Saturday, April 13, 2024
Homeबातम्यामराठी विद्यापीठ जूनपासून सुरु

मराठी विद्यापीठ जूनपासून सुरु

अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूर येथे येत्या जूनपासून सुरु होणाऱ्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज रिध्दपूर येथे दिले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी आज रिध्दपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य कवीश्वर कुलाचार्य महंत श्रीकारंजेकर बाबा, श्रीगोविंद्रप्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत श्री वाईंदेशकर बाबा, मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, तहसीलदार नरेश आकनुरी, गोविंद गुरुकुल आश्रम शाळेचे सचिव सुभाष पावडे, मुख्याध्यापक संजय कोहळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा थीम पार्कची पाहणी करताना श्री. पाटील म्हणाले की, येत्या जून २०२४ पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्यात येईल. त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने अभ्यासक्रम, कुलगुरुंची निवड, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोई-सुविधा तसेच आवश्यक बाबींची पुर्तता लवकरात लवकर करण्यात यावी. या विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी विशेष कॅम्पेन आयोजित करण्यात यावे. विद्यार्थी निवडीचे निकष, अभ्यासक्रम आदींबाबत लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना दिले. मी स्वतः या विद्यापीठाचा पहिला विद्यार्थी राहील, असा मानस व्यक्त केला. येथील म्हाइंभट सभागृह, ज्ञानकेंद्र, भक्तनिवारा आदींची पाहणीही श्री. पाटील यांनी यावेळी केली.
श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरु व्हावे, अशी महानुभावांची मागणी अनेक वर्षांपासून होती. यासाठी कवीश्वर कुलाचार्य महंत श्रीकारंजेकर बाबा यांनी पाठपुरावा केला.

महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे योगदान अमुल्य आहे. त्यांच्या अमुल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री रिध्दपूर ठरली आहे. यामुळे रिध्दपूर ही महानुभाव पंथाची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे. मराठीचा आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ जेथे लिहिला गेला त्या स्थानाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनामार्फत येत्या जूनपासून रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील, याचाही विचार करण्यात आला असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी श्री गोविंद गुरुकुल आश्रम विद्यालय परिसरातील आद्य मराठी गद्य ग्रंथ लीळाचरित्राचे निर्मिती स्थान, वाजेश्वरी येथील दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राजमठ मंदिरात श्री गोविंदप्रभू यांचे दर्शन घेतले. यक्षदेव प्रतिष्ठान येथे भेट देऊन गोपीराज ग्रंथ संग्रहालयातील सातशे वर्षांपूर्वीच्या हस्तलिखित पुरातन पोथ्यांची पाहणी केली. प्राचीन कापडी भांडी, गाठी यांची पाहणी करुन येथील प्राचीन वस्तू आणि ग्रंथसंपदेचे जतन करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments