नमस्कार मंडळी.
आपणास कळविण्यास आनंद होतो की,आज पासून आपण लेखिका सौ.राधिका भांडारकर यांची “माझी जडणघडण” ही आत्मचरित्र लेख माला सुरू करीत आहोत.
अल्प परिचय : सौ राधिका भांडारकर या सुप्रसिद्ध साहित्यिक कै. ज. ना. ढगे, यांची कन्या होत. मुळच्या मुंबईकर, लग्नानंतर जळगांव आणि बँकेत ४० वर्षे सेवा करून निवृत्तीनंतर वाकड, पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. त्यांचे पती आर्किटेक्ट आहेत. त्यांना २ मुली विवाहित असून त्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या आहेत.
रधिकाताईना साहित्याचा वारसा वडिलांकडुनच मिळाला. त्या अनेक वर्षापासुन लेखन करत आहे. उत्कृष्ट लेखनाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांचे पाच, कथा संग्रह आणि तीन, ललित लेख संग्रह व एक, काव्य संग्रह प्रकाशित झाले आहे.
मुंबई, जळगांव आकाशवाणीवर अनेकदा कथाकथन केले आहे. त्यांनी लहान मुलांच्या सुधारगृहात संस्कार शिबीरे आयोजित केली असून तळागाळातल्या महिलांसाठी साक्षरता वर्ग घेतले आहेत.
राधिकताई गेली ३ वर्षे आपल्या पोर्टलवर नियमितपणे लेख, कविता, पुस्तक परिचय लिहित आल्या आहेत.
त्यांचे “माझी जडणघडण” हे आत्मकथन इतरांच्या जडण घडणीत नक्कीच हातभार लावेल, असा विश्वास आहे.
– संपादक
धोबी गल्ली.
आजही माझ्या स्वप्नात तेच घर येतं. एक मजली, खालच्या पायरीवर पाण्याचा नळ असलेलं, वर जाण्यासाठी एक लाकडी जिना, उजवीकडे दरवाजा, मधल्या भागातलं छोटसं लँडिंग, दरवाजा लाकडाचा आणि घरात जाताना ओलांडावा लागणारा लाकडी उंबरठा. दरवाजाच्या बाहेरच्या, वरच्या भागावर लटकणारी एक लोखंडी साखळी. बाहेर जाताना ती साखळी अडकवायची आणि त्यात लोखंडी कुलूप लावायचं. जाताना दोन वेळा कुलूप ओढून बघायचं. आता हे आठवलं की वाटतं त्यावेळी अशा कुलपातलं बंद घर कसं काय सुरक्षित राहायचं ? आता आपण घराला दोन दोन दरवाजे, एक जाळीचा, एकाला पीप होल, अत्याधुनिक कुलुपे, गुप्त नंबर असलेली, शिवाय कॅमेरे, सीसीटीव्ही आणि असेच बरेच काय काय… तरीही आपलं घर सुरक्षित राहील का ? याविषयी शंकाच असते.
तो काळच वेगळा होता का ? स्वप्नात जेव्हा जेव्हा मला ते घर दिसतं तेव्हा तेव्हा मी मनोमन त्या वास्तुदेवतेस मनापासून नमस्कार करते. कारण याच वास्तुदेवतेने माझी जडणघडण केली. इथेच मी खरी मोठी झाले आणि आयुष्यातले असंख्य आनंदाचेच नव्हे तर अनेक संमिश्र भावनांचे क्षण वेचले.
४/५ शा.मा. रोड, धोबी गल्ली, टेंभी नाका ठाणे. या पत्त्याला माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे कारण माझं बालपण याच गल्लीत गेलं. बालपणीचा तो रम्य काळ आणि धोबी गल्ली याचं अतूट नातं आहे. या गल्लीचं आजही माझ्या मनात अस्तित्व आहे. ती जशीच्या तशी माझ्या नजरेसमोर अनेक वेळा येते, हळूहळू आकारते आणि चैतन्यमय होते. अरुंद पण लांबलचक असलेली ती गल्ली, एकमेकांना चिकटून समोरासमोर उभी असलेली काही बैठी, काही एक मजली घरं.. त्या सर्व घरांची दारं मनातल्या मनात फटाफट उघडली जातात आणि माझे ते बाल सवंगडी माझ्या भोवती नकळत गोळा होतात. चित्रा, चारू, बेबी, दिलीप, सुरेश, अशोक, लता, रेखा, अरुण, शरद, आनंद कितीतरी आणि मग आमचे खेळ रंगतात. डबा ऐसपैस, लगोरी, सागरगोटे, कंचे, लंगडी, खो-खो, अगदी क्रिकेट सुद्धा ! आरडाओरडा, गोंगाट, धम्माल !
पद्धतशीर क्रीडा साहित्य म्हणजे काय याच्याशी आमची ओळख ही नव्हती. खरं म्हणजे आम्हाला त्याची जरुरीच भासली नाही. धुणं धुवायच्या धोपटण्याने आम्ही क्रिकेट खेळलो. असमान उंचीच्या मिळेल त्या काठ्यांनी आम्ही यष्टी रचली. गद्र्यांचं घर ते सलाग्र्यांचं घर ही आमची विकेट आणि त्यापलीकडे चौकाराच्या, षटकाराच्या रेषा. समोरासमोर असलेल्या पायऱ्यांवर उभे राहून फिल्डींग व्हायचं आणि असं आमचं गल्ली क्रिकेट जोरदार रंगायचं. रडी खडी सगळं असायचं पण मुल्हेरकरांचे नाना आमचे थर्ड अंपायर असायचे. नाना तसे काही फारसे खिलाडू वृत्तीचे नव्हते. आम्हा खेळणाऱ्या मुलांचा खूप राग राग करायचे. चुकून त्यांच्या गॅलरीत आमचा बॉल गेला तर ते परतही द्यायचे नाहीत.
“मस्तवाल कार्टी ! रविवारी सुद्धा शाळेत पाठवा यांना. नुसता गोंगाट करतात, दुपारची वामकुक्षीही घेऊ देत नाहीत.” पण तरीही आम्ही खेळत असताना गॅलरीच्या धक्क्याला टेकून उभ्याने आमचा खेळही बघत असत आणि त्यांना अंपायरचा मान दिला की मात्र ते खूष व्हायचे. आम्ही पोरंही काही साधी नव्हतो, बरं का! चांगले चतुर, लबाड, लुच्चेच होतो आणि प्रचंड मस्तीखोरही. आज जेव्हा मी पाठीवर पुस्तकांनी भरलेली बॅग पॅक घेऊन स्कूलबसच्या रांगेत आजी किंवा आजोबांचा हात धरून उभं असलेलं बाल्य बघते ना तेव्हा पोटात कळवळतं कुठेतरी. हरवलेलं, बॅकपॅक मध्ये कोंबलेलं ते बालपण माझं काळीज चिरून जातं.
धोबी गल्लीतली ती घरं म्हणजे नुसत्या चुना मातीच्या भिंती नव्हत्या. या भिंती बोलक्या होत्या. या भिंतींच्या आत आणि पलीकडे असलेल्या जगाचा एक सुंदर बंध होता. एक रक्ताचा आणि दुसरा सामाजिक. घरात असलेली नाती आणि भिंतीच्या पलिकडची नाती बांधणारा तिथे एक अदृश्य पूल होता आणि या पुलावरच मी घडले. त्या वातावरणात मी वाढले, तिथे माझ्यावर असंख्य वेगवेगळे संस्कार झाले.
माझी संस्कारांची व्याख्या आणखी थोडी निराळी आहे. सर्वसाधारणपणे संस्कार म्हणजे मोठ्यांचा मान ठेवणे, रीती, परंपरा, देवधर्म पाळणे, नेहमी खरे बोलणे, नम्रता, शालीनता, सुहास्य, सुभाष्य वगैरे वगैरे खूप काही. संस्कार म्हणजे एक आदर्श तत्वांचं भलं मोठं गाठोडच म्हणा ना ! ते तर आहेच. ते नाकारता येणारच नाही पण त्या पलिकडे जाऊन मी म्हणेन संस्कार म्हणजे स्वतः केलेलं निरीक्षण. आजूबाजूच्या वातावरणातून मिळालेली अनेकविध चांगली वाईट भलीबुरी टिपणं आणि या सगळ्या तुकड्या तुकड्यांमध्ये मी कोणता तुकडा हे योग्य रितीने शोधणं, ते शोधता येण्याची क्षमता असणं म्हणजे संस्कार.
धोबी गल्लीत माझं बालपण फुलत असताना कळत नकळत अनेक चांगल्या वाईट भावभावनांचं, प्रसंगांचं नकळत मेंदूत झालेलं रजिस्ट्रेशन आजही डिलीट झालेलं नाही. बालपणी हसताना, खेळताना, भांडताना, बागडताना, बघताना फारसे प्रश्न पडले नसतील किंबहुना प्रश्न विचारण्याची क्षमता तेव्हा नसेल पण पुढच्या आयुष्यात जगताना आणि मागे वळून पाहताना अनुभवलेल्या या प्रसंगांनी आपल्याला किती शिकवण दिली याची जेव्हा जाणीव होते ना तेव्हा संस्काराची व्याख्या व्यापक होते.
धोबी गल्ली म्हणजे माझ्यासाठी बालभारती होती. धोबी गल्लीतलं जग लहान होतं. काही थोड्याच लोकसंख्यांचं होतं. फार तर दहा-बारा घरं असतील पण आता विचार केला तर वाटतं जग लहान किंवा मोठं नसतं. जे जग तुम्हाला किती दूरवर नेऊ शकतं किंवा किती दूरवरचे दाखवते, किती विविधतेत तुम्हाला वावरायला लावते त्यावरून त्याचं क्षेत्रफळ ठरत असतं.
धोबी गल्ली तशी होती. ते एक निराळं जग होतं. लहान— थोर सर्वांचंच. या गल्लीत जितकी एकजूट आणि एकोपा अनुभवला तितक्याच मारामाऱ्या आणि आणि भांडणही पाहिली. जिथे देवांच्या आरत्या ऐकल्या, म्हटल्या तिथे प्रचंड शिवराळ भाषेचाही भेसूरपणा अनुभवला.
मुळातच या धोबी गल्लीचे दोन भाग होते. एक इकडची गल्ली आणि एक तिकडची गल्ली. दोन्ही भागातलं जग निराळं होतं, दोन्ही भागातली संस्कृती वेगळी होती. आम्ही मुलं इकडच्या गल्लीतली होतो. कुटुंबात सुरक्षितपणे वाढत होतो. आम्ही शाळेत जात होतो, अभ्यास करत होतो, गृहपाठ, परीक्षा.. सहामाही— वार्षिक यांचा तणाव बाळगत होतो, परवचा, शुभंकरोती प्रार्थना म्हणत होतो. मे महिन्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत मुक्तपणे धांगडधिंगा घालत होतो. घरातल्या मोठ्या माणसांचा दमही खात होतो आणि प्रत्येक जण कधी ना कधी, लपून-छपून गुन्हेही करत होते. गुन्हा शब्द फार मोठा वाटेल पण त्यावेळी घंटीच्या गाडीवर जाऊन बर्फाचा गोळा खाणे, कुणाच्या परसदारात जाऊन झाडावरच्या कैऱ्या नाहीतर जांभळं तोडणे, बटुबाईच्या कोंबड्यांना पळवणे, नाहीतर तिकडच्या गल्लीत राहणाऱ्या एबी आणि रोशन या बहिणींशी गप्पा मारायला जाणं वगैरे अशा प्रकारचे मोठ्यांचे आज्ञाभंग करणारे गुन्हे असायचे.
इकडच्या गल्लीतलं पहिलं घर होतं मथुरे यांचं आणि शेवटचं दिघ्यांचं. त्यामुळे मथुरे ते दिघे हे आमचं जग होतं पण पलीकडच्या म्हणजेच तिकडच्या धोबी गल्लीतलं जीवन फार वेगळं होतं. तिथे राहणारी माणसं, त्यांचे व्यवसाय, त्यांचे आचार विचार वागणं अगदी त्यांचा आर्थिक स्तर, जात धर्म यांतही भेद होते. हे अंतर , हा भेद त्यावेळी का राखला गेला, का बाळगला गेला किंवा तो का पार करता आला नाही हे सारे प्रश्न आता मनात येतात पण त्यावेळी मात्र माझं बालपण या दोन भिन्न विश्वात नकळतपणे विभागलं गेलं होतं.
बाकीचं फारसं आठवत नाही पण एबी आणि रोशन या ईस्रायली बहिणींबद्दल मात्र मला खूप कुतूहल होतं हे नक्कीच. त्या दोघी अतिशय सुंदर होत्या. त्या काळात त्या हिंदी सिनेसृष्टीतल्या समूह नृत्यांगना होत्या. त्यांच्याकडे नृत्य शिकवायला कोणी कोणी येत. खरं म्हणजे आम्हाला त्यांच्या घरी जाण्याची परवानगी नव्हती पण त्या दोघींना त्यावेळी मस्त फॅशनेबल कपडे घालून, आता आपण ज्याला मेकअप म्हणतो पण त्यावेळी रंगवलेल्या चेहऱ्याने त्यांना गल्ली ओलांडताना मी अनेकदा माझ्या घराच्या खिडकीतून पहायची आणि खरं सांगू मला त्या दोघींबद्दल खूप आकर्षण वाटायचं. त्याही वयात वाटायचं की यांच्याशी आपण का नाही बोलायचं? का नाही त्यांच्याशी मैत्री करायची?
