नलुआत्या— बेबीआत्या
आम्ही राहत असलेल्या गल्लीत दोन मथुरे नावाचे परिवार होते. एक कोपऱ्यावरचे मथुरे आणि दुसरे शेजारचे मथुरे. त्यांचे एकमेकांशी चुलत नाते होते पण फारसे सख्या मात्र नव्हते. एकमेकांविषयी दोघेही बोटं मोडूनच बोलायचे. कोपऱ्यावरचे मथुरे यांचं फारसं कुणाशी सख्य नव्हतं पण दुसऱ्या मथुरेंच्या घरी आम्हा मुलांचा अड्डा जमायचा आणि त्याला कारण होतं “बेबी आत्या आणि नलुआत्या”. त्यांच्या आईंना आम्ही “काकी” म्हणायचो. सावळ्या, उंच, कृश बांध्याच्या, व्यवस्थित चापूनचोपून सुती नऊवारी लुगडं नेसणाऱ्या काकींचा तसा गल्लीत दरारा होता. काकी पाकनिपुण होत्या. त्यांच्या हातची मसुराची आमटी मला फार आवडायची. ढणढण पेटलेल्या चुलीतली लाकडं थोडी बाहेर काढून बीडाच्या तव्यावर सुरेख, मऊसूत तेलावर लाटलेल्या सुंदर पुरणपोळ्या निगुतीने भाजत. तो केशर वेलचीयुक्त सुगंध आजही माझ्या नाकात आहे. काकी उपासतापास, अनेक धार्मिक व्रतवैकल्ये करायच्या. सगळ्यांशी फार जवळिकतेने नसल्या तरी गोडच बोलायच्या.
मात्र काकींविषयी गल्लीत कुणकुण असायची. काकी म्हणे पहाटेच्या प्रहरी उठून ओलेत्याने पिंपळाच्या वृक्षाभोवती उलट्या फेऱ्या मारतात. त्यांना मंत्रतंत्र ज्ञान कळतं. त्या करणी करतात. “करणी कवटाळ काकी” अशी संबोधनं त्यांच्या बाबतीत वापरलेली कानावर यायची पण त्याचबरोबर त्या ही सर्व कर्मकांडं का करतात याच्या कारणांचीही चर्चा व्हायची.
“दोन प्रौढ कुमारिका आहेत ना घरात! त्यांची लग्न कुठे जमत आहेत ? वयं उलटून गेली आता कोण यांच्याशी लग्न करणार आणि जमलं तरी घोडनवऱ्याच ना ?” असं काहीबाही अत्यंत अरोचक भाष्य कानावर पडायचं. ते गलिच्छ वाटायचं आणि ते ज्यांच्या अनुरोधाने उच्चारलं जायचं त्या नलुआत्या आणि बेबीआत्या आम्हाला तर फारच आवडायच्या. त्याचे कारण, वयातलं अंतर विसरून त्या आमच्याबरोबर सापशिडी, गायचोळा, सागरगोटे, काचापाणी, पत्ते असे अनेक बैठे खेळ अतिशय मनापासून खेळायच्या. आम्हाला काही बेबी आत्याचा काळा वर्ण, बोजड कुरळे केस अथवा नलुआत्याचे जरा जास्तच पुढे आलेले दात, किरकोळ शरीरयष्टी, विरळ केस हे सारं कुरूप अथवा असुंदर आहे असं वाटायचंही नाही. खरं सांगायचं तर बालमनाला भावणारं, आकर्षित करणारं जे काही असतं ना ते समाजाच्या वैचारिक चौकटीत बसणारं नसतंच. आमच्यासाठी नलूआत्या आणि बेबी आत्या तशा होत्या. कुठलंही रक्ताचं नातं नव्हतं. मैत्रिणी म्हणाव्यात तर वयात खूप अंतर होतं पण प्रत्येक वेळी नात्याला नाव असलंच पाहिजे का ? वय, रूप यापलिकडचं, नावाशिवाय असलेलं हे नातं मात्र खूप हवंस, सुरक्षित आणि गोड होतं. बालपणीचा एक आनंददायी कोपरा होता.
माझी मोठी बहीण अरुणाताई हिला तर मी “मुक्काम पोस्ट बेबी आत्या आणि नलुआत्या” असंच म्हणायचे. काय असेल ते असो पण ताईचं आणि त्यांचं विशेष नातं होतं. खरं म्हणजे ताई तर मुंबईला आजोबांकडे राहायची पण जेव्हा ती घरी यायची तेव्हा पहिली धावत बेबीआत्या— नलुआत्यांकडे जायची आणि त्याही तिच्या आवडीचं, ती येणार म्हणून काही मुद्दामहून केलेलं तिला प्रेमाने भरवायच्या. पुढे घडलेल्या ताईच्या प्रीती विश्वात या दोघींचा सक्रिय वाटा होता हेही नंतर कळले. दोघांच्याही नंतरच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतरे, स्थलांतरे झाली पण हा जिव्हाळा, हे प्रेम आयुष्यभर टिकून राहिले हे विशेष. एकमेकांना भेटण्याची त्यांची प्रचंड धडपड मी अनुभवलेली आहे. तो आनंद, त्या मिठ्या, अश्रु आजही दृष्टीत आहेत. काय होतं हे ? काय असतं हे ? कोणतं नातं ?
नलुआत्या आणि बेबीआत्या या दोघीही कलाकारच होत्या. सुरेख भरतकाम करायच्या. त्यांच्या दारावर लावलेल्या एका पडद्यावर एक सुरेख रेशमाच्या धाग्याने विणलेली बाई म्हणजे उत्कृष्ट भरतकामाचा नमुना होता. संक्रांतीत चौफेर फुललेल्या काट्यांचा, पांढराशुभ्र तिळगुळ त्या करायच्या. ती कल्हई लावलेली पितळेची परात, मंद पेटलेली शेगडी, थेंब थेंब टाकलेलं साखरेचं पाणी आणि त्यावर हळुवार हात फिरवत फुलत चाललेले ते तिळाचे दाणे माझ्या नजरेत आजही आहेत. इतका सुंदर तिळगुळ मी त्यानंतर कधीच पाहिला नाही.
मनाच्या स्मरण पेटीत ठळक गोष्टी तशाच्या तशा टिकल्या असल्या तरी अनेक गोष्टी पुसूनही गेल्या असतील पण आज हे लिहिताना मला वेगळ्या जाणिवा जाणवत आहेत. माझं आणि माझ्या सवंगड्यांचं त्यांच्याभोवती एक बालविश्व गुंफलेलं होतंच पण त्या दोघींच्या भावविश्वात आम्ही होतो का ? तेवढी आमची मानसिक क्षमता नव्हतीच. त्या वयात तेव्हा एवढेच कळत होतं की या दोघींसाठी “वर संशोधन” चालू आहे आणि त्यांची लग्नं काही जमतच नाहीत. “त्यांची लग्नं” हा गल्लीतला त्यावेळचा महत्त्वाचा चर्चेचा विषय होता. नकाराच्या अनंत फेऱ्यात त्यांच्या मनाच्या काय चिंध्या झाल्या असतील इथपर्यंत तेव्हा आम्ही पोहोचू शकलो नाही. पण घोडनवऱ्या, प्रौढ कुमारिका हे शब्द मात्र खूप सतावायचे.
त्याच काळात एक धक्कादायक घटना गल्लीत घडली ती म्हणजे ठाण्यातील प्रसिद्ध “मराठे सोनारां”च्या दुकानात काम करणाऱ्या भाई नावाच्या तरुणा बरोबर बेबीताईने पळून जाऊन लग्न केले. एका उच्च जातीय मुलीने एका बॅकवर्ड जातीच्या मुलाशी अशा पद्धतीने लग्न करणं हा फार मोठा गुन्हाच होता जणू ! जबरदस्त धक्का होता. काकीने तर अंथरूणच धरलं.
“समाजात तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही..”
“काकीच्या उपवासतापासाचा काय परिणाम झाला ? करण्या केल्या ना ? भोगा आता ! असं दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःचं भलं होत नसतं..”
अशा अनेक उलटसुलट भाष्यांचे प्रवाह कानावर आदळत होते. काहीसं नकोसं, भयंकर घडले आहे एवढंच जाणवत होतं आणि नलुआत्याची यावर काय प्रतिक्रिया होती ? तिला दुःख, आनंद, द्वेष काय जाणवत होतं ?
ती इतकंच म्हणाल्याचं मला आठवतंय,” बरं झालं ! निदान बेबीचं लग्न तरी झालं.”
या वाक्याच्या आत तिच्या मनातलं, “माझं काय आता ?” हे ऐकू येण्याचं कदाचित माझं वय नव्हतं.
मात्र या घटनेनंतर नलुआत्याने वर संशोधन या विषयात पास होण्यासाठी अनेक धाडसी प्रयोग केले. कुरूपत्वात भर टाकणारे पुढे आलेले दात दंतचिकित्सकाकडे जाऊन काढून घेतले. किती वेदना तिने सहन केल्या. त्यावेळी या शस्त्रक्रिया कुठे प्रगत होत्या ? असं काही करून घेण्याचा ट्रेंडही नव्हता. यावरही समाजाचे कुत्सित फिदीफिदीच असायचे. डोक्यावर कृत्रिम केसांचा भारही नलुआत्याने चढवला. छान, तलम, रंगीत साड्या नेटकेपणाने आणि जाणीवपूर्वक ती नेसू लागली. आहाराकडे लक्ष देऊ लागली. कपोल, कटी, वक्ष या अवयवांची जपणूक करू लागली. या नव्या नलुआत्याच्या आतली नलुआत्या मात्र कुठेतरी हरवत चाललेली आहे असे त्यावेळी वाटले. कधीकधी ही नवी नलुआत्या खूप केविलवाणी, खचलेली ही वाटायची. मात्र या तिच्या सर्व प्रयत्नांची फलश्रुती परिणामकारक झाली. अखेर स्वजातीतला, मध्यमवर्गीय, नोकरी असलेला, संसाराची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम असणाऱ्या एका साध्या परिस्थितीतल्या कुटुंबातल्या,प्रथमवर प्रौढवयीन, सज्जन मुलाशी नलुआत्याचे लग्न जमले.
“चि. सौ. कां. नलिनी मथुरे” असे पत्रिकेवर नाव झळकले आणि समस्त गल्लीने या अति प्रतिक्षित विवाह सोहळ्यास जातीने हजेरी लावून “शुभमंगल सावधान” म्हणून आनंदाने मंगलाक्षता उधळल्या.
या विवाहास आमंत्रण नसतानाही बेबीआत्याने चोरून हजेरी लावली होती आणि नलुआत्याने तिला भर मांडवात मिठी मारली होती— हे दृश्य मी आजही विसरलेले नाही.
या सगळ्या घटनांचा आज जेव्हा मी विचार करते तेव्हा त्याविषयी खूप काही बोलावसं वाटतं.
बेबीआत्याने खालच्या जातीतल्या मुलाशी पळून जाऊन लग्न केलं हे चुकलं का ? जातीधर्माचा इतका पगडा का असावा की तो गुन्हाच ठरावा ? ती असहाय्य होती म्हणून तिच्या हातून हे अविवेकी कृत्य घडले का ? ती समाजाच्या दृष्टीने सुखी नसेलही पण तिने तिच्या आयुष्याशी केलेली तजजोड तिच्यासाठी समाधानकारक असेलही. यात जातीचा संबंध कुठे येतो ?
त्यावेळी लपत छपत एक विचार माझ्या मनात आला होता की मुलीचं लग्न जमणं, ते होणं किंवा न होणं हे इतकं मोठं आयुष्याची उलथापालथ करणारं आहे का ? पुढे भविष्यात आपल्यावरही जर अशी वेळ आली तर ? घोडनवरी, प्रौढ कुमारिका ही कळकट विशेषणे आपल्या पदरी आली तर ? तर यावर मात करायला हवी. व्यक्तिमत्त्वाची मजबूत घडण करून स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे. समाजाच्या अशा हीन प्रहाराचे बळी न ठरता वेगळ्या वाटेवरून जाता आले पाहिजे, वेगळे आदर्श निर्माण करायला हवेत.
प्रातिनिधिक स्वरूपात जेव्हा मी बेबी आत्या आणि नलुआत्यांना पाहते तेव्हा जाणवतं की त्यांच्यात अनेक कला होत्या. त्या कलांना त्याकाळी वाव मिळाला असता तर किंवा त्यांनीच त्यांच्यातील असलेल्या गुणांचा आदर राखून त्यांना अधिक प्रगत करून एक समर्थ आयुष्याची वाट आखली असती तर ? स्वसन्मान, स्वतःची ओळख मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर ? कदाचित त्या काळासाठी ते आव्हान असेल पण अशक्य होते का ? केवळ लग्न होणे ही एकमेव इतिश्री होती का आयुष्याची ? आज मुलींसाठी बदललेला काळ अनुभवत असताना हे तुलनात्मक विचार मनात जरूर येतात. आज लिव्ह—ईन—रीलेशनपर्यंत पर्यंत काळ पुढे गेलेला आहे. पण त्याचबरोबर अजूनही “लग्न” या विषयावर व्हावे तितके विचारमंथन झालेले दिसत नाही. समाजाच्या डोळ्यातली भिंगं व्हावी तितकी स्वच्छ झालेली वाटत नाहीत. “प्रौढ कुमारिका” या शब्दामागचं भीषण वास्तव निपटलेलं नाही वाटत.
पण बालपणीच्या या घटनेनंतर स्त्रीसक्षमता म्हणजे काय या विचारांचा एक झरा माझ्या मनात त्या वेळेपासून उसळला होता हे नक्की.
I WILL NEVER GIVE UP हे मात्र मी नकळत ठरवलं होतं…
क्रमश:
— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
बेबी आत्या व नलुआत्या वाचताना त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, खेळकरपणा, तुमच्याशी असलेले मैत्रीचे नाआते,त्याच्या बरोबर घालवलेले बालपणी क्षण,
वाचायला मिळाले. खरोखर मैत्री साठी जात, धर्म, रंग रुप, श्रीमंत, गरिब, वय असे कुठलेही बंधन नसते मन जुळण, विचार जुळणे, महत्त्वाचे.
लग्न या विषयावर म्हणायच तर लग्न लवकर होणे किंवा प्रौढावस्थेत होणे, हे महत्त्वाचे नसून त्या झालेल्या लग्नापासून आपण किती सुखी, समाधानी, आनंदी आहोत,
आपल्या इच्छित व्यक्ती सोबत लग्न करणेही गैर नाही. पण दोघांकडून होकार हवा. सहज तर मिळत नाही ,पण सांगा भेट घालून दया, हटट करा, मनवा, पण पळून जाऊ नये. मुलींनी आईवडिलांचा विचार करायला च हवा. तुम्ही तर सुखी (काही) पण आयुष्य भर आईवडिलांना मान खाली घालावी लागते.
आजच्या काळात लिव्ह इध रिलेशनशिपमध्ये पण अनेक धोके आहेत, लग्न संस्था हा गंभीर विषय झाला आहे त्या विषयी समुपदेशन अतिशय गरजेचे आहे.
राधिकाताई बेबी आत्या व नलू आत्या यांचा सहवास तुम्हाला तुम्ही लहान असताना लाभला तरीहि तुम्हाला त्यांच्याविषयीच्या लहान सहान गोष्टीही आठवत आहेत. आणि त्या तुम्ही अगदी सहजपणे ओघवत्या शब्दांत सांगितल्या आहेत. लेख वाचताना या दोनही व्यक्तींचे स्वभाव कळतात. अप्रतिम शब्दांकन.
खरे आहे. पूर्वी प्रौढ कुमारिकांचा प्रश्न अगदी लक्षात येण्यासारखी होता.राधिकाताईंनी फारच योग्य प्रकारे मांडला आहे.छान लिहिले आहे.सर्व काही हुबेहुब.
बेबी आत्या व नलू आत्या यांच्यामुळे एका मथुरेकडे मुलांचा अड्डा असायचा . बेबी आत्यांनी त्यांचा स्वतःचा वेगळा विचार करून आपले वैवाहीक जीवन मार्गी लावले , यात गैर काहीच नाही . पण नंतर तरी ते समाजाभिमुख होणे हे नैतिक दृष्ट्या गरजेचे असते .
व्यक्ती चित्रण वाचताना प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव चित्रण न कळत होते , त्यातून माणूस कळतो. आता लिव्ह इन रिलेशन चा काळ आहे . काळानुरूप माणसाने आपले विचार व वर्तन हे मर्यादेत राहून बदलले पाहिजे , असे मला वाटते. व्यक्तिचित्रण म्हणून बेबी – नलू आत्या वाचनीय नक्कीच आहे