“शाळा नंबर १२”
रॉबर्ट ब्रेक एकदा म्हणाला होता, “I FEEL I WANT TO GO BACK IN TIME,NOT TO CHANGE THINGS BUT TO FEEL A COUPLE OF THINGS TWICE…
I WISH I COULD GO BACK TO SCHOOL NOT TO BECOME A CHILD BUT TO SPEND MORE TIME WITH THOSE FRIENDS, I NEVER MET AFTER SCHOOL.” माझं अगदी असंच काहीसं झालेलं आहे.
आम्ही मुलं नगरपालिकेच्या शाळेत शिकलो. म्हणजे माझं प्राथमिक पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत झालं. माझ्या शाळेचे नाव शाळा नंबर १२. घरापासून अगदी जवळच आमची शाळा होती. माझ्या काही बालमैत्रिणी शाळा नंबर चार मध्ये जात तर मुलगे दगडी शाळेत जात. आमची शाळा फक्त मुलींची होती. शाळेची अशी नावं आठवली तरी आता गंमत वाटते. लिटिल मिलेनियम स्कूल, ब्लूमिंग पेटल्स, किडझी,स्माईल अशी आकर्षक नावं असलेल्या शाळा तेव्हा नव्हत्याच. नर्सरी, प्लेग्रुप्स यांची ओळखही नव्हती. म्हणजे शिशुविहार, बालक मंदिर वगैरे सारखे काही खासगी शैक्षणिक समूह होते पण आमच्या शिक्षणाची सुरुवात मात्र शाळा नंबर १२ या नगरपालिकेच्या शाळेपासूनच झाली.
त्यावेळी ठाण्यात एक कॉन्व्हेंट स्कूल होतं. सेंट जॉन द बाप्टीस्ट हायस्कूल पण मला वाटतं आमची पालक मंडळी मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान बाळगणारी होती. आपल्या मुलांचं शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे याच विचारांची होती. कदाचित आपल्या मुलांना एखाद्या मिशनरी इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये का पाठवू नये असा विचारही त्यांच्या मनाला तेव्हा शिवला नसेल आणि आमच्या बालमनावरही नगरपालिकांच्या शाळांतून मिळणारं शिक्षण हेच खरं शिक्षण असा काहीतरी विचार पक्का केला असावा आणि त्यावेळी आमचा जो मराठी माणसांचा एक गट होता त्यातली सगळीच मुलं मराठी आणि नगरपालिकांच्या शाळेतून शिकत होती. त्यामुळे याहून काहीतरी उच्च, दर्जेदार असू शकतं हा विचार त्यावेळेच्या मुलांच्या मनात कशाला येईल ? मात्र काही अमराठी मुलं आमच्या परिसरात होती आणि ती मात्र कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. याचा परिणाम असा झाला की नकळतच इंग्लिश माध्यमातून शिकणारी मुलं आणि मराठी माध्यमातून शिकणारी मुलं यांच्यात संस्कृतीच्या भिंती त्यावेळी निर्माण झाल्या. या भिंती थेट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत टिकल्या.
टेंभी नाक्यावर टाऊन हॉल समोर बारा नंबर शाळेची इमारत होती. ब्रिटिश कालीन दगडी इमारत होती ती! शाळेला मागचं—पुढचं अशी दोन प्रवेशद्वारे होती. मागच्या बाजूला पटांगण होतं आणि ते रस्त्याला लागून होतं. पुढचे प्रवेशद्वार हे मुख्य द्वार होते आणि नऊ दहा लांबलचक अशा दगडी पायऱ्या चढून आमचा शाळेच्या मधल्या आवारात प्रवेश व्हायचा आणि त्याच्या डाव्या उजव्या बाजूला वर्ग होते.
शाळेच्या समोर चाळ वजा घरे होती. अडचणीची, खडबडीत बोळातली आणि अरुंद घरात दाटीवाटीने राहणारी, खालून पाणी भरणारी, भाजीपाला किराणाच्या पिशव्या सांभाळणारी, सायकलवरून कामाच्या ठिकाणी जाणारी, जीवनाची दहा टोकं एकमेकांशी जुळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारी माणसं होती ती. वयाच्या सहाव्या वर्षापासून डोक्यात बसलेलं हे जीवन आज इतकी वर्ष झाली, स्वतःच्याच आयुष्यात इतकी स्थित्यंतरे झाली. एका उजळ वाटेवरून प्रवास होत गेला तरीही ही चित्रं पुसली गेली नाहीत.
बारा नंबर शाळेच्या त्या दगडी पायऱ्यांवर दहा मिनिटाच्या आणि अर्ध्या तासाच्या सुट्टीत बालमैत्रिणींसोबत केलेल्या गप्पा, गायलेली बडबड गीते आणि चवीने चोखत खाल्लेली आंबट चिंबट चिंचा बोरं, एकमेकांना दिलेली सोनचाफ्याची फुलं आजही आठवतात.
एक छोटसं दफ्तर… शाळेत जाताना आईच दफ्तर भरायची. त्यात एखादं पाठ्यपुस्तक, काळी दगडी पाटी आणि पेन्सिल आणि मधल्या सुट्टीत खायचा डबा एवढेच सामान शाळेसाठी आम्हाला पुरायचं. आमच्या शालेय जीवनाचं नातं होतं पाटी— पेन्सिल, खडू —फळा आणि बुटके लांबलचक वर्गात बसायचे बाक यांच्याशी.
एकेका वर्गाच्या अ ब क ड अशा तुकड्या असायच्या. ‘अ’ तुकडीतली मुलं हुशार आणि “ड” तुकडीतली मुलं ढ!
“ढ” हे अक्षर मला तेव्हा फार त्रासदायकच वाटायचं. कारण “ढ” या अक्षराला माझ्या मते फारशी चांगली पार्श्वभूमी नसताना माझे आडनाव मात्र *ढगे* होतं !
एक दिवस वर्णमाला शिकत असताना बाई सांगत होत्या…
“क” कमळातला …
“ख” खटार्यातला ..
“ग” गडूतला ..
असं करत करत त्या “ढ” जवळ आल्या आणि माझ्या शेजारी बसलेली रत्ना पेडणेकर नावाची मुलगी मोठ्याने म्हणाली “ढ” ढगेतला.
सगळा बालचमु हसला. माझे डोळे पाण्याने भरले.
बाईंनी मात्र रत्नाला हात पुढे करायला सांगितला आणि तिच्या हातावर सपकन छडी मारली. तिचेही डोळे गळू लागले आणि त्याचेही मला फार वाईट वाटले. पण त्यानंतर मी आणि रत्ना एकमेकींच्या जीवाभावाच्या मैत्रिणी झालो हे नवल नाही का ? यालाच मी आमचे बालविश्व म्हणेन.
मात्र त्यादिवशी शाळेतून घरी परतल्यावर मी— संध्याकाळी पप्पा ऑफिसमधून घरी आल्यावर त्यांना पहिला प्रश्न विचारला होता,
“आपण आपलं आडनाव बदलू शकतो का ?”
त्यावेळी पपा मिस्कीलपणे म्हणाले होते..
“म्हैसधुणे, धटींगण, झोटींग असे आपले आडनाव असते तर..”
शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे ? मला आजही असं वाटतं नावात खूप काही असतं. सहज आठवलं म्हणून सांगते वरपरीक्षेच्या त्या अप्रिय काळात माझ्या कन्येने “टकले” नावाच्या सर्वगुणसंपन्र स्थळाला केवळ आडनावापायी नकार दिला होता. असो..
रत्ना पेडणेकर ही ठाण्यातल्या एका मोठ्या कलाकाराची मुलगी होती. सिव्हील हॉस्पिटलच्या समोर त्यांचा सुंदर बंगला होता. गणपती उत्सवात तिचे वडील गणेश मूर्ती समोर अतिशय कलात्मक असे पौराणिक कथांवर आधारित देखावे उभे करायचे आणि ठाण्यातली सगळी मंडळी पेडणेकर यांचा गणपती बघण्यासाठी त्यांच्या बंगल्यासमोर प्रचंड गर्दी करायचे.
अशा घरातली ही रत्ना शाळा नंबर १२ मध्ये टांग्याने यायची. सुरेख इस्त्री केलेले तिचे फ्रॉक्स असायचे. तिच्या वडिलांचा ठाण्यात दबदबा होता. हे सांगण्याचे कारण इतकंच की असे असतानाही तिने केलेल्या एका किरकोळ चुकीलाही बाईंनी थोडेसे हिंसक शासन केले पण तिच्या वडिलांनी शाळेत येऊन कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. एकदा आपलं मूल शाळेत गेलं की ते शिक्षकांचं. तिथे हस्तक्षेप नसायचा हे महत्त्वाचं. त्यामुळे घर, शाळा, आजुबाजूची वस्ती ही सारीच आमची संस्कार मंदिरे होती. आम्ही सारे असे घडलो. नकळत, विना तक्रार.
१२ ते ५ अशी शाळेची वेळ होती. एक दहा मिनिटांची सुट्टी आणि एक डबा खायची सुट्टी.
सगळे वर्ग एका शेजारी एक. मध्ये भिंत नाही फक्त एक लाकडी दुभाजक असायचा. वर्ग चालू असताना शेजारच्या वर्गातल्या बाईंचा आवाज आणि शिकवणंही ऐकू यायचं. कुठे गणितातले पाढे, कुठे कविता पठण, कुठे उत्तर दक्षिण दिशांचा अभ्यास, कुठे बाराखड्या, तोंडी गणितं आणि अशा सगळ्या खिचडी अभ्यासातून आम्ही एकाग्र चित्ताने शिकत होतो.
