त्या चार ओळी..
उषाच्या स्टडी टेबलावरचा पसारा मी आवरत होते. मनात म्हणत होते, “किती हा पसारा! या पसार्यात हिला सुचतं तरी कसं ? शिवाय तो आवरून ठेवण्याचीही तिला जरूरी वाटत नाही.”
इतक्यात टेबलावरच्या एका उघड्या पडलेल्या वहीवर अगदी ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिलेल्या ओळींकडे सहज माझं लक्ष गेलं तेव्हा प्रथम माझ्या नजरेनं वेचलं ते तिचं सुरेख अक्षर, दोन शब्दांमधलं सारखं अंतर आणि अगदी प्रमाणबद्ध काना मात्रा वेलांट्या. उषाचं अक्षर आणि उषाचा पसारा या दोन बाबी किती भिन्न आणि विरोधाभासी होत्या !
तिने लिहिलं होतं, ”मला छुंदा खूप आवडते. ती कशी जवळची वाटते ! मला आणि निशाला अगदी सांभाळून घेते. अभ्यासातल्या अडचणी ती किती प्रेमाने समजावून सोडवून देते ! कधीच रागवत नाही. ताई बद्दल काय म्हणू ? एक तर वयातल्या अंतरामुळे तिच्या मोठेपणाचं तसं दडपण येतंच. शिवाय ती भाईंकडे (आजोबांकडे) राहते, शनिवारी येते, सोमवारी जाते. त्यामुळे या घरातली ती पाहुणीच वाटते. का कोण जाणे पण ती थोडी दूरची वाटते आणि बिंबा (म्हणजे मी) मला मुळीच आवडत नाही. तिचा प्रचंड राग येतो. सतत आम्हाला रागावते. मोठी असली म्हणून काय झालं ? तिची दादागिरी का सहन करायची ? तिला कधी काही प्रश्नाचे उत्तर विचारले तर सुरुवातीलाच ती ढीगभर बोलून घेते. प्रश्न मात्र देते सोडवून. तसं तिला सगळं येत असतं पण सांगताना, ”तुला इतकं साधं कसं कळत नाही ? कसं येत नाही ?” असा तिचा माझ्याविषयीचा जो भाव असतो ना तो मला मुळीच आवडत नाही. समजते काय ती स्वतःला ?” बापरे !!
हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या मनाची नेमकी काय स्थिती झाली असेल ? खूप मोठा धक्काच होता तो ! क्षणभर वाटलं आत्ता तिच्यापुढे ही वही घेऊन जावं आणि तिच्या या लेखनाचा जाब विचारावा पण दुसऱ्या क्षणी मी काहीशी सुन्न झाले. उदासही झाले आणि किंचित स्थिर झाले. माझ्याबद्दल तिच्या मनात असे विचार असावेत ? राग, चीड आणि दुःख या संमिश्र भावनांनी माझं अंतर्मन उकळत होतं. शिवाय उषा—निशा या जुळ्या बहिणी असल्यामुळे जरी उषाने हे स्वतःपुरतं लिहिलेलं असलं तरी तिच्या या भावना प्रवाहात निशाचेही माझ्याबद्दल तेच विचार वाहत असणार. याचा अर्थ या दोघी माझ्याविषयी माझ्यामागे हेच बोलत असतील. त्या क्षणी मला जितका राग आला, जितकं वाईट वाटलं त्यापेक्षाही एक मोठी बहीण म्हणून मला “माझं मोठेपण हरलं” ही भावना स्पर्शून गेली. त्यांच्या जन्मापासून ते आतापर्यंत मी मनोमन त्यांना किती जपलं, किती प्रेम केलं यांच्यावर, यांनी चांगलं दिसावं, चांगलं असावं, चांगलं व्हावं म्हणून जी कळकळ माझ्या मनात सदैव दाटलेली होती त्याचा असा विपर्यास का व्हावा ?
आत्मपरीक्षण अथवा आत्मचिंतनासारख्या थीअरीज अभ्यासाव्यात असं वाटण्याइतकं माझंही ते वय नव्हतं. माझ्याही विचारांमध्ये परिपूर्णता अथवा परिपक्वता नक्कीच नव्हती. बुद्धीने मी इतकी प्रगल्भ नव्हते की या क्षणी मी तटस्थ राहून काही रचनात्मक विचार करू शकत होते. मी अत्यंत बेचैन आणि डिस्टर्ब्ड मात्र झाले होते हेच खरं. माझ्या या बेचैनीमागे कदाचित ही कारणे असतील. पहिलं म्हणजे उषा— निशांना माझं सांगणं दादागिरीचं वाटू शकतं हा विचार माझ्या मनात कधी आला नाही. त्यावेळी वाटायचं,” मी जे बोलते, मी जे सांगते ते त्यांच्यासाठी हिताचे आहे.” असे वाटायचे. नकळतच मोठ्या बहिणीच्या अधिकाराने त्यांच्यावर सुसंस्कार करण्याचा तो माझा प्रयत्न होता आणि या वैचारिकतेवर मी तेव्हाही ठाम होते. शिवाय मी डॉमिनेट करते असं त्यांना वाटू शकते याचा मी कधी विचारच केला नाही. माझ्या मनात फक्त बहिणींचं जपून ठेवलेलं एक गोड नातं होतं पण त्या नात्यात आलेला हा विस्कळीतपणा जेव्हा माझ्या ध्यानात आला तेव्हा मी एखाद्या जखमी हरिणी सारखी घायाळ मात्र झाले. ज्या घरात आई, वडील, आजी आहेत त्या घरात बहीण या नात्याने काही वेगळे संस्कार, विचार बिंबवण्याचा माझा अधिकार किती नगण्य आहे याची मला जाणीव झाली. शिवाय कुठेतरी माझं वागणं अतिरिक्तच आहे असे पुसटसे वाटूही लागले होते.
वास्तविक छुंदालाही मी खूप वेळा माझा हाच बाणा दाखवला होता. एकदा गणिताचा पेपर देऊन ती घरी आल्यानंतर मी जेव्हा तिला पेपरातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचारले तेव्हा जवळजवळ तिची सगळीच गणितं चुकलेली होती हे समजलं. माझा पारा इतका चढला की मी तिला म्हटले, ”शून्य मार्क मिळतील तुला या पेपरात. एक भलामोठा भोपळा घेऊन ये आता. शाळेत जाण्याचीही तुझी लायकी नाही.”
केवळ धांदरटपणामुळे तिची प्रत्येक उदाहरणातली शेवटची स्टेप चुकली होती पण शाळेत तिची गुणवत्ता इतकी मान्य होती की शिक्षकाने तिचे पेपरातले गुण कापले नाहीत म्हणून ती सुरक्षित राहिली पण त्याही वेळेला मी छुंदाला म्हटले होते “या पेपरात तुला शून्यच मार्क आहेत हे कायम लक्षात ठेव.” ती काही बोलली नाही पण त्यानंतर मात्र तिला गणितात नेहमीच पैकीच्या पैकी गुण मिळत गेले अगदी इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षीही ती शंभर टक्क्यात होती. त्याचं श्रेय फक्त तिच्या मेहनतीला आणि जिद्दीलाच अर्थात.
पण त्यादिवशी जेव्हा उषाने लिहिलेल्या त्या प्रखर ओळी वाचल्या तेव्हा माझ्या मनावर आघात झाला आणि एक लक्षात आले किंवा असे म्हणा ना एक धडा मी शिकले की एकच मात्रा सर्वांना लागू होत नाही हेच खरे आणि आपल्या बोलण्याचा परिणाम हा “चांगला ते अत्यंत वाईट” या रेंजमध्ये कसाही होऊ शकतो. तिथे आपले अंदाज चुकतात. मुळातच कुणाला गृहित धरणं हेच चुकीचं.
काही दिवस तो विषय माझ्या मनात खुटखुटत राहिला. सर्व बहिणींच्याबाबतीत मला या चौघी एकीकडे आणि मी एकीकडे ही भावनाही डाचत राहिली. एकाच घरात राहून मला एक विचित्र एकटेपणाची भावना घुसळत होती. काही दिवसांनी घरात कोणालाही न जाणवलेलं माझ्या मनातलं हे वादळ हळूहळू शांतही झालं. याचा अर्थ बदल झाले —माझ्यात किंवा उषा निशांच्यात असेही नाही पण रक्ताच्या नात्यांचे धागे किती चिवट असतात याची वेळोवेळी प्रचिती मात्र येत गेली. मतभेदातूनही आम्ही टिकून राहिलो. तुटलो नाही.आमच्या घरात खर्या अर्थाने लोकशाही होती. तसेच “वाढे भांडून ममता” याचाही अनुभव होता.
एक दिवस पप्पांना घरी यायला खूप उशीर झाला होता. पप्पांची जाण्याची आणि परतण्याची वेळ सहसा कधीच चुकली नाही पण त्यादिवशी मात्र घड्याळाच्या काट्यांची टिकटिक संपूर्ण घराला अस्वस्थ करून गेली मात्र. का उशीर झाला असेल ? त्यावेळी मोबाईल्स नव्हते, संपर्क यंत्रणा अतिशय कमजोर होत्या. फारफार तर कुणाकडून निरोप वगैरे मिळू शकत होता. बाकी सारे अधांतरीच होते. चिंतेचा सुरुवातीचा काळ थोडा सौम्य असतो. संभाव्य विचारात जातो. ऐनवेळी काही काम निघाले असेल, पप्पांची नेहमीची लोकल कदाचित चुकली असेल किंवा उशिरा धावत असेल. “व्हीटी टू ठाणे” या एका तासाच्या प्रवासात काय काय विघ्नं येऊ शकतात याचाही विचार झाला. त्यावेळी आतंगवाद, बाँबस्फोट वगैरे नव्हते पण अपघात मात्र तितकेच होत असत आणि अपघाताचा जेव्हा विचार मनात आला तेव्हा मात्र आमचं घर हादरलं .अशा कठीण, भावनिक प्रसंगी जिजी माझ्यापुढे तिची तर्जनी आणि मधलं बोट एकमेकांना चिकटवून समोर धरायची आणि म्हणायची, ”यातलं एक बोट धर. पटकन मी तिचं कुठलंही बोट ओढायची मग ती म्हणायची,” सारं सुरक्षित आहे. बाबा येईलच आता.” तिची काय सांकेतिक भाषा होती कोण जाणे ! मला तर संशयच होता की, हीचं कुठलंही बोट धरलं तरीही
ती हेच म्हणेल पण गल्लीच्या कोपऱ्यावर पप्पांची सायकलची घंटा नेहमीच्या सुरात वाजली आणि आम्हा साऱ्यांचे धरून ठेवलेले श्वास मोकळे झाले. ”पप्पा आले.”
त्या क्षणी फक्त एकच वाटलं की जगातल्या साऱ्या चिंता मिटल्या आता. प्रतीक्षा, हुरहुर, “मन चिंती ते वैरी न चिंती” या वाटेवरचा प्रवास ज्या क्षणी संपतो ना तो क्षण कसा कापसासारखा हलका असतो आणि त्याचा अनुभव किती आनंददायी असतो हे फक्त ज्याचे त्यालाच कळते.
त्यादिवशी रात्री झोपताना उषा माझ्या कुशीत शिरली आणि चटकन म्हणाली, “काय ग आम्ही अजून किती लहान आहोत नाही का ? तुमचं तर बरंच काही झालं की.. शिक्षणही संपेल आता. आई पप्पांना मध्येच काही झालं तर आमचं कसं होईल ?” ती खूप घाबरली होती की काल्पनिक काळजीत होती नकळे पण तिच्या मनातली भीती मला कळली. मी तिला जवळ घेतलं, थोपटलं आणि म्हटलं, ”झोप आता. असं काहीही होणार नाही.”
आज जेव्हा मी वयाच्या एका संथ किनाऱ्यावर उभी राहून साक्षी भावांनी या सर्व घटनांचा विचार करते तेव्हा जाणवते की घरात लहान भावंडांचे जरा जास्तच लाड होत असतात. त्यांच्यासाठी आई-वडील आपल्याला लागू असलेले अनेक नियम सहजपणे मोडतात. या तक्रारींच्या भावने बरोबर एक असेही वाटते की लहान भावंडं मोठी होईपर्यंत आई-वडीलही थकलेले असतात का ? त्यांच्याही मनात “जाऊ दे आता” असे सोडून देण्याचे विचार सहजपणे निर्माण होतात का आणि त्याचवेळी थकत चाललेल्या आई-वडिलांना पाहताना धाकट्यांच्या मनात असुरक्षिततेची एक भावना निर्माण होत असेल का ? त्यादिवशी नकळत उषाने तिच्या मनातली हीच असुरक्षिततेची भावना व्यक्त केली आणि पुढे तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांना बेपर्वाईने कुणाकुणाला दोषी ठरवताना, तिच्यात हीच असुरक्षिततेची भावना असेल का ? असेल कदाचित …
क्रमशः
— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मागे वळून बघताना वेगळे पैलू लक्षात आले
राधिका जसजसं तू लिहीत आहेस तसं त्यात मन गुंतत चाललंय खूप छान लिहितेस तुम्ही सगळ्या बहिणी त्यांचं प्रेम तुमचं लहानपण मोठेपण पाहिलं की मनाला खूप छान वाटतं वास्तविक आपणही मैत्रिणी आहोत अशाच काही भावना असतील का तू त्या सहज विशद करशील
राधिकाताईंच्या जडणघडणीचे प्रत्येक प्रकरण वाचताना मी, त्यांची ताई अगदी त्या दिवसात हरवून जाते ती केवळ त्या जुन्या आठवणीनीच नव्हे तर त्यांच्या भाषाप्रभुत्वाने.
एकेक आठवणी वाचताना त्या आमच्या प्रत्येकाच्या मनाच्या खोल तळाशी गेलेल्या आढळतात, आणि त्यांचे मनही मोकळे करतात.
राधिकाताई असेच लिहित रहा.