- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे महत्त्वाचे असले तरी, मराठीवर अतोनात प्रेम करणा-यांनी राजमान्यतेच्या मागे लागण्याऐवजी मराठीला आपल्या वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक व्यासपीठांवरून अभिजात मानूनच लोकव्यवहारात तिचा अधिकाधिक वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष आणि इतिहास तज्ञ प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी नुकतेच पुणे येथे केले. ‘सृष्टी’ संस्था आयोजित ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा : वास्तव की मृगजळ’ या डॉ. किरण ठाकूर लिखित माहिती पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभाचा अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.
- डॉ दीक्षित पुढे म्हणाले की, सद्य राजकीय व्यवस्थेमध्ये राज्यातील आमदार, खासदार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे मोदी सरकारपुढे अभिजात भाषेच्या दर्जाची आपली मागणी करण्याची हिंमत दाखवेल अशी सूतराम शक्यता नाही. ग्रीक व रोमन भाषांनी कोणत्याही प्रकारच्या राजमान्यता शिवायही तेथील सर्वसामान्य जनतेने या भाषांना प्रमाण भाषा बनवली आणि त्याचा व्यापक स्तरावर वापर केल्यामुळेच अभिजात दर्जा प्राप्त झाला, त्याप्रमाणेच आपण आपल्या मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढवून प्रत्येक मराठी व्यक्तीने त्याचे रुपांतर लोकमान्यतेत केले पाहिजे असेही डॉ. दीक्षित यांनी शेवटी सांगितले.
या प्रसंगी डॉ. किरण ठाकूर यांनी, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी, प्रा. रंगनाथ पठारे यांच्या समितीच्या वतीने, मसुदा समितीचे समन्वयक दिवंगत डॉ. हरी नरके यांनी केलेल्या कार्यामुळे भारावून जाऊन, त्यांना त्यांच्या आवडत्या कामातून श्रद्धांजली वाहण्यासाठी ही पुस्तिका तयार केली, या शब्दात आपली भावना व्यक्त केली.
अरूणा तिवारी यांनी प्रा. रंगनाथ पठारे यांनी अलीकडे प्रसृत केलेले निवेदन वाचून दाखवले, तर अभिनेत्री तथा
दिवंगत डॉ. हरी नरके यांची कन्या प्रमिती यांनी, दिवंगत डॉ. हरी नरके यांच्या ब्लॉगवरील मागच्या वर्षी लिहिलेला लेख अतिशय प्रभावीपणे सादर केला.
डॉ. रूपाली शिंदे यांनी, मराठी भाषा ही तिच्या लिखित वा ग्रंथोबद्ध स्वरूपामुळे टिकली नसून, ती सर्वसामान्यांनी वर्षानुवर्षे रोजच्या व्यवहारात वापरल्यामुळे टिकली असून, त्यामध्ये अनेक झरे व पाझर मिसळल्यामुळे ती अधिक समृद्ध झाल्याचा मुद्दा अधोरेखित करून, मराठीच्या ज्या अनेक बोलीभाषा आहेत त्यांचे महत्त्व जाणून त्यांचा अभिजात भाषेच्या संकल्पनेत आवर्जून विचार केला पाहिजे, असे आग्रही मत मांडले.
श्री. अभय कुलकर्णी यांनी एकुणच पत्रकारितेच्या क्षेत्राने मराठी भाषेच्या भवितव्याचे निराशाजनक चित्र रेखाटल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे प्रतिपादन करून, भाषा व साहित्याचा विचार करताना, लोकांना काय वाचायला आवडेल याचा शोध घेणे गरजेचे असून, त्यादृष्टीने नव्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्यास, वाचकसंख्या वाढू शकते, याचे काही अनुभव मांडले.
संजय नहार यांनी, मराठीला अभिजात भाषा मिळवून द्यायचा असेल तर मराठी भाषिकांना रस्त्यावर उतरून स्वतःची ताकद दाखवून द्यावी लागेल, कारण हा प्रश्न केवळ तांत्रिक नसून, राजकीय असल्याने मराठी भाषेच्या मागे सर्व समाजघटकांची एकत्रित लोकशक्ती उभारूनच तो सोडवावा लागेल, असे स्पष्ट मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी, सचिन नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक करताना, ‘सृष्टी’ संस्थेच्या मागील ३२ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला.
प्रशांत कोठडिया यांनी स्रूत्रसंचालन करताना, ‘सृष्टी’ संस्थेने प्रकाशित केलेली वरील माहिती पुस्तिका राज्यभरातील भाषा व साहित्याविषयक संस्थांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे जाहीर केले.
शेखर केंदळे यांनी आभार मानले आणि पसायदान सादर केले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी भाषेच्या विभाग प्रमुख डॉ. रूपाली शिंदे, ‘मीडिया नेक्स्ट’ चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अभय कुलकर्णी, युवा अभिनेत्री प्रमिती संगीता हरी नरके, ‘सृष्टी’चे संस्थापक प्रशांत कोठडिया व अध्यक्ष सचिन नाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास अभ्यासक संजय सोनवणी, प्रसिद्ध कवी व साहित्यिक गणेश विसपुते, ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, अक्षरनंदन शाळेच्या संस्थापिका विद्या पटवर्धन, ‘पुण्यभूषण’ संस्थेचे डॉ. सतीश देसाई व काका धर्मावत आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. राजा दीक्षित आणि सर्व पाहुण्यांच्या हस्ते या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन संपन्न झाले
.– टीम एन एस टी. ☎️ 9869484800