“आईने आणssले चाssर पेरू.
माधवने दोन चोरून खाल्ले. किती उरलेsss ?
आम्ही आमच्या हाताची चार बालबोटं उघडायचो, दोन दुमडायचो आणि एक साथ उत्तर द्यायचो.. दोssन.
मग बाई म्हणायच्या, “शाब्बास !”
आयुष्यातल्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार या साऱ्यांची सुरुवात जणू काही अदृश्यपणे या शाळा नंबर १२ पासूनच सुरू झाली.
आज नातीचा अभ्यास घेताना लॅपटॉप, टॅब्लेट (यास मी आधुनिक युगातली पाटी असेच म्हणते.) त्यावरचे अभ्यासक्रम, उत्तरे देण्याची पद्धत, आकर्षक पुस्तके, त्यातील रंगीत चित्रे ! एकंदरच दृक् श्राव्य अभ्यासाचं बदलतं, नवं,स्वरूप बघताना मला माझी बारा नंबरची शाळा हमखास आठवते.
पण इथेच आम्ही शिकलो, वाढलो घडलो.
आजही नजरेसमोर ते फुलपाखरू बागडतं,
“फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू ..”
नाही तर ….
“देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो ।”
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून
सरसर गोविंदा येतो
मजवरी गुलाल फेकितो…
झिम पोरी झिम कपाळाचा भीम
भीम गेला फुटून
पोरी आल्या उठून..
अडम तडम तडतड बाजा
उक्का तिक्का लेशमास
करवंद डाळिंब फुल्ला…
लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली…
अशा सुंदर गाण्यातून खरोखरच आमचं बालपण हसलं, बागडलं.
मला जर आज कोणी प्रश्न विचारला, ”मराठी भाषेनं तुला काय दिलं तर मी नक्की सांगेन माझ्या मराठी भाषेने मला असं सुंदर काव्यमय बालपण दिलं.”
आजही त्या शाळेतल्या दफ्तराची मला आठवण येते. माझं दफ्तर आणि माझी आई यांच्याशी माझं एक सुंदर, भावनिक अतूट नातं आहे.
आठवणीच्या पेटीत
एक दफ्तर होतं
एक पाटी होती
दफ्तर जागोजागी
ऊसवलं होतं
पाटीही फुटली होती.
पण पाटीवरची अक्षरं
नव्हती पुसली.
कळायला लागेपर्यंत
आईने रोज
पाटी दफ्तर भरलं
वह्या पुस्तकं, खडु पेन्सीली..
आज आई नाही
पण दफ्तर आहे
पाटी फुटली
तरी अक्षरे आहेत
त्या जीर्ण दफ्तरावर आता
माझाच सुरकुतलेला
हात फिरवताना वाटतं,
हेच तर आईनं
दिलेलं संचीत.
वेळोवेळी तिने
हव्या असलेल्या गोष्टी
आत भरल्या.
नको असलेल्या काढल्या.
हळुच….ऊसवलेल्या,
दफ्तरात डोकावून पाह्यलं,
त्यात नव्हते मानअपमान,
दु:खं, निराशा, राग,
होतं फक्त समाधान,
आनंद…. तृप्ती !!
एकेका अक्षरात,
जपून ठेवलेला…
मानवतेचा ओलावा….
खरंच या साऱ्या आठवणींच्या लाटेवर मी तरंगतच राहिले की… आता थोडा ब्रेक घेऊया.
शाळेची घंटा घणघण वाजली
दहा मिनिटांची सुट्टी झाली…
क्रमशः
— राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
राधिकाताईंची लेखनशैली अप्रतीमच आहे.
जडणघडण या सदरातील शाळा नं१२ हा लेख वाचताना त्यांनी सर्वच वाचकांना त्यांच्या त्यांच्या शालेय जीवनात नेले आहे हे
निःसंशय!
राधिकाताईंनी आम्हा वाचकांना त्यांच्यासोबत आम्हालाही पहिली दुसरीच्या वर्गाच्या रम्य आठवणींत नेले.
त्या खरोखरीच महान लेखिका आहेत.
अप्रतीम सहज सुंदर अशी लेखनशैली आहे त्यांची.
धन्यवाद
सुंदर ,सर्व अगदी हुबेहुब डोळ्यासमोर आले.”दप्तर” छान सत्य सांगितले आहे.
धन्यवाद
अप्रतिम शब्दांकन, माझी आई त्या शाळेत शिक्षिका होती. १९६३ च्या आसपास, ते दिवस आठवले