Thursday, May 30, 2024
Homeलेखमहाराष्ट्र दिन आणि शिवनेरी

महाराष्ट्र दिन आणि शिवनेरी

ऐतिहासिक महाराष्ट्राची सुरुवात मौर्य राजवटी पासून होते असे मानले जाते. कोणत्याही देशात राज्यात लिखित साधने उपलब्ध झाल्यापासून त्या देशाचा लेखनकाळ सुरू होतो.

महाराष्ट्राचा पहिला लिखित उल्लेख असलेला शक राजा श्रीधर वर्मा याचा शिलालेख सागर जिल्ह्यात एरण या गावात उभारलेल्या स्तंभावर आहे.
या शिलालेखामध्ये श्रीधर वर्मा राजाचा कालखंड इसवी सन 365 असा आहे. या राजाचा सेनापती सत्यनाग याने हा स्तंभ उभारला असून त्या लेखात त्याने म्हणजे राजाने स्वतःला महाराष्ट्र प्रमुख असे संबोधले आहे.
महाराष्ट्र या शब्दाचा हा पहिला लिखित उल्लेख आहे अशी नोंद पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी “भारतीय संस्कृतीकोश” या संदर्भ ग्रंथाच्या खंड सात मध्ये पृष्ठ 201 वर केली आहे.

मौर्य राजवटीनंतर सातवाहन राजवंश व इतर अनेक राजांची राजवट महाराष्ट्र या भूमीवर होती. एहोळे शिलालेखामध्ये महाराष्ट्र हा शब्दप्रयोग आला आहे. ज्ञानेश्वरी मध्ये महाराष्ट्र मंडळ असा शब्द आहे. महाराष्ट्राला महंतराष्ट्र अर्थात थोरराष्ट्र असेही नाव आहे.

महाराष्ट्राला समृद्ध करण्याचे काम महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी, ज्ञानेश्वर, संत एकनाथ, मुक्तेश्वर, रामदास, तुकाराम, शेख मोहम्मद इत्यादी साधुसंतांनी आपल्या वाङ्मयांना आणि अभंग रचनेने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केल्यापासून पद्याप्रमाणेच गद्यामधूनही मराठी भाषेच्याद्वारे महाराष्ट्र विषयीचा हा आदर खूप वाढत गेला आहे.
हा किती योगायोग आहे की ज्या जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच किल्ले शिवनेरीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. धन्य ते जुन्नर, धन्य तो शिवनेरी.
जेथे महाराष्ट्र भाषावर्तते ते महाराष्ट्र l
चतुर्थांश महाराष्ट्र भाषा वर्तते तेही महाराष्ट्र l
महाराष्ट्री असावे l
महाराष्ट्र या शब्दाविषयी चे अनेक उल्लेख इतिहास ग्रंथांमध्ये आहे.
याविषयी महाराष्ट्र नाम उत्पत्तीचा इतिहास स्वतंत्र लिहिता येईल.
यादव राजवंश मुस्लिम कालखंड. मराठा कालखंड आणि इंग्रजी अंमल ते थेट एक मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना.
जुन्नर मधील किल्ले शिवनेरीवर केलेली महाराष्ट्र राज्य स्थापनेची घोषणा. हे सर्व मुद्दे या लेखामध्ये सारांश रूपाने मांडले आहेत.

दगडांच्या आणि काटेरी देशाच्या या जनतेने महाराष्ट्र राज्याच्या म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जो रणसंग्राम केला त्याचा इतिहास येथून तेथून मराठी जनतेच्या बलिदानाचा आणि स्वाभिमानाचा जसा इतिहास आहे तसाच दुसऱ्या बाजूला तो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या खुज्या लाचार आणि भेकड नेतृत्वाचा इतिहास देखील आहे.
हा इतिहास म्हणजे दिल्लीकरांच्या लोकशाही विरोधी आणि हुकूमशाही धोरणाचा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अवसानघातकी धोरणाचा इतिहास आहे. हा इतिहास म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ब्रिटिश साम्राज्यवादांच्या विरोधात प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या जनतेला काँग्रेसच्या नेतृत्वाने जी जी आश्वासने दिलेली होती. त्या त्या आश्वासनांवर बोळा फिरवून जनतेशी प्रतारणा करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या विश्वासघातकी धोरणाचा इतिहास आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असहकार सत्याग्रह या सर्व गोष्टींनी राज्यकर्त्यांना नकोशा वाटू लागल्या. त्यांची सत्सदविवेकबुद्धी इतकी खालच्या स्तराला गेली की ज्या सत्याग्रहाच्या उपोषणाच्या आणि असहकाराच्या मार्गाने भारतीय जनतेने ब्रिटिश राज्यकर्त्यांना नमविले तोच सत्याग्रह तेच उपोषण तोच असहकार आंदोलन यांना लोकशाहीमध्ये कसलेही स्थान नाही अशी भाषा बोलू लागले विशेष म्हणजे खुद्द पंडित नेहरू. ही नोंद लालजी पेंडसे यांनी महाराष्ट्राचे महामंथन या ग्रंथामध्ये प्रस्तावनेतील आठ आणि नऊ या प्रश्नांवर केली आहे. या प्रदीर्घ ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आहे माननीय एन डी पाटील यांनी.

तत्कालीन काँग्रेसच्या समितीने विशेषतः शंकरराव देव गिरीकर काकासाहेब गाडगीळ भाऊसाहेब हिरे आणि यशवंतराव चव्हाण या सर्वांनी असे ठरवले होते की आमची मुंबई सह महाराष्ट्राच्या एक भाषिक राज्याची मागणी कायम आहे. अन्य पर्याय आम्ही विचारात घेऊ शकत नाही. अशी बाब काँग्रेसच्या नेतृत्वाला स्पष्टपणे सांगण्यात यावी असे ठरविण्यात आले होते. . मात्र 19 ऑक्टोबर 1955 रोजी शंकरराव देव यांनी कोणालाही विश्वासात न घेता पंडित नेहरू आजाद या श्रेष्ठींच्या समोर विशाल द्विभाषिक राज्याचा पर्याय ठेवल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे सर्व नेते चक्रावून गेले. भाऊसाहेब हिरे हे महाराष्ट्राच्या स्थापनेबाबत फार आग्रही होते.

याविषयीची सविस्तर मांडणी ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक यदुनाथ फडके यांनी “विसाव्या शतकातील महाराष्ट्र खंड आठ.” मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचा उदय आणि अस्त.
1956 ते 1963 या कालावधीतील घडामोडींवर लिहिलेला हा प्रदेश ग्रंथ प्रत्येक अभ्यासकाने वाचला पाहिजे.

शंकरराव देव यांची भूमिका एक डिसेंबर 1955 रोजी फलटण येथे सभा घेऊन महाराष्ट्राने झुगारून दिली.
मनात एक आणि पोटात एक असे करू नका असे स्पष्ट सांगितले.
येथून पुढे महाराष्ट्र राज्याच्या स्थापने संदर्भात 105 मान्यवरांचे जे बलिदान झाले त्याचा इतिहास आपणा सर्वांना ठाऊक आहे.

संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न जी मराठी जनता पाहत आहे त्या स्वप्नांचा चक्काचूर करण्याचा कोणालाही अधिकार नाही असा विचार जनमानसामध्ये बळावू लागला असता आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचे पाऊल पुढे पडू लागले.

विविध आंदोलने सत्याग्रह आणि मोर्चा अशा अनेक प्रकारांनी तसेच मोरारजी देसाई यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे महाराष्ट्रातील जनमत चांगलेच खवळून निघाले. 6 फेब्रुवारी 1956 पासून संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू झाला. माननीय केशवराव जयधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये एक कार्यकर्ता मेळावा झाला आणि शांतता सत्याग्रहाचा मार्ग सोडून चालणार नाही त्यासाठी ऐक्याची गरज आहे भिन्नभिन्न विचारांच्या लोकांमध्ये आपल्याला एकमत तयार करावे लागेल या गोष्टीवर सर्वांनी भर दिला.

या कामी संयुक्त महाराष्ट्र समितीचे काम महत्त्वपूर्ण आहे. 16 फेब्रुवारी 1956 पासून संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबई बेळगाव कारवार आणि निपाणी या सर्व शहरांमध्ये काळे झेंडे दाखवून प्रस्थापित शासनास विरोध केला.
1956 पासून 1960 पर्यंत महाराष्ट्र निर्मितीच्या संदर्भात झालेली विविध आंदोलने त्यासंदर्भात झालेले लेखन साहित्य विशेषतः लालजी पेंडसे यांनी केलेले लेखन खूप महत्त्वपूर्ण आहे.
त्या वेळच्या केंद्रातील सरकारने 1958 मध्ये द्वैभाषिक राज्य असावे याविषयी प्रतिपादन करून भर दिला. या संदर्भात भाऊसाहेब हिरे यांनी आपल्या पक्ष नेतृत्वाला खणखणीत इशारा दिला आणि ते म्हणाले.

आज आमच्या आवाजाला किंमत नाही पण जनतेचा आवाज आम्हाला चांगला समजतो. महाराष्ट्रीय जनता संयुक्त महाराष्ट्र मिळविल्याशिवाय कधीही गप्प बसणार नाही आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय महाराष्ट्र काँग्रेस तग धरू शकणार नाही. आणि जर जनतेला दिलेला शब्द पाळला नाही तर काँग्रेसचा विनाश अटळ आहे. असे त्यांनी प्रतिपादन केले.

1960 च्या जानेवारीपासून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची सूत्र वेगाने हलू लागली. गंमत म्हणजे 13 एप्रिल 1960 रोजी गुजरातचे पुरुषोत्तम पटेल यांनी असे मत प्रतिपादन केले की काँग्रेस निष्ठे पायी त्यांना फार मोठा त्याग करावा लागत आहे आणि महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातला फार कमी मिळाले आहे.
त्याचबरोबर कर्नाटकचे सुगंधी यांनी महाराष्ट्र या नावाला हरकत घेतली. त्यासाठी त्यांनी असे काही हरकत घेणारे पुरावे जोडले की जे पुरावे कोणत्याच निकषावर समर्थनीय नाही आणि टिकणारे नाहीत. अर्थात हे सर्व गळून पडले. मुंबईसह महाराष्ट्र राज्य संमत झाले. 14 एप्रिल 1960 हा दिवस उजाडला यासंबंधीचे विधेयक मांडले गेले 21 एप्रिल रोजी लोकसभेने विधेयक मंजूर केले. 23 एप्रिल रोजी राज्यसभेने मंजूर केले. शेवटी ज्या संसदेने मुंबईच्या प्रश्नाचा घोळ घालून 105 हुतात्म्यांचे बलिदान व अनंत त्या सायास झिडकारून चार वर्षांपूर्वी द्वैभाषकाचा नकली डोलारा उभा केला होता त्याच संसदेने गुजरात राज्य आणि महाराष्ट्र राज्य यांच्या निर्मितीचा प्रस्ताव पास केला.

“भारताच्या नकाशावर महाराष्ट्र झळकला.”

एक मे 1960.
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा,
त्या वेळच्या शाहिरांनी नफा वर थाप देऊन गीत म्हटले.
विरोधकांनो पळपुट्यांनो शिवरायांच्या महाराष्ट्राचे आज पुनरुत्थान होते आहे त्याला यशोगान गावे गत पापांचे प्रायचित्त करावे.
शत शत शरद मागे लोटून याची देही याची डोळा महाराष्ट्र साकार झाला.

“राज्य स्थापनेचा अपूर्व सोहळा.”

त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 27 एप्रिल रोजी साजरी केली जात होती. 27 एप्रिल ते एक मे या पाच दिवसांसाठी एक समारंभ समिती स्थापन करण्यात आली. शासन समिती आणि जनता जीव ओतून काम करत होते.
27 एप्रिल रोजी शिवनेरी किल्ल्यावर एक उत्सव ठरला. त्या उत्सवाचे उद्घाटन भोसले वंशज सातारचे छत्रपती प्रतापसिंह राजे यांच्या हस्ते झाले. जुन्नर नगरी मधून हजारो शेतकरी हा सोहळा पाहण्यासाठी आले होते. उद्घाटनानंतर इतिहासकार न. र फाटक यांचे भाषण झाले. सकाळी श्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते शिवनेरीवर बांधलेल्या शिवकुंज या इमारतीचे उद्घाटन झाले. शिवप्रतिमा उद्घाटनाचा कार्यक्रम दुपारी महाराष्ट्र राज्याचे नियुक्त मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी रोषणाई, दारूकाम, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचे आयोजन केले होते. प्रसिद्ध सिनेमा निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम आणि गायिका लता मंगेशकर यांच्या साह्याने “शिवशंभव” हे नाटक सादर करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या पूर्व सूर्योदयाला अभिष्टचिंतन करण्याच्या धार्मिक प्रार्थना झाल्या. वैदिक, ख्रिस्ती, इस्लामी, फारसी, जैन, सर्व धर्मियांनी त्यात सहभाग घेतला. त्यावेळी काढलेली रांगोळी ही नयनरम्य होती. संपूर्ण जुन्नर मध्ये रांगोळीचे सडे घालण्यात आले होते. त्याचप्रमाणे मुंबई येथे सचिवालयात देखील रांगोळीचे सडे घालण्यात आले.

माननीय यशवंतराव चव्हाण छत्रपतींच्या प्रतिमेला वंदन करून म्हणाले, “शिवाजी महाराज एकदाच जन्मले तसाच विसाव्या शतकातील हा महाराष्ट्र आता जन्मास येत आहे. जसा भारत एकदाच आणि कायमचा निर्माण झाला तसा महाराष्ट्र ही एकदाच निर्माण होत आहे.”
महाराष्ट्र राज्याची घोषणा छत्रपतींच्या जन्मभूमीत होणे ही फार भाग्याची आणि मोठी गोष्ट आहे. त्यावेळी जुन्नर मधील लोकनेते सहकार महर्षी शिवाजीराव तथा दादासाहेब काळे उपस्थित होते.
त्याचे नियोजन त्यांनी स्वतःच केले होते. जुन्नर नारायणगाव रस्त्याचे प्रथमच डांबरीकरण करण्यात आले. किल्ल्यावरील प्रत्येक दरवाजाला सजावट आणि मावळ्यांच्या वेशातील सैनिक मानवंदना देण्यासाठी हजर करण्यात आले. विशेष म्हणजे शिवनेरी आणि जुन्नर मध्ये तार टेलीफोन संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आघाडीचे शाहीर अमर शेख गानसम्राज्ञी हिराबाई बडोदेकर ज्येष्ठ कलावंत साहित्यिक यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती त्यावेळी महाराष्ट्र राज्याच्या स्थापने निमित्ताने उषःकाल दीपलक्ष्मी आणि विशाल सह्याद्री या विशेष शंकांचे प्रकाशन करण्यात आले
जुन्नर मधील या कार्यक्रमासाठी माननीय बाळासाहेब देसाई भगवंतराव साठे राजाराम बापू पाटील बाळासाहेब देसाई आणि आमदार शिवाजीराव काळे साहेब उपस्थित होते. मानव शेठ कोठारी, गेनू भाऊ ढोले, चंद्रकांत देसाई, विश्वनाथ वाबळे, भिकू शेठ झुटे, लक्ष्मणराव बोटे पाटील, चांदमल बोरा, श्रीपतराव मेहेर, धमाजीराव मेहेर, शंकराव भेलके इत्यादी जेष्ठ मंडळींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची तयार करण्यात आलेली कार्यक्रम पत्रिका माझ्या संग्रहामध्ये आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य निर्मिती प्रसंगी मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण आणि शिवाजी दादा काळे यांनी प्रकाशित केलेले विशाल सह्याद्री या अंकाची एक आवृत्ती देखील आहे.

आज एक मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आपण साजरा करतो. या स्थापना दिवसाची सुरुवात जुन्नरच्या भूमीतून झाली हा इतिहास सांगणे हा या लेखाचा उद्देश आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास अभ्यासण्यासाठी खूप साहित्य अभ्यासकांना उपलब्ध आहे. त्यांनी ते अवश्य पहावे.

प्रा डॉ लहू गायकवाड.

— लेखन : प्रा डॉ लहू गायकवाड. इतिहासतज्ञ
नारायणगाव, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाची सुरुवात जुन्नर भुमीतून झाली हे इतिहासतज्ज्ञ डॉ . गायकवाड यांच्या मुळे आम्हा सर्व सामान्यांना कळाले . अत्यंत माहितीपूर्ण लेख . अप्रतीम !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments