानाने मी विदेशी
अपमान गिळून बसते मी देशी
मी मराठी मी मराठी…

— रचना : सौ पौर्णिमा शेंडे.

— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८