नमस्कार मंडळी.
आजच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने पुढे काही कविता सादर करीत आहे.
– संपादक
१. मकर संक्रांत
सूर्य येता मकरवृत्ती
येतसे मकरसंक्रांती
संपुनी हे दक्षिणायन
सुरू झाले उत्तरायण – १
सण संक्रांतीचा हो जुना
सुरू सुगीचा तो महिना
तीळगूळ देऊ सर्वांना
गोडीने जपुया नात्यांना – २
नवविवाहित यौवना
घाली हलव्यांचा दागिना
लुटुनी विविध वाणांना
सौभाग्याची करी कामना – ३
दिस वाढे तिळातिळाने
वेढे जग थंडीधुक्याने
वाढो उर्जा तिळगुळाने
सांगे श्रद्धा प्रेमभराने – ४
— श्रद्धा जोशी. डोंबिवली (पूर्व)
२. तिळगुळ
मकर संक्रांतीचा सण गोड
तीळ गुळाचा गोडवा आयुष्यभर
तीळाची माया जपुया सारे
गुळाचा गोडवा पुरतो आयुष्यभर ॥१॥
तीळ गुळ घ्या गोड बोला
मंत्र शिकवतो हा सण
नाती जपुया आपण
संक्रांतीचा संदेश देतो सण ॥२॥
गुलाबी थंडीत पतंग उडतो
उंच भरारी घेऊया शिकवतो
आयुष्यात उंच स्वप्ने पाहुया
पतंग आपल्याला भरारी शिकवतो ॥३॥
सवाष्णीसाठी हा सण पर्वणी
वाण देती त्या घरोघरी
दान देऊन पुण्य वाढवती
तीळगुळ वाटती हो घरोघरी ॥४॥
भांडणे सारी विसरुया
नाती अधिक दृढ करुया
स्नेह वाढुवूया आपल्यातला
गोडवा नात्यात आणुया ॥५॥
द्बेष, राग, मत्सर दुर आपण सारु
मैत्रीचा सुर सारे आपण जपु या
तीळगुळ खाऊन गोड होऊ
मिळुन आपण सारे राहु या ॥६॥
— पंकज काटकर. काटी. जि.धाराशिव
३. सांजवेळ
संक्रांतीचा सण साधूनी
आकाशी उडती पतंग
रंग आकार विसंगती
परि हृदयी एकच उमंग….
उंच-उंच आणिक उंच
मजा येते सोबत्यांसवे
धागा तुटता एकाचा
डोळ्यात येती आसवे….
काट देणारा स्वानंदात
जोशात ओरडे काऽट
झेलण्यास धावे जोशात
कोणी अडवू नका वाऽट….
आता नभी स्थिर एकटाच
ऐसे नाही भावत मनास
एवढ्यात झाली सांजवेळ
चला खाली, ना होता उदास….
दूर उभी एक बालिका
एकटीच होती मौज पहात
गुंडाळला विचारांचा धागा
चला घरा म्हणे मनात….
— विजया केळकर. नागपूर
४
आधी येते भोगी ।
नंतरी संक्रांत ।।
नंतरच येई ।
मागून किंक्रांत ।।
माझ्या मनी येते ।
त्याची पुढील संगती ।।
योग्य वाटते का ।
विचार करा चित्ती ।।
आधी भोगायचा देह ।
नंतर मृत्यूची संक्रांत ।।
नंतर दानाची किंक्रांत ।
घ्यावी ध्यानी ।।
तिळात ना स्नेह
गुळात ना गोडी
संक्रांतीची खोडी,
काढू नये
भाकरी न लोणी,
गुळपोळीची न चव
संक्रांतीला जेव,
म्हणू नये
लाडूही ना वडी,
ना हलव्याचा घोळ
त्याचे गोड बोल,
मानू नये
विकतचे सारे,
विकतची गोडी
कसे प्रेम जोडी,
सुन्या म्हणे
शब्दांचीच गोडी,
शब्द प्रेम जोडी
शब्द तोडी जोडी,
मित्र भाव
गुळाचीच गोडी,
तीळ स्नेह जोडी
तिळगुळ जोडी,
मित्र भाव
मित्र भाव मनी,
शिवी देई कोणी
तरी जागे मनी,
प्रेम भाव
प्रेमाची महती,
तिळगूळ चित्ती
शब्द जागवीती,
प्रेम भाव
कडू गोड शब्द,
मित्र भावे बद्ध
जोडी सारे शब्द,
प्रेम भाव
मनामध्ये सदा,
गोड भाव हवा
तेंव्हाच शब्दांना,
गोडी खरी
मुखामधे येई,
शब्द कोणताही
मैत्री स्नेह देई,
सुन्या म्हणे
डोळसांना जेंव्हा,
येई खरी दृष्टी
होई समाजात,
नेत्र वृष्टी
मनामध्ये येई,
खरा स्नेहभाव
तेव्हा अवयव,
दान होई
आत्मभाव खरा,
देहभाव खोटा
पटेल हे तेव्हा,
देहदान
कार्यकर्ता जेव्हा,
अंतर्बाह्य गोड
समाजाची तेढ,
सोडवील
तिळगुळ तेव्हा,
देई खरी गोडी
शब्दांचाही फक्त,
असेना का
शब्दच आपले,
करती जागृती
हेच ध्येय चित्ती,
सुन्या म्हणे
गुळाने मारली शीळ..
त्याला चिकटला तीळ.
तिळ्गुळ हा शब्दांचा,
कशाला चावतोस गीळ
— रचना : सुनील देशपांडे.
५. जरा गोड बोल….
नको काढू चुका,नकोस बडवू ढोल,
तू मौन रहा किंवा जरा गोड बोल,
तुटत चाललेत आज, सगळे सभोवती,
मोबाईलचे जाळे, केवढी अधोगती,
महत्वाचे काही नाही, तरी होती खुळे,
मूल्य ऱ्हास होतो, खरा याच्यामुळे
मग्न आहे प्रत्येक जण, नाद फार झाला,
बोलणे तुटले संबंधाचा, आधार तो गेला,
सगळेच एकेकटे, बघ भावना आटल्या,
प्रेमासाठी सारे भुके, द्वेष शेकोट्या पेटल्या,
कसे गप्प राहतात, कुणी कुणाशी बोलेना,
ओळखीचे नाही कोणी, आपले म्हणेना,
आता जरा येई पुढे, जाण याचं मोल,
मित्र, शेजारी यांच्याशी, जरा गोड बोल…!!!
— रचना : हेमंत भिडे.
६. जीवन गाणे
आली संक्रांत !
सूर्य संक्रमण !
मकर राशीत !
हर्ष भरे …….
थंडीचा महिना !
हवेत गारवा !
तन मनास विसावा !
प्रेम भरे……..
तिळ गुळ घ्या !
तिळ गुळ घ्या !
गोड गोड बोला ! आयुष्यभर………
तिळातील स्नेह !
गुळाचा गोडवा !
मनात रुजवा !
मंजूळ गाणे ………..
करु गुण आत्मसात !
टिकवू अतुट नातं !
नको कोणासंगे वाद !
मनभेद ………
प्रभास वाटते !
जपावी मनं !
येतील जातील सणं !
गावे जीवन गाणे………
गावे जीवन गाणे !
हर्ष उत्साहाने !
कालचक्र फिरत राहिल !
अखंडित…………
— रचना : डॉ. प्रभा वाडकर.
७. निसर्ग
सूर्य उत्तरायण करी
मकर राशीत
भास्कराचे स्वागतार्थ
भक्त घालीत साद !!धृ!!
विश्वां भुरळ घातली
भारतीय संस्कृतीनं
हर सण निसर्ग
आरोग्याशी निगडित
सुमने करू रविराजाचे
स्वागत पूजन !!1!!
भोगीची भाकरी खिचडी
सकस अन्न, पौष्टिक आहार
सेविती सर्व जन
जन नवनवीन वस्त्रे
करिती परिधान !!2!!
शेतांतील पदार्थ देतात
दान सुगडात
तिळगुळ घ्या गोड बोला
असे महामंत्र
जागविली जाते समता
टाळून भेदाभेद !!3!!
संक्रांत नैराश्य दूर
करी परिवर्तन
संक्रमणे उत्कर्ष करी
स्नेह वृद्धिंगत
चैतन्यदायी सूर्य
भू मंडळ उजळीत !!4!!
सूर्यप्रकाशाने
वृक्षवल्ली बहरतात
पशुपक्षी मोहरून
बागडती आनंदात
कृषीवल जातो
भूसेवेस या वातावरणांत !!5!!
शक्ती समता जागृती
दात्याला अर्घ्य देत
पतंग उडवून सूर्याला
करिती नमन
तेज ऊर्जा दाता
नारायणास राहू कृतज्ञ !!6!!
— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड.
८. उत्तरायणी
उत्तरायणी उंबरठ्यावर
संक्रमणाचे वेध लागती
मुहूर्त पाहुन कधी व्हायच्या
पुन्हा नव्याने गाठीभेटी
निरोप घेता, उमेद घेउन
नव्या दमाने होय भ्रमंती
पडशी भरली कुतूहलाने
अनुभवण्या नव ऋतु प्राजक्ती
असुयेचा ज्वर कधीच नव्हता
रागद्वेष तर गळून पडले
पुरचुंडीतुन तुमच्यासाठी
तीळगुळाचे लाडू भरले
— रचना: सूर्यकान्त द. वैद्य, पुणे
९. मकरसंक्रान्त
घ्यावा संक्रान्तीचा हलवा
गोड बोलण्या तीळगूळ घ्यावा
स्नेह तीळातीळाने वाढतो
वृध्दिंगत परिचय होतो
द्वेषभाव दुजांप्रती सरतो
तीळगुळाचा संगम होतो
मान मनापासूनि द्यावा
तीळगूळाचा महिमा गावा
या तीळाची पहा मखलाशी
पाकामध्येच लपून राहशी
शोध घ्यावयास जे जाती
काटेच तया टोचती
स्नेह मनामध्ये झिरपावा
कटूबोला टाळून यावा
राजकारणी तीळगूळ न्यारा
निवडणूक आलीया द्वारा
झिजवूया घरांचा उंबरा
करू वास्तपुस्त सानथोरा
मान कलती करुनिया नमना
स्मितहास्य विलसते वदना
हात मिळवूनी म्हणती घ्यावा
आश्र्वासन तीळगूळ खावा
गोड बोल देती हो थारा
संक्रांत आलीया द्वारा
— रचना : स्वाती दामले.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
आपण सणावारानुसार व्यवस्थित कविता नेहमीच देता यावेळेसही आजच्या दिवसाच्या यथायोग्य कविता वाचायला मिळाल्या. मनापासून धन्यवाद!
खूप कवितांचा समावेश केलाय धन्यवाद …
भावनापूर्ण रचना वाचावयास मिळाल्या..
माझी कविताही त्यात पाहून आनंद वाटला.. धन्यवाद