Saturday, July 27, 2024
Homeलेखमहान डॉ. माईसाहेब आंबेडकर

महान डॉ. माईसाहेब आंबेडकर

‘मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विशाल अथांग महासागराच्या पाण्यावरचा अल्प कालावधीकरिता का असेना, बुडबुडा झाले. त्या पाण्याचा बुडबुडा होण्याचे भाग्य मला लाभले. मी धन्य झाले. जीवनाचे सार्थक झाले. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला म्हणजे सोने होते. तसेच त्यांच्या स्पर्शाने माझ्या जीवनाचे सोने झाले…’ – डॉ. सविता ऊर्फ माई आंबेडकर

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोर्ले गावात कृष्णराव विनायक कबीर राहत होते. त्यांच्या पत्नीचे नाव जानकी होते. २७ जानेवारी १९१२ या दिवशी कबीर परिवारात एका कन्यारत्नाचा जन्म झाला. मुलीचे नाव शारदा ठेवण्यात आले. शारदाचे प्राथमिक शिक्षण रास्ता पेठ, पुणे आणि माध्यमिक शिक्षण पुणे येथील हुजूरपागा विद्यालयात झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळाले. परशुराम विद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन बुद्धिचातुर्याच्या जोरावर विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पुढील लक्ष्य होते इंटर सायन्स परीक्षा! त्या परीक्षेत फर्ग्युसन महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या त्या एकमेव महिला ठरल्या. पुढे मुंबईच्या पेंट वैद्यकीय महाविद्यालयात शारदा यांनी एमबीबीएस पर्यंतचे शिक्षण वसतिगृहात राहून पूर्ण केले.

त्या काळातील सामाजिक परिस्थिती आणि मुलीच्या शिक्षणाबाबत असलेली एकंदरीत नकारात्मकता पाहता कबीर परिवाराचे हे कौतुकास्पद आणि धाडसी पाऊल होते. नंतर गुजरातमध्ये काठेवाड येथील जनाना या इस्पितळात वैद्यकीय अधिकारी पदावर त्या नियुक्ती झाली. परंतु काही महिने नोकरी होताच शारदा आजारी पडल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि त्या पुन्हा मुंबईला आल्या. कदाचित भावी आयुष्यात घडणाऱ्या घटनांची ती नांदी असावी.

मुंबई येथील त्यावेळच्या प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. मालवणकर यांच्या सोबत डॉ शारदा काम करू लागल्या. विद्यार्थी दशेपासून अत्यंत हुशार, मेहनती अशी ख्याती असलेल्या शारदा या नव्या ठिकाणी मन लावून काम करू लागल्या.

डॉ. मालवणकर यांच्याकडे त्या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर रक्तदाब, संधिवात, रक्तातील साखर आणि मज्जारज्जूचा आजार यासाठी औषधोपचार घेत होते. शारदा तेथेच काम करीत असल्याने बाबासाहेब आणि शारदा यांची तेथे भेट होत असे. त्यावेळी त्यांची चर्चा साहित्य, समाज आणि धर्म अशा बाबींवर होत असे. या चर्चेदरम्यान अनेकदा तात्त्विक मतभेदही होत. त्या वेळी बाबासाहेब सविता यांची बाजू बारकाईने ऐकत आणि समजून घेत. तर दुसरीकडे त्या चर्चांमधून बाबासाहेबांचे विविध विषयांवरील अभ्यासयुक्त असे विवेचन ऐकताना शारदा यांच्या मनातील बाबासाहेबांविषयी असलेला आदर दुणावला जाई.

आपल्या आत्मचरित्रात डॉ. सविता लिहितात, ‘डॉक्टरसाहेबांच्या सहवासात मला त्यांच्या ऐतिहासिक कार्याची जवळून प्रचीती आली आणि मी अक्षरशः दिपून गेले.
पहिल्या पत्नीच्या मृत्यूला बारा वर्षे झालेली असताना एकदा बाबासाहेब शारदा यांना म्हणाले, “माझे लोक, सहकारी मला दुसऱ्या लग्नाचा आग्रह करीत आहेत. परंतु मला माझ्या अनुरूप, आवडीची नि योग्यतेची पत्नी मिळणे कठीण आहे. परंतु लोकांचा आग्रहही मोडवत नाही. अशा सुयोग्य स्त्रीचा शोध मी तुमच्यापासून सुरू करतो. तेव्हा पुढील प्रमुख गोष्टी समोर ठेवून निर्णय घ्यावा… तुझ्या व माझ्या वयातील फरक आणि माझी प्रकृती !”

डॉ. शारदा गोंधळून गेल्या. त्यांनी डॉ. मालवणकर आणि भावाचा सल्ला घेतला. डॉ. मालवणकरांनी त्यांना हिरवा कंदील दाखवला. थोरले भाऊ आनंदाने म्हणाले, “याचा अर्थ तू भारताची कायदेमंत्रीण होणार तर ? नकार द्यायचाच नाही.”
१५ एप्रिल १९४७ या दिवशी बाबासाहेब आंबेडकर आणि शारदा विवाहबद्ध झाले. उभयतांच्या लग्नाची ठिकठिकाणी चर्चा झाली. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या लग्नाबद्दल मतमतांतरे व्यक्त होत होती.
लग्नानंतर शारदा कबीर यांना सविता आंबेडकर हे नाव मिळाले असले तरीही बाबासाहेब त्यांना ‘शारदा’ किंवा ‘शरू’ याच नावाने बोलवत असत.

लग्नानंतर सविता यांनी नोकरी सोडली आणि त्या पूर्णवेळ बाबासाहेबांची देखभाल करू लागल्या. बाबासाहेबांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत होती. पत्नीने केलेली सेवा, देखभाल पाहून बाबासाहेबांनी लिहिले, ‘माझ्या जीवनाची मालवत चाललेली ज्योत प्रज्वलित करण्याचे काम माझ्या पत्नीच्या वैद्यकीय कौशल्यामुळे तडीस जात आहे. माझे आयुष्य आठ-दहा वर्षांनी वाढले आहे. म्हणूनच माझ्याकडून ग्रंथलेखनाचे कार्य पार पडले आहे’ अशा भावनोत्कट विवेचनातून सविता यांनी बाबासाहेबांची किती काळजी घेतली हे समजून येते.

१४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस आंबेडकर दांपत्याच्या जीवनातील एक सुवर्णयोग म्हणावा असाच. कारण याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. विशेष म्हणजे सविता आंबेडकर यांना बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या पहिल्या महिला हा मान मिळाला. या वेळी पाच लाख लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला हे विशेष ! पुढे अनुयायी सविता यांना ‘माई’ या नावाने बोलावू लागले. यावरून सविता यांचे अनुयायांवर मातेप्रमाणे प्रेम होते हे लक्षात येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असताना त्यांना भेटायला येणारांची संख्याही वाढत होती. सविता त्यांच्या पत्नी तर होत्याच, शिवाय त्या डॉक्टर या नात्याने बाबासाहेब यांची देखभाल करताना काळजीही घेत असल्यामुळे वैद्यकीय दृष्टिकोनातून त्यांनी बाबासाहेबांना भेटायला येणाऱ्यांवर निर्बंध घातले. त्यामुळे बरेच लोक नाराज होत.

अखेर ६ डिसेंबर १९५६ या दिवशी दिल्ली येथे बाबासाहेब यांचे झोपेतच दुःखदायक निधन झाले. सारे शोकसागरात बुडाले, परंतु काही जणांनी निधनाबद्दल संशय व्यक्त केला. अनेक लोकांनी संशयाची सुई थेट सविता यांच्या दिशेने फिरवली. माई आत्मचरित्रात लिहितात, केंद्र सरकारने एक समिती नेमली. त्या समितीने चौकशीअंती जाहीर केले, “कुठल्याही तऱ्हेच्या संशयास जागा नसताना असे सिद्ध झाले आहे की, डॉ. आंबेडकरांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणांमुळे झालेला आहे. म्हणून कुठल्याही गैरप्रकाराबद्दल संशय घेण्यास कुठलाही पुरावा उपलब्ध नाही.”

या आरोपांमुळे आणि पतीच्या मृत्यूमुळे माई एकाकी झाल्या, जणू अज्ञातवासात गेल्या. उद्विग्न अवस्थेत त्यांनी लिहिलंय, ‘डॉ आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर मला ज्या अग्निदिव्यातून जावे लागले, मला वैधव्याच्या वणव्यात जो वनवास भोगावा लागला तसाच अन्याय डॉ. आंबेडकरांच्या हयातीत कोणा स्त्रीच्या नशिबी आला असता तर आंबेडकर त्या स्त्रीच्या हक्कासाठी धावून गेले असते, खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले असते.’ त्या पुढे म्हणतात, ‘मी त्या विशाल अथांग महासागराच्या पाण्यावरचा अल्प कालावधीकरिता का असेना, बुडबुडा झाले. त्या पाण्याचा बुडबुडा होण्याचे भाग्य मला लाभले. मी धन्य झाले जीवनाचे सार्थक झाले. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला म्हणजे सोने होते तसेच त्यांच्या स्पर्शान माझ्या जीवनाचे सोने झाले. डॉ. आंबेडकरांच्या सहवासाने मी नऊ कोटी बौद्धांची माई झाले.

माईसाहेबांचे असामान्य कर्तृत्व लक्षात घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, हैदराबाद या विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट हा सन्मान प्रदान केला.

२९ मे २००३ या दिवशी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी डॉ. सविता बाबासाहेब आंबेडकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण आदरांजली !

नागेश शेवाळकर.

— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. माता रमाई यांचे सुरेख आणि प्रेरणादाई शब्दचित्र .

  2. प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण लेख!
    भावपूर्ण श्रद्धांजली!🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments