“आनंदकंद” वृत्तातील गझल
माझेच मागणे मज छळते अजून आहे
माझीच मी मलाही कळते अजून आहे
भेदीत जीवनाचे हे चक्रव्यूह सारे
झेलीत वार सारे लढते अजून आहे
मोहातल्या क्षणांचा आलेख रेखताना
वेडेपणास माझ्या हसते अजून आहे
मस्तीत सांजवेळी रंगीन आठवांचे
ते भाव भारलेले जगते अजून आहे
आभास चांदण्यांचे फसवेच जाणताना
स्वप्नात पौर्णिमा ती बघते अजून आहे
भारावल्या क्षणांचा बाजार मांडताना
हुंकार मीलनाचे स्मरते अजून आहे
भांबावल्या मला मी दूरात शोधताना
भासात मृगजळाच्या फसते अजून आहे
✍️ डॉ मीना बर्दापुरकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
लेखन शैली उतम