आम्ही चार भावंडे, तीन बहिणी एक भाऊ. मी घरात थोरली. माझ्या पाठचा भाऊ असिफ. मी लहान असतांना मी त्याला भैय्या म्हणावे म्हणून घरातले ही त्याला भैय्या म्हणायचे तर त्याला आज सगळेजण भैय्या म्हणूनच ओळखतात. माझ्यापेक्षा छोटा पण आजपर्यंत मोठा भाऊ म्हणूनच सगळे कार्य करत आला आहे. साहित्यामध्ये आज त्याच्यामुळेच माझे नाव झाले आहे. त्याला कारण असे की मी लहानपणा पासूनच मला शाळेतून घरी आले की पाठ्यक्रमातील कविता म्हणायचे. कवितेचा मला खूप छंद होता. जसं लिहायला वाचायला शिकले मी तशाच प्रकारचे काहीतरी शब्द लिहायचे. त्यावेळेस मला माहित नव्हते की ही कविता आहे किंवा मी लिहू शकते असं काही समजत नव्हतं पण जे मनात येत होतं ते लिहीत होते. घरात सगळ्यांना हे माहीत होतं.
अकरावीला असताना माझ्या हातात त्याने एक वर्तमानपत्र आणून दिलं. छोटासा कागद होता तो घडी घातलेला. त्याने तो माझ्या हातात देऊन सांगितलं यात जे आहे ते लिही आणि मी उघडून पाहिलं तर त्यात कश्मीर विषयी कविता लिहून मुंबईला पाठवायची होती. त्यावेळेस कश्मीर प्रश्न ज्वलंत होता.आणि माझ्याकडून “मातृभूमी” नावाची कविता लिहून झाली. मी उर्दू आणि हिंदी शिकलेले. त्यामुळे मी उर्दू आणि हिंदीत लिहित होते. मी ही कविता हिंदीत लिहिली आणि दिलेल्या पत्यावर पाठवली. त्या कवितेला मला प्रमाणपत्र आणि 21 रुपये बक्षीस ही आले. हीच माझी पहिली कविता.
हीच कविता मी नंतर बी एड ला असताना फायनल लेसनला शिकवली आणि नंतर जेव्हा मी 2017 पासून मराठी लिहू लागले तेव्हा मी हीच कविता मराठी मध्ये भाषांतरित केली आणि त्यानंतर माझा मराठी साहित्य प्रवास सुरू झाला.
दुसरी गोष्ट अशी की, मी मोठी असूनही तो एक थोरला भाऊ म्हणून त्याला जमेल तसे ड्रेस किंवा साडी घेत असतो. कितीही नाही म्हणले तरी तो घेतोच आणि आवर्जून सांगावेसे वाटते की अडीच वर्षांपूर्वी जी दुःखद घटना घडली त्या रात्री त्याने मला मौलानाला विचारून घरी नेले. कारण आमच्याकडे त्या रात्री जर मी माझ्या घरी राहिले असते तर चार महिने दहा दिवस मला कुठे जाता आले नसते आणि माझी परिस्थिती अशी नव्हती की मी चालू किंवा बोलू शकत होते. मी पूर्ण कोसळले होते. जर त्याने त्या रात्री मला नेले नसते तर माहित नाही मी आज असते की नाही.
आज हे लिहितानाही माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. माझ्या मुलांना आईचा आधार ही राहिला असता की नाही माहित नाही. त्याने हा निर्णय सर्व विधी झाल्यानंतर लगेच घेतला आणि मला घरी नेले. आमच्या वहिनीनेही बहिणीच्या वर माया लावली. मला कसली शुद्धच नव्हती. तिने माझे तीन महिने केले, तिचे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे पण तिने जे केले ते खूपच कौतुकास्पद आहे सख्खे बहिणी ही करू शकले नाही पण (सबा) वहिनीने हे केले आणि अजूनही ती करते. सारखी फोन करून तब्येत विचारत असते.
मी जेव्हा सुरुवातीला घटना घडल्यानंतर कोणाशी बोलत नव्हते, कोणाचे फोनही घेत नव्हते तेव्हा ती माझी फोन घेत होती. सर्वांशी बोलत होती आणि मला समज देत होती. किती तरी वेळा तेव्हा मी तिला धरुन रडले. रडायला ही माणसाला भक्कम खांदा लागतो तेव्हाच रडता येते. लहान असून माहित नाही तिला एवढी कशी समज आहे.
एकच भाऊ आहे पण तो सूर्यासारखा चमकणारा आहे. असे नाही की तो फक्त आम्हा बहिणीलाच बघतो. नातेवाईकांमध्येही सर्वांना बघतो. सगळ्यांची विचारपूस करतो. आले गेलेल्यांची काळजी घेतो. आमच्या एका आत्याला त्याने स्वतः पुढाकार घेऊन हज करून आणले. सर्व नातेवाईक त्याला खूप मान देतात तो सर्वांसाठी तेवढे करतो ही.
वडील आता नाही. परंतु आईची तो इतकी काळजी घेतो जे म्हणेल ते लगेच तिच्यापुढे हजर असते. आपण असे म्हणतो की माझा भाऊ चांगला आहे पण मला असे वाटते भावजय चांगली आहे म्हणून भाऊ चांगला आहे. प्रपंच चालवण्यात घरातील जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पुरुष मंडळींचे घराकडे दुर्लक्ष होत असते. संसारामध्ये खूप कामे असतात. सगळ्याकडे ते लक्ष देऊ शकत नाही. त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी बायको ही चांगली असावी लागते आणि माझी भावजय तशी आहे. सर्वांचे ती जमेल तसे करत असते. भावाचे कामामुळे घरात लक्ष नसले तरी तिचे बरोबर सगळ्याकडे लक्ष असते. ती सर्वांना आले गेलेल्यांचे व्यवस्थित करते. दोघेही माझ्या मुलांना खूप जीव लावतात. यापुढेही हे नाते असेच राहील याची अल्ला जवळ दुआ करते.
अभंग
भाऊ माझा
मनाचा उदारी ।
शांत स्वाभावाचा
माझ्या तो पाठचा ।
भाऊ माझा ॥१॥
प्रेमळ अबोला ।
प्रेमळ नि खरा
उंच गोरा गोरा ।
पुण्यवान ॥२॥
प्रेम सर्वांवर ।
करतो आपार
गुणी आहे फार ।
संत जणू ॥३॥
माता नि पित्याला ।
संभाळे चांगला
जपुन मनाला ।
गुणी फार ॥४॥
चालवितो गाडी ।
नित्य नियमाने
अत्यंत कष्टाने ।
पोटासाठी ॥५॥
बनला श्रावण ।
ईच्छा पुर्ण केली
माता पिता झाली ।
हज यात्रा ॥६॥
लाभो सुख शांती ।
आरोग्य संपदा
हास्य राहो सदा ।
मुखावर ॥७॥
मागणी आल्लाह ।
माझी तुज आहे
सदा खुश राहे ।
भाऊ माझा ॥८॥
— लेखन : अनिसा सिकंदर. दौंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
उत्कृष्ट लेखन मनःपूर्वक शुभेच्छा !