त्या उदरनिर्वाहासाठी सिनेमात गेल्या. त्यांच्यावर घर चालवण्याची जबाबदारी होती. रोशन तर साधारण माझ्याच वयाची होती. एबी थोडी मोठी होती.उदरनिर्वाह, घर चालविणे यातलं गांभीर्य तेव्हा मला कळतही नव्हतं. इतकंच कळत होतं आपल्यापेक्षा त्या वेगळ्या आहेत.
काही वर्षांनी ते सारं कुटुंब पॅलेस्टाईनला स्थलांतरित झाले.
अशा या पार्श्वभूमीवर आजही ती धोबी गल्ली मला एखाद्या स्थितप्रज्ञा सारखी भासते. तिथल्या घराघरांमध्ये घडणाऱ्या घटनांची खरी साक्षीदार वाटते. सर्व धर्म आचार विचार समावेशक वाटते.
तो एक अथांग जीवन प्रवाह होता आणि माझं बालपण त्याच प्रवाहात वल्ही मारत घडत होतं.
क्रमशः
— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मी मॅडमची जळगाव येथील बँकेतील सहकारी खूपदा मॅडमला लिहिताना बघितला आहे आणि बहुतेक सगळी त्यांची पुस्तकं मी वाचलेली आहेत त्यांच्या मार्गदर्शकही होत्या आणि मैत्रिणीसारख्याही होत्या व्यक्तीसमोर जिवंत उभी करणे हे त्यांच कौशल्य !अगदी सहजपणे एखादा प्रसंग डोळ्यासमोर उभा करणे ही हातोटी विलक्षण आहे.
काही प्रसंग त्यांच्याकडून ऐकले आहेत पण आता आत्मचरित्र वाचण्याची अतिशय उत्कंठा आहे. आजी वर लिहिलेल ‘जीजी ‘ यावरून त्यांच्यावर असलेला संस्काराचा पगडा नेहमीच जाणवतो,
तुझं जीजींवर लिहिलेलं पुस्तक आधाशासारखं वाचून काढलं होतं तेव्हां.
तुला राधिका म्हणणं मला खरं तर औपचारिक वाटतंय ग. माझ्यासाठी तू बिंबाच आहेस. असो. तुझी जडणघडण वाचतांना मी माझंच प्रतिबिंब आरशात पाहात असल्याचा भास झाला आणि सुखावले. एकतर आपल्या वेळच्या मध्यम वर्गीय सुसंस्कृत घरातल्या मुलींचं आयुष्य असंच होतं नाही का? त्यातून मी ही धोबी आळीतलीच फक्त तिकडच्या. ए बी आणि रोशनच्या वरच्या मजल्यावरची. पण पाला पडायचा तुमच्याच गल्लीतून . आपण तर वर्ग मैत्रिणी. खूप छान वाटलं आठवणिंच्या झूल्यावर. मधली काही वर्ष जीवन प्रवाहात हे दोन ओणके दूर गेले होते पण कसे जवळ आले बघ आयुष्याच्या मावळतिला. तुझ्या जडणघडणीचा पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे.
मी राधिका ताईंबरोबर अनेक लेखक समूहांमध्ये तर आहेच, पण त्यांची मोठी बहीण अरूणाताई मुल्हेरकर ह्यांच्याशी खास स्नेहसंबंध आहेत, त्यामुळेच राधिका ताईंनी त्यांच्या आजीच्या जीवनावर लिहिलेले “जीजी” हे पुस्तक वाचून, ह्या परिवाराचा जवळून परिचय झालेला आहे. त्यामुळेच राधिका ताईंचे आत्मचरित्र वाचण्याची अतिशय उत्कंठा आहे. पहिल्याच भागाचे शीर्षक “धोबी गल्ली ” वाचल्यावर तर ती अधिकच वाढली, कारण माझी मावशी तिथेच धोबी गल्ली मध्ये अनेक वर्षे राहिली, आणि तिच्या घरी जातायेताना धोबी गल्ली इतकी परिचयाची झालेली आहे,की मावशीच्या निधनाला अनेक वर्षे झाल्यानंतरही तिची आठवण आली की धोबी गल्ली हमखास आठवते.
राधिका ताईंचे लेखन नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर, रोचक व उत्कंठावर्धक आहे. पुढच्या भागांची प्रतिक्षा करत आहोत. मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
आत्मचरित्राची सुरवात फारच सुंदर.
मी राधिकाताईंची सख्खी बहीण(ताई) असल्यामुळे वाचताना धोबी गल्लीतील एकेक घर,त्या घरातील माणसे,मुले सगळे कसे एका क्षणात दृष्य झाले.
वाचनाची उत्सूकता वाढली आहे.