Wednesday, September 11, 2024
Homeलेखमाझी जडणघडण भाग १३

माझी जडणघडण भाग १३

आम्ही पाच – २

एका मुक्त, मोकळ्या, स्वतंत्र वातावरणात आम्ही पाच जणी वाढत होतो, घडत होतो. मुक्त, मोकळे वातावरण म्हणजे आम्ही स्वैर होतो, बेशिस्त होतो, मोकाट होतो असे मात्र नाही. आम्हा पाचही बहिणीत एकमेकात आणि घरात आई वडील, आजी यांच्याशी एक सुसंवाद होता. आम्ही मोकळेपणाने बोलू शकत होतो, प्रश्न विचारू शकत होतो, बालवयातल्या आणि नंतर समज येऊ लागल्यानंतरच्याही कितीतरी शंकांना, अडचणींना, हवं नको वाटणाऱ्या अनेक बाबींना आम्ही बिनधास्त मांडू शकत होतो आणि मुख्य म्हणजे, “अजून तू लहान आहेस, तुला काही कळत नाही” अशी असमाधानकारक अधांतरी उत्तरं आम्हाला कधीच मिळाली नाहीत.

मागे वळून पाहताना आज मला एक प्रकर्षाने जाणवते की मनातली वादळं, शंकांचं निरसन, जर घरातच आपल्या प्रिय आणि मोठ्या व्यक्तींकडून झालं तर ती व्यक्ती सक्षम आणि निर्भय बनते. स्वतःच्या चुकांची कबूली देण्याचंही बळ तिला मिळतं. निर्णय शक्तीची एक सर्वसाधारण प्रक्रिया तिच्या व्यक्तिमत्त्वात सहजपणे घडत जाते आणि किंकर्तव्यमूढतेपासून ती व्यक्ती आयुष्यभर दूर राहते. आम्हा पाचही बहिणींच्या बाबतीत हे निश्चितपणे घडलं.

घर लहान की मोठं हा प्रश्नच नसतो. आनंदाच्या क्षणी जिथे आख्ख घर नाचतं, गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत जे घर कुशीत घेतं, छोट्या-मोठ्या मन मोडून टाकणाऱ्या भावनांना जे घर पदरात घेतं तेच खरं सुरक्षित घर. अशा एका सुरक्षित घरात आम्ही वाढलो. “मुलीच्या जातीला हे शोभत नाही बरं का ?” अशी फट्टू वाक्यं आम्ही आमच्या घरात कधीच ऐकली नाहीत.
“तुला हेच करायचं आहे का ? कर मग. समोर येणाऱ्या अडचणींना तुझं तुलाच सामोरे जायचं आहे हे मात्र लक्षात ठेव. यथाशक्ती आम्ही तुझ्या पाठीशी राहूच.” असं प्रेरणा देणारही, सावध करणारही आणि आधार देणारं सामर्थ्य आम्हाला अशा शब्दांतून नक्कीच लाभलं.

एक आठवण मला सांगावीशी वाटते. ज्या सुंदर, मोठ्या, डोळ्यांमुळे हरवलेली छुंदा सापडू शकली तशाच माझ्या मोठ्या डोळ्यांनी मात्र मला एका वाईट क्षणी न्यूनगंड प्राप्त करून दिला. आमच्या गल्लीत एक कोंबड्या पाळून अंडी विकणारी मुस्लिम वयस्कर बाई राहायची. तिला आम्ही बटूबाई म्हणायचो. ती एकटीच राहायची. तिच्या आयुष्याविषयी फारशी कुणाला माहिती नव्हती पण अंडी विकण्याच्या निमित्ताने तिचा घरोघर संचार असायचा. ती काहीशी फटकळ आणि कर्कश्यही होती पण वाईट नव्हती. बरी होती. खेळता खेळता कधी कोणाला तहान लागली तर ती पटकन पाणीही प्यायला द्यायची पण त्या दिवशी मात्र मला तिचा अत्यंत राग आला. रविवार असावा. आमचा बालचमुचा लगोरीचा खेळ मस्त रंगात आला होता आणि त्याचवेळी माझ्याकडे बघून ती म्हणाली, “ए बटारे ! जरा इकडे ये तर..”
मोठ्या डोळ्यांची म्हणून हीने मला “बटारी” म्हणावे ? प्रचंड राग आणि प्रचंड दुखावल्यामुळे मी ताडताड जिना चढून घरी आले आणि खिडकीतूनच तिला जोरात म्हणाले, ”मला बटारी म्हणतेस तू कोंबडी चोर आहेस.” आणि जिजीच्या कुशीत शिरून मी बेफाम रडले.

माझं बालमन विदीर्ण झालं होतं. माझ्या आईचा माझ्या पाठीवर मायेचा हात होता आणि माझ्या चारही बहिणी माझ्या भोवती कडकडून भेदरल्यासारख्या उभ्या होत्या. त्यांच्याही डोळ्यात मला रडताना पाहून अश्रू जमले होते. एरवी आम्ही एकमेकींशी कितीही भांडत असू पण आमच्यापैकी कोणालाही बाहेरच्या कुणा व्यक्तीने दुखावलं तर मुळीच खपवून घेतलं जायचं नाही. अशा अनेक क्षणांनी त्यावेळी आम्हा पाचही जणींना ही एक जाणीव दिली होती की आमची पाच जणींची एक वज्रमूठ आहे. सगळ्या मतभेदांना, विचारांना, निराळ्या स्वभाव छटांना डावलूनही ही घट्ट मूठ कधीही सैल झाली नाही हे विशेष.

आता उषा—निशाही मोठ्या होत चालल्या होत्या. त्यांच्या जाणिवा बहरत होत्या. त्या जुळ्या असूनही त्यांच्यात काहीच साम्य नव्हतं. दिसण्यात, वागण्यात, स्वभावात, संपूर्णपणे त्या एकमेकींपासून भिन्न होत्या. काही ना काही किरकोळ कारणांनी सतत भांडायच्या. उषा जास्त आक्रमक होती. निशा मजबूत, दांडगी असली तरी ती तितकीच समंजसही होती. ”जाऊ दे !” वाली होती.
“चल आता ! शाळेत जायला उशीर होतोय आपल्याला” म्हणून भांडता भांडताच त्या एकमेकींचा हात घट्ट धरून शाळेला निघायच्या. त्यांच्या मागे दोन लांब, घट्ट वेण्या उडवत, ठुमकत छुंदा निघायची कारण त्या तिघींची शाळा आणि शाळेची वेळ एकच होती आणि या तिघींना असे एकत्र बघत असताना मला मी यांची मोठी बहीण अशी एक बलशील भावना स्पर्शून जायची. कधी ती सुखद असायची तर कधी थोडीशी त्रासदायक होई.

एखादे वेळेस मला उगीच वाटून जायचं की घरातली सगळी कठीण, अंग मेहनतीची, क्लिष्ट कामं मलाच करावी लागतात. रोज आईला पाट्यावर वाटण वाटून देणे, कधी घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून कचरा काढणं, उंच दोरीवर काठीने कपडे वाळत घालणे, रात्री गाद्या घालणे, आंब्याच्या सीझनमध्ये पातेलं भरून आंब्याचा रस काढणे, शिवाय जीजीचे तर फारच उद्योग असायचे. अनारशासाठीचे ओलसर तांदूळ जात्यावर दळताना तिच्या जात्याच्या खुंट्याला फिरवू लागणे, पावसाळ्यात पप्पा टोपली भरून “करंदी” आणायचे ती बारीक “करंदी” (हा एक कोलंबीचाच प्नकार) सोलत बसणे, शाळेला सुट्टी लागली, मे महिना आला की आमचं घर म्हणजे एक वर्कशॉपच होऊन जायचं. आजच्यासारखी मुलांसाठी भरणारी, व्यक्तिमत्व विकास घडवणारी शिबिरं वगैरे तेव्हा नव्हती. सुट्टीत घर हेच शिबीर व्हायचं. विविध उपक्रम राबवले जायचे या शिबीरात.

मे महिना म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यातली वाळवणं सुरू व्हायची. पोह्याचे पापड, उडदाचे पापड, साबुदाण्याच्या चिकवड्या, तांदळाच्या कुरडया, कमळाची देठं दह्यात भिजवून,गोल गोल चिरून वाळत घालणं, गवारीच्या शेंगा मीठ लिंबू तिखट लावून वाळवून त्याची भिशी करायची, ताकातल्या सांडगी मिरच्या असायच्याच. एक सारखं कुटणं, लाटणं, वाळत घालणं आणि संध्याकाळी परत आवरणं. या साऱ्याभोवती आमचं आख्ख घर गुंतलेलं असायचं आणि खास अलिबागहून मागवलेले कितीतरी शेर कडवेवाल निवडायचे. त्यातले चाडे दाणे वेगळे करायचे. वर्षभर लागणारा अत्यंत आवडता पदार्थ म्हणजे वालाचं बिरडं ! मग त्याची उस्तवावर नको का करायला ? शिवाय हे स्वत:च्या घरापुरतंच मर्यादित नसायचं. गल्लीत एकमेकांकडे पापड लाटायला जाण्याचीही एक वेगळीच मजा असायची. प्रत्येकाच्या सोयी, सवलतीप्रमाणे “पापडदिन” ठरायचा. संध्याकाळी घरी परतताना त्याच पापडांचा वानवळा असायचा. उषा—निशा यथाशक्ती आणि गंमत म्हणूनही आवडीने या कामात सहभागी असायच्या. आमच्या बहिणींमध्ये छुंदा ही अत्यंत हुशार आणि अभ्यासू. सतत कुठल्या ना कुठल्या परीक्षाच देत असायची. त्यामुळे सहजच तिला या घरगुती कामांपासून रजा मिळत असे. उषाचे वेगळेच, तिचे तिचेही उपक्रम असायचे. कोऱ्या कागदावर चित्रं काढायचा तिला फार नाद होता. तसे तिचे अनेक उद्योग असायचे आणि घरभर पसारा असायचा आणि तो सगळा पसारा निशा आणि आई सतत आवरत असायच्या. ताई आजोबांकडेच राहायची पण आमच्यात असली की मात्र अगदी सारं काही नीटनेटकेपणाने करायची. आजोबांच्या निरनिराळ्या गंमती सांगायची. अखंड बडबड असायची तिची. पण ती एक वेगळीच एन्टरटेनमेंट होती.

मे महिन्याच्या सुट्टीत आई भरतकाम, विणकाम, शिवणकामही आम्हा मुलींना शिकवायची. त्यात माझी प्रगती शून्य असली तरी ताईचा मात्र अव्वल नंबर लागायचा.
निशा लहान असली तरी तिला या साऱ्या कामांची आवड होती की नाही हे माहीत नाही पण ती अत्यंत मेहनती होती. तिला लहानपणापासूनच प्रचंड उरक होता. उपजतच तिच्यात एक व्यवस्थापनेचा गुण होता. तिचाही घरकामातला वाटा आणि सहभाग मोठाच असायचा. शिवाय मी तिला माझी काही कामे पासऑन करायची. माझ्या बॉसिंग करण्याच्या पद्धतीनुसार पण तिने कधीही आदळआपट केली नाही. पप्पा ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी त्यांची बॅग तर तीच भरायची आणि पपा तिलाच विचारायचे, “ निशू आज तू बॅगेत नॅपकिन ठेवायला विसरलीस. ”त्यावेळी मला पपांचा रागही यायचा. निशा बिचारी वाटायची. ईवलीशी तर होती ती !

पण अख्खा दिवस काम करून थकलेल्या आईचे पाय मात्र उषाच दाबून द्यायची. पप्पांचं डोकंही दाबून द्यायची. त्यांना झोप लागावी म्हणून म्हणायची, “थांबा तुम्हाला मी एक छान गोष्ट सांगते,” मग तिची गोष्ट सुरू व्हायची.
“एक होता निजाम..”
अशीच तिच्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात असायची आणि हा तिचा निजाम मुक्तपणे पृथ्वीपासून चंद्रापर्यंत प्रवास करायचा. तो कधी शाळेतही जायचा. कधी शिक्षक असायचा तर कधी विद्यार्थी. कधी चार पट्ट्यांचा मार खायचा तर कधी दहा पट्ट्यांचा मार कुणाला द्यायचा पण तिचा निजाम शूर होता, लढवय्या होता, पराक्रमी होता आणि तितकाच हळवा आणि स्वप्नाळू होता. उषाच्या कथेतला हा असा बहुरूपी, बहुरंगी, बहुढंगी निजाम आज उषा या जगात नसली तरी आमच्या मनात मात्र अमर राहिला आहे.

असो ! अजून खूप बाकी आहे. मन अनंत आठवणींनी तुडुंब भरलेलं आहे. या गाठोड्यात आयुष्यभराचा पसारा बांधून ठेवलाय. एकदा का ते उघडलं की त्यात कसं हरवून जायला होतं….
क्रमश:

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments