“घड्याळ”
आजकाल मनात निरवानिरवीचे विचार वाहतात. वेगवेगळ्या वाटांवर, आयुष्याच्या विविध टप्प्यांवर, गोळा केलेल्या अनंत वस्तुंचा पसारा स्वतःच्या डोळ्यात आता खूपू लागतो. कित्येक वस्तू अशा असतात की ज्यांना हातही लावलेला नसतो. केवळ हौस म्हणून गोळा केलेला हा पसारा अक्षरशः अंगावर कोसळल्यासारखा जाणवतो. कधीतरी लागतील म्हणून जपून ठेवलेल्या वस्तूंची अडगळ जाणवू लागते. ‘हे सगळं आता आवरलं पाहिजे. कुणाला तरी द्यावं नाहीतर चक्क घराबाहेर काढून टाकावे’ असे डिस्पोजेलचे विचार तीव्रतेने मनात उफाळतात. कुठून कशी सुरुवात करावी तेही कळत नाही. वस्तू आणताना आपण किती सहजतेने आणतो पण तीच वस्तू या घडीला कितीही निरुपयोगी असली तरी टाकून देण्यासाठी मनाची किती जोरदार तयारी करावी लागते !
शोकेसमधल्या वरच्या फळीवर मला एक घड्याळ दिसतं. स्टीलच्या कोंदणातलं, पांढऱ्या रंगाचं, गोलाकार, स्पष्ट अंक आणि काटे असलेलं, टेबलावर ठेवण्यासाठी विशाल कोनातले स्टीलचे छोटे पाय असलेलं, किल्लीचं एक जुनं पारंपरिक घड्याळ, अनेक वर्षांपासून बंद पडलेलं आणि तरीही संग्रही ठेवलेलं.. का ? एक अँटिक पीस म्हणून का ? की कुठल्यातरी भावभावनांचा धागा अदृश्यपणे त्यात जोडला गेला असल्यामुळे का ? या भावनांच्या धाग्यांच्या गुंत्यात किती दिवस अडकायचं ? ‘एक एक वस्तू काढूनच टाकूया’ आणि सहजपणे माझा हात ते घड्याळ उचलून काढून टाकण्यासाठी उचलला जातो आणि त्याच क्षणी मी साठ बासष्ट वर्षांपूर्वीच्या एका छोट्या, अत्यंत किरकोळ घटनेच्या आठवणीत नकळतपणे गुंतून जाते.
आठवणींची पण एक मजाच असते नाही का हो ? आठवणी सुखदुःखाच्या, फजितीच्या, गमतीच्या, साहसाच्या, राग लोभाच्या अशा कितीतरी आणि कुठल्याही क्षणी, कुठल्याही निमित्ताने त्यांना किक मिळते. अगदी तसेच झाले. कारण काय तर घड्याळ !
ताईचे अभ्यास करताना तिला लागणारेच आणि तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि अतिशय आवडते घड्याळ छुंदाच्या हातून फुटले. छुंदाने ते घड्याळ का घेतले, तिला ते हातात का घ्यावेसे वाटले आणि घेतले तर घेतले, पण ते हातातून पडलेच कसे ? या प्रश्नांना त्या क्षणी ना अर्थ होता ना उत्तर होते फक्त परिणाम होता.
ताईचे आवडते घड्याळ फुटले.
ताई संतापली. भयंकर खवळली. फार मोठे नुकसान झाले होते तिचे जणू काही आणि आता या छुंदाचे काय करू ? कशी शिक्षा करू तिला ? या विचारात तिने तिच्यावर चक्क हात उगारला. छुंदा आधीच खूप भेदरली होती, घाबरली होती. एका वक्तृत्व स्पर्धेत ताईला बक्षीस मिळालेलं ते घड्याळ ताईसाठी किती महत्त्वाचं होतं याची छुंदाच्या बालमनालाही नक्कीच कल्पना होती पण ताईचा हा रुद्रावतार मात्र तिला अनपेक्षित असावा. ताईचा मार चुकवण्यासाठी ती घरातल्या घरातच पळू लागली.
आमच्या घरातल्या प्रत्येक खोलीला दरवाजा होता त्यामुळे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत असं गोल गोल पळता यायचं. तो सीन मला आठवला की अजूनही खूप हसू येतं. छुंदा पुढे, ताई तिच्या मागे आणि ताईला आवरण्यासाठी जीजी ताईच्या मागे… अशा तिघी गोल गोल धावत होत्या. त्यावेळी मी काय करत होते ते आठवत नाही पण एक दोन मिनिटात ती धावाधाव संपली. छुंदा रडतच होती. ताई तिला बोल बोल बोलत होती. जीजीने छुंदाला घट्ट पकडून मायेचं कवच दिलेलं होतं.
“थांब आता ! संध्याकाळी पप्पा आले की त्यांना तू केलेला प्रताप सांगतेच. मग ते तुला शिक्षा करतील.” एक प्रकारे ताईने छुंदावरच्या आरोपाची याचिका हायर कोर्टात दाखल करून टाकली.
नकळत आमच्या घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. आता पप्पा घरी आल्यावर काय होणार, त्यांची काय प्रतिक्रिया होणार ? पप्पांनाही राग नक्कीच यायचा, ते संतप्त व्हायचेच पण त्या रागापायी त्यांनी कधी आम्हाला कठोर शिक्षा केल्याचं मुळीच आठवत नाही. थप्पड मारली ती सदैव लाडानेच, रागाने कधीच नाही मग ताईच्या या सूट फाईलला कशाला घाबरायचं ? त्यातून छुंदा पप्पांची सर्वात लाडकी !
या सर्वात लाडकी या शब्दप्रयोगाची ही एक गंमत आहे बरं का ? पप्पांना आमच्यापैकी कुणीही विचारलं ना “तुमची लाडकी लेक कोण ?” प्रत्येकीसाठी पप्पांच हेच उत्तर असायचं “अग ! सर्वात लाडकी तूच” पण छुंदाकडे पप्पांचा अधिक कल असावा असे मला मात्र वाटायचे. कारण ती कुणाशी कधी भांडायची नाही, तिची मस्ती ही शांत असायची. शांत मस्ती हे जरी विरोधाभासी असलं तरीही ते तिच्या बाबतीत खरं होतं. शिवाय ती लहानपणापासूनच अत्यंत हुशार, अभ्यासू. पप्पा तिला, ”हा माझा अर्जुन” असेच म्हणायचे. त्याला कारण बहिणींच्या रांगेत तिसऱ्या क्रमांकावर आणि गुणांच्या बेरजेत पहिल्या क्रमांकावर म्हणून असेल कदाचित. असो…
संध्याकाळी पप्पा घरी आले. त्यांच्या सायकलीची एक विशिष्ट धून वाजली. पप्पा ऑफिसात जाताना ठाणे स्टेशन जवळ, त्यांच्या मावशीच्या घरासमोर असलेल्या उसाच्या गुऱ्हाळात सायकल ठेवायचे आणि येताना ती पिकअप करायचे.
सायकलच्या घंटेने पप्पा आल्याची वर्दी दिली आणि घरात सकाळी घडलेल्या घड्याळ फुटण्याच्या घटनेचे पुन्हा तणावपूर्ण पडसाद उमटले. नेहमीप्रमाणे जीजी पप्पांच्या सायकलला टांगलेल्या सामानाच्या पिशव्या आणायला खाली उतरली. मला वाटतं तिने त्याच वेळेला पप्पांना काही पूर्वकल्पना देऊन ठेवली असावी. जीजीचे घराकरिता ‘आजी’ व्यतिरिक्त अनेक पेशे होते. ती कधी डॉक्टर, कधी शेफ, कधी किरकोळ रिपेरिंगसाठी इंजिनियर, कधी शिंपी, कधी शिक्षक, मानसतज्ज्ञ तर कधी वकील असे. याप्रसंगी बहुदा तिची वकिलाची भूमिका असावी.
पप्पा आल्याचे कळताच छुंदा गॅलरीचा कोपरा पकडून पुन्हा रडत बसली. ताईचा अजूनही, ”थांब आता बघतेच तुला” हा बाणा कायम होता.
मी गॅलरीच्या उंबरठ्यावर वाकून रडणाऱ्या छुंदाला बघत होते. सहज मनात आलं,
“अर्जुन कधी रडतो का ? असा कसा हा रडका अर्जुन ?”
मी छुंदाला म्हटलं, ”उठ ! घे शस्त्र हातात आणि युद्धाला तयार हो !”
पप्पा घरात थोडे सेटल झाल्यावर ताईने जोरदारपणे सांगितलं,
“छुंदाने माझं घड्याळ फोडलं. काय गरज होती तिला माझ्या वस्तूंना हात लावायची ?”
संतप्त ताईला पप्पा म्हणाले,
“काय म्हणतेस काय ? तुझं घड्याळ फुटलं ? नुकसान तर झालंच. कुठे आहे छुंदा ?”
निरागसपणे छुंदा पप्पांच्या समोर अपराध्यासारखी उभी राहिली.
“हो पप्पा पण मी मुद्दाम नाही फोडलं. चुकून हातातून पडलं आणि फुटलं.“
मग पप्पांनी स्वतः तिला मांडीवर उचलून घेतलं.
“घड्याळ फुटलं ? अरेरे ! पण आनंद आहे ! त्यात काय एवढं ? आपल्याला दुसरं नवं घड्याळ मिळेल. याहून छान, सुंदर, पुन्हा एकदा ताई स्पर्धेत जिंकेल आणि आणखी मोठं घड्याळ तिला बक्षीस म्हणून मिळेलच. आहे काय नि नाही काय !” ताईचा फुगा फुस्स झाला. छुंदा खुदकन हसली आणि साऱ्या घरावर आलेलं तणावाचं मळभ दूरच झालं. एक आभाळ क्षणात मोकळं झालं.
आज आम्ही सगळ्याजणी वृद्धत्वाकडे झुकलोय. पण छुंदाच्या मनातली ताईचं घड्याळ फोडल्याची अपराधी भावना बोथट जरी झाली असली तरी टिकून आहे आणि ताईला मात्र आपण त्यावेळी उगीचच इतके रागावलो बिचारीवर हा सल आजही बोचतो आणि मी जेव्हा या घटनेचा विचार करते तेव्हा केंद्रस्थानी मला फक्त पप्पांचेच बोल आठवतात. “आनंद आहे ! आपल्याला दुसरं नवं घड्याळ मिळेल.”
किती साधं वाक्य पण सखोल विचारांचं ! यात मुळीच बेपर्वाई नाही. नुकसान झाल्याची कदरच नाही असेही नाही. हे पुन्हा पुन्हा घडू नये पण आता घडलंच आहे तर त्याकडे जरा सकारात्मकतेने पाहूया. एक गेलं तर दुसरं मिळेल. THIS IS NOT THE END OF LIFE. हे तत्व किती सहजपणे पप्पानी आमच्या मनावर कोरून ठेवलं.
“नो रिग्रेट्स” या मानसिकतेची आयुष्य जगताना जरुरी असते. नव्हे पुढे जाण्याचे ते शस्त्र असते हा महान विचार एका किरकोळ घटनेकडे पाहताना सहजपणे त्यांनी आमच्यावर बिंबवला. शिवाय “क्षमा वीरस्य भूषणम्” हे अलगदपणै ताईला सांगितले आणि खरोखरच ताईच्या नंतरच्या आयुष्यात ज्या अनेक दु:खद अप्रिय घटना घडल्या, ज्या लोकांनी तिचे जगणे नकोसे केले होते त्यांनाही तिने नंतर सारं काही विसरून मोठ्या मनाने क्षमा केली. पप्पांचेच संस्कार ना ?
हेच खरे सार जीवनाचे असे वाटते. या जीवनसत्वांनी आम्हाला इम्युनिटी दिली, एक प्रतिकारशक्ती दिली. “थँक्स पप्पा” आणि आताच्या या क्षणी नकळतपणे फेकून देण्यासाठी हातात घेतलेलं ते जुनं, बंद पडलेलं घड्याळ मी पुन्हा जागच्या जागी ठेवलं.
का ?
माहीत नाही.
— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
आमच्याही घरात खूप जुन्या वस्तू विशेषतः पुस्तक आहेत ती पुस्तकं इतकी वर्ष सांभाळून ठेवले आहेत पण ती काढायची म्हटली किंवा कुठे लायब्ररीला देऊन टाकायचे म्हटली तरी अजूनही जीव कासावीस होतो.सगळं सगळं घर एक प्रकारचं खूप साठवून ठेवलेल्या त्यावेळी जीवापाड जपलेल्या वस्तूंचा संग्रहालय आहे बिंबा म्हणतात त्याप्रमाणे काढून टाकायला जीव होत नाही पण आता त्याचा करणार काय? कोण पुढे सांभाळणार ?हे सगळ्यांना आवश्यक असतंच का ?हे विचार मनात येतात. आणि कितीही आवरायचं म्हटलं तरी वस्तू पुन्हा त्याच जागेवर येतात आणि घरातच राहतात अगदी मनातलं वस्तूंबद्दलच प्रेम त्याच्या भोवती असणाऱ्या भावनांचा कल्लोळ हा पुन्हा आठवला जातो आणि पुन्हा घर आत्मविश्वासाने तसेच उभं राहतं.
हाऊस म्हणून आकर्षण म्हणून वाढवलेला आपलाच पसारा आता खूप मोठा वाटू लागतो हे मनातलं वस्तूंबद्दलच प्रेम काळजी मध्ये बदलत याचं पुढे काय करणार आणि कशासाठी करणार ?
एकंदरीत या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक जपणाऱ्या, किंमत असणाऱ्या पुढच्या पिढी जवळ सुपूर्त कराव्या आणि आपल्यासमोरच त्याचे योग्य काळजी घेतली जाईल हे बघून समाधानी व्हावं
मॅडमनी या सगळ्या गोष्टी अतिशय छान घड्याळाचे उदाहरण देऊन तर सांगितल्या आहेतच पण त्यामागे पप्पांनी नकळत दिलेले जगण्याची धडे हे जास्त महत्त्वाचे आहेत आणि ते आयुष्यभर पुरणारे आहेत यात शंकाच नाही. त्या स्वतःही ते अमलात आणताना नेहमी दिसतात
राधिका भंडारकर यांचा घड्याळ हा लेख अतिशय हृदयस्पर्शी आहे. खरंच! आपण सगळेजण घरातल्या अनेक गोष्टींशी आपली मानसिक बांधिलकी जपत जगत असतो. ती वस्तू घरातून जाणे म्हणजे जणू आपल्या अस्तित्वाचा एक भाग निघून जाणे.ते आपल्याला रुचत नाही. महत्त्वाची वस्तू नसून त्याच्याशी जोडलेले भावबंध हेच खरे! राधिकाताईंप्रमाणे वाचणाऱ्या प्रत्येकालाच अशा अनेक वस्तूंची घरात हजेरी जाणवत असेल. खूप छान भावस्पर्शी लेख!