Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यमहिला दिन : काही कविता

महिला दिन : काही कविता

१. हे अपेक्षित नव्हते

एक वेगळा विचार मांडणारी कविता

महिला दिनांनी, महिलांना हक्क दिले,
पण पुरूषांचे हिसकावून त्यांनी ते घ्यावेत..
हे अपेक्षित नव्हते…

मुलगी शिकली, प्रगती झालीच..
पण मुलं तिथेच राहिली, किंवा मागे पडली..
हे अपेक्षित नव्हतेच…

मुलींनी मुलांसारखे कपडे घातले, केस कापले
पण मुलांनी पण मुलीसारखे सर्व अंगिकारले..
हे अपेक्षित नव्हते…

मुलींनी स्वयंपाकघरातून निवृत्ती घेतली
पण म्हणून मुलांनी ती पूर्णपणे स्विकारली..
हे अपेक्षित नव्हते..

नवऱ्यानी बायकोला कमी लेखणे बंद केले
पण म्हणून बायकोने नवऱ्याला कमी लेखावे..
हे अपेक्षित नव्हते…

आधी संसार असमान दोघांचा तरी स्थिर होता
आता समांतर असला तरी संसार डगमगतोय..
हे अपेक्षित नव्हते…

महिला दिनामुळे खूप मिळाले हे खरं आहे..
पण जे गमावले त्याचे परिणाम गंभीर आहेत..
हे अपेक्षित नव्हते…

रचना : चित्रा मेहेंदळे. मुंबई

२. गझल : नारी

खांद्यावरती डोंगर घेते पिढ्या घडवते नारी
संसाराची नावाडी ही दशा बदलते नारी

हृदयामधली बघून खोली अवाक होतो सागर
विचार करतो, पोटामध्ये किती दडवते नारी

झुळूक होते वादळ होते छत्तीस गुणी असते
प्रसंगास पण गुलाम करते तुफान लढते नारी

चिमूटभर बघ मीठ टाकते गोडी तेंव्हा येते
हसता हसता मिठास साखर कशी बनवते नारी

उंबरा खरा मर्दुमकीने दि शास दोन्ही जपते
कंबर कसुनी घरात असते रणी मिरवते नारी

आई पत्नी अनेक नाती उरात लिलया पुजते
पदरा खाली धरते सारी उन्हे सजवते नारी

आकाशाला कवेत घेते उंच उडाया बघते
घेत भरारी स्वप्नांची मग पतंग बनते नारी

रचना:यशवंत पगारे. बदलापूर

३. महिल‍ा दिन आला

(हे गीत कोणाला गाण्याची इच्छा असेल तर रेकॉर्ड करून मला पाठवू शकता. समूहात पोस्ट केली तरी चालू शकेल)

चाल :- प्यार दिवाना होता है मस्ताना होता है।

उठा सयांनो, चला सख्यांनो महिला दिन आला
स्तुतीसुमनांचा भवती तुमच्या वर्षाव झाला.

कुणी म्हणेल दुर्गा तुजला कुणी गं वीरश्री
कुणी म्हणेल वाघीण आणि कुणी ग शूरस्त्री
शिकार करतील बोलुनी गोड अन फसशील तू बाल‍ा
स्तुतिसुमनांचा भवती तुमच्या वर्षाव झाला

ठेव आदर्श जिजाऊचा लक्ष्मी कल्पनाचा.
ध्रुवासम चमकू दे गगनी, दिवा कर्तृत्वाचा.
करून पेरणी संस्कारांची निर्मिशी स्वर्गाल‍ा.
स्तुतिसुमनांचा तुझ्या गं भवती वर्षाव झाला

शिकून घे तू ओळखायचे पशू माणसातला
सावध राहून नायनाट कर दुष्ट प्रवृतींचा
किंवा
(सावध राहून ठेचून काढ त्या दुष्ट प्रवृत्तीला)
ब्रम्हांडामधे होऊ दे नारी तुझा बोलबाला
स्तुतिसुमनांचा तुझ्या गं भवती वर्षाव झाला.

तुझ्यातील सुप्तगुणांना वाव मिळू दे.
कलागुण आतील सारे प्रकट होऊ दे.
भेदाभेद च्या भिंती पाडून घालव संकोचाला.
स्तुतिसुमनांचा भवती तुमच्या वर्षाव झाला.

उठा सयांनो, चला सख्यांनो महिला दिन आला
स्तुतीसुमनांचा भवती तुमच्या वर्षाव झाला.

रचना : अजय बिरारी. नाशिक

४. तिच्याविना

प्रत्येक कळीला फुलण्याचा हक्क द्या,
प्रत्येक फुलाला, दरवळण्याचा हक्क द्या,
वाढू द्या, शिकू द्या, स्वसंपूर्ण होऊ द्या, आणि
जी तेचेच आहे खरे, सांभाळण्याचा हक्क द्या,

घरातील तीचा वावर, तीचेच आहे हे घर,
राबते, रांधते, प्रेम करते, संसार तीचाच हो खरोखर,
ती मुलगी, बहिण, सखी, मैत्रीण, भुमिका निभावते,
ती सून, आई, मावशी, सासू मोठेपणा स्विकारते,

ती बांधून ठेवते, पीढ्यांना, ओढ लावते घराची,
ती नाही, बघा अशी घरे, ओसाड प्रेमाची उपाशी,
कधीकधी ती आग होते, पेटते, विस्फोटते,
सांभाळा सदैव तीजला, ती शक्ती अन संस्कार देते…!!!

रचना : हेमंत भिडे. जळगाव

५. “स्त्री आदर्श शक्ती

स्त्री जीवन सृष्टी नियतीचे वरदान
जीवनांत स्त्रीचे बहुमूल्य योगदान IIधृII

आतला आवाज ओळखावा स्त्रीशक्तीनं
राहते भवतालाचा तोल राखून सन्मान
सांभाळते विश्वाला सात्विक शक्तीनं II1II

सूर्यदेवाला शक्ती मिळते सवितेकडून
समुद्र जलापासून बनती मेघ या शक्तीनं
वैभव लक्ष्मी सरस्वती करी ती प्रदान II2II

दुष्टदुर्जनांचे महांकाली करी मर्दन
देई सामर्थ्य असुरांचे करी निर्दालन
समयोचीत स्त्रीधर्म सांभाळी ममत्वानं II3II

देवी देवतां आदींचे अनन्य योगदान
भाषा वाड्:मय केले स्त्रियांनी उच्च संपन्न
समृद्ध संस्कृतीची किर्त नेली गगनांत II4II

शील चारित्र्य सदाचार प्रेम वात्सल्य त्याग
देवी बहूभुजा बहूअवधानी कर्म निधान
जपते घराचे वैभव लक्ष्मी रूप लेऊन II5II

सर्व कर्मे निभावते राखते व्यवधान
राखी स्वच्छता अन्नपूर्णा पूरवी अन्न
सांभाळी आरोग्य पाहुणचार औचित्यपूर्ण II6II

मातृपद स्वीकारी सांभाळी प्रजनन
माता गृहिणी सहचारिणी पत्नी बहीण
आदिशक्ती आदर्श संस्कृती वाढवी सन्मान II7II

रचना:अरुण गांगल. कर्जत

६. जाणीव

बलात्काराच्या बातम्यांनी काळजाला भोकं पडतात
मुर्दाड मेल्या मनांना बहुदा त्या जाणवत नसतात

विकासाचे गोडवे आम्ही आमच्याच कानांनी ऐकतो
त्याचवेळी कुठेतरी एक बलात्कार घडत असतो

विसरलो नाही निर्भया कधी मणिपूर वा संदेशखाली
अबलांवरील अत्याचारांना वालीच कुणी उरला नाही

क्वचितच एखादा आसाराम शिक्षेस पात्र होतो
बाकीचे वासनांध मात्र पुराव्या अभाविच सुटतो

सबका साथ सबका विकास तरी मृत्यु महिलांचा
अजूनही डोंगरपाड्यात रस्ताच नसे वाहनांचा

नाही सोडत परदेशी बाई तिच्यावरही अत्याचार होतो
देशाची अब्रु जाईल म्हणून एखादा मंत्री पांग फेडतो

कायदे कानुन पुस्तकातच कुणाला इथं पडलंय काय
पक्ष फोडण्या व्यस्त सारे महिलांसाठी वेळच नाय

किती अंत पहावा बरे महिला दिनी फक्त नारे
एकमुखी निश्चय करू बळ देऊ या आपण सारे

अजून नाही वेळ गेली सूर्योदय होईल महिलांचा
महिलादिन न पहाता समभाव जागवा जाणिवांचा

रचना : सुनील चिटणीस. पनवेल

७. || ती… ||

आदिशक्ती, सृजनशक्तीस मनाचा मुजरा :

डोलकाठीसह
घर-शाळा मार्गे आजार, बाजार
या राजमार्गावर
दोन्ही हातांच्या टोकांवरल्या
डाव्या उजव्यांना एकाच दाव्याने
सांधून मधल्या धारेतून वाहताना
स्वतःसह साऱ्यांना सावरणं
रुचकर स्वयंपाकाइतकं
चटकदार वाटतं
बोटं चाटत खाणाऱ्याला

किती घ्यावं मीठ,
किती मळावं पीठ
किती घालावी साखर
किती वाढावी भाकर
याच्या फंदात न पडणं
हेच बरं वाटतं बोटं चाटत खाणाऱ्याला

या राजमार्गावर
रुटीन नियमनाचे पालन
नियमकर्त्यांचे भरण पोषण
फक्कड वाटतं
वाफाळलेला कप बोटांत धरणाऱ्यांना

आपला कप आपण धुणं
ताट-वाटी साफ करणं
वॉशिंग मशीन लावणं
कपडे वाळत घालणं
घड्या घालून ठेवणं
नकोच या फंदात पडणं
हेच बरं वाटतं
वाफाळलेला कप बोटांत धरणाऱ्यांना

कपातल्या वाफेतून आरपार
चेहऱ्यांवरलं समाधान पाहताना
उगवलेला असतो कपाळावरला सूर्य
नवी उमेद, नवा उत्साह
नवी सळसळ वीजचपळ

अंगातला ढाळ, केसातला माळ
रंध्रातला अंगार, मनातला हुंकार
रात्रीचा शृंगार पहाटचा शिणगार
आशेची दिठी, ममतेची मिठी
सहज पेलणारा भार पुन्हा पाठी

ती वामांगी, ती अर्धांगी
ती पुष्कळा, नाना कळा
ती रिद्धी सिद्धी समृद्धी
ती समजीवनी, संजीवनी
नक्षत्रांची माळा, आरोही मळा
अवरोही गळा, झुलता झोपाळा
निस्वार्थाचे बोल, आर्त अबोल
ती प्रणवाचा हुंकार
सृजनाचा ओंकार

रचना : सुधीर शालीनी ब्रह्मे

८. तू – – –

खुले नभांगण बघून घे तू
तुला हवे तर उडून घे तू

नदीस वाटा कुणी दिल्या का
तिची धडाडी शिकून घे तू

क्षणात वादळ विरेलही हे
मनात कणखर बनून घे तू

क्षणा क्षणाने सरेल जीवन
जमेल तितके जगून घे तू

मळभ असू दे सभोवताली
तुझ्यात थोडी भिजून घे तू

सुवास जर का हवा यशाचा
बनून चंदन झिजून घे तू

मनात कुढणे पुरे अता हे
कळी प्रमाणे फुलून घे तू

रचना : स्नेहलता झरकर-अंदुरे. धाराशिव.

९. होईन झुंजार

शरीरी दौर्बल्य
कळला ना कावा
मागील जन्माचा
साधलासी दावा ….

पाठीत खंजीर
निर्घृण वर्तन
विचित्र कां केले
केसांचे कर्तन? ….?

झाकला चेहरा
आवरेना रडू
संतापे वाटावे
जोराने ओरडू …

थांब नराधमा
वास्तव बिकट
आला काळ आता
समज निकट ….

नारी निराधार
होती हतबल
करीते एल्गार
होईल झुंजार ….

रचना : विजया केळकर. नागपूर

१०. ती आता बदलतेय

ती आता बदलतेय
स्त्रीत्वाच्या शृंखला
थोड्याश्या करुनी सैल
ती आता बदलतेय ||धृ

घेतलेय आता शस्त्र हाती
ती लढतेही, झुंजतेही
स्वतःच्या अवकाशात झेपावतेय ||

ती आता बोलूही लागली
व्यवस्थेच्या, भष्ट्राचाराच्या
अन्यायाच्या विरोधात
ती आता बदलतेय ||

उभी आहे स्व‌त्व संभाळत
पंखही फुटलेत तिला
झेपावतेय थेट आसमंतात ||

केली आहेत तिने
सारी क्षितिजे काबीज
ती आता बदलतेय ||

आस्तित्व सिध्द करतेय
पण आजूनही ती
तशीच आहे आतून
संयमी, क्षमाशील, संस्कारी
विश्वाला सामावून घेणारी !!

रचना : आशा ज्ञा.दळवी. फलटण

११. बाईपण सोप नसत

सोपं नसतं बाईपण घेणं
सोपं नसतं बाईपण नेसन

सोपं नसतं सर्वांची मने जपनं
सोपं नसतं बाईपण घेणं

सोपं नसतं आपलं मन मारुन जगणं
सोपं नसतं बाईपण घेणं

सोपं नसतं आनंदावर विरजण लावून घेणं
सोपं नसतं बाईपण घेणं

सोपं नसतं उंबरठा ओलांडून
सासरी गृहप्रवेश करणं
सोपं नसतं बाईपण घेणं

सोपं नसतं स्वतःच्या इच्छेला
विसरून जाणं
सोपं नसतं बाईपण घेणं

सोपं नसतं स्वप्नांवर तिलांजली देणं
सोपं नसतं बाईपण घेणं

सोपं नसतं आवंढा गिळून राहणं
सोपं नसतं बाईपण घेणं

सोपं नसतं
नेहमी पाण उतारा करुन घेणं
सोपं नसतं बाई पण घेणं

सोपं नसतं
तारेवरची कसरत करणं
सोपं नसतं बाईपण घेणं

सोपं नसतं
जन्मदात्या आईबापाला सोडून रहाणं
सोपं नसतं बाईपण घेणं
सोपं नसतं बाईपण घेणं

रचना : परवीन कौसर. बेंगलोर

१२. खरंच स्री स्वतंत्र आहे काय ?

स्री म्हणून जन्माला येते
बाई म्हणून घडवली जाते समाजात
विधिलिखित बदलण्याचे सामर्थ्थ
नाही आले शिक्षणांनी तिला

तिचा जन्मच नाकारला जातो
ऑफीस ते घर, मुले, संसार
याच रिंगणात आयुष्य जाते
“स्वातंत्र्य” हा शब्द नसतो तिच्या जगात

शिक्षण, लग्न यात नसते तिची मर्जी
लादले जाते बाईपण
बाप, नवरा, मुलगा गाजवतात तिच्यावर हूकमत
मर्जीची मालकीण नसते ती

पगारावर नसते तिची मालकी
घरावर नसते नाव तिचे
लग्ना नंतरच पुसली जाते तिची ओळख
एक अनोळखी नाव, पत्ता

मंगळसूत्र बांधुन गुलाम होते
थोड्या गोष्टीत समाधान शोधते
जातील वाईट दिवस म्हणून
आयुष्यभर संसाराचा गाडा हाकते

बाईला स्वातंत्र्य असते का ?
खरच वाट बघतेय ती स्वातंत्र्याची

रचना : अंजली सामंत, डहाणू

१३. यत्रं पुज्यंते नारी

सा-या दुनियेची जननी नारी
अगाध लिलेची माया नारी
काय वर्णावी किमया तिची
खरी जादूगरीं आहे नारी
संसाराचा एक चाक नारी
ओझं सगळा वाहते ती नारी
अपार कष्टाचे द्योतक आहे
जगावेगळी संस्कृती आहे नारी

आई-बहिण-पत्नी रूपातून
प्रकट होत असते ती नारी
माया – प्रेम, आपुलकीची
मखमली चादर आहे नारी

प्रसंगी रूद्रावतार, कधी कोमल
रूप धारण करते नारी
रणरागिणी, चंडीका ती
ललकारी देते नारी

विविध रुपकाची नारी
देवकी, राधा, द्रौपदी अन्
मा जिजाऊ, अहिल्यादेवी
या जगावेगळ्या आहेत नारी

आजच्या या मंगल दिनी
सारे होऊ नतमस्तक तरी
सार्थक होईल जीवन आपले
आहेत पुजनीय सर्व नारी

रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.

१४. स्त्री महती.

महिलादिनी सक्षम होऊ लढू दिनरात
चला गं सख्यांनो फेर धरू या स्त्री महती गात ॥धृ.॥

जनजागृती घडवू सारे नारी हृदयात
नाना संकटे धावुनी येती नारी जीवनात
घरची राणी स्वाभिमानी लढे दिनरात
चला ग सख्यांनो फेर धरू या स्त्री महती गात |१|

प्रेमापोटी जिंकुनी घेई सदा गणगोत
दिन उगवता कामावर जाई चिंता मनात
अन्नपूर्णा भोजन बनवी प्रेम ओते त्यात
चला गं सख्यांनो फेर धरू या स्त्री महती गात |२|

कोमलकांता, सृजनशक्ती विश्वा घडविते
नराधमांना धडा शिकवण्या रणरागिणी होते
नारी तूची नारायणी असशी या जगतात
चला गं सख्यांनो फेर धरू या स्त्री महती गात |३|

उंच उडुनी घाले गवसणी झाली विश्वाची रमणी
नवे संकल्प हातात अन् प्रगती विज्ञानात
चला गं सख्यांनो फेर धरू या स्त्री महती गात
महिलादिनी सक्षम होऊ लढू दिनरात |४|

रचना : शोभा कोठावदे. नवी मुंबई.
संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments