भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक, अर्थशास्त्रज्ञ, समाज सुधारक, राजकीय नेते आणि भारतीय घटनेचे शिल्पकार होते.
बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आणि वडिलांचे नाव रामजी असे होते. बाबासाहेब उत्कृष्ट विद्वत्तेचे धनी होते. तत्त्वज्ञानी आणि दूरदर्शी, राष्ट्रवादी होते. समाजातील शोषित आणि उपेक्षित घटकांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक चळवळीचे नेतृत्व त्यांनी केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” असा मूलमंत्र त्यांनी शोषित, वंचित समाजाला दिला. एल्फिन्स्टन कॉलेज बॉम्बे येथून त्यांनी पदवी घेतली. कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी केली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून एमएससी डी. एससी केले.
बाबासाहेबांनी मानवी हक्क मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक चळवळींचे नेतृत्व केले. विधी महाविद्यालयात सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक होते. एक कुशल वकील आणि चतुरस्त्र विद्वान होते. त्यांना वाचनाचा फार व्यासंग होता. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र धर्म इत्यादी विषयांचा दांडगा दीर्घ व सखोल अभ्यास होता १९३० ते ३२ या काळात झालेली गोलमेज परिषद त्यांनी गाजवली. १९३२ मध्ये त्यांनी तथाकथित दलितांच्या वतीने महात्मा गांधी बरोबर पुणे करार केला.

१९४२ मध्ये बाबासाहेबांनी कामगार चळवळ उभारली. कामगारांच्या हितासाठी लेबर मेंबर म्हणून काम पाहिले. १९४६, ४७ मध्ये बाबासाहेब घटना समितीवर निवडून गेले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आली.
स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता यानुसार घटनेत तरतूद करण्यात आली. घटनेच्या कलमांमध्ये अचूक शब्दयोजना करून महत्त्वाच्या सूचना, दुरुस्त्या विशिष्ट कलमांमध्ये अचूक नियम, प्रयोजन, त्रुटी भरून काढणे हे सर्व त्यांच्या विद्वत्तेचे प्रमाण आहे. २६ जानेवारी १९५० पासून ही घटना लागू करण्यात आली. यामागे बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. ते उत्कृष्ट वक्ता आणि तत्ववादी नेते होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर बुद्धिजीवी आणि विचारवंत होते. त्यांनी अन्यायाविरुद्ध जहाल भूमिका स्वीकारली. परंतु घटनेचा आदर करून नीतिमत्ता पाळणे आणि एकमेकांच्या धर्माचा आदर करणे हे उदारमतवादी धोरण अंगिकारले. सामाजिक राजकीय व आर्थिक प्रश्नांना घटनेच्या चौकटीत राहूनच सोडवण्यावर त्यांचा भर होता.त्यांनी इंग्रजीमध्ये अनेक लेख, पुस्तके, शोधनिबंध लिहिले.
सामाजिक, आर्थिक व राजकीय लोकशाही अस्तित्वात आली पाहिजे असे त्यांनी निक्षून सांगितले. दलितांच्या आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी चळवळ उभारली. हिंदू धर्म सोडून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. डॉक्टर आंबेडकर राष्ट्रवादी होते दूरदर्शी होते. समाजातील शोषित आणि उपेक्षित घटकांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक चळवळींचे नेतृत्व त्यांनी केले. महाडचा सत्याग्रह केला. दलित, अस्पृश्य, चळवळी मधून दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य केले. ते थोर समाज सुधारक होते मनस्मृतींचे दहन त्यांनी केले. स्त्रियांसाठी चळवळी उभारल्या. भारतीय बौद्ध धर्माचे ते पुनरूज्जीवक होते.
डॉक्टर आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारत सरकारने १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. अशा या महामानवाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महानिर्वाण झाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.

— लेखन : पल्लवी उमरे. मुंबई, सौजन्य गुगल.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800