Thursday, December 5, 2024
Homeलेखमाझी जडणघडण भाग : २२

माझी जडणघडण भाग : २२

“वहिनी”

बंडू आणि बेबी ची “वहिनी” म्हणून गल्लीतले सारेच त्यांना वहिनीच म्हणायचे. आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात अनेक स्त्रिया माझ्या जीवनात आल्या. नात्यातल्या, शेजारपाजारच्या, काही सहज ओळखीच्या झालेल्या, काही शिक्षिका, काही मैत्रिणी,
लग्नाआधीच्या, लग्नानंतरच्या, एका संस्थेच्या माध्यमातून काम करण्याच्या निमित्ताने भेटलेल्या तळागाळातल्या स्त्रिया, घरातल्या मदतनीस, ठिकठिकाणच्या प्रवासात ओळख झालेल्या, निराळ्या धर्माच्या, संस्कृतीच्या, सहज भेटलेल्या अशा कितीतरी सबल, दुर्बल, नीटनेटक्या, गबाळ्या, हुशार, स्वावलंबी, अगतिक, असहाय्य, परावलंबी, जिद्दी, महत्त्वाकांक्षी तर कुठलंच ध्येय नसलेल्या, वारा वाहेल तशा वाहत जाणाऱ्या स्त्रिया मला ठिकठिकाणी भेटल्या पण लहानपणीच्या वहिनींना मात्र माझ्या मनात आजही एक वेगळाच कोपरा मी सांभाळून ठेवलेला आहे. त्यावेळी वहिनींच्या व्यक्तिमत्त्वातलं जे जाणवलं नाही त्याचा विचार आता आयुष्य भरपूर अनुभवलेल्या माझ्या मनाला जाणवतो आणि नकळत त्या व्यक्तिमत्त्वासमोर माझे हात जुळतात.

विस्तृत कुटुंबाचा भार वहिनींनी पेलला होता. त्यांचं माहेर सातार्‍याचं. तसा माहेरचाही बहीण भावंडांचा गोतावळा काही कमी नव्हता पण सातारचे बापूसाहेब ही एक नावलौकिक कमावलेली असामी होती. साहित्यप्रेमी, नाट्यप्रेमी म्हणून सातारकरांना त्यांची ओळख होती आणि त्यांची ही लाडकी कन्या म्हणजे आम्ही हाक मारत असू त्या वहिनी. वहिनींनाही बापूसाहेबांचा फार अभिमान होता. पित्यावर त्यांचं निस्सीम प्रेम होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलाबाळांना घेऊन त्या माहेरपणाला सातारी जात आणि परत येत तेव्हा त्यांच्यासोबत धान्य, कपडे, फळे, भाज्या, मिठाया विशेषत: कंदी पेढे यांची बरीचशी गाठोडी असत. वहिनींचा चेहरा फुललेला असे आणि त्यांच्या मुलांकडून म्हणजेच आमच्या सवंगड्यांकडून आम्हाला साताऱ्याच्या खास गमतीजमती ऐकायलाही मजा यायची.

अशी ही लाडकी बापूसाहेब सातारकर यांची कन्या सासरी मात्र गणगोताच्या गराड्यात पार जुंपलेली असायची.

आमचं कुटुंब स्वतंत्र होतं. आई-वडील, आजी आणि आम्ही बहिणी. मुळातच वडील एकटेच असल्यामुळे आम्हाला फारशी नातीच नव्हती, विस्तारित नात्यांच्या एकत्र कुटुंबात राहण्याचा आम्हाला अनुभवच नव्हता. त्या पार्श्वभूमीवर या मुल्हेरकरांचे कुटुंब नक्कीच मोठं होतं. बाबासाहेब आणि वहिनी या कुटुंबाचे बळकट खांब होते. आर्थिक बाजू सांभाळण्याचं कर्तव्य बाबांचं आणि घर सांभाळण्याची जबाबदारी वहिनींची. घरात सासरे, नवऱ्याची म्हातारी आजारी आत्या, दीर, नणंद आणि त्यांची पाच मुलं. धोबी गल्लीतलं त्यांचं घर वडिलोपार्जित असावं. बाबासाहेबांनी त्यावर वरचा मजला बांधून घेतला होता. वहिनींच्या आयुष्यात स्वत:चं घर हा एकच हातचा मौलिक असावा.

त्यावेळी दोनशे रुपये महिन्याची कमाई म्हणजे खूप होती का ? बाबासाहेब आरटीओत होते. त्यांचाही स्वभाव हसरा, खेळकर, विनोदी आणि परिस्थितीला टक्कर देणारा होता. बाबासाहेब आणि वहिनींच्यात त्याकाळी घरगुती कारणांमुळे धुसफुस होतही असेल पण तसं त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि त्याच सामर्थ्यावर वहिनी अनंत छिद्रे असलेला संसार नेटाने शिवत राहिल्या. काहीच नव्हतं त्यांच्या घरात. झोपायला गाद्या नव्हत्या, कपड्याचं कपाट नव्हतं, एका जुनाट पत्र्याच्या पेटीत सगळ्यांचे कपडे ठेवलेले असत. म्हातारी आजारी आत्या— जिला “बाई” म्हणायचे.. त्या दिवसभर खोकायच्या. सासरे नानाही तसे विचित्रच वागायचे पण बंडू बेबी आणि बाबासाहेब या भावंडांचं मात्र एकमेकांवर खूप प्रेम होतं. बेबीला तर कितीतरी लहान वयात जबाबदारीची जाणीव झाली असावी. ती शाळा, अभ्यास सांभाळून वहिनींना घर कामात अगदी तळमळीने मदत करायची. खरं म्हणजे तिच्या आणि माझ्या वयात फारसं अंतरही नव्हतं पण मला ज्या गोष्टी त्यावेळी येत नव्हत्या त्या ती अतिशय सफाईदारपणे तेव्हा करायची. त्यामुळे बेबी सुद्धा माझ्यासाठी एक कौतुकाची व्यक्ती होती. शिवाय त्यांच्या घरी सतत पाहुणेही असायचे. त्यांच्या नात्यातलीच माणसं असत. काहींची मुलं तर शिक्षणासाठी अथवा परीक्षेचं केंद्र आहे म्हणून त्यांच्या घरी मुक्कामी सुद्धा असायची. प्रत्येक सण त्यांच्याकडे पारंपारिक पद्धतीने, साग्रसंगीत साजरा व्हायचा. दिवाळी आणि गणपती उत्सवाचं तर फारच सुरेख साजरीकरण असायचं. खरं सांगू ? लहानपणी बाह्य गोष्टींचा पगडा मनावर नसतोच. भले चार बोडक्या भिंतीच असतील पण त्या भिंतीच्या मधलं जे वातावरण असायचं ना त्याचं आम्हाला खूप आकर्षण होतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रस्थानी वहिनी होत्या.

किती सुंदर होत्या वहिनी ! लहानसाच पण मोहक चेहरा, नाकीडोळी नीटस, डोळ्यात सदैव हसरे आणि प्रेमळ भाव, लांब सडक केस, ठेंगणा पण लवचिक बांधा, बोलणं तर इतकं मधुर असायचं …! संसाराची दिवस रात्रीची टोकं सांभाळताना दमछाक झाली होती त्या सौंदर्याची.

अचानक कुणी पाहुणा दारी आला की पटकन त्या लांब सडक केसांची कशीतरी गाठ बांधायच्या, घरातलंच गुंडाळलेलं लुगडं, सैल झंपर सावरत अनवाणीच लगबगीने वाण्याकडे जायच्या. उधार उसनवारी करून वाणसामान आणायच्या आणि आलेल्या पाहुण्यांना पोटभर जेवायला घालून त्याने दिलेल्या तृप्तीच्या ढेकरानेच त्या समाधानी व्हायच्या.

वहिनी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा. साधं “लिंबाचं सरबत सुद्धा” अमृतासारखं असायचं. त्यांच्या हातच्या फोडणीच्या भाताची चव तर मी आजही विसरलेली नाही. अनेक खाद्यपदार्थांच्या चवीत त्यांच्या हाताची चव मिसळलेली असायची. मला आजही आठवतं सकाळचे उरलेले जेवण लहान लहान भांड्यातून एका मोठ्या परातीत पाणी घालून त्यात ठेवलेलं असायचं, त्यावर झाकण म्हणून एखादा फडका असायचा. शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर मी कित्येकदा चित्रा, बेबी बरोबर त्या परातीतलं सकाळचं जेवण जेवलेली आहे. साधंच तर असायचं. पोळी, कधी आंबट वरण, उसळ, नाहीतर वालाचं बिरडं, किंवा माशाचं कालवण पण त्या स्वादिष्ट जेवणाने खरोखरच आत्म्याची तृप्ती व्हायची. त्या आठवणीने आजही माझ्या तोंडाला पाणी सुटतं !

लहानपणी कुठे कळत होतं कुणाची आर्थिक चणचण, संसारातली ओढाताण, काळज्या, चिंता. एका चपातीचीही वाटणी करणे किती मुश्कील असतं हा विचार बालमनाला कधीच शिवला नाही. घरात जशी आई असते ना तशीच या समोरच्या घरातली ही वहिनी होती. आम्हाला कधीच जाणवलं नाही की वहिनींच्या गोऱ्यापान, सुरेख, घाटदार मनगटावर गोठ पाटल्या नव्हत्या. होत्या त्या दोन काचेच्या बांगड्या. त्यांच्या गळ्यात काळ्या मण्याची सुतात ओवलेली पोतही आम्हाला सुंदर वाटायची. त्यांच्या पायात वाहणा होत्या की नव्हत्या हे आम्ही कधीच पाहिले नाही.

आम्हाला आठवते ते सणासुदीच्या दिवशी खोलीभर पसरून ठेवलेला सुगंधित, खमंगपणा दरवळणारा केवढा तरी चुलीवर शिजवलेला स्वयंपाक आणि पाहुण्यांनी भरगच्च भरलेलं ते घर आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद लुटणाऱ्या त्या पंगती आणि हसतमुखाने आग्रह कर करून वाढणाऱ्या वहिनी. हे सगळं त्यांना कसं जमत होतं हा विचार आता मनात येतो.

एकदा मला टायफॉईड झाला होता. तोंडाची चव पार गेली होती. वहिनी रोजच माझ्याजवळ येऊन बसायच्या. एक दिवस मी त्यांना म्हटलं, “शेवळाची कणी नाही का केली ?” दुसर्‍या दिवशी त्या माझ्यासाठी वाटीभर “शेवळाची कणी” घेऊन आल्या. अत्यंत किचकट पण स्वादीष्ट पदार्थ. पण वहिनी झटपट बनवायच्या.

काळ थांबत नाही. काळाबरोबर जीवन सरकतं. नाना, बाई स्वर्गस्थ झाले. बाबासाहेबांनी यथाशक्ती बहीण भावाला त्यांना पायावर उभे राहण्यापुरतं शिक्षण दिलं. बेबी च्या लग्नात आईच्या मायेने वहिनींनी तिची पाठवणी केली. आयुष्याच्या वाटेवर नणंद भावजयीत वाद झाले असतील पण काळाच्या ओघात ते वाहून गेलं. एक अलौकिक मायलेकीचं घट्ट नातं त्यांच्यात टिकून राहिलं. माहेरचा उंबरठा ओलांडताना दोघींच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. विलक्षण वात्सल्याचं ते दृश्य होतं. बेबी आजही म्हणते ! ”मी माझी आई पाहिली नाही. मला माझी आई आठवत नाही पण वहिनीच माझी आई होती.”

धन, संपत्ती, श्रीमंती म्हणजे काय असतं हो ? शब्द, भावनांमधून जे आत्म्याला बिलगतं त्याहून मौल्यवान काहीच नसतं.

बाबा वहिनींची मुलंही मार्गी लागली, चतुर्भुज झाली. जुनं मागे टाकून वहिनींचा संसार असा नव्याने पुन्हा फुलून गेला. पण वहिनी त्याच होत्या. तेव्हाही आणि आताही.

बाबासाहेब निवृत्त झाले तेव्हा काही फंडांचे पैसे त्यांना मिळाले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तेव्हा ते म्हणाले, ”सहजीवनात मी तृप्त आहे. मला अशी सहचारिणी मिळाली की जिने माझ्या डगमगत्या जीवन नौकेतून हसतमुखाने सोबत केली. माझ्या नौकेची वल्ही तीच होती. मी तिच्यासाठी काहीच केलं नाही. तिचं डोंगराएवढं ॠण मी काही फेडू शकणार नाही पण आज मी तिच्या भुंड्या मनगटावर स्वतःच्या हाताने हे सोन्याचे बिलवर घालणार आहे.“

त्यावेळचे वहिनींच्या चेहऱ्यावरचे भाव मी कोणत्या शब्दात टिपू ? पण त्या क्षणी त्यांच्या परसदारीचा सोनचाफ्याचा वृक्ष अंगोपांगी फुलला होता आणि त्या कांचन वृक्षाचा दरवळ आसमंतात पसरला होता. तो सुवर्ण वृक्ष म्हणजे वहिनींच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होता आणि तोही जणू काही अंतर्यामी आनंदला होता.

अशोक (त्यांचा लेक) एअर इंडियात असताना त्याने वहिनी आणि बाबासाहेबांसाठी लंडनची सहल आयोजित केली. विमानाची तिकिटे तर विनाशुल्क होती. बाकीचा खर्च त्यांनी केला असावा. वहिनींना मुळीच जायचं नव्हतं पण सगळ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी अखेर जाण्याचे मान्य केले. वहिनींच्या आयुष्यात असा क्षण येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते पण त्याचवेळी त्यांच्या प्रियजनांचा आनंदही खूप मोठा होता.

त्या जेव्हा लंडनून परत आल्या तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होते. “धोबी गल्ली ते लंडन” हा वहिनींच्या आयुष्यातला अकल्पित टप्पा होता तो ! मी त्यांना विचारलं, ”कसा वाटला राणीचा देश ?”
तेव्हा त्या हात झटकून म्हणाल्या, ”काय की बाई, एक मिनिटंही मी बाबासाहेबांचा हात सोडला नाही. कधी घरी जाते असं झालं होतं मला !“
त्यावेळी मात्र वहिनींकडे पाहताना “इथेच माझे पंढरपुर” म्हणणारी ती वारकरीणच मला आठवली.
“ते जाऊ दे ग! हे बघ सकाळी थोडी तळलेली कलेजी केली होती. खातेस का ?”
त्या क्षणी मला आठवलं ते मोठ्या परातीत पाणी घालून झाकून ठेवलेलं सकाळचं उरलेलं चविष्ट जेवण !
या क्षणी माझ्याजवळ होती ती तीच अन्नपूर्णा वहिनी. प्रेमाने खाऊ घालणारी माऊली…

आज वहिनी नाहीत पण जेव्हा जेव्हा मी काटेरी फांदीवर उमललेलं टवटवीत गुलाबाचे फुल पाहते तेव्हा मला वहिनींचीच आठवण येते..
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. त्या वहिनी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या, इतकं सुंदर शब्दांकन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !